शिंगाडे आणि सॅलेडची बहार...
याशिवाय दुसरा काही पर्याय नाही का....बाहेरुन मागवूया...नाहीतर बाहेरच जेवायला जाऊया...जेवणाच्या ऐवजी कोणी असलं सटरफटर खातं का...तुला खायचं तर खा...मी जेवेन बाहेर...आदी आदी अनेक प्रकारचे डायलॉग नव-याचे चालू होते. पण मी ठाम होते...आमच्या दोघांच्याही समोर दोन मोठे बाऊल भरले होते. त्यात सॅलेड होतं शिंगाडे आणि रताळ्याचे...रविवारचा दिवस...सकाळी उठायला उशीर झालेला. त्यात सायंकाळी चार वाजता एका कार्यक्रमाला जायचे होते. अशावेळी नाष्टा आणि जेवण यांच्यामधले काहीतरी हवे होते. नेहमीचे सगळे पर्याय सोडून मी शिंगाड्याचे सॅलेड करण्याचा निर्णय घेतला. याच सॅलेडनं नव-याचं डोकं फिरवलं होतं. जेवणाचा पर्याय म्हणून सॅलेड कोणी खातं का...म्हणत त्यांनी जी सुरुवात केली ते थांबायचं काही नावच नव्हतं. पण तू खाऊन तर बघ...हे वेगळं सॅलेड आहे, अगदी पूर्णअन्न आहे. पोट भरेल पण जडही वाटणार नाही...चव तर बघ म्हणून मी आर्जव करीत होते...पण त्याचं काही समाधान होत नव्हत...शेवटी थोडं खाऊन घे...नाही आवडलं तर मग सरळ बाहेर जाऊ आणि तू म्हणशील ते खाऊया....नो डायट...पण एकदा तर ट्राय कर...या शेवटच्या वाक्यानं गाडी थोडी शांत झाली. नाराजीनं...अगदी तोंड वेगवाकडं करत सॅलेडचा बाऊल हातात घेतला आणि पहिला घास घेतला. मग मात्र मी निवांत झाले. माझा
माझ्यावर आणि त्या सॅलेडवर विश्वास होता. मुळात शिंगाडा हा एवढा चवदार प्रकार आहे, की त्याला कोणत्याही अन्य चवीची साथ नको असते. अगदी नावाला मिठ असलं तरी चालतं...पण इथे त्या शिंगाड्यासोबत अन्य कंद आणि फळांचे मिश्रण होतं...सोबत थोडा इटालियन टच म्हणून ऑलिव्ह ऑईलचा शिडकावा होता...या सर्वांचा परिणाम म्हणजे सॅलेड उत्तम झालं होतं...पहिला घास घेतल्यावर नवरा ते शांतपणे खायला लागल्यावर मी मनातल्या मनात माझीच पाठ मात्र थोपटून घेतली.
शिंगाडा हा प्रकार माझा लहानपणापासूनचा सोबती म्हणा ना...उकडलेले शिंगाडे, तुरीच्या आणि वालाच्या, शेंगदाण्याच्या शेंगा हा सर्वोच्च चवदार प्रकार असायचा. नंतर काही वर्ष हा शिंगाडा प्रकार बघण्यात आला नाही. काही वर्षांनी ठाण्यात आल्यावर शिंगाडे दिसायला लागले. थंडीच्या दिवसात
सायंकाळी भय्यामंडळी उकडलेले शिंगाडे विकायला घेऊन यायचे. पहिल्यांदा अगदी आवडीनं शिंगाडे घेतले. घरी गेल्यावर हवरटासारखे खायला घेतले...पण तेव्हा लहानपणी खायचो त्यात आणि या शिंगाड्यात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे जाणवले. गाडीवर विकत घेतलेले शिंगाडे एकदम कडक..दगडासारखे होते. पण त्याचवेळी भाजीवाल्या मावश्यांकडेही शिंगाडे विकायला आल्याचे दिसले. हे शिंगाडे घेऊन घरी मिठ टाकून उकळवले. अगदी दहा ते पंधरा मिनिटांनंतर शिंगाडे तयार झाले. पहिला शिंगाडा घाईघाईनं, हाताला चटके सहन करत मधोमध कापला...आणि पांढरा गर अलगद काळ्या सालीपासून दूर झाला. हा गर तसाच गरम गरम तोंडात टाकल्यावर ती लहानपणीची चव सापडली. आता साधारण नोव्हेंबर महिना सुरु झाल्यावर बाजारात येणारे हे शिंगाडे आमच्याकडे आठवड्यातून चार वेळा तरी असतातच. या काळ्या, टणक सालीच्या शिंगाड्यांसोबत हिरव्या आवरणाचे कोवळे शिंगाडेही तेवढेच चवदार असतात. हे शिंगाडे उकडवायची गरज नसते. अगदी साल हातानं सोलता येते, इतके कोवळे असतात. सोलल्यावर मधला गर तर एकदम पाणीदार. नारळातला मोड कोणी खाल्ला असेल तर त्याच्या आसपास जाणारी चव या कोवळ्या शिंगाड्याची असते. हे कोवळे शिंगाडे म्हणजे प्रवासातला मस्त सोबती
असतो. कुठे प्रवास करायचा असेल आणि पोटपुजा राहिली असेल, तेव्हा हे कोवळे शिंगाडे मिळाल्यास प्रवास कधी होतो हे समजत नाही...सोबतच पोटही कधी भरलं याची जाणीव होत नाही. पक्या झालेल्या...म्हणजेच काळ्या सालीच्या शिंगाड्याच्या भाजीची चव मी एकदा चाखली होती. एका उत्तरप्रदेशमधल्या मैत्रिणीनं माझं शिंगाडा प्रेम बघता शिंगाड्याची भाजीही खाऊ घातली होती. तिथे म्हणे थंडीत हा आवडीचा पदार्थ असतो. ही रस्सा भाजी अप्रतिम झाली होती, सोबत डाळीच्या पु-या होत्या...पण हा प्रकार मी एकदाच खाल्ला...आवडला तरी मी मात्र स्वतः केला नाही...मला त्या उकडलेल्या शिंगाड्यांच्याच चवीची मोहिनी अधिक आहे. एवढ्यावरच ते केवढेतरी चवदार लागतात त्यात अधिक प्रयोग कशाला हा माझा दृष्टिकोण होता...असो...पण नंतर मात्र या उकडलेल्या शिंगाड्यावर एक प्रयोग सुरु केला, तो म्हणजे शिंगाड्याचे सॅलेड.
ट्रॅव्हल लिव्हींग चॅनेल बघून अनेक प्रकारचे सॅलेड करण्याचा छंद लागला. त्यातूनच या शिंगाड्याच्या सॅलेडचा जन्म झाला. ब-याचवेळा घरात एकटं असल्यावर जेवायला काय करायचा हा प्रश्न पडायचा. थोडा कंटाळा यायचा...त्यातून हा नवा सॅलेडचा प्रकार मला जमला. आणि नंतर दरवर्षी त्यात अधिक भर पडत गेली, अर्थात त्याबरोबर चवही बहारदार होत गेली.
ही शिंगाड्याच्या सॅलेडची कृती अगदी साधी. आधी शिंगाडे शिजवून
घ्यायचे. एकीकडे कंद आणि रताळेही उकडायचे. या दोघांना शिजायला थोडा वेळ लागतो. हे मुळ काम. त्यानंतर शिंगाडे सोलून मध्ये कापून घ्यायचे. कंदही सोलून कापून घ्यायचे...आणि रताळेही...मी अलिकडे या कंद आणि रताळ्याच्या कापा अगदी जराश्या तुपावर शॅलोफ्राय करुन घेते. त्याचवेळी या कापांवर अगदी बारीक केलेली काळीमिरी पावडर टाकून ठेवते. याच तव्यावर मग गॅस मोठा करुन अननसाच्या कापा परतते. थोडी भाजल्याची चव येते. ही चव अप्रतिम लागते. त्यावरही काळीमिरीची पावडर पेरायची...हा एवढाच गॅसचा प्रवास...बाकी सर्व मग आपल्या-आपल्या आवडीचा प्रकार...मोठ्या बाऊलमध्ये शिंगाडे, कंद आणि रताळ्यांच्या फोडी, अननसाचे तुकडे, संत्र्यांच्या सोललेल्या फोडी, पिकलेल्या पेरुच्या फोडी यांना एकत्र करावं. काहीवेळा या सर्वात मी उकडलेले छोलेही मिसळले आहेत. सोबत छोटो टोमॅटो असले तर तेही छान लागतात. या सर्वात ऑलिव्ह ऑईल थोडी वेगळी चव म्हणून मी टाकते. पण सॅलेडवर तेल टाकण्यापूर्वी एका छोट्या डब्यात अगदी दोन चमचे तेल घेते, त्यात पुदिना आणि कोथिंबीर बारीक करुन, काळीमिरीची पुड, काळं मिठ, थोडा चाट मसाला, चिमुटभर साखर आणि मिठ, थोडी सुंठ पावडर हे सर्व टाकून चांगलं ढवऴून घ्यायचं. मग हे तेल बाऊलमधल्या सॅलेडवर टाकून पुन्हा एकदा मिक्स करुन घ्यावे. इथपर्यंत या सर्वात सगळे रंग एकमेकांत मिक्स होऊन जातात. खायला घेतांना या सर्वात वरुन डाळींबाचे दाणे टाकले की सॅलेड खायला तयार...
थंडीच्या दिवसात या अशा सॅलेडवर मी अनेकवेळा दुपारच्या जेवणाची कसर भरुन काढली आहे. गेल्या दोन वर्षात मात्र असा प्रकार झाला नव्हता. आता दोन वर्षांनी सॅलेड केलं असलं तरी त्याची चव तशीच भन्नाट असणार याची खात्री होती. एव्हाना नव-यानं काहीही तक्रार न करता सॅलेडचा बाऊल संपवला होता...त्यामुळे सॅलेड कसं झालं हे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. पोट भरल्याची जाणीव होत होती...शिवाय जिभेवर शिंगाडा, अननस, संत्र यांची चव येत होती. ऑलिव्ह ऑईल आणि काळीमिरीचा तिखटपणाही सोबत होता. एकूण अर्धा तासापूर्वी वैतागलेला नवरा या चवीपुढे नरमला होता. अधून मधून करत जा हा प्रकार म्हणत त्यानं कौतुक केल्यावर तर माझा चेहरा अगदी खुलला...शिंगाड्याची जादूच अशीच आहे. शिंगाडा हा प्रकार खातांना कधी त्यापासून काय फायदा होतो याचा विचारच केला नव्हता...मात्र अलिकडे आपण काय खातो, त्याचे फायदे किती आणि तोटे किती हे जाणून घ्यायला लागले...तेव्हा या काळ्या खजिन्याची महती कळली. यात फायबरचे प्रमाण भरपूर असते. शिवाय पाण्याचे प्रमाणही जास्त असते. शिंगाड्यांनी पोटाचे
आरोग्य सुधारते. पचनशक्ती वाढते. काविळीवर रामबाण उपाय म्हणून शिंगाडे खाल्ले जातात...एवढी वर्ष फक्त चवदार म्हणून या शिंगाड्यांचा मी फडशा पाडत होते. आता त्यांच्या गुणधर्मांची माहिती मिळाल्यावर शिंगाड्यांचा अधिक वापर होऊ लागला. त्यातूनच सॅलड तयार झाले. एकूण काय मंडळी...आता हिवाळा सुरु झालाय...गार वा-याबरोबर आता बाजारात अनेक चवदार भाज्यांची हजेरी लागणार आहे. सोबत फळांनी बहार आणलेली असेल. मटार आणि गाजर यांची चढाओढ लवकरच सुरु होईल...यातून अशा अनेक नव्या-जुन्या पदार्थांची घरोघरी रेलचेल सुरु होईल...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान चला आता ह्यावेळी शिंगाडा सलाड बनवावेच लागेल 😊
ReplyDeleteनक्की करा...
Deleteवाह सलाड एकदम मस्त.
ReplyDeleteपुढच्या आठवड्यात नक्की बनवेन.
ये टेस्ट करायला ठाण्यात.
नक्की...
Deleteवाह सलाड एकदम मस्त.
ReplyDeleteपुढच्या आठवड्यात नक्की बनवेन
खूपच छान सॅलड चा प्रकार सांगितला.. 👍👍👌👌
ReplyDelete