शेवग्याच्या पानांच्या भाजीचा महिमा...

 

 शेवग्याच्या पानांच्या भाजीचा महिमा...


अक्कलदाढ बहुधा उशीराच येते....तसंच खाण्याच्या बाबतीतही होतं बहुधा...लहानपणी अमृताचा झरा आसपास वहात असतो.  आणि आपण त्याला बेचव म्हणून टाळतो.  पुढे मोठं झाल्यावर या बेचव वाटणा-या पदार्थांमध्येच आयुष्याच्या सुखाचा...आरामाचा आणि वयामानानुसार अंगात भिनणा-या आजारपणाचा उतारा आहे, याची माहिती मिळते.  मग लहानपणी अगदी फुकटात मिळणारे अमृत, सोन्याच्या मुल्यानं घरात आणलं जातं...कोण कौतुकात त्याच्यावर स्वयंपाकघरात संस्कार केले जातात...आणि त्याही पेक्षा कौतुकात भाकरीसोबत या अमृताच्या पदार्थांचा घास चवीचवीनं खाल्ला जातो...वरुन आज किती पौष्ठिक पदार्थ खाल्ला...चवही झकास झाली होती...किती गुणकारी आहे तो...वगैरे वगैरे...गप्पा मैत्रिणींसोबत हक्कानं मारल्या जातात....मग त्यांच्याही कानावर या पदार्थाची महती गेली की, पुढच्या आठवड्यात आणते हं...तुला पाठवते नक्की....म्हणून सांगावा धाडला जातो....ही अमृताचं मुल्य असणारी भाजी म्हणजे, शेवग्याच्या पानांची भाजी....लहानपणी रेवदंड्याला आमच्या घराच्या अंगणातच ही शेवग्याची दोन


झाडे होती.  आमच्याच काय, तिथे प्रत्येकाच्या अंगणात ही एक-दोन शेवग्याची किंवा  शेगटाची झाडे असणारच.  या शेवग्याच्या पानांची भाजी करायची असेल तर तो लगेच पानं काढून भाजी व्हायची....शेंगाही तशाच...अगदी ताज्या ताज्या...पण तरीही शंभरवेळा नाक मुरडून या भाजीचा एखादा घास तोंडात जायचा...आता त्याच भाजीचं मोल कळल्यावर मात्र बाजी उलटली आहे. 

रेवदंड्याला आमच्या घरी कृष्ण जन्माच्या वेळी ही शेवग्याच्या पानांची भाजी असायचीच....नैवेद्यावर....पण तेव्हा मस्ती किती...आईंनं केलेला प्रत्येक पदार्थ चवदार असायचा.  पण या भाजीचं आणि माझं कधी जमलं नाही.  हे काय...ही घासपूस मी खाणार नाही...म्हणून भोकाड पसरायचे...अगदी पाण्याबरोबर गिळ...हा आईचा ऑप्शनही मी अनेकदा रडक्या आवाजात निकरानं नाकारला आहे.  आता माझ्याकडे काय परिस्थिती...तिच भाजी मी आनंदानं बनवते....आणि आनंदनं खाते...शिवाय लेकानं ती खावी म्हणून कोण प्रयत्न करते...दुनिया गोल आहे, म्हणतात ना...ती अशी....

गेल्या काही वर्षापूर्वी नव-याच्या पाठिचे दुखणे अचानक पुढे आले होते.  डॉक्टर, हॉस्पिटल...हे सर्व प्रकार झाल्यावर नंतर त्यावर घरगुती उपायांची शोधाशोध सुरु झाली.  त्यावेळी या शेवग्याच्या भाजीचा उपाय सापडला.   हाडांच्या मजबुतीसाठी काही आवश्यक तत्व या शेवग्याच्या भाजीत असतात, असे सांगत एका परिचितांनी डबाभर  शेवग्याच्या पानांची भाजी आणली.  तो


भाजीचा डबा पाहिल्यावर पहिल्यांदा आई आठवली...आणि तिचा तो आग्रह आठवला.  त्यानंतर शेवग्याच्या पानांच्या भाजीची गुणवत्ता शोधण्यासाठी थोडी पुस्तकं चाळली...मग समजलं फक्त पानंच नाही तर शेवग्याची फुलं आणि शेंगाही कितीतरी गुणकारी असल्याची माहिती मिळाली.  त्यादिवसापासून शेवग्याचा पाला, फुलं आणि शेंगाही घरात हक्कानं येऊ लागल्या...आणि त्याच्या चवदार पदार्थांना ताटात मानाचे स्थान मिळाले. 

शेवग्याची पानं जेव्हा घरी यायला लागली, तेव्हा माझा लहानपणीचा प्रश्न पुन्हा पुढे आला... शेवग्याच्या पानांची भाजी कोण खाणार....त्यामुळे या पानांवर प्रयोग सुरु झाले.  पहिल्यांदा शेवग्याच्या पानांची साधी भाजी केली.  भरपूर लसूण, कांदा, मिरची आणि त्यावर शेवग्याची पानं...भाजी परतून तयार झाल्यावर त्यात मुठभर ओलखोबरं.  भाकरीसोबत ही भाजी पानात आल्यावर मी आणि नव-यानं औषध म्हणून पहिल्यांदा घास घेतला....पण नंतर भाजीची  चव समजली आणि ती भावलीही, आणि मग हसत-खेळत भाजी पोटात जाऊ लागली.  पण इथे प्रश्न होता तो लेकाच...त्याच्या नकारापुढे माझे काही चालेना...बरं ओरडणार तरी कसं...माझ्या लहानपणीच्या आठवणी सोबत होत्याच की...मग करायचं काय...याचं सोप्पं आणि चवदार उत्तर सापडलं.  दर सोमवारी होणा-या थालिपीठांमध्ये कोथिंबीरीच्या ऐवजी शेवग्याची पानं


टाकायला सुरुवात केली.  लोण्याबरोबर थालिपीठ खातांना लेकाला चवीची कधी जाणीव झाली नाही.  किंबहुना या शेवग्याच्या पानांमुळे थालिपीठाची चव अधिक वाढली.  मग मेथीच्या थेपल्यांसारके शेगटाच्या पानांचे थेपलेही होऊ लागले...आणि तेही चवीनं पोटात जाऊ लागले.  शेवग्याच्या शेंगांचा प्रश्नच नव्हता....या शेंगाही कशातही टाका त्या चोखून चोखून खाणारच....त्यातही गुळ टाकलेली...आणि गोडा मसाल्याचा मारा असलेली...शेंगवणी केली तर भाताचे दोन घास जास्तच जाणार....शिवाय कोलंबी असो की सुकट...कशातही शेंगा टाकून परतल्या की त्या चवदार लागणारच...साधं वरण असो वा आंबट वरण...वालपावट्याची भाजी तर या शेंगांशिवाय होणारच नाही....पण या सर्वात शेवग्याच्या फुलांच्या भाजीनं खरी बहार  आणली.

शेवग्याच्या पानं सहज मिळतात...पण बाजारात काही वेळेला शेवग्याची पांढरी शुभ्र फुलंही दिसायची...पण या सुंदर फुलांची भाजीही होते, याची कल्पना नव्हती.  एकदा ही फुलं,  नेहमीच्या भाजी विक्रेत्या महिलांकडून घेतली.  ही भाजी देतांना त्यांनी भाजीची रेसिपीही मला सांगितली.  फक्त भाजीच नाही तर भजीचीही रेसिपी सांगून फुलांचा एक जादा वाटा दिला होता.  घरी आल्यावर पहिल्यांदा त्यांनी सांगितल्यासारखी शेवग्याच्या फुलांची भाजी आणि भजी केली...तेव्हा लेक शाळेत होता.  शाळेतून आल्या आल्या त्याला ही फुलांची भजी खायला दिली.  पहिला घास घेतल्यावरच त्याची व्वा...ही पावती मिळाली.  तेव्हापासून बाजारात शेवग्याची पांढरी शुभ्र फुलं दिसली की ती घरात अगदी पिशवी भरुन यायला लागली. 

शेवग्याच्या फुलांची भाजी चवदार असली तरी ती फुलं साफ करण्याचा पहिला


टप्पाच जरा अवघड असतो.  तो पार पडला की सर्व सुरळीत होतं.  फुलं बाजारातून आणल्यावर एका मोठ्या ताटात घेऊन अगदी तांदूळ निवडतो, तशी निवडून घ्यावीत...कचरा किंवा पिवळी पडलेली, सुकलेली फुलं बाजुला काढून टाकावीत.  फुलं पाण्यातून स्वच्छ धूवून घेतल्यावर एका चाळणीत फुळं ठेवायची.  नंतर साधारण कोमट पाणी करुन घ्यायचे.  आणि चाळणीत ठेवलेल्या फुलांवर हे पाणी टाकायचे.  ब-याचवेळा लाल किंवा काळ्या मुंग्या या फुलांत असतात.  गरम पाणी टाकल्यावर या मुंग्या किंवा काही अन्य कचरा असेल तर तो निघून जातो.  बाकी प्रोसेस नेहमीसारखी.  भरपूर लसूण कुटून घ्यायचा.  सोबत हिरव्या मिरच्यांचे तुकडे.  तेलावर हे थोडं परतायचं.  फक्त नेहमीच्या पालेभाजीत घातला जात नाही तो चिमुटभर ओवा या भाजीत घालायचा.  त्यावर भरपूर कांदा...तो तेलावर थोडा नरम झाला की त्यावर शेवग्याची फुलं.  अगदी दोन-चार मिनिटात भाजी तयार होते.  वरुन मुठभर खोबरं हे आलंच...ही भाजी अप्रतिम लागते.  शिवाय ती पालेभाजीसारखी हिरवी नसते...त्यामुळे रंग बघून मुलं टाळत नाहीत, हा माझा स्वानुभव आहे.  पण यापेक्षाही शेवग्याच्या फुलांची भजी चवदार होते. 

फुलं अशीच साफ करुन घ्यायची.  अगदी चार वाटी फुलं असतील तर त्यात एक वाटी भिजवलेली चणाडाळ बारीक वाटून टाकायची.  शिवाय कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, ओवा आणि मिठ घालून हे मिश्रण छान मळून घ्यायचे.  पाच ते दहा मिनिटं हे भजीचं मिश्रण ठेवलं की, त्यात कांद्याचं पाणी सुटतं आणि मिश्रण थोडं हलकं होतं.  मग सरळ गरम तेल


करुन त्यात छोटे गोळे टाकून तळायला सुरुवात करायची.  या शेवग्याच्या फुलांच्या भजीची चव अगदी न्यारी लागते.  अगदी पिशवी भरुन जरी फुलं आणली तरी ती कमीच पडतात, असा हा चवीचा महिमा. 

एकूण काय...आपल्या आसपासच आरोग्याचा सर्व खजिना असतो.  पण त्याची किंमत आपल्याला माहित नसते.  मला सापडलेली ही शेवग्याच्या पानांची भाजी ही खजान्यासारखीच.  लहानपणी घराच्या अंगणात अगदी फुकट मिळणारी ही भाजी, आता पैसे देऊन खरेदी करायला लागते.  क्वचित कधी गावाला गेलं तर शेवग्याच्या शेंगाची मोठी मोळीच हाती लागते.  मग कोण कौतुकात साफ करुन डब्यात भरलेल्या या शेंगा किमान महिनाभर तरी चालतात...पण पानांचे आणि फुलांचे असे नाही.  बाजारात ठराविक महिन्यात या पानां-फुलांची बहार येते.  ही बहार नक्की घरात आणावी....यात चवीतही बदल होतोच पण आरोग्यासाठीही त्याचा फायदा आहेच की...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. भाजीच्या रेसिपी इतकाच लेखही मस्त!!

    ReplyDelete
  2. अप्रतिम , आपल्या वर्णन शैलीमुळे लेख मनामध्ये रुंजी घालू लागतो आणि पदार्थाची चव तोंडावर रेंगाळू लागले.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....पानांची भाजी नक्की करुन बघा....

      Delete
  3. मनकी बात सई.
    काखेत कळसा न गावाला वळसा अशी आपली गत असते.
    शेंगोळ्याही छान होतात

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना....शेंगोळ्याही दोन प्रकारे होतात....तिखटाच्या आणि गोड्या मसाल्याच्या....एकूण शेगटाच्या रेसिपींचे वेगळे पुस्तक निघेल...

      Delete
  4. नेहमीप्रमाणेच तुमचा लेख खुसखुशीत! शेंगांचा वापर सर्रास करतो, पण आता पानं आणि फुलांची भाजी आणि भजी नक्की करून खाणार! वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय. 😋

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...नक्की ट्राय करा...

      Delete
  5. Masala bhaji ,,,kadhit shenga takun chan hote

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....अरे व्वा...हे नवीन कळले....आता हे ही करुन बघते...

      Delete
  6. लेख नेहमीप्रमणेच उत्कृष्ट आणि चविष्ट , तोंडाला पाणी सुटते वाचून पण !

    ReplyDelete
  7. शेवग्याच्या छान रेसिपी कळल्या .सई लिखाण तर छानच सहज गप्पा मारल्या सारखे

    ReplyDelete

Post a Comment