सुरेल अबोली...

 

सुरेल अबोली...


आठवड्यात शनिवार आणि रविवार हे दोन वार कसे येतात आणि कसे जातात याचा हिशोबच लागत नाही.  साधारण दोन आठवड्यापूर्वीही असेच व्यस्त असे हे दोन दिवस गेले.  पण यातही एक सुरेल साथ मिळाली.  शनिवारी संध्याकाळी एका संगीत कार्यक्रमाचे बोलावणे होते.  त्याच संध्याकाळी मल्टी टास्क होता.  दोन वाढदिवस, एक साखरपुडा आणि त्यात हा कार्यक्रम...गायिकाही नवखी वाटली...त्यामुळे संध्याकाळी कसं होतं ते ठरवू आणि वेळ मिळालाच तर कार्यक्रमाला जाऊ असं ठरवलं...नेमका एक वाढदिवस रात्री दहा नंतर साजरा करणार होते...त्यामुळे मध्ये अर्धा तासांचा वेळ मिळाला...त्यात या गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही खरेदीचं आटपा असं सांगत मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊन बसले.  सभागृह छोटं असलं तरी सर्व खचाखच भरलं होतं...स्टेजवर एकटी गायिका होती, आणि समोरचे प्रेक्षक तिच्या सुरेल स्वरांना दाद देत होते...मी गेले तेव्हा ऐसा समॉं न होता, कुठ भी यहॉं न होता...मेरे हमराही जो तुम न होते...हे जमीन आसमां या चित्रपटातील लता मंगेशकर यांचे गाणे गायिका सादर करीत होत्या...सूर एवढा जुळला होता की मी ऐकत असलेल्या पहिल्याच गाण्यात रंगून जायला झालं...गाणं झालं की त्या गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत काम करतांनाचा आपला अनुभव श्रोत्यांना सांगत होत्या...मग  पुन्हा दुसरं गाणं...बाहों मे चले आओ...एव्हाना माझा अर्धा तास उलटून गेला...नव-याचे फोन सुरु झाले...तेव्हा तू पण ये...कार्यक्रम सुरेल आहे, असा त्याला उलटा मेसेज पाठवला...अगदी कोप-यात आम्हा दोघांना जागा मिळाली...फक्त अर्धा तास म्हणून आलेले मी तर या गाण्याच्या मैफीलीमध्ये रंगून गेले आणि नंतर नवराही त्या सुरांमध्ये सर्व धावपळ विसरुन रममाण झाला...ती गायिका होती, अबोली ठोसर...लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या छायेत कोरसमध्ये गायला मिळालेली गुणी गायिका...अबोलीचा सूर एवढा पक्का की हा कार्यक्रम झाल्यावरही तिच्याबद्दल उत्सुकता लागून राहिली...एवढी उत्तम गायिका आत्तापर्यंत होती कुठे हा प्रश्न पडला.  पण या प्रश्नाचे उत्तरही मिळाले...गेल्याच आठवड्यात या गायिकेला भेटण्याचा योग आला...


अबोली ठोसर ही डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉक्टर निळकंठ ठोसर यांची मुलगी.  अबोली यांच्या आई, मीरा ठोसर या संगीत विशारद.  त्यांनी आणि डॉक्टर ठोसर यांनी अबोलीला गाण्यासाठी प्रवृत्त केलं.  अगदी दुसरीत असल्यापासून अबोली लिला आघारकर यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी जायची. लहानपणी आईच्या हट्टाखातर गाणं शिकणारी अबोली नंतर या सारेगमपच्या सूरात रमली.  बारीवीच्या परीक्षा देता देताच तिनं गांधर्व महाविद्यालयाकडून संगीत विशारद ही पदवी मिळवली.  दरम्यान छोट्या मोठ्या कार्यक्रमात तिला गाण्याची संधी मिळत होती.   लोकप्रिय कार्यक्रमातही अबोली गायची.  डॉ. ठोसर यांच्याकडे अनेक मान्यवर उपचारासाठी येत असत, ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी हे त्यापैकीच एक.  अबोलीचे गाणे ऐकून त्यांनी तिला गाणे शिकवण्याचा आग्रह केला.  त्यानुसार अबोली पुजारी यांच्याकडे जायला लागली.  पुढे दशरथ पुजारी यांनी संगीतकार अनिल मोहिले यांच्याकडे अबोलीचे नाव सुचविले.  अनिल मोहिले लतादिदींच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम करत होते.  त्यांनी अबोलीचे गाणं ऐकल्यावर तिला थेट लतादिदींच्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाण्याबाबत विचारणा केली. 

केवळ उत्तम आवाज आणि सूरांची जाण या जोरावर अबोली मग एकामागोमाग एक अशा यशाच्या पाय-या चढू लागली.  लतादिदींसोबत कोरसमध्ये गाणं हा अबोलीच्या जीवनातला सूवर्णक्षण ठरला.  एवढी महान गायिका.  मात्र अत्यंत विनयशील.  आदारशील.  समोरचा कितीही नवखा असला तरी त्याला अहो-जाहो...संबोधणारी.  अबोली लतादिदींचा हा नम्रपणा जवळून बघत होती....आणि या सर्वात वरचढ म्हणजे लतादिदींना गातांना बघणं...अबोली यांनी या सर्वांचा अगदी जवळून अनुभव घेतला.  लतादिदींसोबत सात ते आठ थेट कार्यक्रम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.  एक उत्तम कोरस गायिका म्हणून त्यांची ओळख झाली.  भूपेन हजारिका


, बप्पी लहरी, सोनू निगम, जतिन ललित यांच्यासोबतही काम करण्याची संधी त्यांना मिळाली.  एका प्रसिद्ध संगीतकारांनी तिला लतादिदींच्या कार्यक्रमात ऐकलं होतं.  लतादिदींच्या कार्यक्रमात ते नेहमी असत.  अबोली नोटेशन्स लिहितांना त्यांनी पाहिलं होतं, तेव्हा त्यांनी आयोजित केलेल्या शो साठी अबोलीला गाण्याबाबत विचारलं.  अबोलीनं त्यांना होकार दिला.  तो कार्यक्रम होता रोशन शो.  अबोली यांना यातून रोशन कुटुंबासोबत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. 

या सर्वांदरम्यान अबोली टिव्हीच्या अनेक स्पर्धांमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली.  सारेगम, मेरी आवाज सुनो, स्टार यार कलाकार...अमिताभ बच्चनच्या एबीसीएलतर्फे झालेल्या एका स्पर्धेमध्येही अबोली सहभागी झाली होती.  त्यात चाळीस हजार स्पर्धकांमधून चाळीस जणांची निवड झाली.  त्यात अबोलीचा समावेश होता.  स्टार यार कलाकारमध्ये ती अभिनेते जॉकी श्रॉफ यांच्यासोबत सहभागी झाली आणि विजयीही झाली होती.  कुठल्याही शिफारशीशिवाय अबोलीचा हा सगळा प्रवास सुरु होता.  तिचा आवाज आणि पक्के सूर हेच तिचे भांडवल होते.  2012 पर्यंत अबोली या गाण्याच्या प्रवाहात व्यस्त होती.  मात्र नंतर कौंटुबिक जबाबदारी किंवा गाणं यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली.  तेव्हा कुठलाही विचार न करता अबोलीनं कुटुंबाला प्राथमिकता दिली.  सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत रेकॉर्डींगमध्ये व्यस्त असणारी अबोली, अचानक शांत झाली.  पण आपल्या जबाबदा-यांची जाणीव तिला होती, त्यासोबतच गाण्याचा रियाजाचीही होती.  न चुकता हा रियाज तिच्यासोबत राहीला.  मध्यंतरी लॉकडाऊनच्या दरम्यान अबोलीनं आपल्या शाळेत एक गाणं गायलं.  हा तिचा गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र शेअर झाला.  तेव्हा अबोलीनं पुन्हा आपल्या गाण्याचं मनावर घेतलं.  लतादिदींच्या सोबत काम केल्यावर त्यांच्याबद्दलचा अनुभवाचा खजाना तिच्याकडे आहे.  याची माहिती सर्वांना व्हावी असा तिचा प्रयत्न आहे.   त्यातूनच तिनं सोलो कार्यक्रम करण्याचा निश्चय केला.  तिच्या या निर्णयाला पुंडलिक पै आणि श्रीरंग कुलकर्णी या दोन दर्दी आणि जाणकारांनी साथ दिली.  अबोलीचा कार्यक्रम सादर झाला.  मी आणि माझे


पती ज्या गाण्याचा कार्यक्रमात गुंग झाले होतो, तो अबोलीचा कार्यक्रम.  अबोली तेव्हा तब्बल दहा वर्षांनी स्टेजवर आली होती.  या दहा वर्षात अबोलीच्या मते सगळं बदललं आहे.  सोशल मिडीया नावाचं नव व्यासपीठच निर्माण झालं आहे.  अबोली या सर्वांपासून कोसो दूर आहे म्हणा ना...पण ती सूरांच्या अधिक जवळ गेली आहे.  आम्ही दोघंही त्या कार्यक्रमातून बाहेर पडलो तेव्हा अबोली गाईड चित्रपटातलं पिया तोसे नैना लागे रे....नैना लागे रे....हे लतादिदींचे गाणं गात होती...त्यामुळे दरवाजातच घुटमळत असतांना तिनं शांता शेळकेंचं माजो लवताय डावा डोळा...जाई जुईचो, गजरो माळता हे गाणं घेतलं...अबोलीचे हेच गाणं गुणगुणत आम्ही तिथून निघालो होतो.  अबोलीसोबत नंतर बोलतांनाही तिच्या याच गाण्यांची जादू जाणवत होती.  खरंतर अबोलीनं घेतलेला निर्णय ऐकून ती अधिकच आपलीशी वाटू लागली.  कारण फिल्मी जगात जी मंडळी वावरतात त्यांना एक दिवसांचा ब्रेक घ्यायला सांगितला तरी नकोसं वाटतं...एवढी त्या मायानगरीची जादू आहे.  इथे तर अबोली चक्क दहा वर्ष दूर राहिली...पण ती फक्त मायानगरीपासून दूर राहिली, गाण्यापासून नाही.  त्यामुळेच दहा वर्षानंतरही स्टेजवर वावरतांना तिचा आत्मविश्वास पक्का होता आणि सूर सुरीले....ही अबोली आता अशीच गात रहाणार आहे,  लतादिती, आशाताई यांच्या अनुभवासह अबोलीचे सुरेल कार्यक्रम होत रहाणार आहेत. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 



Comments

  1. Khup chhan lekh

    ReplyDelete
    Replies
    1. एका गायिकेचा प्रवास उत्तम लिहिलाय, इन्सपायर होण्यासारखा आहे.

      Delete
  2. Khup chhan lekh.

    ReplyDelete
  3. किती सुंदर लिहिलं आहे..
    वाचताना काटा आला अंगावर.
    मी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जाऊ शकले नाही.
    तुला खूप खूप शुभेच्छा अबोली...

    ReplyDelete
  4. अबोली तुला मी लहानपणापासून ओळखते मला तुझा सार्थ अभिमान आहेच पण कुटुंब व करियर यात मुलं मुली सहसा आपले करिअर निवडतात पण तु त्याला अपवाद आहेस. एखाद्या मुलालाही लाजवेल अशी कुटुंबाची जबाबदारी तु समर्थ पणे पार पाडत आहेस अजूनही, तु आता परत करिअरकडे लक्ष देत आहेस बघून मला खूप आनंद होत आहे. तुझ्या पुढील वाटचालीस माझे खूप खूप आशिर्वाद व शुभेच्छा. तु अशीच उत्तरोत्तर प्रगती करशील याची मला खात्री आहे.तुझी ताई

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद..अबोलीच्या या वेगळेपणामुळेच तिच्याबद्दल लिहावेसे वाटले

      Delete
  5. अबोलीला खूप वर्षांपासून ओळखते. पै काकांकडचा तिचा कार्यक्रम फारच सुंदर झाला होता. तिच्या बद्दल लिहून तिच्या गाण्याला ही तू खरीखुरी दाद दिली आहेस.

    ReplyDelete
  6. Proud Feeling that अबोली is my friend

    ReplyDelete
  7. अबोलीचा शुभमंगल कार्यालयातील कार्यक्रम आम्ही अनुभवला होता.ती गाते सुंदरच पण स्टेजवर ज्या आत्मविश्वासाने ती निवेदन,गायन, आणि इतर गोष्टी एकटीने हॅन्डल करीत होती त्याला हॅटस् आॅफ..तिच्या आई वडिलांचे आशिर्वाद तिच्या पाठीशी आहेतच आणि तिचे स्वतःचे कष्ट व जिद्द यामुळे तिला हे यश मिळत आहे.असेच उत्तरोत्तर यश तिला मिळो हिच सदिच्छा. बने यांनी अबोली बद्दल लिहीलेला लेख सुंदरच आहे.

    ReplyDelete
  8. खुप मस्त मांडले

    ReplyDelete
  9. छान सांगीतिक प्रवास मांडला आहे

    ReplyDelete
  10. आयुष्यात घेतलेल्या कष्टाचे फळच आहे हे, की एवढ्या मोठ्या कलाकारांकडून शाबासी मिळते.. अशीच उत्तम प्रगती उत्तरोत्तर होत राहू दे देवा.

    ReplyDelete
  11. अबोली तू तुझ्या बोलक्या स्वरांनी सर्वाना अबोल करून सर्वांचे कान बोलके केलेस सही आहेस तू

    ReplyDelete
  12. Aboli- Keep going and progressing!-Madhao kaka

    ReplyDelete
  13. Aboli!-Keep going and progressing - Madhao Kaka

    ReplyDelete
  14. Thank you so much everyone n especially dear Sai Bane Mam for this blog.

    ReplyDelete
  15. धन्यवाद सई, आनंद च्या आमच्या शाळेतील मित्राच्या बहिणीची एवढी कर्तृत्व संपन्न ओळख तुझ्यामुळे झाली 🙏🏽
    अबोलीला खूप शुभेच्छा👍💐

    ReplyDelete

Post a Comment