काहीतरी वेगळं....
नव्या पदार्थाचा शोध
घेणारे शब्द...
मला निदान सांगायचंस...मी येतांना भाजी आणली असती माझ्यापुरती....हे
काय...रोज रोज सूप प्यायला मी काय आजारी आहे....चव, रंग वेगळं असलं तरी सूप ते
सूपच....आता उद्या हे सूपबिप नको....कुठल्याही रंगाचे नकोच....काहीतरी वेगळं
बनव...नाही जमलं तर मला सांग...मी ऑफीसवरुन येतांना घेऊन येतो....समोर ठेवलेल्या
ब्रोकलीचे हिरव्या रंगाचे सूप पितांना आणि सोबतीला असलेल्या हराभरा कबांबांना खाता
खाता नव-याची बडबड चालू होती. हे दोन
हिरवे पदार्थ कमी की काय मी त्यांच्या सोबतीला हिरवा मसाले भात केला होता. पानातली ही हिरवी बहार त्याला आवडली...पण सूप
बघून स्वारीचा मूड गेला...हा हिरवा मेनू जेव्हा केला, त्याच्या आदल्या दिवशी रेड
डे साजरा केला होता. तेव्हा बिटाचं सूप
आणि थेपले केले होते. सोबत बिट आणि
टॉमेटोची चटणी...म्हणजे तीही लाल रंगाची...ही सर्व रंगाची बहार ताटातल्या सूपामुळे
बिघडली होती. नव-यानं थेट धमकी दिली आणि
खुले चॅलेंज...काहीतरी वेगळं....हा शब्द खूप भारी आहे. अनेक आया या काहितरी वेगळं या शब्दामुळे अस्सल
कुक झाल्या आहेत. भारतीयच काय पण अनेक
पाश्चात्य पदार्थही त्या सहजपणे बनवू लागल्या....कारण काहीतरी वेगळं कर...हे
चॅलेंज आम्हा महिलांसाठी नव्या पदार्थाच्या शोधापर्यंत घेऊन जातं....अर्थात मी
सुद्धा पुन्हा हे चॅलेंज स्विकारलं होतं...आणि त्या नव्या पदार्थाचा घाट घालायला
तयार झाले.
नूडल्स हा प्रकार मी ब-याचवेळा तोडून मोडून केला आहे. लेकाच्या मते आमच्याकडे होणारे नूडल्स हे भाजीनं ओतप्रोत भरलेले असतात. नूडल्सच्या पदार्थाचा घास घेतला तर त्यात दोन नूडल्स आणि चार भाज्या पोटात जातात. अनेकवेळा नूडल्स कर असे सांगतांना लेकांनं, फक्त नूडल्स कर....हॉटेलमध्ये कसे सर्व्ह करतात ते आठव...भाज्या कमी घाल...असा सल्ला देतो...पण लेकानं आईला सल्ला द्यावा की आईनं लेकाला...अर्थातच आईनं लेकाला...आणि खाण्याच्या बबतीत तरी हाच नियम लागू असावा, या ठाम मताची मी. त्यामुळं त्यानं कितीही सांगितलं तरी घरी नूडल्स केले तरी त्यात मनमुराद भाज्यांचा मी वापर केलाय.
आता लेक बाहेर गेल्यावर हा नूडल्स प्रकार अगदीच झालेला नाही. नव-यानं काहीतरी वेगळं कर असं सांगितल्यावर काय करावं हा विचार सुरु झाला. तेव्हा या नूडल्सची आठवण झाली. पण घरात आता तयार नूडल्स नव्हत्या....खाणाराच नाही तर आणायच्या कशासाठी....मग परत विचार करायचं काय...पण नूडल्सवरुन मन दूर जात नव्हतं....शेवटी त्याच फायनल केल्या....पण जरा वेगळ्या....ज्वारीच्या नूडल्सची तयारी सुरु केली. एरवी आमच्याकडे बहुधा रोजच ज्वारीची भाकरी असते. त्यामुळे कायम ज्वारी-बाजरीचे पिठ असतेच. मग ज्वारीच्या पिठाच्या नूडल्सची तयारी सुरु केली. एरवी भाकरी करतांना पिठ मळण्यासाठी त्यात साधे पाणी लागते. पण नूडल्स किंवा रॅव्हीओली सारखा पदार्थ करतांना जरा हेच काम नाजूकपणे करावं लागतं. ज्वारीचे नूडल्स अतिशय सोप्या पद्धतीनं होतात. फक्त ज्वारीच्या पिठाला मळण्यासाठी गरम पाणी घ्यावं लागतं. या पाण्यात अगदी चमचाभर तेल वापरावं...त्यामुळे पिठाचं बायडींग चांगलं होतं. पिठ छान मळून घ्यायचं आणि सोबतच इडलीचे पात्र तयार करायचे. त्यात पाणी टाकून ते गॅसवर गरम करायला ठेवायचे आणि त्यातील इडलीच्या साच्यांना तेल लावून घ्यायचे. चकलीच्या सो-यालाही तेल लावून घ्यायचे...आणि मळलेल्या ज्वारीच्या पिठाचे गोळे त्या सो-यात भरायचे. सो-यात शेवयांची चकती टाकायची आणि मग काम सुरु....इडलीच्या साच्यात या ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स करुन घ्यायच्या आणि बरोबर दहा मिनिटे वाफवून घ्यायचे.
या नूडल्स आधी करुन घेतल्या तरी खराब होत नाहीत. कारण नूडल्स करणं जेवढं सोप्प तेवढीच त्यासोबतच्या ग्रेव्हीची खटपट जास्त असते. ही ग्रेव्ही म्हणजे घरातल्या सर्व राहिलेल्या भाज्या खपवायचा चांगला मार्गच....मी ही ग्रेव्ही करतांना आलं, लसूण यांना किसून घेते. सोबत कडीपत्ताही बारीक
कापून घेते. चायनीजस्टाईल ग्रेव्ही करतांना आधी फोडणीला ढोबळी मिरची टाकायची....ती थोडी परतली की त्यावर तेल आणि हवं असेल तर बटर टाकावं. ही टीप मला एका चायनिज हॉटेलमधील कुकनं दिलेली...एकदा लेकानं ऑथेंटीक....ऑथेंटीक...असा आग्रह धरला होता....तू खूप प्रयोग करतेस...त्या प्रयोगात मूळ पदार्थ बाजूला रहातो....म्हणून जिथे चायनीज ऑथेंटीक मिळते तिथे घेऊन गेला होता. त्याचा परिणाम असा झाला की मी त्या हॉटेलमधील कुकलाच थेट भेटले...त्याच्या पदार्थांचं कौतुक केलं...आणि या ऑथेंटीक चवीचं रहस्य विचारलं...तेव्हा त्यांनी मला ही ढोबळी मिरचीची टीप दिली होती. अर्थात मी ही चौकशी करत असतांना लेक आणि नवरा डोक्याला हात लावून बसले होते, असो....
जेवढ्या भाज्या घरात होत्या तेवढ्यांचा ढिग गॅसजवळ करुन ठेवला...आणि एकीकडे दोन चांगले मोठे टोमॅटो शिजवायला ठेवले. आलं, लसूण बारीक करुन झाले...सोबत मिरची आणि कडीपत्ताही....त्यानंतर ढोबळी मिरची, कांदा, गाजर, ब्रोकली, बेवी स्विट कॉर्न, फरसबी, कोबी आणि थोडे मशरुम एकीकडे कापायला घेतले....ग्रेव्ही असल्यानं भाज्या थोड्या बारीक केल्या. पण फोडणीला पहिल्यांदा ढोबळी मिरची टाकली. ती छानशी परतली. त्याचा मंदसा वास सगळीकडे पसरला...त्यानंतर मग त्यावर तेल आणि एक चमचा बटर टाकलं. मग बारीक चिरलेला कांदा परतून घेतला....आणि त्यानंतर आलं, लसूण, मिरची कडीपत्ता टाकून परतून घेतलं. यावरच मिठ घातलं. आता
उरलेल्या भाज्यांची रांग सरु....ब्रोकली, गाजर, स्विट कार्न अशा सर्व बारीक केलेल्या भाज्या टाकून छान परतून घ्यायचं. एकडे तो टोमॅटोही शिजतो...मग त्याची बारीक पेस्ट करुन ती या सर्व भाज्यांवर टाकायची....याला उकळी आल्यावर त्यात चमचाभर कॉर्नफ्लॉवर पावडरची पेस्ट, काळीमिरी पावडर टाकून परत उकळी काढायची....अगदी दोन मिनिटांमध्ये त्यात एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचअप टाकायचे...अर्थात या दोन्ही गोष्टी चवीवर असतात....हे मिश्रण थोडं घट्टच करावं....तसंच करुन घेतलं....
आता नुसत्या नूडल्स आणि
ग्रेव्ही बरोबर नाहीत...शिवाय दोन्ही पदार्थ बनवतांना मी तेलाचा अगदी बेतानं वापर
केला होता. त्यामुळे फ्रेच फ्राईजची तयारी
करुन ठेवली. बटाट्यांच्या सळ्या कापून
त्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या मग त्या कोरड्या करुन त्यावर त्या कोरड्या
कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून ठेवल्या. अगदी
जेवायला बसायच्या वेळी एकीकडे या फ्रेच फ्राईज तळायला घेतल्या. तळल्यावर त्यात घरी केलेली पुदीन्याची
पावडर...काळं मिठ आणि घरी केलेली बिटाची पावडर पेरली. दिसायला एकदम छान...मग त्या ज्वारीच्या
नुडल्सला सजवायची वेळ....नुडल्स आणि त्यावर ती ग्रेव्ही...आणि वरुन फ्रेच
फ्राईज...नव-यानं त्या डीशकडे बघितलं...आणि काहीतरी वेगळं हे भलतच मनावर
घेतलंस...एवढीच प्रतिक्रिया दिली. फ्रेच
फ्राईज त्याच्यासाठी बोनस ठरल्या.
ग्रेव्ही फारशी तिखट नाही...पण चवदार झालेली...त्याखाली त्या ज्वारीच्या
नूडल्स सहज लपल्या....सर्व नूडल्स आणि ग्रेव्ही संपल्यावर मी त्या नूडल्स
ज्वारीच्या असल्याची घोषणा केली...मला चव समजली होती...पण छान लागल्या
नुडल्स....कधी तरी भाकरी ऐवजी करायला हरकत नाही...हे सर्टफिकीट मला देऊन तो
उठला....
खरंतर आपली वरणफळ हा एक असाच फक्कड पदार्थ...रॅव्हिओलीचं कौतुक
करणा-या एकाला मी वरणफळांची माहिती दिली होती. एकूण काय आपल्या मराठी पदार्थांमध्ये एकापेक्षा एक सरस पदार्थांचा ठेवा आहे. फक्त त्याची माहिती हवी...आणि असेल तर त्यातील जिन्नसांमध्ये थोडी ढवळाढवळ करण्याची हौस हवी...मग एखादी नवी पाककृती नक्कीच जन्मला येते...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सईताई, भारी हौशी आहात तुम्ही! छान, मस्त बेत करता तुम्ही!👌👌👍👍
ReplyDeleteनलिनी पाटील
ReplyDeleteसइ , तुझ्या पाककलेमधील कौशल्याबाबत, आणि निरनिराळ्या संशोधनाबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि या तुझ्या प्रयोगांचेप्घरातले सर्वजण आनंदाने स्वागत करतात
खरंच सई, तू एवढ्या कामात बिझी असते... तरी स्वतः एवढ्या सुंदर आणि पोषक रेसीपी आम्हाला देत असते...
ReplyDeleteतुझ्या निरंतर.. लिखाणाला.. हॅट्स off... सई..
New recipe kalali
ReplyDeleteसई, एकदम मस्त डिश!! वाचताना तोंडाला पाणी सुटलं!!
ReplyDelete