तुरीचे दाणे आणि अनोखी भेळ...

 

 तुरीचे दाणे आणि अनोखी भेळ...


दोन किलो तुरीच्या शेंगा द्या....असे जरा ठसक्यातच मी त्या विक्रेत्याला सांगितले.  हे सांगितल्यावर जी प्रक्रिया यायला हवी तिच आली...आसपास उभ्या असणा-या सर्व बायकांनी माझ्याकडे चमकून बघितले.  माझ्या सोबत माझी मैत्रिणही होती...तिनंही माझ्याकडे आश्चर्यांनं बघितलं...आणि मग हळूच हसून विचारलं...आई येणार आहे का ग...तिला नाही म्हणत, मी त्या दोन किलो शेंगा माझ्या मोठ्या पिशवीत घेतल्या...एव्हाना आसपासच्या बायकाही बोलायला लागल्या...उकडवायला ब-या...एवढ्या शेंगा सोलायच्या म्हटलं तर दिवस जाईल...आणि एवढ्या घेऊन करायच्यात काय...ही सर्व बोलणी होत असतांना मी त्या विक्रेत्याला दोन किलो तुरीच्या शेंगांचे पैसे दिले आणि मैत्रिणीसह घराकडे निघाले.  तिनं तर नेहमीसारख्या पाव किलो शेंगा


घेतलेल्या.  पण ती राहून राहून माझ्या पिशवीकडे बघत होती.  तू एवढ्या शेंगांचं करणार काय....आणि या सोलणार तरी कधी ते सांग...मी हसत होते...नवरा काही कारणामुळे गावी गेलेला...जेवणाचं फारसं टेन्शन नाही...अगदी डोसा किंवा खिचडी केली तरी खूप...त्यामुळे मी अशा किचकट कामांचा प्लॅन केलेला...तुरीच्या शेंगा हे त्यातलं पहिलं काम...आणि या तुरीच्या दाण्याचं करणार काय...हा प्रश्न नव्हताच...कारण तुरीच्या दाण्यांच्या पदार्थांचे मेनूकार्ड माझ्याकडे तयार होते...

थंडी चालू झाली की खाण्यापिण्याची चंगळ होते.  अगदी खास ठेवणीतले पदार्थही महिन्यात आवर्जून केले जातात.  तसा रेटा आमच्याकडे चालू झालेला....डिंकाचे लाडू करुन वाटून झाले.  आणि मेथीचे लाडूही करुन फस्त झाले.  मुळा, गाजर, लसूण, आंबेहळद, आलं, लिंब, मिरची असं मिक्स लोणचं करुन झालं.  आता वेळ होती ती जरा वेळ काढणा-या पदार्थांची...पण हे पदार्थ करण्याआधी त्यांची थोडी तयारी केली तर ते करतांना फार वेळ लागत नाही.  अशाच तयारीला मी सुरुवात केलेली.  त्याची सुरुवात या तुरीच्या शेंगा घेऊन केली.  तुरीच्या दाण्यांची आमटी, चटणी, भात, उंदीयो पासून अगदी मासे घालून तुरीच्या दाण्यांच्या पदार्थांचा हा महिना आहे.  अगदी तुरीची कचोरीही होते...पण सर्वच पदार्थ वेळखाऊ.  त्यामुळेच त्याची तयारी आधी करुन घेणे महत्त्वाचे असते.  नवरा गावी गेलेला असतांना मी


या कामाला सुरुवात केली.  तुरीच्या दोन किलो शेंगा घरी आल्या...तो ढिग पाहून पहिल्यांदा टेन्शन आलं...पण एकदा दाणे सोलायला घेतले.  तुरीच्या शेंगा चांगल्या भरलेल्या होत्या आणि दाणेही टपोरे.  त्यामुळे आलेला कंटाळा दूर झाला...नाही म्हणायला चांगले दोन अडीच तास लागले...दोन मोठे डबे भरुन दाणे सोलून झाले.  एव्हाना दुपार होत आलेली.  जेवणात खिचडीचा पर्याय होता.  पण समोरचे दाणे खुणावत होते.  मग एकीकडे फक्त भात लावला आणि दुसरीकडे तुरीचे दाणे फक्त तेलावर तिखट मिठ टाकून परतले.  त्यात सुक्या खोब-याचे वाटण टाकले.  ग्लासभर पाणी टाकून ही आमटी तयार व्हायला ठेवली.  ती तयार होईपर्यंत एक खूप वेगळा पदार्थ करायला घेतला. 

नाशिकला हॉस्टेलमध्ये असतांना माझी भारती नावाची रुममेट होती.  तिचे वडील शेतकरी.  दर महिन्यांनी ते लेकीला भेटायला हॉस्टेलवर येत.  ते भारतीला भेटायला आले की, ती आम्हा सर्व मुलींसाठी मेजवानी असायची.  कारण भारतीचे वडील दरवेळी काहीना काही खास पदार्थ घेऊन यायचे.  त्यातलाच एक वेगळा पदार्थ म्हणजे तुरीची भेळ....भारतीचे वडील तुरीच्या शेंगा यायला लागल्या की उकडेल्या तुरीच्या शेंगा आणि तुरीच्या दाण्यांची भेळ सोबत भाक-या घेऊन याचये.  हा पदार्थ एकतर वेगळ्या चवीचा आणि भन्नाट लागणारा.  त्यामुळे त्यांना खूपवेळा त्याची रेसिपी विचारली...ही रेसिपी त्यांनी सांगितली होती...पण नाशिक सुटलं आणि त्या रेसिपीही...मध्यंतरी अशाच खुपशा तुरीच्या शेंगा आणल्या होत्या...तेव्हा या दाण्यांचे करायचे काय हा प्रश्न पडला. त्याचवेळी या तुरीच्या दाण्यांची भेळ आठवली.  तेव्हा थोडं थोडं आठवून करायचा प्रयत्न केला,  चव जवळपास होती...पण हा पदार्थ एवढा वेगळा होता की तेव्हापासून तुरीच्या मौसमात


एकदा तरी करुन झालेला आहे.  आताही भात होईपर्यंत या पदार्थाची तयारी सुरु केली.  दोन वाटीभर तुरीच्या दाण्यांना थोडी हळद टाकलेल्या पाण्यात उकडायला ठेवलं.  तोपर्यंत शेंगदाणे, तीळाच्या बरण्या बाहेर निघाल्या.  शिवाय सोललेला लसूणही बाहेर काढला.  दाणे ठेवलेल्या पाण्याला एक उकळी आली होती, त्यामुळे दाणे चाळणीत काढून पाणी निथलायला ठेवलं.  कढईमध्ये जरा ब-यापैकी तेल घेतलं.  हा पदार्थ साठवणुकीचा आहे, त्यामुळे जरा जास्त तेल घालावं लागतं.  तेल तापल्यावर त्यात पहिल्यांदा अर्धवट शिजलेले तुरीचे दाणे टाकले.  हे दाणे चांगले परतून घ्यायचे, दोन मिनिटं परतल्यावर यात शेंगदाणे टाकले.  शेंगदाण्यांसोबत चांगला मुठभर सोललेला लसूण घातला.  त्यावर मिरच्या, कडीपत्ता आणि कोथिंबीर बारीक करुन टाकली.  हे सर्व भाजत असतांना त्यात खायचे चणे टाकले.  घरात खायचे चणे नसतील तर डाळ्या किंवा गाठ्या टाकल्या  तरी चालतात.  सर्व छान गरम झाल्यावर यात तिळ आणि मिठ टाकून पुन्हा परतायला सुरुवात केली.  पाच मिनिटं हे सर्व  मिश्रण परतल्यावर गॅस बंद केला...हे सर्व थंड व्हायला ठेवलं.  तोपर्यंत माझी तुरीची आमटी छान तयार झाली होती.  भातही झाला.  या सोबत तांदळाचे दोन पापड तळले...माझा हा जेवणाचा बेत होईपर्यंत तुरीच्या भेळीचे मिश्रण थंड झाले.  त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करणे हा एक टास्क असतो.  कारण हे सर्व अगदी बारीक केलं तर त्याची चव खराब होते.  त्यामुळे अगदी भरडीसारखे बारीक करायचे. सर्व जाडसर झालेले मिश्रण एका बरणीमध्ये भरुन ठेवायचे.  भाकरीसोबत ही भेळ मस्त लागते.  पण ही तुरीची भेळ खरी चवदार लागते ती, कुरुमु-यासोबत.  थंडीमध्ये सायंकाळच्या चहा-कॉफीसोबत भेळीसारखा चटपटीत पदार्थ करायचा असेल तर हा तुरीच्या भेळीचा मसाला खूप उपयोगी पडतो.  वाटीभर कुरुम-यामध्ये चमचाभर ही

तुरीची भेळ आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकली वरुन चॅट मसाला आणि शेव भुरभुरली तर ही भेळ खूप चटकदार होते.  शिवाय कुठे बाहेर जायचं असेल तर ही तुरीची भेळ अगदी उपयोगी पडते.  चपाती, भाकरी फारकाय ब्रेडबरोबरही ही तुरीची भेळ सुरेख लागते.  ही तुरीची भेळ काचेच्या बरणीत भरुन झाली.  आता रोज डब्यात भाजीसोबत लागणा-या एका चटणीचा पर्याय तयार झाला होता.

थोडं हुश्श केलं...पण हे इथेच थांबणारं नव्हतं...डिसेंबर महिना हा पै पाहुण्यांचा आणि अशाच काही भन्नाट पदार्थांचा असतो.  त्यात पुढचं नाव होतं ते ओल्या हिरव्या चण्यांचे...दुस-या दिवशी असाच वेळ ओले चणे सोलण्यासाठी द्यावा लागणार होता.  हिरवे वटाणे आणि उंदिओमध्ये वापरण्यात येणारे वालाचे दाणे हे त्यापाठोपाठ येणारच होते.  एकूण सोमवारपासून आमच्याकडे


खाद्यमहोत्सव आहे की काय असे वातावरण रहाणार होते,  त्यासाठीची तयारी माझी सुरु होती.   उंदीओ, तुरीची आमटी, तुरीच्या कचो-या, ओल्या चण्याची भाजी आणि मटार बहार हे सर्व होणार होते.  शिवाय मेथीच्या मुठीया, कोथिंबीरीच्या आणि अळू वड्यांचे उंडे तयार करायचे होते.  मिरच्याही भरुन ठेवायच्या होत्या....त्याचा मसाला वेगळा करायचा होता.  या सर्वात गाजर हलवा आणि त्यासाठी घरी बनवलेला खवा....एरवी ताटात वाढल्यावर चवदार वाटणा-या या पदार्थांमागची खटपट किती हे जी करते तिलाच माहित...त्यामुळेच मी नवरा गावी गेल्यावर जी सुट्टी मिळाली, त्या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी धडपडत होते...तुरीची भेळ तर झाली...पण तुरीचे दाणे टाकलेला उंदिओ हा सर्वात मास्टर पिस...त्याच्या तयारीत पुढचा दिवस जाणार होता....मग काय बाजारातून हिरव्या चण्यांसोबत आणखी काय आणायचे याची यादी करायला घेतली....शेवटी तयारी असली तर उंदिओ काय पण आमची चौल-रेवदंड्याची पोपटीही पटपट होणार होती....या चवींचा पाठलाग करतांना थोडी दमछाक झाली तरी चालते की....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. शेफ लपला आहे तुझ्यात हाँटेलच्या व्यवसाय बाबत एखाद्या ज्योतिषाला विचारून बघ

    ReplyDelete
  2. Ekdam bhari,chamchamit

    ReplyDelete
  3. तुरीच्या दाण्यांची भेळ... कमाल रेसिपी आहे. तुझ्यातली सुगरण लेखिकेला खूप मदत करतेय. मस्त लेख!!

    ReplyDelete
  4. Khup chhan lekh

    ReplyDelete
  5. खरंच सुगरण लेखिका आहेस सई. सर्वच पदार्थ अप्रतिम

    ReplyDelete
  6. Delicious dish sai

    ReplyDelete

Post a Comment