एका साध्याच्या दोन बाजू....
एका नाण्याच्या दोन बाजू असतात...छापा आणि काटा...आपल्याला नित्याच्या आयुष्यात असे अनेकदा अनुभव येतात, या दोन बाजू आपल्याही समोर येतात. एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण किती वेगळा असू शकतो, भिन्न असू शकतो याचा अनुभव मलाही काही दिवसांपूर्वी आला. छापा चांगला की काटा चांगला हा विचार तेव्हा मनात सुरु झाला. दोन बाजु असल्या तरी नाणं एकच असतं...तसंच झालं, एकाच गोष्टीच्या दोन बाजू समोर आल्या...प्रत्येकाची नजर वेगळी, तशीच विचारसरणीही...अशीच दोन विचारसरणीची मंडळी गेल्या आठवड्यात भेटली...एकाच दिवशी...दोघांचंही साध्य एकच होतं...पण दोघांनाही त्यातून मिळालेलं समाधान वेगळ्या पद्धतीचं होतं...या दोन बाजुत आम्ही कुठे होतो...नशीबानं जी बाजू आम्हाला थोडं नाराज करुन गेली, ती आधी समजली. नंतर ज्या बाजुला समाधान होतं, ती बाजू समोर आली....एखाद्या पदार्थात कुठलाही फ्लेवर टाकायचा असेल तर तो सर्वात शेवटी टाकला जातो....मग तो कायम दरवळत रहातो...तसंच झालं....समाधानाची बाजू नशिबानं नंतर समोर आली...आणि तिच्यात आम्ही बूडून गेलो...
काही महिन्यापूर्वी आमच्या भागात रहाणा-या एका महिलेचा फोन आला....तिच्या मुलाला नोकरी हवी होती...मी तिचा फोन चालू असतांनाच नव-याला विचारलं, काही होऊ शकतं का...त्यानं लगेच सीव्ही पाठवायला सांगितलं...मी तिच्या मुलाबरोबर बोलले....त्या मुलानं सीव्ही पाठवला...त्याच्याबरोबर नव-यांच बोलणं झालं...अगदी आठवड्याभरात त्या मुलाला नोकरी मिळाली. त्या महिलेचा फोन आला....एकदम आनंदी स्वर...माझे आभार व्यक्त करतांना तिला भरुन आले होते...घरची अगदी साधारण परिस्थिती...ती स्वतः एका दुकानात कामाला...नवरा कुरिअर एजन्सीमध्ये कामाला...कोरोनाच्या फटक्यानं घरची परिस्थिती अधिक खालावली होती. त्यात मुलाला पदवी मिळाल्यावर लगेच नोकरी मिळाली, हा त्या कुटुंबाला खूप मोठा दिलासा होता....मी फक्त निमित्त झाले. याच महिन्यात आणखी एक फोन होता...नोकरी असली तर बघा अशाच आशयाचा...पुन्हा नव-याला मेल केला...त्याचं बोलणं झालं...त्यालाही महिना भराच्या अंतरानं नोकरी मिळाली...मला नव-यानं ही बातमी सांगितली...तेव्हा सर्व ऑनलाईनच होतं...मुलगा जॉईन झाला...तुला त्यानं कळवलं का...म्हणून विचारलं...पण मंडळी गडबडीत असतील, त्यात राहिलं असेल, असं वाटलं...मुलाच्या नोकरीला महिना झाल्यावर त्याच्या वडीलांचा फोन आला...नोकरी मिळाली...पण पॅकेज काही खास नाही...आता टाईमपास म्हणून जॉईन झालाय...नाहीतरी घरुनच काम आहे, काय फरक पडतोय...आम्ही दुसरीकडे बघतोय...तिथे मोठी ऑफर मिळाली की हा जॉब सोडू...तुम्ही वाईट वाटून घेऊ नका...मी ठिक म्हटलं...मी कशाला वाईट वाटून घेऊ...माझी कंपनी नाही...आणि त्या कंपनीसाठी तो जगातला एकमात्र कर्मचारी आहे, असंही नव्हे....
या घटनेनंतर जवळपास पाच-सहा महिन्यांनी ऑफलाईन कामकाज सुरु झाले.
मला या दरम्यान त्या महिलेचा दोनवेळा फोन येऊन गेला...प्रत्यक्ष भेटून तुमचे आभार मानायचे आहेत, पण वेळ मिळत नाही...पण लेक खूष आहे. दरम्यान नव-यानंही त्याच्या काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं. त्या मुलानं पुढच्या अभ्यासक्रमालाही प्रवेस घेतला. अभ्यास सांभाऴून ऑफीसच्या कामातही त्याची प्रगती चालू होती. दुस-याची मात्र काहीच खबर नव्हती...आणि मी सुद्धा ती खबर काढण्याचा प्रयत्न केला नाही. या आठवड्यात सोमवारी कधी नाही ते रात्रीचे जेवण लवकर झाले...त्यामुळे सहज एक फेरी मारुया म्हणून दोघंही बाहेर पडलो....अगदी काही पावलं चालतोय न चालतोय तोच एक हाक ऐकू आली. त्या मुलाचे वडील होते...भेटल्या भेटल्या सुरु झाले...काय साहेब...काय तुमची कंपनी...अहो मुलाला नोकरी दिली...पण पगार काय...त्या मालकाच्या मुलाचं लग्न झालं तर किती खर्च केला...आणि आमच्या मुलाचं काय...आता कंपनी किती दूर...निदान ट्रेनचा पास तरी द्यायचा की...एवढी मोठी कंपनी पण सुविधा नावाला नाहीत...आणि मालक तर मजा मारतोय...पण कर्मचा-यांना काही नाही...तुम्ही जरा बघा...त्याचा पगार वाढतोय का बघा जरा...नाहीतर दुसरीकडे प्रयत्न चालू आहेत आमचे...बाकी काय....आता काय चालायला का...छान...चला....असा एकतर्फी संवाद साधून ते गृहस्थ मार्गी लागले. नव-यानं आणि मी डोक्याला हात लावला...नवरा सांगत होता, हा मुलगा कामाला येतो...पण स्वतःहून काही प्रगती नाही...जी पदवी घेतली, त्यावरच समाधान...ऑफीसमध्येही काही अधिक जाणून घेण्याची किंवा शिकण्याची धडपड नाही...की नवीन शिकायची उत्सुकता नाही...त्याचाही रोख वडीलांसारखाच...मी दुसरीकडे प्रयत्न करतोय...इथे काही ठिक नाही...अर्थात या वाक्याला वर्ष होत आलं आहे, पण लेकाला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळालेली नाही...आणि याचे वडील त्याची तुलना कंपनीच्या मालकांबरोबर करत होते...असो...आम्ही दोघं थोडे नाराज झालो....कधी नाही ते चालायला बाहेर पडलो आणि हा प्रसाद मिळाला...
आणखी पुढे गेल्यावर मागून ताई...ताई असा आवाज आला....आता कोण म्हणून थांबलो तर पहिल्यांदा ज्याला नोकरी मिळाली होती, त्या मुलाची आई...आम्हाला बघून धावतच आली....एवढ्या उशीरा कुठे ग...म्हणून मी विचारल्यावर दुकान अलिकडे उशीरा बंद होतं...तोपर्यंत थांबायला लागतं म्हणून सांगितलं....हे बोलत असतांनाच तिनं माझा हात हातात धरला...ताई खूप उपकार झाले...लेकाचं भलं झालं...किती मोठी कंपनी...आम्ही विचारही केला नव्हता...पण तुम्ही संधी दिलीत...त्याला एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल असं कधी वाटलच नाही...आणि मागच्या आठवड्यात ते कंपनीनं आमची सगळ्याची तपासणी करुन घेतली...मुलानं सांगितलं सगळं फ्री आहे. कंपनी सगळा खर्च करते...आमच्या तिघांचीही तपासणी केली. सकाळपासून हॉस्पिटलमध्ये गेलेलो...एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली....कितीतरी टेस्ट केल्या...त्याही मोफत...कायकाय जेवण होतं...सर्व फ्री...कंपनी खूप चांगली आहे...कर्मचा-यांची किती काळजी...एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कधीच गेलो नाही...मला थोडी शुगर असल्याचं त्या डॉक्टरांनी सांगितलं....बाकी काही नाही....ताई, खूप मोठी कंपनी...मालकाचं मन खूप मोठं आहे....कर्मचा-यांची किती काळजी त्याला....बरं वाटलं...दादा, लेकावर लक्ष ठेवा...तुमचे खूप उपकार आहेत....म्हणत पुन्हा तिनं हातातला माझा हात हलकासा दाबला....त्या स्पर्शामध्ये सर्व काही होतं. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं...माझ्यासमोर आणि नव-यासमोर मग हात जोडले...नव-यानं तिला सांगितलं....तुमचा मुलगा खूप हुशार आहे....खूप पुढे जाईल...काळजी करु नका....तीनं पुन्हा हात जोडले....आणि घराकडे गेली.
एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेलेले...आमचा चालण्याचा बेत बारगण्याच्या
स्थितीत होता...तरीही निदान आल्यासारखं एक फेरी पूर्ण करुया म्हणून चालायला
लागलो...दोन्ही मुलांचे विचार मनात होते....दोघंही एकाच ठिकाणी
नोकरीला...दोघांचीही कंपनी एक...मालक एक...पण समाधानाची पातळी किती आणि कशी असावी
याच एक झलकच आम्हाला मिळाली...कंपनी...मालक मोठे असतातच...पण आपण त्या कंपनीसाठी
काय करतो...आपल्या गुणांनी प्रगती कशी साधतो, हे महत्त्वाचे असते...आणि कुठेतरी
मिळालेल्या संधीबाबत आभार नावाचा शब्द असतो की...समाधानाची पातळी असते...पण हे
सर्व सांगून उमजत नाही हेच खरं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप सुंदर
ReplyDeleteKhup chhan lekh
Deleteखूप सुंदर
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteWell said 👌
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteअसे अनुभव अनेकदा येतात. तू मांडले पण खास आहेत.
ReplyDeleteChan lekh
ReplyDelete