वय फक्त 88

 

वय फक्त 88


अग मी पत्र लिहिते....तू हा पेपर वाचलास का...त्यात बघ ती लेखमाला चालवली होती.  सर्व शाळांची माहिती होती...गावातल्या शाळांपुढे खूप वेगवेगळी आव्हानं असतात....त्यावर मात करुन त्या शाळा कशा मुलांचं आयुष्य घडवतात....आणि हो, ते पुस्तक वाचलंस का....त्यात लेखकांनी किती छान वाक्य लिहिलं आहे....हे बघ आजकल पत्र कुठे मिळतात...पोस्टकार्ड कुठे मिळतं हे पण माहित नाही...म्हणून मी सरळ जोडपत्र पाठवते...मला काही अपेक्षा नाही, पण समोरच्याच्या चेह-यावर एखादं हसू आलं की बस्स...आणि यात माझा काही स्वार्थ नाही....मी फक्त निमित्त...बाकी सर्व तो परमेश्वर करुन घेतोय....माझ्यासमोर 88 वर्षाच्या आजी बसल्या होत्या....गोरापान चेहरा...पिवळ्या रंगाची नऊवारी साडी...एका मैत्रिणीनं आणलेल्या चाफ्याच्या फुलाचा वास घेत...भरपूर साखर, आलं घाललेल्या चहाचा स्वाद घेत या आजी माझ्यासोबत बोलत होत्या...आणि मी फक्त तोंडाचा आ....करुन त्यांच्याकडे बघत होते...काय अदभूत व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलं होतं...88 वर्षाच्या या आजींचं नाव, मंगला बाळकृष्ण नातू....मी त्यांना पहिल्यादा डोंबिवलीत झालेल्या पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनात पाहिलं होतं.  स्वतः फिरुन त्यांनी आपल्याला हवी ती पुस्तक निवडली होती.  वय 88.  पण चष्मा नाही की वाकलेला पाठिचा कणा नाही.  आजी एकदम ताठ....चौकशी केल्यावर समजलं ज्येष्ठ साहित्यिका, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. धनश्री साने यांच्या त्या आई.  नातू आजींबरोबर तेव्हा अगदी जुजबी गप्पा मारल्या आणि मी त्यांच्या प्रेमातच पडले....मग तुमच्याबरोबर अजून गप्पा मारायच्या आहेत, म्हणून मागे लागले....या आजी ब-याच व्यस्त असतात...त्यांची माझी भेट झाली ती थेट या आठवड्यात, 8 मार्च रोजी....माझा महिला दिन खरा सार्थकी लागला.  कारण नातू आजींचे कार्य आणि विचार ऐकल्यावर मी त्यांच्या चरणी नतमस्तक झाले होते. 


मंगला नातू यांची माझी भेट झाली...जवळपास तीन तासांच्या गप्पा झाल्या...नातू आजी हे काय व्यक्तिमत्व आहे, याची त्यात थोडक्यात झलक मिळाली.  त्यांचं वय फक्त 88....हा फक्त शब्द का....कारण, नातू आजींकडे बघितलं तर उत्साह, चेतना म्हणजे काय याचा अनुभव येतो.  ही नातू मंडळी मूळ नागपूरची.  त्याचं माहेरचं नाव सूमन सदाशिव जोशी.  त्यांच्या नागपूरच्या घराच्या आसपास अनेक मान्यवर मंडळी रहात होती.  गोळवलकर गुरुजींचा आणि त्यांच्या वडीलांचा, सदाशिव जोशी यांचा स्नेह होता.  त्यातूनच संघाच्या शिस्तीत त्यांचं बालपण गेलं.  त्यांचे मोठे बंधू अरविंद, यांच्यामुळे वाचनाची ओढी त्यांना लागली.  घरात गोकुळ होतं....आल्यागेल्याचं करतांना सानेगुरुजी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, यांच्या पुस्तकातून आजींचं बालपण समृद्ध झालं.  मोठा भाऊ, नाना, पुस्तक आणून देत असे, आणि हे वाच आणि मला यात काय आहे, हे सांग असे सांगून पुस्तक ताब्यात देई.  मोठ्या भावाला पुस्तकाचा गोषावरा द्यायचा आहे, या धाकानं पहिल्यांदा पुस्तक वाचली गेली.  नंतर आजी या पुस्तकांकडे ओढल्या गेल्या.   तो काळ वेगळाच होता....मुलांचे पाढे, सगळी स्तोत्र, मनाचे श्लोक तोंडपाठ असायचे.  नातू आजींचे वडील पाढा कधी सरळ विचारत नसत...मध्येच एका पाढ्यातील आकडा विचारायचे...मग पंचायत नको आणि वडीलांचा ओरडाही नको, यामुळे आजींनी तेव्हा सगळे पाढे तोंडपाठ केले, ते आजही आहेत.  स्वातंत्रवीर सावरकर एकदा नागपूर स्टेशनवर येणार होते, तेव्हा आजींच्या घरची सगळी मोठी मंडळी त्यांना बघण्यासाठी स्टेशनवर गेली होती.  तेव्हा या आजी शाळा बुडवून मैत्रिणींना घेऊन सावरकरांना बघण्यासाठी स्टेशनवर गेल्या....शाळा बुडवली म्हणून त्यांनी घरी आल्यावर वडीलांची माफी मागितली.  पण सावरकरांना प्रत्यक्ष बघितल्याचा अनुभव सांगताना त्या एवढ्या वर्षानंतरही गहिवरल्या होत्या. 

बाळकृष्ण नातू यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.  तेव्हा त्यांनी तेव्हाची


मॅट्रीकची परीक्षा पास केली होती.  बाळकृष्ण नातू हे स्टेटबॅंकेत होते.  सासरीही मोठा गोतावळा.   हा गोतावळा सांभळत आजींनी डीएड पदवी घेतली.  काहीकाळ नागपूरच्या शाळेत नोकरी करुन संसाराला हातभार लावला.  पुढे नातू यांची बदली पालीला झाली.  नागपूरहून थेट पाली.  याआधी त्यांनी कोकण बघितलेही नव्हते.  पण बदली झाल्यावर तीन मुलांना घेऊन त्या पालीला आल्या.  पहिल्यांदा वाटणारी धाकधूक कमी झाली.  पालीला या नातू दाम्पत्यांनं चांगलाच मित्रपरिवार गोळा केला.  तिथेही त्यांनी काही  वर्ष शाळेत नोकरी केली.  अगदी मंगळागौरीपासून ते उकडीच्या मोदकांपर्यंत सर्व पालीला शिकल्याचे आजी सांगतात.   नातू यांची बदली ठराविक वर्षानी होत राहिली.  मनमाड, नाशिक, साक्री आदी ठिकाणी त्यांना नोकरीनिमित्त रहावे लागले.  येथे नातू आजींनी संस्कारवर्ग चालवले.  या संस्कार वर्गात त्या मुलांकडून पाठांतर करुन घ्यायच्या.  रामरक्षा, समरगीते, मनाचे श्लोक, पसायदान यांचे पाठांतर मुलांकडून पक्के  करुन घेतले होते.  शिवाय त्यांची भाषा सुधारण्यास त्या मदत करत.  या वर्गाला थोडीथोडकी नव्हे तर 60 ते 70 मुलं येत असत.  काही महिन्यापूर्वी याच मुलांनी एकत्र येत नातू आजींचा सत्कार केला.  आता त्यातील बरीच मुलं नोकरीतून निवृत्त झाली आहेत, कोणी शिक्षक आहेत, तर कोणी डॉक्टर....पण  आजींनी पाठांतर करुन घेतलेली स्तोत्र अद्यापही येतात हे त्यांनी अभिमानांनी सांगितलं होतं.  हे सांगतांनाही आजी भारावल्या होत्या....मला सांगत होत्या, हे बघ ही पिवळी साडी त्या मुलांनीच दिलीय...आजींच्या चेह-यावर त्या मुलांचं कौतुक ओसंडून वहात होतं. 

या आजींच्या अशाच गप्पा चालू असतांना त्यांचा एक खास कप्पा उघडला गेला.  हा खास कप्पा म्हणजे आजींची लाखमोलाची सवय.  आजी या आत्ताही पत्रलेखन करतात....त्यांची ही सवय म्हणजे समृद्ध लेखन परंपरेची गाथाच म्हणावी लागेल.  नातू आजींनी आत्तापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, लता मंगशेकर, आशा भोसले यांच्यापासून ते दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत नंबर काढणा-या विद्यार्थ्यांपर्यंत पत्र पाठवली आहेत. आणि हो...अजूनही त्या पत्र पाठवतात.  फक्त आता जोड पत्र पाठवतात.  कारण काळाच्या ओघात पोस्टकार्ड कोणाला मिळेल वा मिळणार नाही.  त्यामुळे त्याचीही सोय आजी करतात.  त्यांच्या या पत्रलेखनाचे किस्से ऐकतांना मी तल्लीन होऊन गेले होते.  औरंगाबादचा मुलगा सीए परीक्षेत पहिला आला.  आजींनी त्याला पत्र लिहिलं...भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.  पत्र पोस्ट केलं...आणि काही दिवसांनी त्या मुलाच्या आईनं आजीना फोन  करुन आभार


व्यक्त केले.  असेच आजी गुणवतांना पत्र पाठवतात.  पण त्यांना नेमका पत्ता मिळतो कसा....मला हाच प्रश्न पडला...कारण आपल्यासारख पहिला खोडा पत्त्याच्याच प्रश्नावरुन घालेल....पण त्या नातू आजी आहेत.  सर्व प्रश्नांची त्यांच्याकडे सकारात्मक उत्तरं आहेत.  मुळात म्हणजे त्या पेपर अत्यंत बारकाईनं वाचतात.  औरंगाबादच्या मुलाची बातमी आली होती तेव्हा त्याच्या शहराचं आणि तो रहात असलेल्या विभागाचं नाव होतं.  बस्स...आजीनी तेवढच पत्त्यावर लिहिलं  आणि एक ओळ लिहिली होती...सीए मध्ये पहिला आलेल्या मुलाच्या घरी पत्र पोहचवा...पत्र बरोबर मुलाला मिळालं...आणि त्याच्या आईचा फोन आजींना आला.  ब-याचवेळा आजी पत्ता म्हणून गल्ली नंबर,  उजवीकडे वळलं की तिसरं घर...असाही पत्ता घालतात....आणि ते पत्र अचूकरित्या संबंधित घरात पोहचतं...गेल्या काही महिन्यात एका वृत्तपत्रात शाळांबाबत लेखमाला आली होती.  आजींनी त्या शाळांना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केलं.  इचलकरंजी येथील शाळेलाही त्यांनी पत्र पाठवलं...आणि शाळेच्या प्रगतीचं कौतुक केलं.  तेव्हा तेथील गुरुजींनी शाळेतील मुलांना आजींचे पत्र वाचून दाखवले आणि आजींना आभाराचे पत्र पाठवा म्हणून सांगितले.  झाले, काही दिवसांनी चाळीस पत्रांचा गठ्ठा घेऊन पोस्टमन आजींच्या दारात....अहो आजी नेमकं काय केलंत तुम्ही...केवढी ही पत्र म्हणत तो गठ्ठा त्यांनी आजींच्या हातात दिला.  एकदा रेडीओच्या बातम्या ऐकतांना एका मुलीनं लहान बाळाला वाघापासून वाचवल्याची बातमी सांगितली.  झालं...आजीनं बातमी काळजीपूर्वक ऐकून त्या मुलीच्या गावाचं नाव टिपून ठेवलं....आणि तिचं कौतुक करणारं पत्र रवाना केलं.  पुढे काही दिवसांनी याच मुलीची रेडीओवर मुलाखत होती.  तेव्हा तीनं आपल्याला आजींचं पत्र आल्याचा उल्लेख केला.  बरं आजी या पत्रलेखनाबाबत कमालीच्या चोखंदळ आहेत.  त्या सांगतात, यात माझा काही फायदा नाही.   पण ही पत्र ज्यांना लिहिली त्यांना वेळत मिळावी ऐवढीच माझी इच्छा असते.  एकदा आपल्याला पत्र वेळवर मिळत नाहीत म्हणून त्यांनी थेट मुख्य पोस्ट अधिका-यालाच खरमरीत भाषेत पत्र लिहिलं...मग त्यानं  एका पोस्टमास्तरला चक्क आजींच्या घरी पाठवलं आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा आदेशच दिला. 

नातू आजी विदेशातही फिरल्यात बरं का...तेथील तपशीलही त्या अजूक सांगतात.  इटलीच्या व्हेनिस शहरात गेल्यावर तिथे बोटीमधून फिरतांना आजींनी रामाचं भजन म्हटलं होतं....हे भजन एवढं सुरेल की त्या बोटीवाल्यानं आसपासच्या बोटचालकांनाही आपल्या बोटीजवळ यायला सांगितलं....आजीची स्मरणशक्ती तीव्र आहे.  कारण त्या अगदी बारीक सारीक तपशीलासह त्या वाचन करतात...त्यामुळे माझ्याबरोबर बोलतांना अगदी पार पन्नासवर्षाच्या आठवणी तारीखांसह  सांगत होत्या.  फारकाय, पण आजींचा भूगोलही अगदी पक्का....कोण कुठला जिल्हा, तालुका आणि त्यातला गावाची आणि वाड्यांची नावं त्या मला अगदी अचूकपणे सांगत होत्या.  अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असतांना नातू आजींना  त्यांना भेटण्याचा योग आला होता.  त्यांच्या मोठया भावानं लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वाजपेयी यांच्या हस्ते झाले.  तेव्हा या कुटुंबाला दिल्लीतील एका बंगल्यात उतरवण्यात आलं होतं.  या घटनेला आता अनेक वर्ष झाली आहेत.   पण आजींनी मला याबाबत सांगितलं तेव्हा, त्या बंगल्यात कुठे काय आहे, तिथे कोणती झाडं आहेत, तिथून पंतप्रधानांचे  निवासस्थान किती दूर आहे.  तिथे गेल्यावरचा क्रम आणि पंतप्रधान आवासाचा आवाका हे सर्व काही असं सांगितलं की मलाही क्षणभर आपण दिल्लीलाच आहोत असा भास झाला....सांगायचा मुद्दा की या 88 वर्षाच्या आजींना अजूनही तारखा आणि गावांची नावं लक्षात आहेत. 

आजी  हे सर्व कसं करतात...हा मला वारंवार पडणारा प्रश्न होता.  कारण आजी यापलिकडेही खूप करतात.  ज्ञानेश्वरी त्यांनी 700 पेक्षा अधिक वेळा वाचली आहे.  याशिवाय दासबोध, भगवतगीताही त्यांनी अनेकवेळा वाचली आहे.   एवढचं नाही तर ज्ञानेश्वरी हातानंही लिहून झाली आहे.  आज अनेक घरात त्यांनी हातानं लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली जातेय.  आजी या कायम उत्साही असतात, याचं कारण म्हणजे त्यांचं वाचन अफाट आहे.  आजही नवीन पुस्तकं विकत घेऊन वाचायची त्यांना सवय आहे.  सध्या त्या सुधीर महाबळांचं परतवारी वाचत आहेत.  त्यांना विचारुन पुस्तकं विकत घेणारेही अनेक आहेत.  याशिवाय दासबोध, स्वातंत्र्यवीर सावरकांचे माझी जन्मपेठ आणि विवेकानंद यांची पुस्तके विकत घेऊन त्या आपल्या परिचितांना देतात.  यातून काय मिळतं...हा माझा प्रश्न....आजी सांगत होत्या,  काय मिळणार यासाठी कुठलंही कार्य करु नये....आणि यातून काय मिळणार म्हणून प्रयत्नही सोडू नयेत...मी सर्व माझ्या आनंदासाठी करते...तोच माझा खजिना आहे....एवढं बोलून आजी हसू लागल्या.

या आजींची मुलंही कर्तबगार आहेत.  डॉ. धनश्री साने या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत.  माधव नातू नावाचा त्यांचा मुलगा स्टेट बॅंकेत वरिष्ठ अधिकारी आणि स्वाती जोशी नावाची त्यांची मुलगी अर्थविषयक सल्लागर म्हणू काम करत आहेत.  मुलंच काय पण नातवंडं, पतवंडंही आजी, पणजीचा शब्द झेलायला तयार असतात.  पण आजी आपली सगळी काम स्वतः करतात.  मी मनसोक्त गप्पा मारल्यावर त्यांनी माझ्या हातात एक पर्स ठेवली....आणि त्यात सुविचार लिहिलेली चिठ्ठी...या सर्व गप्पा मारतांना आजींनं भरपूर साखर आणि आलं घातलेला चहा घेतला होता....साबुदाण्याची खिचडी खाऊन झाली होती.  सतत कार्यमग्न राहिलं तर कुठलाही रोग आसपासही येत नाही.  नातू आजींचही तसंच आहे.  त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पांनी मला सकारात्मक दृष्टी मिळाली.  काय करायचं हा प्रश्न आला की एकाकीपणाचा त्रास जाणवतो...आणि काय-काय करुया असा विचार सुरु झाला की नवीन वाटा सापडतात....आजींचही तसंच आहे.   त्या या वयातही नवीन वाटा शोधण्यात व्यस्त आहेत.  एकूण काय माझा 8 मार्च मस्त साजरा झाला....एका सकारात्मक व्यक्तिमत्वाला नमन करता आलं....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. खूप छान लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. श्री हरी. नातू आजी नमस्कार शब्दाचा खजिना आहेत,माझ्या आजीची आठवण प्रकाशने जाणवली. माऊली नमस्कार.

      Delete
  2. नातू आजींना नमस्कार

    ReplyDelete
  3. मस्त.. अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे वर्णन केलेले क्षण... चलचित्र सारखे.. आम्ही प्रत्यक्ष न बघता ही... अबोली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... अबोली...

      Delete
  4. वय हा निव्वळ आकडा, खरतर वृत्ती महत्त्वाची. नातू आजींची वृत्ती सकारात्मक आहे, त्यामुळेच त्या सुखी व आनंदी जीवन जगू शकतात व इतरांनाही त्यात सामावून घेऊ शकतात. हॅट्स ऑफ टू नातू आजी. तुमच्या लिहिण्या बद्दल काय लिहायचे. ओघावते लिखाण कसे असावे याचा आदर्श म्हणून तुमचे लिखाणाचा उल्लेख करायला हरकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...मनापासून धन्यवाद...

      Delete
  5. खूप सुंदर लिहीले आम्हा सर्वांचे उर्जा स्थान आहेत आजी

    ReplyDelete
  6. अनुकरणीय व्यक्तीमत्व..शतशः नमन...

    ReplyDelete
  7. Replies
    1. So nicely written. She is my aaji (mothers mother) you have captured her personality so well. We have so many memories of her which are so inspirational and positive that keep us going.

      Keep writing.

      Delete
    2. धन्यवाद...तुमची आजी खरंच ग्रेट आहे....माझं मनच भरलं नाही त्यांच्याबरोबर बोलून....किती प्रचंड वाचन आहे त्यांचं....आणि कार्यही तेवढचं मोठं...पण या सर्वाचा त्यांना अहंकार नाही, गोड स्वभाव....तुम्ही खरंच भाग्यवान आहात...

      Delete
  8. नमस्कार आजी तुमच्या उत्साहाला आणि सकारात्मकता.

    ReplyDelete
  9. अशा नातू आजींनी जिव्हाळ्याचा परिचय आहे ह्याबद्दल खूपच आनंद होतो. नातूआजी जीवेत शरदः शतम!

    ReplyDelete
  10. खूप छान लेख. आजींविषयी अजून माहिती मिळाली.

    ReplyDelete
  11. खूपच छान! या वयात उत्साही रहाणार्या व इतकं वाचन करणार्या नातूआजींची करून दिलेली ओळख आम्हाला पण उर्जा देऊन गेली!!

    ReplyDelete
  12. खूपच छान लेख लिहिलाय.नातू आजी, आम्ही त्यांना नातू काकू म्हणतो.मनमाड येथे साधारण १९७५-७६ साली मी लहान असताना त्यांच्या संस्कार वर्गात जात असे.त्यांनी शिकविलेले अनेक छोटे छोटे श्लोक, तसेच अथर्वशीर्ष,रामरक्षा, मारुती स्तोत्र असे अनेक स्तोत्र आम्हाला आजही पाठ आहेत.त्या गोष्टी ही सांगायच्या.आम्ही फार आवडीने ऐकायचो.आपण नातूकाकूंविषयी लिहिलेले वाचून फार आनंद झाला.धन्यवाद .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...नातू आजी खरोखरच कमाल आहेत. त्यांना मनमाड येथील तुमच्या सगळ्यांची आठवण आहे. सगळ्यांची नावही त्या सांगतात....खरच कौतुक आहे आजींच....

      Delete
  13. नातू आज्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा शांत झरा आहे. स्वाती जोशी हि आज्जीची मुलगी माझी मैत्रिण आहे, त्यांना मी चाळीस वर्षे ओळखते आहे, पण आज महिला दिनाच्या निमित्ताने नातू आजी खूप लोकांना कळल्या ह्याचा आनंद झाला. हॅट्स of

    ReplyDelete
  14. हो मी पण नातू काकूंच्या संस्कार वर्गात जात होते. त्यांनी शिकवलेली स्तोत्र आजही मी रोज म्हणते.
    दोन्ही ताई आणि दादा आम्ही बरोबर खेळलो आहोत.
    खरच आज तुमच्या मुळे खूप लोकांना आमच्या नातू काकूंची माहिती मिळाली.धन्यवाद.

    ReplyDelete
  15. असा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे

    ReplyDelete
  16. अशी सकारात्मक विचारांची माणसं भेटली की आपल्याला पण जगण्याला उर्जा मिळते.
    खूप छान.

    ReplyDelete
  17. Mast. Me pan Manmad la asatana Natu kakunchya sanskar vargat jat hote Tyanchya mulech maze khup shlok patha zale.

    ReplyDelete
  18. एका सुरेख अनुभवाचे सुंदर शब्दांकन 👍 या लेखामुळे कार्यमग्न आणि वाचनप्रीय नातू आजींची ओळख झाली.
    लिहीत राहा.....

    ReplyDelete
  19. Khup khup khup kautuk Aajinch... mast

    ReplyDelete
  20. खरंच अभिमानास्पद आहे. आजींनी आमच्यावर केलेले संस्कार आम्ही आमच्या मुलांना दिले आहेत. नातू आजी म्हणजे ऊर्जेचा श्रोत आहेत.

    ReplyDelete
  21. नातू काकू...आणि त्यांचे कुटुंबीय हे आमच्या कुटुंबाचे स्नेही .
    मनमाड ला त्यांचे आणि अमाचे वास्तव्य एकाच काळात होते .
    त्यांच्या मुली आणि माझी मोठी बहीण ह्या घट्ट मैत्रिणी .अजूनही आम्ही संपर्कात आहोत.
    नातू काजुंबद्दल वाचून खूपखूप छान वाटले आणि प्रचंड अभिमान वाटला.
    त्यांचा उत्साह असाच राहो....देव त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो.



    ReplyDelete
  22. very inspiring

    ReplyDelete
  23. natu aji amchya borivalit rahtat hyacha amhala abhiman ahe . mazya aai( vay varsha 85yrs) chya tya snehi ahet. eka bhahani samajat ahet. changle vishay adan pradan karnarya karyakramat doghi nehmi sahbhagi astat .

    ReplyDelete
  24. Kaharach khup sunder Sai bane

    ReplyDelete
  25. 🙏 नातू आजी यांना माझा नमस्कार. महान आदर्श आहेत.

    ReplyDelete
  26. Khup chhan lihilay... Agdi tyana pratyaksh jaun bhetavasech vatatay

    ReplyDelete

Post a Comment