आठवणींच्या कप्प्यातील मोरपीस....

 

 आठवणींच्या कप्प्यातील मोरपीस....


आयुष्यात अशा अनेक आठवणी असतात, ज्या सोनेरी असतात.  त्यांची जागा वहितल्या त्या मोरपीसासारखी असते...अगदी निवांतवेळी ती वही उघडायची....आणि ते मोरपीस हळूवारपणे आपल्या चेह-यावर फिरवायचे...ही किती छोटी कृती...पण यानं मनावरचा सगळा ताण निघून जातो...मन प्रसन्न होतं...तसंच गेल्या आठवड्यात झालं.  आठवणींच्या कप्प्यातलं एक मोरपीस असंच माझ्या मनावरुन हळुवार फिरलं...आणि मोजता येणार नाही, असा आनंद देऊन गेलं.  माझ्या आठवणीतल्या या मोरपीसाचं नाव आहे अर्थव....अर्थव बोरकर....आमचे धुळ्याचे स्नेही डॉक्टर ज्योती बोरकर यांचा धाकटा मुलगा.  आमचं कुटुंब रेवदंड्याचं....ही बोरकर मंडळी धुळ्याची....दोन्ही गावांचे वातावरण म्हणजे टोकाचा फरक...एकीकडे हिरवळ तर दुसरीकडे गरम हवेच्या झळा...पण या सर्वातही आम्ही दोन्ही कुटुंबियांची मने एकमेकांत गुंतली...ती आजपर्यंत...धुळ्यात रहात असतांना दीड महिन्यांचा असल्यापासून अर्थव आमच्या घरी यायचा...त्याचे कालपरवा लग्न झाले.  या लग्नसमारंभानिमित्त सगळ्या आठवणींचा कप्पा पुन्हा एकदा उघडला.  मध्यंतरी अनेक वर्ष निघून गेलेली.  पण भेटल्यावर जाणवलं ही मधली वर्ष फक्त आकड्यांमध्ये होती...बाकी प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा....आहे तसाच आहे....


आलिबाग...रेवदंड्यामध्ये माझं बालपण गेलं.  बारावी झाल्यावर काही कारणांनी आम्ही काही वर्षासाठी धुळ्याला रहायला गेलो.  धुळ्याला रहायला जाणे, हा माझ्या जीवनातला एक मोठा टप्पाच ठरला.  एकतर तेव्हा कधी धुळे हे नाव ऐकलेच नव्हते.  भुगोलाच्या पुस्तकाऐवढा त्या जिल्ह्याबरोबर संपर्क आलेला.  आता तिथेच आपल्याला रहायचे आहे, हे ऐकल्यावर पोटात मोठा गोळा आला होता.  कसे असेल.  अगदी साधे खेड्यासारखे असेल....मग तिथे करायचे काय....शिक्षणाचे काय....असे नको नको ते प्रश्न मनात येत होते.  पहिल्यांदा वडीलांबरोबर धुळ्याला गेले ते बसने...मुंबईहून धुळ्याला झालेल्या या प्रवासात मी एक क्षणही झोपू शकले नव्हते.  खिडकीची जागा पकडून मी सतत बाहेर बघत होते.  बाहेरचं वातावरण बघून अजून धास्तावत होते.  आलिबागहून रेवदंड्याला जायला निघालं तर सर्व रस्ता हिरवाईनं नटलेला....पण इथे त्याच्यापेक्षा वेगळं वातावरण...उगाच एखादं झाडं दिसायचं...बाकी सर्व मोकळी जागा....मी वडीलांसोबत रात्री अकराच्या सुमारास आमच्या धुळ्याच्या घरी पोहचले.  धुळ्याच्या कमलाबाई अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयात वडील काम करत होते आणि त्याच महाविद्यालयाच्या आवारात असणा-या घरांपैकी एका घरात आमचं कुटुंब रहात होतं.  काही दिवसातच धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात मी प्रवेश घेतला...अगदी आठवड्यातच जाणीव झाली, धुळं खूप वेगळं आहे.  वेगळं म्हणजे, वेगळंच...धुळ्यातले वातावरण रुक्ष आहे, मान्य...पण तिथल्या लोकांची मनं तेवढीच साधी आणि मऊसूत...माझ्या मनातला किंतू धुळ्याला गेल्यावर अगदी आठवड्याभरात दूर झाला.  कॉलेजमध्ये चांगला ग्रुप तयार झाला...राजवाडे वाचनालयासारखी प्रख्यात लायब्ररी मिळाली...

आणखी एक गोष्ट या धुळ्यानं आम्हाला दिली, ती म्हणजे बोरकर कुटुंबाची


साथ...धुळ्याला आम्ही अजमेरा महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये रहात होतो.  कॉलेजचे आवार खूप मोठे, त्याच्या कोप-यात आमची घरं होती.  आसपास कॉलेजमध्ये काम करणारे रहात होते. काही डॉक्टरही होते.  अशातच एकदा आमच्या घरात डॉ. ज्योती बोरकर आल्या.  त्या महाविद्यालयात शिकवायला येत असत.  मॅडम तेव्हा आठ महिन्यांच्या गरोदर होत्या.  गो-यापान...हसरा चेहरा आणि बोलका स्वभाव.  त्या डॉक्टर होत्या...संस्कृत पंडिता...पण बोरकर मॅडमनी कधीही याबद्दल अहंमपणा ठेवला नाही.  त्या आमच्या घरात आल्या आणि कधी घरातल्या कधी झाल्या हे कळलंच नाही.  मॅडम कॉलेजच्या मधल्या वेळेत येऊन  आईबरोबर गप्पा मारत...आठ महिन्याच्या गरोदर असतांना त्यांनी संस्कृतची परीक्षा दिली.  कॉलेज, स्वतःची प्रॅक्टीस आणि संस्कृतचा अभ्यास, परीक्षा. हे सर्व करतांना मी त्यांना बघत होते.  अतिशय दृढ निश्चयी...कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही...सदा हसतमुख...मॅडमबरोबर माझी अगदी थोड्याच दिवसात गट्टी जमली.  धुळ्याला आल्यावर माझ्या मनावर जी नाराजी पसरली होती, ती दूर करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला.  मुळात त्यांनी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवलं.  काही दिवसातच त्यांचं बाळतपण झालं.  त्यांना एक मोठा मुलगा होता, अमेय.  आता दुसरा मुलगा झाला, अर्थव...हा अर्थव दीडमहिन्याचा झाल्यावर अचानक एक दिवस मॅडम घरी आल्या.  बाळंतपणानंतर त्यांना पुन्हा कॉलेजमध्ये जॉईन करायचे होते.  अशावेळी छोट्या बाळाचा प्रश्न होता.  तेव्हा त्याला आमच्या घरी सांभाळायला ठेवावे असा त्यांचा आग्रह होता.  आमची काहीच ना नव्हती.  पण ते घर छोटंस...आणि आवश्यक अशा सुखसोयी नव्हत्या.  त्या उलट बोरकर मॅडमचा प्रशस्त बंगला.  तिथे रहाणा-या मॅडमनी आम्ही रहात होतो त्या छोट्या घरात त्यांच्या बाळाला का ठेवावे हेच आम्हाल समजत नव्हते.  पण मॅडम ठाम होत्या.  तुम्ही कसंही ठेवा...तुमच्याकडे जे बनवता तेच अन्न त्याला द्या...मी काहीही बोलणार नाही...एवढंच त्या बोलल्या...तरीही आईची धाकधुक चालू होती.  बाळ कसं असेल...रडकं असेल तर...मस्तीखोर असेल तर...असे ना ना प्रश्न तिला पडले होते...माझं काय मी माझ्या कॉलेज निमित्तानं दिवसभर बाहेरच रहाणार होते...पण आईला त्या बाळाला सांभाळायचे होते, आणि त्याचीच तिला काळजी पडली होती. 

दुस-या दिवशी एक रिक्षा आमच्या घरासमोर उभी राहिली.  बोरकर मॅडम दिड महिन्याच्या अर्थवला घेऊन पहिल्यांदा आमच्या घरी आल्या.  आईनं चटई टाकली आणि त्यावर एक गोधडी...छोटं बाळ झोपलं होतं...त्याला त्या गोधडीवर मॅडमनी ठेवलं...सोबत त्याच्या कपड्याचं बास्केट होतं...ते आईच्या ताब्यात दिलं.  आणि तुम्ही सांभाळाल तसं सांभाळा, मी काहीही म्हणणार नाही असं म्हणून त्या त्याच्या लेक्चरसाठी निघून गेल्या.  आई बराच वेळ त्या बाळाकडे बघत राहिली...कारण ते बाळच तसं होतं...अगदी जाहीरातीत दाखवतात ना तसंच...गोंडंस...गोरं गोरं पान...कुठे आलोय याची त्याला


जाणीवही नव्हती...एकदम गोड असं ते बाळ छान झोपलं होतं...आईनं त्याच्याकडे बघत भराभर कामं उरकली.  मी सुद्धा कॉलेजमधून लवकर घरी आले होते...माझीही अवस्था आईसारखी झाली....शांत झोपलेल्या बाळाच्या बाजुला आम्ही दोघी बसून होतो...शेवटी त्या बाळाची झोप चाळवली....आता बहुधा भोकाड पसरणार म्हणून आई हातात खुळखुळा घेऊन तयार होती....पण कसलं काय  ते छोटुसं कधी रडलंच नाही...गोड हसत आळस दिला...आणि जणू आम्ही त्यांच्या चांगलेच परिचयाचे आहोत, असं आमच्याकडे टकमक बघू लागला...आमच्या आईला कोण आनंद झाला...त्या क्षणापासून त्या बाळाने आमच्या घरातले मानाचे स्थान पटकावले. काही करायचे तर अर्थवसाठी...पहिल्यांदा एका जागी निमुट झोपून रहाणारा अर्थव नंतर रांगायला लागला, चालायला लागला...बोलायला लागला.  त्याच्या या सगळ्या प्रवासात बोरकर मॅडमनी आईला चुकूनही असं करू नका...त्याला हे नको की ते नको असं सांगितलं नाही.  उलट अर्थव आमच्या घरी जे जेवण झालं असेल तेच जेवायचा.  एकदा पावसाळ्यात आम्ही रहात होतो त्या घरात पाणी शिरलं होतं,  आणि मुसळधार पावसामुळे सर्व घरालाही आलं आलं होतं.  अशात मॅडम छोट्या अर्थवला घेऊन आल्या...त्याला या थंडाव्याचा त्रास होईल, आज त्याला तुमच्या घरीच ठेवा, असं आईनं सांगून बघितलं...तेव्हा, काहीही होत नाही...ठेवा तुमच्याकडेच त्याला...असं सांगून मॅडम लेक्चरसाठी निघून गेल्या....त्यांच्या या साध्या वाक्यांनी आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं.  तिनं दिवसभर त्या बाळाला आपल्या जवळ ठेवलं...

छोट्या अर्थवला बघण्यासाठी, त्याच्याबरोबर खेळण्यासाठी कॉलेजमधील इतरही डॉक्टर आणि माझे मित्र मैत्रिणी आवर्जून येत असत...त्याच्यामुळे आमच्या घराचे वातावरण बदलले...एक आनंदाचा झराच सापडल्यासारखे झाले.  डॉ. ज्योती बोरकर आणि त्याचे पती डॉ. सतिष बोरकर हे दोघेही आयुर्वेदाचार्य.  अतिशय संपन्न व्यक्तिमत्व.  अहंमची बाधा न झालेले जोडपे.  मॅडम आमच्या आयुष्यात आल्या तो खरोखर भाग्याचा क्षण होता.  कारण त्यांनी चांगले वाचायला शिकवले.  समाजात कसे बोलायचे, वागायचे याचे धडे त्यांच्याकडे बघून मिळाले.  किती सौम्यपणा होता त्यांच्या स्वभावात.  परिस्थिती कितीही गंभीर असो, त्या त्यांच्या स्वभावामुळे सर्वांवर मात करत असत.  मला जी थोडीफार स्वयपांकाची आवड लागली तीही त्यांच्यामुळेच.  घरात कुठलाही पदार्थ केल्यावर त्या आवर्जून तो पदार्थ आमच्यासाठी आणत असत.  मग तो पदार्थ माझ्याकडून करुनही घेत असत.  स्वयपांक करतांना साधनं कमी असली तरी चालतील, पण स्वयंपाक करणा-याची वृत्ती प्रसन्न असली की तो पदार्थ रुचकर होणारच हे बाळकडू मी त्यांच्याकडूनच शिकले.  पुढे आमच्या आईला पाठदुखीचा त्रास होऊ लागला.  आईच्या मणक्यात गॅप आल्याचे निदान निघाले.  प्रचंड वेदना तिला होऊ लागल्या.   अशावेळी डॉ. सतिष बोरकर देवासारखे आमच्या कुटुंबाच्या मागे उभे राहिले.  डॉक्टरांनी आईवर केलेल्या उपचारामुळे आज वयाच्या पंचाहत्तरीतही आमची आई कुठलाही आधार न घेता चालू शकते.  अशा अनेक घटनांनी या बोरकर कुटुंबाबरोबर आम्ही जोडलो गेलो.  काही वर्षांनी आम्ही जसे धुळ्याला रहायला आलो, तसेच धुळ्याला सोडण्याची वेळ आली.  आता पारी उलटली होती.   येतांना जी रुखरुख होती...तिच आता जातांना होती.  सर्वात मोठं म्हणजे आम्ही बोरकर कुटुंबापासून वेगळे होणार होतो....पण वेळ हा सर्वांवरचा उपाय असतो.  आम्ही धुळ्यापासून दूर झालो...पण तिथल्या आठवणींपासून नाही....आम्ही जोडलेला बोरकर कुटुंबाबरोबरचा घरोबा आजही तसाच आहे.

आता आमच्याकडे येणारा छोटा बाळ मोठा झालाय....अमेरिकेत जाऊन त्यानं


एमएस पदवी घेतली.  तिथल्याच मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर तो कामाला आहे.  पण त्याचा स्वभाव त्या गोड बाळासारखाच आहे.  कालपरवा या अर्थवचे, अमृता नावाच्या गोड मुलीबरोबर लग्न झाले.  लग्नाला आई आवर्जून हजर होती.  अर्थवनं लहानपणीसारखीच आईला मिठी मारली आणि तिला सोबत घेऊन फोटो काढले.  बोरकर कुटुंब तसंच आम्हाला भेटलं...गप्पा झाल्या...निरोप घेतांना एकच विचार मनात येत होता...नाती ही अशीच असतात...मनाची...ती बांधतांना पैशाचा...श्रीमंतीचा विचार होत नाही....तर वैचारिक समृद्धीचा विचार होतो...आणि त्यामुळेच या नात्यांची बैठक पक्की असते...मग केव्हाही या नात्यांमध्ये डोकावले की तो मोरपीसाचा स्पर्श जाणवतो...हळूवार...अल्हाददायक...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. मोरपीस खरंच खूप आल्हाददायक!!

    ReplyDelete
  2. आदरणीय सई जी आपण इतक्या जुन्या आठवणी अतिशय सुंदर मांडल्या आहेत जश्या त्या आजही ताज्या तवान्या वाटतात..
    स्व अनुभवातून काल भेटलेला माणूस आपण आज विसरतांना पहातो पण!!
    आपण अतिशय छान जपणूक केली ती आठवणींन सोबत माणसांची.

    ReplyDelete
  3. धुळ्याला पोहोचवलं. किती सुंदर अनुभव अथ पासून ईती पर्यंत.
    तुम्ही मोरपंखी अनुभव घेतला आणि किती तरी वहीत जाळी तयार झालेली पिंपळ पानं आठवली.
    सरोज नेरूरकर

    ReplyDelete
  4. बोरकर मॅडम आणि अथर्व आणि डॉक्टर बोरकर जर आपल्याला भेटले नसते तर कदाचित धुळ्याला राहणं शक्यच झाला नसत , त्यांनी खूप सांभाळून घेतलाय आई पप्पाना , आणि अथर्व तर अजून तसाच आहे .

    ReplyDelete
  5. खूप छान वाचले मी बरेच दिवसांनी......माझी ही आवड मी विसरलेच होते......बघ तुमच्या लेखाने किती मोलाचे काम केले आहे.... खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🙏

    ReplyDelete

Post a Comment