जेव्हा काट्यानं काटा निघतो....

 

 जेव्हा काट्यानं काटा निघतो....


आठवड्याभरापासून घरात एकच धुमाकूळ चालू आहे.  सर्दी...सर्दी...आणि सर्दी....नवरा ऑफीसला जातांना आणि ऑफीसवरुन आल्यावरही सर्दी पुराण...घरगुती ऑषधं...सोबतीला डॉक्टरांची औषधं...सगळं चालू पण सर्दी काही कमी नाही.  शेवटी रविवारी काहीतरी झणझणीत कर...सर्दी गेलीच पाहिजे असा आग्रह त्यानं धरला...रविवार म्हणजे नव-याचा ऑर्डरचा दिवस पण आपला तर कामाचा दिवस...दोघांचा ताळमेळ कसा घालावा या विचारात एक काटा समोर आला.  काटा....घोळ माशाचा काटा...थंडीत घोळ नावाचा मासा जरुर खावा, हा माझ्या घरचा एक रिवाजच होता...कारण या माशात तेलाचे प्रमाण जास्त असते.  हा मासा म्हणजे नावाप्रमाणेच मोठा घोळच...मासा चवदार...मासाच कशाला त्याचा काटाही तेवढचा चवदार....आणि सोबत गाभोळी मिळाली तर खवय्यांसाठी मोठीच मेजवानी...याच घोळ माशाच्या काट्याचे कालवण हे सर्दीसाठी सर्वात चांगले औषध...त्यामुळे त्याची तयारी सुरु केली.  कारण मासेबाजारात जाऊन, काटा घेऊन घरी यायचं आणि त्याचं कालवण करायचं....एवढा हा प्रकार सोप्पा नसतो...त्याचे पहिले कारण म्हणजे घोळीच्या काट्याला खूप मागणी असते...आणि तो मिळणंही महत्त्वाचं असतं...त्यामुळेच त्याच्या बुकींगपासून सुरुवात करायला लागते. 


घोळ हा मासा नेहमी खाण्यातला नसतो.  या माशाला इतर माश्यांच्या प्रमाणात मांसल भाग जास्त असतो.  शिवाय त्याला काटाही नसतो.  यामुळेच हा मासा थोडा महाग असतो.  मोठा असतो.  एरवी या माशाचा एखादा मोठा तुकडा बस्स पडतो.  पण काटा हवा असेल तर गोष्ट वेगळी पडते.  हा काटा आधी बुक करावा लागतो.  त्यामुळे शनिवारी रात्री आमच्या नेहमीच्या मासेवाल्याला फोन केला.  ही मंडळी रात्री बारानंतर मासे आणायला बाहेर पडतात.  आमच्या मासेवाल्यांचीही तयारी सुरु झाली होती.  फोन केल्यावर मासेवाल्या दादांनी आधी सर्व चौकशी सुरु केली...पाहुणे येणार आहेत का...लेक येतोय का...मग कशाला फोन केलास...काय हवे...तेव्हा मी माझी मागणी सांगितली...घोळीचा काटा...तेव्हा त्यांनी  अगदी मनातली बात सांगितली...सर्दी झालीय काय तुला...की पाठ दुखतेय...आणतो..तू  काळजी करु नकोस...काटा आणतो...पण सोबत माशाचा तुकडा घेशील ना...मी हो म्हटलं...नुसतं काट्यानं काही होणार नव्हतं...चवीसाठी थोडा मासाही घ्यावा लागणार होता...फोनवरुन बुकींग झालं...ही रात्री अकरा-साडेअकराची गोष्ट...फोनवरुन दादांनी सकाळी दहा नंतर ये असा हुकूम केला आणि मी हो म्हणत फोन ठेवला...

रविवारची सकाळ म्हणजे घाईची...योगाचा तास...त्यात  योगा ऑन व्हिडीयोही...त्यानंतर मग निवांत आपला मराठमोळा नाष्टा...कांदेपोहे...मग बाजारात जायची तयारी...या रविवारी घाई नव्हती...आमचे मासे बुक केले होते...त्यामुळे मासेवाल्या दादांनी सांगितलेल्या वेळेच्या अर्धा तास उशीरानं आम्ही त्यांच्यासमोर उभे होतो.   रविवार असल्यामुळे बाजारात ही गर्दी....त्यात  आमच्या मासेवाल्यांसमोर जरा जास्तच गर्दी होती...आम्ही गेल्यावर त्यांनी घोळीचा काटा साफ करायला सुरुवात केली....घोळीचा काटा


घ्यायचा असेल तर तो त्या मासेवाल्याकडूनच कापून घ्यायला लागतो.  कारण इतर माश्यांच्या काट्याप्रमाणे तो नाजूक नसतो.  चांगलाच जाडजूड असलेला हा काटा ही मंडळीच योग्य प्रमाणात कापून देतात.  आम्ही काट्यासोबत घोळ माश्यांचा एक मोठा तुकडाही घेतला.  घोळ माश्याचे अनेक प्रकार होतात.  काहीवेळा फक्त घोळीचे तुकडे तळले जातात.  पण मी या घोळीच्या मोठ्या तुकडयाचे छोटे भाग करुन घेते...अगदी पनीरसारखे आणि त्याच्यापासून एक वेगळा पदार्थ तयार करते.   त्याची तयारी म्हणून मासेवाल्या दादांकडूनच मोठ्या घोळ माशाच्या तुकड्याचे छोटे-छोटे तुकडे करुन घेतले.  मासे घेण्यासाठी माझा मोठा स्टिलचा डबा आहे.   त्या डब्यात एका बाजुला घोळीचे छोटे  तुकडे आणि दुसरीकडे घोळीच्या काट्याचे तुकडे....मोठा खजिना हातात घेतल्यासारखा तो डबा पकडला आणि घराकडे निघालो...

घोळ माश्याचा प्रकार करायला फार त्रास नसतो...पण हा मासा शिजण्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो.  दोन प्रकार होते...त्यातला एक प्रकार आधी करायला घेतला.  घोळ माश्याचे बारीक केलेले तुकडे प्रथम घेतले.  पाण्यात हे तुकडे धुतांना खूप काळजी घ्यावी लागते.  हलक्या हातांनी धुवून झाल्यावर त्यात लिंबाचा रस...मी आलं आणि लसूण यांची पेस्ट घालत नाही तर आलं आणि लसूण किसून घातले...तसं किसलेलं आलं-लसूण...अगदी दहा-बारा काळीमिरी ठेचून...मिरच्यांचे अगदी बारीक केलेले तुकडे आणि कोथिंबीर, पुदीना थोडा कडीपत्ता बारीक करुन...हे सर्व त्या घोळ माश्यांच्या तुकड्याला लावावे...सोबत मिठ लावून माश्यांचे तुकडे बाजुला करुन ठेवायचे.  जेवढे हे मासे मुरतात...तेवढीच त्यांची चव चांगली लागते.  मग घोळीच्या काट्याला हाती घेतले.  हा काटा म्हणजे भरपूर व्हिटॅमीन...काट्याचे कालवण करतांना जरा जास्त प्रमाणात लागतो तो लसूण....तोही दोन प्रकारात...एक सोललेला आणि दुसरा सालासकट...घोळीच्या काट्यामध्ये तेल भरपूर असते.  त्यामुळे फोडणीसाठी बेताचे तेल टाकले तरी चालते...या तेलावर सालासकटच्या लसूणाच्या चांगल्या मुठभर पाकळ्या ठेचून टाकाव्यात...या लसणाच्या पाकळ्या अगदी मंद गॅसच्या आचेवर काळ्या करुन घ्यायच्या...यातून लसणाची चव त्या तेलात उतरते.  नंतर त्या गरम तेलात तसाच मुठभर कडीपत्ता टाकावा आणि मग वर सर्व फोडणीचे सामान...जिरं, मोहरी आणि हिंग....त्यावर अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा...हा कांदा नरम झाल्यावर त्याच्यावर आलं, लसूण यांचं वाटण....हे सर्व छान परतून झालं की मग त्यावर तिखट, हळद, मिठ आणि अगदी बोटभर खोब-याच्या तुकड्याचे थोडं जिरं आणि धण्यासोबत केलेलं वाटण...यावर दोन आमसूल...कोथिंबीर...हे सर्व मिश्रण चांगलं परतायचं...दोन मिनिटभर परतल्यावर त्यात घोळ माशाच्या काट्याचे तुकडे टाकून परतायचे...हे सुद्धा चांगले परतून घ्यायचे....सुरुवातीला पाणी घालायचे नाही.  ज्या भांड्यात हे माशांचे कलावण होत आहे, त्यावर झाकणं ठेऊन त्यात राहिल तेवढं पाणी ठेवायचे.  साधारण पाच मिनीटानंतर हेच पाणी त्या तुकड्यांवर टाकायचे....आणि सोबत आणखी ग्लासभर तरी गरम पाणी टाकायचे...हे सर्व मिश्रण मंद गॅसच्या आचेवर उकळत ठेवावे....जेवढा हा काटा उकळला जातो, तेवढेच त्याचे कालवण चवदार होते.  कालवण छान उकळल्यावर गॅस बंद करतांना त्यात मुठभर कोथिंबीर टाकली की कालवण तय्यार...

आता त्या घोळीच्या तुकड्यांवर नजर टाकायची.  एव्हाना हे घोळीचे तुकडे छान मुरलेले असतात.  त्यावर कॉर्न फ्लॉवर पेरुन घ्यायचे.  कोरडे पिठ पेरल्यांनं त्याला सुटलेल्या पिठाचे आपोआप बायडींग होते.  मग पॅनवर तेल टाकायचे...यावेळी मात्र तेलाचा हात थोडा मोकळा सोडायचा...या गरम तेलात हे घोळीचे बारीक तुकडे टाकायचे आणि छान तळायचे...सर्व बाजु कुरकुरीत होतील याची काळजी घ्यायची.  सर्व बाजुंनी हे तुकडे छान खरपूस झाल्यावर त्याच पॅनमध्ये जागा असेल तर त्यांना एका बाजुला करुन घ्यायचे...आणि अर्ध्या


पॅनवर बारीक केलेले आलं लसूण आणि मिरची टाकून परतायचे...त्यावर मग कांद्याचे मोठे तुकडे टाकायचे...आणि मग शिमला मिरचीचे मोठे तुकडे....सर्वात शेवटी टोमॅटोचे मोठे तुकडे....याच दरम्यान  या सर्वांवर थोडंस मिठ आणि काळीमिरीची पावडर...हे सर्व करतांना गॅस जरा मोठाच असावा...हे सर्व होत असतांनाच एका वाटीमध्ये दोन चमचे टोमॅटो सॉस, चिली सॉस चवीप्रमाणे, व्हिनेगर आणि अगदी छोटा चमचा कॉर्न फ्लॉवर टाकावे...या सर्वात दोन चमचे पाणी टाकून मिक्स करुन घ्यावे...पॅनमध्ये भाज्या आणि घोळ माश्याचे छान कुरकुरीत झालेले तुकडे एक करुन परतावे...सोबत त्यावर टोमॅटो सॉसचे केलेले मिश्रण टाकावे...अगदी अर्धा मिनिट परतल्यावर ही घोळ माशाची डीश तयार...

जेवतांना फार त्रास नाही.  कारण ताटात चपाती, भाकरी अशावेळी नक्कोच...फक्त भाताचा छोटा डोंगर आणि जरा मोठ्या डीशमध्ये घोळीच्या काट्याचे कालवण....सोबतीला घोळ माशाच्या तुकड्यांचे केलेले हे सॅलेड....घोळीच्या काट्याचे हे कालवण थंडीत एकदा तरी घ्यावे असेच असते...नव-यानं या संधीचा चांगला फायदा घेतला....एरवी आमच्याकडे भात फार होत नाही...पण घोळीच्या काट्याचे कालवण हे भाताबरोबरच ओरपायचे असते...त्यामुळे आठवड्याभरचा भात एकाच दिवशी झाला होता...तो साफ झाला...सोबतीला असलेल्या घोळीच्या सॅलेडनं जेवण अधिक आरामशीर झालं...या घोळीच्या काट्याचं कालवण सर्दीसाठी फायदेशीर किती ठरलं हे येत्या दिवसातं स्पष्ट होणार होतंच...पण सध्यातरी त्या झळझणीत कालवणाच्या चवीनं मनाची तृप्ती मात्र झाली होती....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. घोळ मासा मी पण आणते. काटे कमी म्हणून घरातले सगळे आवडीने खातात. खरंच हा मासा चविष्ट असतो. पण त्याच्या काट्याचं कालवण सर्दीला पळवून लावते हे आजच समजलं. वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटलं. सई ,ही तुझ्या लेखनकौशल्याची आणि पाककलेची किमया !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....या घोळीच्या काट्याचे कालवण नक्की करुन बघा....आणि त्याची गाभोळी मिळाली तरी ही गाभोळी नक्की घ्या....ही गाभोळीही थंडीच्या दिवसात चांगली असते....

      Delete
  2. Khoop chan lagte kalvan 👌👍

    ReplyDelete
  3. I have never tried this ghol fish...but now feel like eating.

    ReplyDelete

Post a Comment