नाईटशीपवाली बाई...

 

  नाईटशीपवाली बाई...


मला काही वाटत नाही...लोकं काय बोलतात काय नाय....आपल्याला काय करायचंय...घरातलं महिन्याचं रेशन थोडीच भरुन देतात...पोरांची फी...लाईट बील...घराचं भाडं...भाजीपाला...रोजचा खर्च काय थोडा आहे....बोलणा-याचं काय जातंय...नाईटशीपवाली बाई बोलतात मला...आता नाईटशीप आहे, त्यात का चुकीचं काय....या नाईटशीपनं माझं, माझ्या पोरांचं आयुष्य सावरंलय....मी काय कोणाच्या घरी जात नाय...आणि माझ्याघरी कोण येत नाय...पण मला त्याचं काय वाटत नाय बघा....माझी पोरं शिकतायेत...मोठी होतायेत...एवढंच समाधान आहे....माझ्यासमोर बसलेली सविता नावाची महिला बोलत होती.  हा आमचा संवाद चालू होता रात्री बाराच्या सुमारास...रविवारी संध्याकाळचा वेळ मोकळा होता, म्हणून सहज चित्रपटगृहात गेलो तर शेवटच्या शो ची तिकीटं मिळाली.  चित्रपट संपल्यावर वॉशरुममध्ये गेले.  भल्या मोठ्या या वॉशरुममध्ये एकटी बाई बसलेली.  माझ्यासोबत दोन-तीन महिला येऊन गेल्या....तेव्हाही ती अगदी शांत बसलेली...बाजुला तिची साधनं...झाडू आणि सफाई करण्यासाठी लागणा-या लिक्विड सोपच्या बाटल्या ठेवलेल्या....आम्ही कधी बाहेर जातोय आणि कधी एकदा सफाई सुरु करतेय अशी भावना तिच्या चेह-यावर होती.  मला राहून राहून उत्सुकता वाटत होती, म्हणून हसून बघितलं...तर ताई तुम्ही लवकर बाहेर पडा...मला सफाई करायचीय म्हणून तिचं आर्जव आलं...पण मला काही निघता येत नव्हतं...मी तिचं नाव विचारलं...आणि तुम्ही सुरु करा ताई, माझी काही हरकत नाही म्हणून थांबून राहिले. 


रात्रीचे बारा वाजून गेले होते.  सवितानं नाराजीनं कामाला सुरुवात केली.  सगळीकडे साबणाचं लिक्विड टाकायला लागली.  मी तिच्या मागे....पूर्ण रात्र इथेच रहाता का ताई...मी हळूच विचारलं...तेव्हा तिनं मानेनं नाही म्हटलं...आता माझा पुढचा प्रश्न, ड्युटी  कधी संपणार....तेव्हा बोलली रात्री एक वाजता...मग मी म्हटलं...एकटीच जाणार...सवितानं एव्हाना साबणाचं लिक्विड टाकून घेतलं होतं...मी पुढे जात होते...तर मला हातानं थांबवलं पडाल मॅडम...तिथेच थांबा...सविता बोलायला लागली...माझी गेली सात वर्ष इथे अशीच ड्युटी आहे.  सायंकाळी पाचला येते ती रात्री एक वाजेपर्यंत...मला नाईटशीपवाली बाई म्हणतात आमच्या भागात...कायमची नाईटशीप ना...आता रात्री दोन-अडीचला घरी जाईन...आमच्यासाठी एक गाडी आहे....ती गाडी मला सोडते...सर्वात शेवटी...घरात दोन मुलं आहेत.  एक दहावीला, दुसरा तेरावीला...आठ वर्षापूर्वी नवरा सोडून गेला...दोन मुलांसह मी एकटी...मला ना माहेरानं समजून घेतलं...ना सासरनं...नवरा सोडून गेला....तो दुस-या बाईबरोबर राहू लागला...तो दोष माझाच...मला त्याला राखताच आलं नाही म्हणून...फक्त दोष देऊन लोकं गेले....आता पोरांना काय खायला घालू...मी काय करु म्हणून विचारानं हैराण झाले...माझं शिक्षण पण नाय...काही दिवसांनी आमच्या भागातल्या एका बाईनं मला विचारलं,  काम हवं आहे का...संडास-बाथरुम साफ करायला लागतील...दिवस रात्र चालेल का म्हणून विचारलं....माझ्याकडे काय साफ करायचंय यापेक्षा पैसे किती मिळणार हा प्रश्न होता...आणि दोन लहान मुलांच्या खाण्यापिण्याचा...शिक्षणाचा....अगदी खोलीच्या भाड्याचाही...मग त्याबाईबरबोर आले आणि  कळलं इथे ड्युटी वेगवेगळ्या वेळेत आहे....मला सकाळची वेळ जमणारच नव्हती...पोरांना कुठे ठेऊ...त्यांच्या शाळेचा प्रश्न...मग ही वेळ बरोबरची....आणि ताई या वेळेत काम करायला कोणी बाई तयारच नव्हती....मीच एकटी....त्यामुळे लगेच काम मिळालं...मला केवढा आनंद झाला....सात-साडेसात वर्ष झाली...त्या कोरोनाच्या काळात काही महिने घरी होते....तेवढाच फक्त वेळ....बाकी एवढी वर्ष सलग येतेय इथं....साफसफाई करायला काय जातंय...पहिल्यांदा जाम बोलणी खाल्ली....घरचेपण जाम बोलले...काय काम आहे...आणि काय वेळ आहे.  मी बोलले सोडते...आता नवीन काम द्या आणि पैसेपण...मग सगळे गप्प

बसले....फुकट पैसे कशाला देतील...त्यांना फक्त फुटकचे सल्ले देता येतात...आणि ते मला नको...आता सगळं ठिक चालू आहे....पोरपण समजूतदार....मोठ्याला तर जेवण पण करता येतं...ब-याचवेळा पोरं माझ्यासाठी थांबतात रात्रीची जेवायची...मोठा  लेक गरम करुन ताट वाढतो...अजून काय हवं...सविता बोलत होती...तितक्यात दरवाजावर जोराची थाप पडली...मी एकदम तंद्रीतून बाहेर आले...दहा-पंधरा मिनिटं होऊन गेली होती...माझा नवरा बाहेर उभा होता...तोच असणार...आणि तोच होता....काय झालं...एवढा वेळ...सगळे गेले...आपणच एकटे आहोत...ठिक आहेस ना...चल...म्हणून तो सुरु झाला...मी हळूच सविताकडे बोट दाखवलं....ती आता भींतीवरील टाईल्स साफ करत होती...ती आहे बघ म्हटलं...सविताला हाक मारली...येते, पुढच्यावेळी बोलू म्हणून बाहेर पडले....तिनंही हात दाखवला आणि हसत निरोप दिला.   

घरी परत येतांना गार वारा लागत होता.  पण मनात सगळ्या जुन्या आठवणींच्या जणू ज्वाळाच उठल्या होत्या.  सविताच्या जवळपास जाणारा अनुभव...साम मध्ये नोकरी लागली होती.  त्या आनंदात मी होते...अगदी एक दिवस जॉईंनींगसाठी राहिलेला.  अशावेळी जी घाई होत असते, तीच घाई चाललेली.  कपड्यांचा वॉडरोब तयार करणे,  आठवड्याभराची डब्याची तयारी, 


खाऊचे डबे....किती ती कामं...अशीच माझी घाई चालू होती.  तितक्यात एक फोन आला...अगदी प्राथमिक चौकशीही न करता एक खडखडीत आदेशच आला....ते तू कुठली नोकरी स्विकारलीस का....ती नको करु...तुला नाईटशीपला जावे लागेल....आपल्याकडे ते चालत नाही...असं आपल्यात कोणी केलं नाही...मी इकडे अक्षरशः स्तब्ध झालेले....कारण समोर बोलणारं माझ्यासाठी आदरणीय व्यक्तीमत्व...त्यांचे विचार स्त्री स्वातंत्र्य पुरक...पण माझ्याबरोबर त्या बोलत असतांना, किंबहुना त्या मला जो आदेश देत होत्या तेव्हा हा त्यांच्या विचारांचा फक्त कचखाऊ आरसाच असल्याचं मला जाणवलं...मी फक्त हो...हो...म्हणत संवाद साधला.  पलिकडून फोन ठेवला गेला, तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ झाले.  आता काय करायचं...हातात जॉईंनींग लेटर...आणि आता हा आलेला आदेश....करायचं काय...या प्रश्नासोबत आणखी एक प्रश्न....मग एवढे दिवस आम्ही स्वातंत्रवादी स्वातंत्रवादी म्हणून घेत होते, ते यांचे विचार तरी कसले होते.  सायंकाळी नवरा घरी आल्यावर त्याला झालेला प्रकार सांगितला....तो नेहमीप्रमाणे हसला....लाखोजणी करतात नाईटशीप....असं प्रत्येकाकडे म्हटलं की आमच्यात चालत नाही तर जग कोसळेल....तू लाग तयारीला मी आहे...मी जोरदार हुश्श केलं...आणि कामाला लागले....

आता गाडीचा गार वारा खातांना मी मनातल्या मनात सविताचा पुन्हा विचार करायला लागले होते.  मला आलेल्या अनुभवाचा आणि सविताचा विचार चालू होता.  साधीशी वाटणारी सविता आणि काठपदराची भपकेबाजी साडी आणि चेह-यावर गडद रंगाची लिपस्टिक....नक्कीच साधीशी सविता सरसच ठरली.....कपड्यांवरुन, श्रीमंतीवरुन विचारांची झेप ठरत नाही.  ती स्वभावात असावी लागते...आणि मगच ती कृतीत येते....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. खूपच सुरेख आणि तितकेच मार्मिक

    ReplyDelete
  3. खूप छान.... अलगद वर्मावर बोट ठेवलंत..

    ReplyDelete
  4. आदरणीय सई जी अपन अतिशय मार्मिक आणि वार्मिक शब्दत छान वर्णन केलय

    ReplyDelete
  5. खुप सुंदर प्रवाही लेखन असतं तुझं शिल्पा..

    ReplyDelete
  6. वाह ! वाह ! खूप छान

    ReplyDelete

Post a Comment