वर्षभरानंतरचे समाधान....
बरोबर दुपारचे 12 वाजले, तेव्हाच लेकाचा फोन आला....मी व्यवस्थित पोहचलो आहे, आता सारखा फोन करु नकोस...मी व्यवस्थि…त अंघोळ करेन...मग जेवेन....आणि मग सामान अनपॅक करेन...आणि मग झोपेन...आता थेट रात्री व्हिडिओ कॉलवर बोलूया....काळजी करु नकोस....आणि अजून एक, इथे थंडी आहे...पण कशी काळजी घ्यायची हे मला समजलं आहे, त्यामुळे पुन्हा त्याबद्दल काळजी करु नकोस...चल, फोन ठेवतो...म्हणत त्यानं फोन ठेवला....मी हो...हो...बोलत बाय...टेक केअर बाळा...म्हणत फोन ठेवला....फोन झाल्यावर मी बराचवेळ त्या फोनकडे बघत होते. बरोबर वर्ष झालं असेल, गेल्या वर्षी याच सुमारास लेकाचे कॉलेज सुरु होण्याची तारीख आली होती. ही तारीख आल्यावर पहिल्यांदा खूप उत्साह वाटला...आनंद वाटला...पण नंतर वास्तव समोर आलं. तो एकटा रहाणार होता...आणि मी ही...तो कसा राहील...काय करेल...अभ्यास कसा होईल...जेवणाचं काय...आणि त्याच्या सोबतच मित्र कसे असतील...रॅगिंग होईल का...त्याला कोणी त्रास दिल्यास आपण इथे बसून काय करणार....बापरे मारुतीच्या शेपटीसारखी विचारगंगा सुरु झाली होती...त्याची तयारी करतांना मनाची ही साशंकता कमीच होत नव्हती...अखेर तो दिवस आला....माझं लेकरु त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी दूर गेलं...तो तिथे गेला....स्थिरावला...सरावला...सहज झाला...पण इथे मी मात्र साशंकच...तो सांगत होता...अग सगळं ठिक आहे...पण पुरावा काय...माझ्या मनातली शंका काही दूर होत नव्हती...पण आता या दुराव्याला वर्ष होताहोता तो सुट्टीत आला...आणि सगळं चित्र पुन्हा रंगलं....फक्त या चित्रातील कॅनव्हासमधील रंग बदलले होते...
म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही....तसंच असतं...मी अनेकांना सल्ले देते...पण जेव्हा माझं लेकरु दूर गेलं...तेव्हा माझ्या मनाची काय तगमग होती ते मलाच ठाऊक....रोज शंभर शंका...त्याला तेवढेच प्रश्न...शेवटी तो वैतागला...रोज रोज तेच तेच काय...रोज सांगतोय तुला...म्हणत मग त्याचा रिप्लाय यायला लागला...मग फोनही कमी होऊ लागले. परीक्षा...उशीरापर्यंत लेक्चर...अशी कारणं पुढे आली...इकडे माझी तगमग वाढली...नव-यानं सल्ला दिला...तो शिकलाय...एकटा रहातोय...स्वतःची काळजी घेतोय...लेक मोठा झालाय...हे मान्य कर आणि पुढे चल...हे सांगूनच नवरा थांबला नाही, तर हक्कानं ओरडलाही...तरी मी सांगत होतो, त्याला थोडं एकटं सोड...त्याचं त्याला करु दे...पण नाही...मग हा असा त्रास होणारच...एकूण घरातली दोन्हीही माझी हक्काची माणसं माझ्या शंकांना माझ्यासोबतच सोडून व्यस्त झाली होती...
आता साधारण वर्ष होत असतांना आठवड्याभराच्या सुट्टीसाठी लेक घरी
आला. अगदी दिवाळीलाही तो घरी
नव्हता...त्यामुळे लेक येई घरा तोची दिवाळी दसरा...माझा आनंद किती. तो येणार त्या दिवसात काही गडबड नको
व्हायला...त्याच्यापासून एक सेकंदही दूर नको व्हायला, म्हणून मी सर्व कामांची यादी
तयार केली. त्याच्या आवडीच्या पदार्थांची
यादीही तयार केली. सकाळचा नाष्टा, जेवण,
सायंकाळची चटकदार डीश आणि रात्रीच्या जेवणात त्याला लागते तशी व्हरायटी...भरल्या
मिरच्या, आळू वड्या, कोथिंबीरवड्या....चॉकलेट तयार करुन ठेवले. अगदी किलोभर लसूणही सोलून ठेवला...फ्रिज
भाज्यांनी गच्च झाला...तो आल्यावरचा आठवडा कसा आला आणि गेला हे कळलंच नाही...एरवी
फोनवर गप्पा होत नाहीत....मग त्या गप्पा...मित्रमैत्रिणींची चौकशी...काही हक्काचे
लग्नसमारंभ...आणि आपुलकीचे पाहुणे यात तो आठवडा कुठे आणि कसा गेला याचा हिशोबच लागला नाही.
शेवटी जाण्याचा दिवस उद्यावर आला. आणि इथूनच मग माझी परीक्षा सुरु झाली. लेक दोन दिवसात जाणार म्हणून मी त्याच्या खाऊचे डबे तयार करायला घेतलेले...याच गडबडीत काही पाहुणे आले...त्यात नव-याला काही
अर्जंट काम निघालं...अजून एका मित्रपरिवाराच्या घरी मला जावं लागलं....अशीच कामांची यादी वाढत गेली. शेवटी जाण्याच्या आधी एक दिवस तर लेकाला सर्व दिवस घरात एकटं रहावं लागलं. आठवडाभर माझ्या मनाची शांत झालेली तगमग पुन्हा जागी झाली....त्याला दहावेळा सॉरी म्हटलं...तो म्हणाला होतं असं...त्यात काय...मला सवय झाली आहे...या वाक्यांनी मी अजून दुखावले...पण नवरा म्हणाला बघ तो बदलतोय...म्हणजे दुरावतोय असं नाही तर सरावतोय...समजून घे....
ज्या दिवशी लेक निघणार तेव्हा तर मल्टी टास्क ठरला...शेवटी त्याला सोबत देण्यासाठी जो डबा करणार होते, तो डबाही करायला वेळ मिळाला नाही...अगदी घाई...गडबड...पण ही फक्त माझीच होती...तो कमालीचा शांत...सर्व सामान स्वतः पॅक केलं. बॅग भरली...हातातली सॅक भरायची बाकी होती. त्यात काय भराचयं याची त्याच्याकडे लिस्ट होती...ती म्हणे निघतांना चेक करणार...दुपारचे जेवण झाल्यावर मग ती सॅकही भरली. लिस्ट पुन्हा चेक केली आणि मी तय्यार म्हणून घोषणा केली. गाडी संध्याकाळी पाचची...आम्ही तीन वाजेपर्यंत घरीच...माझी वाढती गडबड...चला चला असा घोषा...तिकीट काढायला वेळ लागेल...म्हणून मी बडबडत असतांनाच त्यानं फोन पुढे केला...जेवत असतांना त्याला मी दोनवेळा फोन खाली ठेव म्हणून ओरडले होते...तोच ओरडा खात त्यांनं ट्रेनची तिकीटं आधीच काढून ठेवली होती...तो थोडावेळ वाचेल या दिलाश्यासोबत घराबाहेर पडलो...ट्रेन वेळेवर होती...आता कुर्ला स्टेशनपासून बांद्रा टर्मिनन्सचा टप्पा...तिथे गेल्यावर भलताच घोळ...रिक्षावाल्यांनी दुप्पट रक्कम सांगायला सुरुवात केली...मी म्हटलं पैशापेक्षा वेळ महत्त्वाचा...जी मिळेल ती पकडूया...नवरा रिक्षा शोधायला...लेक मान खाली घालून मोबाईलमध्ये आणि मी सामानाजवळ...पाच मिनिटातच त्यानं सांगितलं...ओला रिक्षा बुक केलीय...ती येईलच...आणि तो बोलेपर्यंत ती रिक्षा आलीही...आता बांद्रा टर्मिनन्सला आम्ही आधी कधी गेलोच नव्हतो...त्यामुळे तिथे गेल्यावर समजलं की आसपास काय पण आसपासच्या आसपासही काहीच नाही...पुन्हा प्रश्न याच्या रात्रीच्या जेवणाचे काय...प्लॅटफॉर्मवर असलेल्या दुकानात केक आणि वेफर्सशिवाय काहीही नव्हते. मग काय माझे पुन्हा पर्याय सुरु झाले...आपले डबे आहेत. बॅग ओपन कर, त्यातले डबे आत्ताच बाहेर काढून घे...गाडीत पॅन्ट्री आहे का बघूया...या माझ्या बोलण्याच्या वेळात नव-यानं त्या फ्लॅटफॉर्मवरच्या दुकानातून केक आणि वेफर्स घेतले...त्याची एक पिशवी झाली...तरीही तो शांत...अरे काय खाशील रात्री, ते तरी बोल...नेमका निघतांना माझा पारा चढत होता...मग तो त्याचं शांत हसू चेह-यावर आणत म्हणाला...शांत हो...मी ऑर्डर केलीय...पार्सल येत आहे. मान खाली घालून त्यानं मोबाईलमध्ये मॅकडी शोधलं होतं...तिथे ऑर्डर केली...त्यांचा माणूस ती ऑर्डर घेऊन थेट प्लॅटफॉर्मवर येणार होता...पंधरा मिनिटांनी जेव्हा ट्रेनचे दरवाजे उघडले तेव्हाच तो माणूसही ऑर्डर घेऊन आला...मी हुश्श केलं...आणि त्यासरशी माझ्या हक्काच्या दोघांनीही हातावर टाळी देत आनंद व्यक्त केला...किती काळजी करशील...म्हणून लेकानं जवळ घेतलं...गाडी सुटायला अगदी पंधरा मिनिटं राहिली...मी शांत झाले होते...त्यानं अप्परची सिट बुक
केलेली...तिथे म्हणे कोणी डिस्टर्ब करीत नाही...त्या सिटवर व्यवस्थित चादर लावली...उशीला कव्हर घातलं...खाऊची बॅग रॅकवर ठेवली...पाण्याची बाटली आणि सॅक एका जागी ठेवली...सामान लावून झाल्यावर पुन्हा मोबाईल हातात घेतला...माझी चुळबुळ सुरु झाली...गाडी सुटायला दोन मिनिटं असतांना आम्ही गाडीच्या खाली उतरलो...बाहेर आल्यावर त्यानं खिडकीमधून मोबाईल चेक कर म्हणून सांगितलं...त्यानंच एक मेसेज पाठवला होता...जातांना आमच्यासाठी ओला रिक्षा बुक केली होती...त्याचा नंबर आणि ओटीपी...आता मी खरचं समाधानानं हसले...आतून तोही हसला...गाडी सुटली...न बोलताच आम्ही हात हलवत होतो...निरोप घेत होतो...
त्याचा पोहचल्याचा फोन आल्यावर हे सर्व आठवलं आणि नव-याचं वाक्य
आठवलं...दूर गेलाय पण दुरावला नाही...इकडे माझ्याबरोबर बोलतांना त्याचं रिक्षावाल्याबरोबरही बोलणं चालू होतं...भैय्या
छेसौही होता है....उतनांहीं दुंगा...मी मात्र समाधानानं फोन ठेवला होता...फक्त
अभ्यास करुनच मोठं होता येत नाही, याची मला जाणीव आहे...जगात वावरण्यासाठी
सर्वागिण ज्ञान लागतंच...आणि त्यासाठीच ही पाखरं दूर जातात...पण फक्त
शरीरानं...मनानं ती आईच्या भोवती असतात....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप समर्पकपणे एका आईचे मन मांडले आहे
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteApratim...Very emotional as well
ReplyDeleteआपली मुलं आता आपली काळजी घ्यायला शिकली हे खूप छान अनुभव आहेत ना
ReplyDeleteअप्रतिम लेख... मुलं सुद्धा आपली काळजी करतात ही गोष्टच समाधानकारक आहे.
ReplyDelete