उंदियोचं
शास्त्र...
लग्न होऊन संसार सुरु झाल्यावरची गोष्ट. साधारण वर्ष झालेलं. नव्या नवरीचं आवरणही दूर झालेलं. अशाचवेळी मग एकएक परीक्षा सुरु होतात. हिला काय करता येतं...काय येत नाही...तराजूमध्ये आपसूक आपल्याला बसवलं जातं...तसेच काहीसे दिवस होते...अशात काही पाहुण्यांचे डबे जमा झालेले...डब्यांची संख्या आणि आकार दोन्हीही मोठे...डिसेंबर महिना सुरु झालेला...मग हक्काचा पदार्थ करायला घेतला. उंदियो...पहिली शंका नव-यानं घेतली. एवढा आवडतो तर विकत घेऊया...म्हणून त्याचा प्रस्ताव आला. अर्थात त्याकडे दुर्लक्ष करीत मी उंदियोची तयारी सुरु केली. कुकरची पहिली शिटी झाल्यावर त्याचा घमघमाट घरात फिरला आणि नव-याचे डोळे चमकले....छान...थोड्याच वेळात भाकरी आणि उंदिओ, सोबत बटाटा, पोहा पापड एवढाच पण श्रीमंती बेत झाला...अगदी पोह्या-उपम्यासारखा उंदियो घेतला गेला आणि खाल्लाही गेला. संध्याकाळी खाऊचे डबे भरुन आले होते, त्यांचे डबे पोहचते करण्याच्या मोहिमेवर निघालो. पण पहिलाच डबा ज्यांच्या हातात दिला त्यांनी नाराज केलं. नव-यानं उत्साहानं सांगितलं, हिनं पहिल्यांदा उंदिओ बनवलाय. मस्त झालाय...नक्की चव सांगा....ज्यांच्या हातात डबा दिला, त्यांनी आमच्यासमोरच डब्याचं झाकण काढलं...आणि हे काय उंदियो आहे हा...मग तेल कुठाय....तेलाशिवाय उंदियो होतच नाही...असं म्हणत मला पहिला धडा दिला...मन थोडं खट्टू झालं...निदान चव तर बघा...आणि मग सांगा...पण असाच अनुभव दुसरा डबा ज्या महिलेच्या हातात दिला, तिच्याबाबतही आला...तेल नाही....तेलाचा अस्सा तवंग पाहिजे...तरच उंदियोची चव लागते, म्हणून त्यांनी आणखी एक सल्ला दिलाच, शिवाय मी जास्तीच्या तेलाची फोडणी टाकून मगच चव बघेन असंही सांगितलं...आम्ही दोघंही मनातून नाराज झालो होतो...मी बनवलेल्या उंदियोमध्ये तेल होतं..पण ते तवंग येईल, डब्यातून धार लागेल, इतरपत नव्हतं...मुळात पदार्थ छान होण्यासाठी...चवदार होण्यासाठी तेलाचा तवंग यायला पाहिजे, हे मला मान्यच नाही...पण तेव्हा असं बोलायची हिम्मत नव्हती...शेवटी आता पुढच्यावेळी येथे आपल्या उंदियोचे डबे पोहचते करायचे नाहीत, असा निश्चय करुन आम्ही
घराकडे परतलो....तो पहिला उंदोयो आणि आता दरवर्षी होणारा माझा उंदियो, खरचं उत्तम होतो...अगदी कुकरची पहिली शिट्टी झाली की घरभर त्याचा सुगंध दरवळतो...ब-याचवेळा हा उंदियो नुसता डिशमध्ये घेऊन खाल्ला जातो...मुळात चव महत्त्वाची असते...करण्याची पद्धत आणि मगच तेलाचा भाग येतो. नशिबानं मी पहिल्यांदा ज्यांच्याकडून अतिरिक्त तेल टाकून उंदियो करण्याचे सल्ले मिळाले होते, ते कधीच मानले नाहीत....त्यामुळेच आजही फार धावपळ न करता उंदियो तयार होतो...आणि डबे भरुन ज्यांना आवडतो, त्यांच्या घरी पोहचवला जातो....
मुळात कुठलाही पदार्थ बनवतांना त्यात थोडासा तरी बदल होतो. अगदी एक चमचा मिठ...एक चमचा साखर....पाव कप अमूक....पाव कप तमूक...अशा आखिव-रेखिव रेसिपी करतांना मजा येत नाही....मी तर केक किंवा बिस्किट सारखे पदार्थ करते तेव्हाही प्रमाणात थोडी फार हेराफेरी करते...तर बाकिच्यांचे काय...आणि उंदियोचं म्हणाल तर आम्हा रेवदंडा-चौल भागातल्या मुलींना उंदियो करायला फार खटपट करावीच लागत नाही. लहानपणापासून आम्ही पोपटी या चविष्ट पदार्थाला होतांना बघितलं आहे.
पोपटीसाठीची चटणी करण्यासाठी एकाचवेळी दहा-दहा नारळ खोवले आहेत. जेव्हा मिक्सर नव्हता, तेव्हा या पोपटीच्या चटणीला पाट्यावरवंट्यावर वाटलं आहे. पोपटी आणि उंदयो यात थोडंफार साम्य आहे. पोपटीत तेल वापरत नाहीत...पण चटणी भरपूर असते...ओल्या खोब-यानं तेलाची कमी भरून निघते...तर वालाचे दाणे सोलण्याची झंझट नसते...थेट वालाच्या शेंगा त्यात टाकल्या जातात...इथे उंदोयोमध्ये वेगळ्या...थोड्या छोट्या वालाच्या शेंगा मिळतात...त्या सोलण्यात काहीसा वेळ जातो...पण दोन्हीही ठिकाणी चवअप्रतिम....
उंदियो करण्याची खटपट फार असते, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी माझी एक सोप्पी पद्धत उपयोगी आहे. माझ्या अनेक मैत्रिणी आता हा अवघड वाटणारा पदार्थ सहजपणे करु लागल्या आहेत. उंदियोमध्ये आपण काय भाज्या वापरणार आहोत, त्या भाजांची एक यादी करुन घ्यायची. वालाचे दाणे, तुरीचे दाणे, छोटी सुरती पापडी, हिरवे चणे, ओले शेंगदाणे, मटार या भाज्या साफ करतांना थोडा वेळ लागतो. त्यामुळे त्यांची एकदा साफसफाई झाली की पुढची पद्धत एकदम सोप्पी. ओला लसूण, आलं, आणि थोडी ओली हळद, चार कडीपत्त्याची पानं, भरपूर कोथिंबीर, धणे, जिरं, थोडा ओवा, साखर आणि अगदी चार ते पाच चमचे ओलं खोबरं आणि ज्यांना जेवढा तिखटपण हवा तशा हिरव्या मिरच्या. आमच्याकडे डिश भरुन उंदियो खाल्ला जातो, त्यामुळे मी बेतानंच मिरच्या टाकते. हे सर्व वाटण तयार करायचं. दुसरीकडे, छोटी वांगी चिरा भरुन या मसाल्यांनी भरुन घ्यायची. बारीक
बटाटेही तसेच भरुन घ्यायचे. सोबत रताळं आणि कंद आणि गाजरही सोलून पाण्यात घालून घ्यायचे...हे सर्व झाल्यावर मुख्य चवदार पदार्थ करुन घ्यायचा. तो म्हणजे उंदियोतील मुठिया...या मुठियाचं उंदियोला चव आणण्याचं काम करतात. त्यासाठी भरपूर मेथी कापून घ्यायची, त्यात थोडं तांदळाचं पिठ आणि त्यापेक्षा डबल चण्याचं पिठ घालायचं. वरुन साखर, ओवा, मिठ, लिंबाचा रस आणि थोडं जिरं घालून हे सर्व मिश्रण मिक्स करुन घ्यायचं...काहीजणं या सर्वांचे गोळे करतात, काही जण मुठियांच्या आकाराचे गोळे करतात...मी सुद्धा मुठियांच्या आकाराचे हे गोळे करुन घेते....आता उंदियोचं आणखी मुख्य काम....हे मुठिये तळण्याचे....बिर्याणी करतांना बिर्याणीवर जो कुरकुरीत कांदा टाकतो, त्याच तेलात बिर्याणी केली की ती चवदार होते....उंदियोमध्येही मी तोच नियम पाळते...ज्या कुकरमध्ये उंदियोला फोडणी देणार आहे, त्यातच तेल टाकून पहिल्यांदा मुठिये तळून घेते...हे मुठिये तळल्यावर त्यात ओवा, तिळ आणि हिंगाची फोडणी...की वरुन कंद आणि रताळी टाकून अगदी मिनिटभर परतून घ्यायचं....खूप घाई असेल तर याचवेळी सर्व भाज्या एकत्र करुन अगदी भरली वांगी आणि बटाटेही, त्यांना केलेलं हिरवं वाटण छान लावून घ्यायचं...परतलेल्या कंदावर ही सर्व मिक्स केलेली भाजी टाकायची आणि अगदी बेताचं, म्हणजे चार चमचे पाणी टाकून कुकरचं झाकण बंद
करायचं...मंद गॅसवर अगदी एका शिटीत उंदियो छान तयार होतो....एक शिटी झाल्यावर गॅस बंद करुन कुकर तसाच ठेवायचा...दहा मिनिटानंतर त्या उंदियोमध्ये वर तळलेल्या मुठिया ठेवायच्या आणि अगदी दोन मिनिटांसाठी वाफ द्यायची....की झाला उंदियो तय्यार...
कुठलाही पदार्थ करतांना मी हा आमच्यात असा करत नाही...आम्ही अस्साच करतो...असले आयाम पाळत नाही....दरवेळा काहीना काही बदल आण चवीत फेरफार करते...शिवाय समोरच्यांनी कोणी चांगले बदल सांगितले तर तेही
स्विकार करते...अपवाद फक्त वचाकभर तेलाचा वगळता....कारण पदार्थाची चव ही तेलावर नसतेच...आपली ऋषीची भाजी कुठे तेलावर करतात....पण त्याच्या चवीला तोड नसते....आता आपण काही तासांना नव्या वर्षात प्रवेश करु आणि लवकरच संक्रातीची तयारी सुरु होईल....त्याबरोबरच भोगीची भाजीही....ही भाजी म्हणजे मिनी उंदियोच....एकूण काय खाणारे जेवढे....तेवढ्याच चवी...अगदी बेतानं तेलाचा वापर करत केलला माझा उंदियोही याच प्रकारातला...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान लेखन ! उंदियो मला आवडतो पण तो तेल कमी असलेला ! सध्या या भाज्यांचा सीझन आहे. मस्त !
ReplyDeleteखूप छान लेख लिहिला आहे ... चवदार आणि खुसखुशीत... उंदियोच्या चवीइतकाच आवडला. 👍👍
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteफारच छान! साधी,सोपी पण रूचकर पाककृती! नक्की करून बघेन मी.😊😊👍👍
ReplyDeleteचवदार
ReplyDeleteकधी डब्बा घ्यायला येऊ
ReplyDeleteकधी डब्बा घ्यायला येऊ
ReplyDeleteचविष्ट उंदियो... मस्त लेख!!
ReplyDeleteवर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. सुगरण सई.. तुझे खूपखूप कौतुक !
ReplyDelete