एक सुविधा...एक दुरावा..
दुपारी सर्व आवरुन ठेवा...आम्ही येऊन पाईपलाईन टाकू आणि मग सर्व तुम्हाला सर्व सांगू...असं म्हणत त्या दोघांनी मला अजून काही सूचना दिल्या...मी हो हो म्हणत, सर्व आवरायला घेतलं....जेवण झालं...गॅसची शेगडी, ओटा साफ करुन ठेवलं, आणि त्या दोघांची वाट पाहू लागले...अगदी ठरल्या वेळेप्रमाणे ते दोघंही आले, आणि त्यांच्या कामाला सुरवात झाली. पहिल्यांदा गॅसच्या टाकीचा पुरवठा खंडित केला. मग एक मिटर लावला आणि पिवळ्या रंगाच्या छोट्या पाईपलाईन टाकण्यात आल्या. त्या लावल्यावर आमच्या शेगडीला या पिवळ्या रंगाच्या पाईपलाईन जोडण्यात आल्या. दुस-या माणसानं त्या वेळेतच गॅसच्या शेगडीची सर्विसींग केली. ते करता करता शेगडीची कशी काळजी घ्यावी हे मला सांगितले. अगदी पंधरा ते वीस मिनीटात आमच्या घरी पाईपलाईनद्वारे होणा-या गॅस पुरवठ्याबाबतची सर्व जोडणी झाली. हे सर्व झाल्यावर मला हा गॅस पुरवठा कसा होणार आणि त्यासाठी कशी काळजी घ्यावी हे सांगितले. मी खूष...कारण त्या टाकीच्या गॅसचे आणि माझे फार जमायचेच नाही...एरवी घरचा गॅस संपला तर गॅसची दुसरी टाकी लावायला लागायची...इथेच मी कमी पडत होते. हे काम नवरा करायचा...कधी तो गावाला किंवा बाहेर गेला असेल अगदी ऑफीसला गेला आणि गॅस संपला की माझी बोंब व्हायची...काहीवेळा बाहेरुन जेवण आणायला लागायचे...मग काय नव-याची बोलणी खायची...गॅसची टाकी लावायला कधी शिकणार...वगैरे त्याचा उपदेश सुरु व्हायचा...माझी कुचंबणा....कारण त्याला उलटही बोलायची सोय नाही....रागवला,बिगवला तर गॅसची टाकी कोण लावणार...दर दिड-दोन महिन्यांनी आमचा या गॅसच्या टाकीवरुन हा हलकासा वाद-विवाद व्हायचाच...पण आता या पाईपद्वारे होणा-या या गॅस पुरवठ्यामुळे हा वादाचा मुद्दाच संपणार होता...त्यात गॅसची ही नवीन व्यवस्था लावण्यासाठी आलेली माणसं मला त्या गॅस पुरवठ्याचे फायदे सांगत होते...बील कमी येणार
होते...अजून काय हवं...मी खूष...ते दोघंही सर्व व्यवस्था करुन गेले आणि थोड्या वेळात पुरवठा चालू होईल, असे सांगितले....मग काय...घरात नवीन काही आल्यावर काहीतरी गोड करायचं असतं ना...दुपारची वेळ असूनही मी बाहेर पडले. दुधाचे पेढे करायचे ठरवले...आणखीही दोन पदार्थ करायचे ठरवले आणि पिशवी घेऊन बाहेर पडले. मनात कितीतरी खूष होते...त्याच आनंदात आपल्या आसपास कोण आहे, याचाही विसर मला पडला. या अशाच आनंदात ओ ताई...ओ ताई अशी हाक कानी पडली....मी मागे वळून बघितलं तर आमच्याकडे गॅसच्या टाक्या आणणारे दादा उभे होते...काय ताई आता आम्हाला विसरलात का...हे त्यांचे वाक्य कानी आलं आणि माझ्या मनातला आनंद मनातच राहिला....
मला जेव्हापासून समजू लागले, तेव्हापासून घरात गॅसची टाकी येत आहे. अगदी आमच्या रेवदंड्यापासूनच...आमच्याच घरासमोर वसईकर काका रहात
होते. त्यांच्याकडेच गॅस एजन्सी होती...घरासमोरच हे गॅसचे गोडावून होते. घरातली गॅसची टाकी संपली की आई हाक मारुन त्यांच्याकडील कामगारांना सांगायची....ते लगेच नवीन गॅसची टाकी आणून गॅसपुरवठा सुरळीत करुन द्यायचे...लग्न झाल्यावर पहिल्यांदा गॅसच्या टाकीचा नंबर वगैरे लावायचा असतो याची जाणीव झाली. मग त्रास नको म्हणून डबल गॅसची टाकी बुक केली. आता गेल्या पंचवीस वर्षात ही गॅसची टाकी घेऊन येणारे कर्मचारीही ओळखीचे झाले. पावसात झिपवाल्या पिशव्या घेण्यासाठी ही मंडळी न चुकता येणार...तर उन्हाळ्यात थंडगार पाणी हवे असेल तरही हे हक्कानं येणार....एरवीही गॅसची टाकी घेऊन आल्यावर त्यांच्यासाठी सरबत किंवा खाऊ पुढे करायची माझी सवय...ही मंडळीही घरात गॅसची टाकी आणतांना माझ्या रांगोळीचं कौतुक करत येणार...अशीच तर ओळख वाढते...मग मुलांची चौकशी...कधी सणाला मिठाईचा डब्बा दे तर कधी केलेले चार लाडू त्यांच्या मुलांसाठी द्या...आमच्यातील हे विश्वासाचे नाते किती चांगले झाले होते, याचा परिचय नोटबंदीच्या वेळी आला.
नोटबंदी आली आणि हजारच्या नोटेवर बंदी आणली तेव्हा मी खूप बावरले
होते...माझ्या पाकीटात बघितलं तर असेच काही पैसे मिळाले...आता या नोटा बदलायच्या कशा
हा प्रश्न आला...शिवाय तेव्हा सुट्टे पैसेही मिळत नव्हते...अशातच गॅसची टाकी घेऊन
एक दादा आले...त्यांना विचारलं, तुम्हाला आता पैसे कसे देऊ, बंदी घातलेल्या नोटा देऊ का...तेव्हा त्यांनी
त्या नोटा तर घेतल्याच पण आणखी काही पैसे बदलायचेत का म्हणून मला विचारलं...अर्थात
मला गरजच होती...मग या दादांनी त्यांच्या सर्व सहका-यांना बोलवून
आणलं...संध्याकाळची वेळ...त्यांचा हिशोब चालू झाला. घरासमोर असलेल्या पॅसेजमध्ये ही मंडली
बसली...मी दहावेळा घरात या म्हणून आग्रह केला...तर राहूदे हो ताई...आमचं रोजचच
आहे....तुम्ही थांबा सुट्टे पैसे देतो तुम्हाला....म्हणत काही हजाराचे सुट्टे पैसे
मला दिले...या बदल्यात मी काय दिलं...चहा आणि फराळ...उलट जातांना आमच्याकडे
येणा-या गॅसवाल्या दादांनी मला आग्रहानी सांगितल, ताई, कधी पैसे सुट्टे लागले तर
लगेच सांगा...असतात आमच्याकडे देऊ आम्ही...नमस्कार करुन ही मंडळी गेली...आणि मी
त्यांच्या साधेपणाकडे बघत राहिले...
या गॅसवाल्या दादांमुळे डोळ्यात पाणी आल्याची घटना घडली ती कोरोना काळात. लेकाची जेईई अडव्हान्स परीक्षा तोंडावर आली असतांना त्याला आणि नव-याला कोरोनाची लागण झाली. नवरा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. लेक घरी...अशातच गॅसची टाकी संपली...मला गॅस लावता येत नाही....मी प्रयत्न करुन बघितला पण मला नवीन गॅसची टाकी काही केल्या लावता येईना...अशावेळी कोणाला बोलवायचं...सकाळचं जेवण झालेलं...पण रात्रीच्या जेवणाचा प्रश्न पडला...शेवटी घरात असलेला खाऊ आणि फळं खाऊया असं लेकानं सुचवलं...पण एक उपाय आहे, म्हणून मी आमच्याकडे नेहमी येणा-या गॅसवाल्या दादांना फोन लावला....त्यांना घरात झालेला गॅसचा प्रॉब्लेम सांगितला....आणि मुलाला करोना झालाय...पण तो वेगळ्या रुममध्ये आहे, तुम्ही अशावेळी आमच्या घरी येऊन गॅसची टाकी लावून द्याल का म्हणून विचारले... मी विचारल्यावर अगदी एका सेकंदात ते दादा म्हणाले, त्यात काय होतंय...तुम्ही आधी का नाही सांगितलंत...काही वेळातच येतो...तुम्ही काळजी करु नका...आणि काही वेळातच ते दादा दारात हजर झाले...मी अगदी मास्क लावून त्यांना घरात घेतलं...त्यांनी गॅसटाकी लावून दिली...आणि मग म्हणाले, ताई, अहो एवढं काय त्यात...एवढ्याश्यासाठी लेकाला कशाला उपाशी ठेवलंत...आम्ही आहोत ना...कधीही काहीही लागलं तरी फोन करा....लेकाची काळजी घ्या...काही होत नाही...असा विश्वास देऊन ते गेले....ते गेल्यावर माझ्या आणि लेकाच्या डोळ्यात फक्त पाणी होतं...
आता त्याच दादांनी हाक मारली होती...त्यांचे वाक्य कानी पडल्यावर मी
चपापले...किती स्वार्थी झाले मी...मान्य आहे, पाईपलाईनच्या गॅस पुरवठ्यामुळे थोडे पैसे वाचणार आहेत, पण मी जोडलेल्या या माणसांचे काय....हा प्रश्न मनात आला...त्या दादांपुढे गेले...नमस्कार केला...आणि सॉरी बोलले...तुम्हाला बघितलच नाही असं सांगितलं...ते म्हणाले, मगाशी तुमच्या सोसायटीवरुन गेलो, तेव्हा बघितलं, तुमच्याही सोसायटीत पिवळ्या पाईपलाईनी लागत आहेत...म्हणजे, आता आम्ही नाही येणार तुमच्याकडे....मला त्यांच्या या वाक्यांनी अधिक अपराधीपणाची भावना जाणवायला लागली...मी नाही म्हणत, त्या दादांना सांगितलं...ते राहूदे दादा...तुम्ही हवं तेव्हा या....काहीही हरकत नाही...गरमी लागली की तुम्ही कधी थंड पाणी घेण्यासाठी येता...कधी त्या पिशव्या घ्यायला येता...तसेच या...घर सोडू नका...हे सांगतांना मी हात जोडले...तेव्हा त्या दादांनीही त्यांच्या नेहमीच्या साध्या शब्दात सांगितलं...नाही हो...मस्करी केली ताई...आम्ही काही गरज लागली तर येऊ....बाकी लेक कसा आहे...दादा कसे आहेत...आमचा नमस्कार सांगा...म्हणत ते खांद्यावर गॅसची टाकी टाकून निघाले...मी पाठमोरी त्यांच्याकडे बघत राहिले...नव्या गॅसपाईलाईनच्या स्वागतासाठी होणा-या पेठ्यांवर या दादांचे नाव आपसूकच लिहिले गेले....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान
ReplyDeleteBeautifully written, as usual.A must read article....This really shows how good you are at heart dear Mam... Aboli.
ReplyDeleteछान लिहिलं आहेस स ई.
ReplyDeleteSai yaa lekhachya nimmitane gas cylinder carry karnarya mansachi vyatha Ani baryach varshacha snehasaband,olak Ani yevdya varsha nantar sudha aapatkalin konthi madat chi aapeksha n thevtha tatpar asnarya yaa madalina manapasun salam
ReplyDeleteसई, फारच सुंदर लिहिलंयस!! तू माणसं खूप छान जोडून ठेवतेस.अगदी तसंच लिहिलंयस 🌹
ReplyDeleteमन हेलावून टाकणारे लिहिले आहे. अप्रतीम.
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteह्या विषयावर जेंव्हा आमच्या घरी चर्चा झाली तेव्हा या लोकांना काम कसं मिळणार ही हुरहुर लावणारी घटना.
ReplyDeleteजेव्हा सिलिंडर घेउन तो आला तेव्हा त्याला हा प्रश्न केला तेव्हा त्यानं सहज ऊत्तर दिलं बाई जोवर डिपॉझिट च्या बिल्डींगा आणि झोपड्या आहेत तोवर
हे काम चालू रहाणार
किती सकारात्मकता
सुंदर आहेत अनुभव व माहिती
ReplyDelete