असा...तसा...प्रवासी बटाटेवडा
झालं...एकदाचं आपलं तिकीट कंन्फर्म झालंय...तू तयारीला लाग...सर्व सामान काढून ठेव...बाकी काय खरेदी करायची असेल तर करुन ये...रात्री बॅंगा भरू...उद्या सायंकाळी सहाच्या ठोक्याला निघायचं...तुला चार दिवस किचनपासून सुट्टी....गाडी पकडण्यापूर्वी कल्पनामध्ये जेऊया...चल तयारीला लाग...नव-यानं फोनवरुन हा आदेश दिला...आणि तोंडाचा आ...करुन मी ऐकत बसले...इंदौरमध्ये, आमच्या कुलदेवीला जाण्याचा बेत खूप दिवसांपासून चालू होता...पण ठरत नव्हतं...आणि आत्ता हा बेत ठरला तो असा...तयारीला चोवीस तासांचा वेळ...अर्थात ज्या दिवशी जायचं आहे, हा विचार सुरु झाला होता, तेव्हाच मी ब-यापैकी तयारी करुन ठेवली होती...बॅंगा काढून त्यात आवश्यक सामान डंप करुन ठेवलं होतं...त्यामुळे बाहेर काही खरेदी करायला जायची गरजच नव्हती...फक्त प्रश्न होता, ज्या दिवशी निघायचंय त्या दिवसाचा...प्रवासाला सोप्प होईल, म्हणून नवरा त्या दिवशी वर्क फ्रॉम होम....सकाळचं जेवण करायचं फक्त...बाकी किचनची आवराआवर महत्त्वाची...सोबत काहीही करुन घ्यायचं
नव्हतं....त्यामुळे मी तशी तयारी सुरु केली...रात्री नवरा घरी आला तेव्हा जवळपास सर्व तयारी झालेली...सर्व झालं...म्हणून मी हुश्श करीत असतांनाच नव-यानं एक फोन केला...आणि आता काय करायचं हा प्रश्न समोर आला...
या प्रश्नामागे एक नाव होतं, ते म्हणजे...कल्पना...हॉटेल कल्पना...मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोरचं हॉटेल कल्पना हे माझ्या अगदी लहानपणापासूनचं आवडीचं हॉटेल...अस्सल दाक्षिणात्य पदार्थ...काश्मिरी बिर्याणी...मिळण्याचं हक्काचं ठिकाण....त्यामुळे या हॉटेलच्या आसपास जरी कोण जाणार आहे, असं कळलं तरी मी
तिथून एखाद्या पदार्थाचं पार्सल आणण्याचा आग्रह करते. म्हणूनच कुठेही बाहेर जायचं असेल तर मुंबई रेल्वे सेंट्रल स्थानकाचाच माझा आग्रह असतो. आताही त्याचसाठी हा आग्रह केला...पण तो वाया गेला. कारण नव-यानं सहज म्हणून हॉटेलमध्ये फोन केला...पार्सल हवं असेल तर किती वेळ आधी सांगावं लागेल...घरातून निघायला वेळ लागला तर वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी आधीच ऑर्डर देऊन ठेऊया, असा त्याचा सावध पवित्रा होता...घरातून ऑफीसचं काम करतांना अचानक मिटींग लागली तर वेळ होईल असा त्याचा अंदाज होता...त्यासाठी ही तयारी...पण त्याच दरम्यान समजलं की हॉटेल कल्पना काही कामासाठी बंद आहे...झालं...आता काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला...बरं मी प्रवासासाठी काही घेऊन जायला लागले, या तयारीत नव्हतेच...त्यामुळे किचनमध्येही ब-यापैकी आवराआवर केलेली...कुठून दुस-या हॉटेलमधून पार्सल घेऊया हा पर्याय समोर आला...पण मन तयार नव्हतं...अशावेळी एक पदार्थ समोर आला, तो म्हणजे प्रवासी बटाटेवडा...
या प्रवासी बटाटेवड्याचा शोध मी लेक लहान असतांना लावला. त्याच्या परीक्षेसाठी ब-यावेळा प्रवास करायला लागायचा. अगदी पहाटे
घर सोडायला लागायचे...पार कांदिवली, बोरीवली पर्यंतचं टोक गाठायला लागायचं..अशावेळी डबा गरजेचा असायचा...पण डब्यात काय करायचं हा मोठा प्रश्न पडायचा...परीक्षा असल्यावर लेक तेलकट खाण टाळायचा...त्यामुळे सारखी तहान लागते...शिवाय तो पदार्थ आटोपशीर आणि चटपटीत...चमचमीतही असायला हवा अशी त्याची मागणी असायची...अशातच मी हा बटाटेवडा करायला सुरुवात केली. एका घासाचा हा बटाटेवडा नंतर आम्ही प्रवासी बटाटेवडा म्हणून ओळखायला लागलो...आता इंदौरला निघतांनाही हाच बटाटेवडा करण्याचं नक्की केलं.
बटाटेवडा करतांना मोजके जिन्नस सोबतीला लागतात...पण या प्रवासी बटाटेवड्यासाठी मी त्यात थोडीशी फेरफार केली आहे. बटाटेवड्यासाठी एरवी बटाटे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि चण्याचं पिठ हे प्रमुख जिन्नस लागतातच...बाकी तुम्ही त्यात काहीही टाका...त्याची चव भन्नाटच लागते...मी बटाटेवड्याचं सारण करतांना बडीशेपची फोडणी देते...सोबत खोब-याच्या बारीक कापा आणि अगदी नावापुरते मटारचे दाणे टाकते...अर्थात बटाटेवडे करतांना त्यात काहीही घाला...पण त्याची सर्व आन बान आणि शान ही बटाट्याचीच असली पाहिजे. त्याला धक्का लागेल असं काहीही करायचं नाही. त्यामुळे अगदी नावाला मटारचे दाणे...खोब-याचे अगदी पातळ तुकडे...फोडणीला बडीशेप, धणे, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची यांची
भरड आणि अगदी बारीक चिरलेला कडीपत्ता...हे सारण तयार झालं की चांगली चमचाभर साखर...मिश्रण थंड करण्यासाठी ठेवल्यावर मग चटणीकडे हात वळवायचा...सुक्या खोब-याची लाल चटणी ही बटाटेवड्याबरोबर सुरेख जाते...आणि या प्रवासी बटाटवड्यात तर ती अधिक खुलून दिसते. त्यातही मिरचीचा वापर अगदी आटोपशीर...कारण ते प्रवासी आहेत...थोडी काळजी घेऊनच तयार करायचे...सुकं खोबरं, लसूण, अगदी थोडे तिळ आणि लाल मिठ आणि सुकी मिरची...असं सगळं अगदी दोन मिनिटासाठी परतायचं...आणि पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं...की चटणी तयार...ही चटणीही थोडा वेळ बाजुला ठेवायची...आता मुख्य तयारी म्हणजे ज्या पिठात वड्यांना डुबकी मारायची असते त्या पिठाची...इथेच मी थोडासा बदल केला आहे. एरवी आपण बटाटेवडा किंवा भजी करतांना चण्याचे पिठ वापरतो...मी प्रवासी बटाटेवड्यात चण्याच्या पिठाऐवजी मुगाच्या डाळीचे पिठ वापरते...मुगाच्या डाळीच्या पिठात अगदी अर्धा चमचा तांदळाचे पिठ, मिठ, हळद आणि थोडा ओवा हे सर्व बेताचं पाणी टाकून फेसून घ्यायचं आणि पंधरा मिनिटांसाठी बाजुला ठेवून द्यायचे. बटाटवड्याच्या भाजीचे गोळे करण्यात ही दहा-पंधरा मिनिटं सहज जातात. प्रवासी बटाटवडे करतांना हे भाजीचे गोळे करतांनाच खरी कसब लागते...कारण एरवी जसे मोठे गोळे केले जातात, त्याच्या अगदी अर्धे गोळे करायचे...त्यासाठी हे भाजीचं मिश्रण हलक्या हातांनी मळून घ्यायचं...अशामुळे बटाट्याची एखाद दुसरी फोड मोठी राहिली असेल, तर ती बारीक होऊन मिश्रण छान एकजीव होतं...मग या भाजीचे जरा लहानच गोळे तयार करायचे...हे गोळे तयार झाल्यावर पुन्हा ते हातात घेऊन त्यात मध्ये भरण्यासाठी एक जागा करायची....त्या जागेत तयार केलेली लाल चटणी भरायची आणि पुन्हा हलक्या हातांनी हा गोळा गोल करायचा....हे सर्व काम सुरुवातीला जरा आरामसे करायला लागते...नंतर हात बसला की अगदी गोळ्यांमध्ये पटकन चटणी भरुन होते...मग मुख्य कामाकडे मोर्चा वळवायचा...त्या मुगाच्या पिठात अगदी नखभर खायचा सोडा टाकून पुन्हा चांगलं फेसून घ्यायचं...
या सर्वात वडे तळण्यासाठी कढई वगैरे ठेवण्याची गरज नसते...कारण अगदी
कमी तेलात होणारे हे वडे तयार होतात ते अप्पे
करण्याच्या साच्यात...अप्पेपात्र गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचे...त्यात
अगदी नावापुरते तेल टाकून घ्यायचे...अगदी पहिल्यांदा हे तेल सर्वत्र निट
लावण्यासाठी मी गरम अप्पेपात्र गोल फिरवून घेत असे...मात्र अलीकडे तेल
लावण्यासाठीचा एक ब्रश घेतला आहे, त्यानं
हे काम चोख होतं...मग ते चटणी भरलेले
बटाटेवड्यांचे छोटे छोटे गोळे मुगाच्या पिठात बुडवायचे...हे अगदी नाजूक काम...त्यामुळे ते करण्यासाठी
शक्यतो काट्याचा वापर करायचा...त्यामुळे
फार पिठही वड्यांसोबत जात नाही...सर्व बटाटेवडे पात्रात टाकून झाले की, अर्धामिनीटभर
झाकण ठेवायचे...अशानं वरचं आवरण तयार होतं...मग झाकण काढून त्यावर तेलाचा ब्रश
फिरवायचा....की काम झालं...वडे छान तयार होतात...काही वेळानंतर ते
परतायचे...तुम्हाला वाटलं तर त्यात अधिकचं तेल टाका...नाहीतर अगदी थोड्या वेळातच
हे वडे छान तयार होतात.
हे छोटे वडे मी अनेकवेळा प्रवासात करुन नेले आहेत. वडे छोटे असले तरी त्याचे फायदे खूप आहेत. एकतर त्याचा आटोपशीर आकार...एका घासात एक वडा खाता येतो...शिवाय आत चटणी भरली असल्यामुळे चटणीसाठी वेगळा डबा घ्यावा लागत नाही...प्रवासात असे एका घासातच वडा आणि चटणी तोंटात जाणे सोप्प पडतं....शिवाय त्यात तेलाचा वापर कमी असतो, त्यामुळे फार त्रासही होत नाही...मी सुद्धा इंदौर दौ-यात असेच प्रवासी वडे सोबत घेतले होते...एक डबा भरुन हे वडे...आणि त्यावर छोट्या पिशवीमध्ये दोन टुथपीक आणि टिश्यु पेपर...काम झालं...मुंबई सेंट्रलवरुन आमची ट्रेन रात्री नऊ वाजता सुटली...तासाभरानं बोरीवली स्टेशन पार झालं...आणि आमचा वड्यांचा डबा उघडला...एक-एक टुथपीक हातात घेऊन वड्यांवर ताव मारायला सुरुवात केली...नशीब एवढं चांगलं की हा डबा उघडल्याउघडल्याच कॉफी...कॉफी...चा आवाज कानी आला...लगेच एक कप कॉफी घेतली...आणि त्याला परत जातांनाही आवाज दे म्हणून सांगितले...पाठोपाठ चहावालाही आला...म्हणजे नवराही खूष....अगदी एका घासाचे हे प्रवासी बटाटवडे सुरेख झाले होते...सोबतीला कॉफी होती, त्यामुळे त्याची चव अधिकच वाढली...इंदौर म्हणजे खवय्यांची नगरी...या खवय्यांच्या नगरीला जातांना अशी सुरुवात होणे म्हणजे, मोठा शुभशकूनच...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
प्रवासी वडे फारच मस्त आणि टेस्टी!! नवीन रेसिपी आवडली.
ReplyDeleteSo tempting...mastttt... Aboli.
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान आणि नवीन रेसिपी
ReplyDeleteमी असे अप्पे पात्रातले साबुडणावडे वडे करते आता हे करून बघेन .आत चटणी घालण्याची व एक घासा चा वडा ही कल्पना पण छान.
ReplyDelete👍👌👌
ReplyDeleteMast tondala Pani sutle
ReplyDelete