सुखाचा प्रवास....

 

  सुखाचा प्रवास....


ट्रेनचा प्रवास हा माझा आवडीचा विषय...लहानपणापासून बसचा प्रवास आणि माझा छत्तीसचा आकडा....तो आकडा आजही लागू आहे.  त्यामुळेच आपल्याला गावाला देवीची ओटी भरायला जायचं आहे, असं जेव्हा नव-यानं सांगितलं तेव्हा ट्रेनशिवाय मी येणार नाही....हा माझा हट्ट कायम ठेवला...या हट्टामुळेच होळी झाल्यावर आठवड्यानं आम्हाला ट्रेनचं बुकींग मिळालं...मी हुश्श केलं...जातांना सकाळी अगदी लवकरची, म्हणजे साडेसहाची आणि येतांना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारासची ट्रेन मिळाली होती.  दोन्ही ट्रेनमध्ये जेवणाची व्यवस्था आहे,  त्यामुळे तू घरुन काहीही घेऊ नकोस, असा नव-याचा आदेश वजा सल्ला मिळाला....अजून काय हवं...एकूण तीन दिवसांच्या प्रवासाचा आमचा बेत ठरला...त्यानुसार सामानाची पॅकींग झाली...ट्रेनचा प्रवास म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक सोबतीला हवंच...ते पुस्तक सोबतीला घेतलं...ट्रेनच्या प्रवासात अजून एक उत्सुकता असते, ती म्हणजे आपल्यासोबत सहयात्री कोण असणार...कारण प्रवासात कितीही पुस्तकं वाचली आणि ट्रेनमधून दिसणा-या आसपासच्या दृष्याची मजा घेतली तरी सहा तास नुसतं गप्प रहाणं म्हणजे माझ्यासारखीला कठीणच...पण जर मनात छान गोष्टींची कल्पना केली की त्या गोष्टी प्रत्यक्षातही होतात,  तसाच प्रत्यय मला आला.  दोन्हीवेळच्या प्रवासात अगदी छान माणसं भेटली...भरपूर गप्पा झाल्या...अगदी हातातलं पुस्तक बाजुला झालं...आणि गप्पांचा फड रंगला...सुखाचा प्रवास तो हाच....


रत्नागिरीला जातांना तेजस ट्रेनचं बुकींग होतं...तेजस अगदी काठोकाठ भरलेली...आणि अगदी वेळेत होती...ठाण्याहून आम्ही ट्रेन पकडली...अगदी दोन मिनिटात सामान सेट झालं...आणि प्रवास सुरु झाला...काचेच्या मोठ्या खिडक्यांमधून पलिकडची परिचित स्थानकं दिसत होती...हे सर्व पहात असतांना आमच्या समोरच्याच सिटवर दोन आजोबा स्थानापन्न झाले होते....या दोघांच्याही जोरजोरात गप्पा सुरु झाल्या...पहिल्यांदा किती मोठ्यानं बोलत आहेत, असा माझा सूर होता...पण नंतर आपसूकच त्यांच्या गप्पात मी ओढले गेले...कारण हे दोघंही आजोबा अगदी जगभराच्या गप्पा मारत होते.  मुंबई स्टॉकची परिस्थिती....त्यातील चढउतार ते बिटकॉईन...जपानमध्ये जन्मदर घटल्यामुळे आलेलं संकट...कोरोनामध्ये WHO ची भूमिका...रशियात गेल्यावर काय काळजी घ्यावी लागते ते नागालॅडमधला अदभूत निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध स्थळे....आदी...आदी सर्व विषयावर या आजोबांच्या मनसोक्त गप्पा चालू होत्या.  तासाभरानं तेजसमध्ये चहा, कॉफी आणि नाष्टा दिला गेला.  त्यावरही आजोबांनी आपली मतं दिली.  अलिकडे ट्रेनमधील सुविधांचा दर्जा चांगलाच सुधारला आहे, असा शेराही दिला...आरामात चाललेल्या या प्रवासात माझी उत्सुकता ताणली जात होती....या दोघांनाही स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बातम्यांची माहिती होती, आणि त्याची चर्चा चालू होती...बरं या गप्पा येवढ्या जोरात चालू होत्या की मी कितीही टाळायचं म्हटलं तरी माझं लक्ष त्यातच गुंतलं जात होतं....हे सर्व चिपळूनपर्यंत चालू होतं.  चिपळूनला ट्रेन जवळपास खाली झाली.  आम्ही ज्या विभागात बसलो होतो तो तर सर्वच

डबा खाली झाला....आम्ही दोघं...आमच्यापुढे बसलेले ते दोन आजोबा आणि आमच्या मागे चारजणांचं कुटुंब...बस्स एवढेच जण राहिले.

मग काय...या खाली झालेल्या ट्रेनचा आम्ही चांगलाच फायदा घ्यायला सुरुवात केली...फोटो सेशन प्रवासात महत्त्वाचे असते...ते झाले...आमचे फोटोसेशन बघून मागे बसलेल्या कुटुंबानंही विनंती केली...ही मंडळी थेट गोव्यापर्यंत जाणार होती...त्यांची ओळख झाली आणि फोटोही झाले....यासर्वात आमच्या पुढे बसलेले आजोबा अजूनही गप्पांमध्ये व्यस्त होते...आमची फोटो काढण्याची धावपळ बघून मात्र ते थोडे अस्वस्थ झाले होते....शेवटी मी पुढे होऊन विचारलं...तुमचे फोटो काढू का...काही क्षण विचार करत त्या दोघांनीही आपापले फोन काढून माझ्या हातात दिले...या फोटोसेशन नंतर मात्र त्या दोघांबरोबर छान गप्पा मारता आल्या...हे दोघंही आजोबा त्यांच्या मित्राला बघायला रत्नागिरीत जात होते.  दोघांनीही केंद्रामध्ये मोठ्या पदावर काम केले आहे.  त्यामुळे देश-विदेशात फिरण्याची त्यांना संधी मिळाली होती...यातूनच वाचन आणि अभ्यासाची सवय लागलेली.  त्यांचा एक मित्र निवृत्तीनंतर रत्नागिरीमध्ये स्थायिक झालेला.  त्याची तब्बेत बिघडल्याची यांना माहिती मिळाली, त्याला आता बघण्यासाठी हे दोघंही रत्नागिरीत जात होते.  आमच्या गप्पा सुरु झाल्यावर त्या मित्रानं फोन करुन या दोन मित्रांना आजचा दिवस थांबण्याचा आग्रह केला...दुस-या दिवशी संकष्टी होती, तेव्हा तुम्ही दोघंही गणपतीपुळ्याला चला, तिथे दर्शन करुन मगच जा...असा आग्रह धरला...हो ना हो करत या दोघांनीही अनुमती दिली...आणि दुस-या  दिवशीची परतीची तिकीट बुक करण्याची जबाबदारी त्या मित्रावर सोपवली...हा त्यांचा मित्र, आपले मित्र भेटायला येत आहेत, या कल्पनेनंच ठणठणीत झाला होता...त्याची खुशाली कळल्यावर हे दोघंही मित्र खूष झाले.  मग आमची चौकशी सुरु झाली...मी त्यांना एवढ्या अपडेट बातम्या कशा माहिती आहेत, असं विचारलं...तेव्हा हे दोघेही पक्के वाचक असल्याचे कळलं...सकाळी दोन तास वाचनात जातात.  त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्राचा फडशा पाडला जातो.  मग या सर्व बातम्या सायंकाळचा फेरफटका मारतांना एकमेकांना सांगितल्या जातात आणि त्या अजून अपडेट केल्या जातात...एकूण निवृत्तीचा काळ सुखाचा असला तरी तो कंटाळवाणा नाही तर अभ्यासात चालल्याचे त्यांनी सांगितले...या सर्वात रत्नागिरी स्टेशन आलं...त्या दोघांकडेही आटोपशीर सामान होतं...आम्ही एकदम स्टेशनबाहेर पडलो...अगदी स्टेशनच्या गेटवरच त्यांचा मित्र उभा होता...तिघांनही आनंदानं मिठ्या मारल्या...आम्ही त्या दोघांचा निरोप घेऊन आमच्या गावाला रवाना होत असतांना दोघांनीही


थांबण्याची विनंती केली...त्या तिस-या मित्रासोबत आमची ओळख करुन दिली...नमस्कार झाला आणि आम्ही पुढे निघालो...अगदी दोन-तीन तासांची ओळख...पण मोबाईल नंबर शेअर करेपर्यंत गोड झालेली...

परत येतांनाचा अनुभवही असाच साजेसा झालेला.  रत्नागिरीहून दिडवाजता राजधानी पकडली.  आमचा शेवटचा डबा...रत्नागिरीत चढलो तेव्हा आमच्या बॅंगा दोनच्या ऐवजी चार झालेल्या...त्या कशातरी सीटखाली गेल्या...आमची सीट होती तिथे आधी बसलेली महिला पार झोपी गेलेली...तिला उठवून आम्हाला बसण्यापूरती जागा करुन घेतली...तिनं अगदी नाईलाजानं सिट देतेय, असं दाखवत दोघांना बसायला दिलं...पण समोरच्या सिटवरच दृष्य वेगळं होतं...तिथेही आधी पासून एकजण बसलेले होते.  आमच्यासोबत रत्नागिरीला दोन लहान मुलांना घेऊन एक आजी आणि त्या लहानग्यांचे वडील चढले होते...त्या सर्वांना त्या गृहस्थानं जागा करुन दिली...त्यांचे सामान ठेवायला मदत केली.  सोबत लहान मुलं असल्यामुळे त्या आजींनी लगेच जेवणाचे डबे उघडले, तेव्हा त्या गृहस्थांनी स्वतः जवळचा पेपर पुढे केला...या सर्वात आमचेही जेवण झाले...समोरचे गृहस्थ अगदी हसमुख...त्यांच्या बाजुला असलेल्या आजींना मदत करत होते...लहान मुलांबरोबर गप्पा मारत होते...जेवण झाल्यावर आईस्क्रीम आलं आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या....या गृहस्थांचे नाव श्याम शिरोडकर....त्यांनी त्यांच्या गावी स्वतःचे टुमदार घर बांधले आहे.  आणि या घराभोवती काजुची बाग उभारली आहे.  तब्बल पाच वर्षाच्या मेहनतीनंतर आता हे काजू धरायला लागले आहेत.  या काजूसोबत शिरोडकर काकांनी सर्व फुलांची आणि फळांची बागही तयार केली आहे.  गणपतीला आपल्या घरातील सर्व पत्री मिळतील अशी व्यवस्था केली आहे.  त्यांच्या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभ्यासपूर्वक जलसिंचन योजनाच या बागेत राबवली आहे.  या सर्व झाडांच्या मुळात पाईपलाईनची सोय केली आहे.  त्यामुळे सर्व झाडांना काही क्षणात पाणी मिळण्याची व्यवस्था येथे आहे.  शिरोडकर काका स्वतः हे सर्व काजू राखतात.  आताही ते काजू काढण्यासाठी आले होते.  आम्हाला त्यांनी काढलेले काजू दाखवले.  काजू एक नंबर...मी लगेच विचारलं...विकता का...तेव्हा हसून नाही म्हणाले...हे सर्व काजू काका आपल्या नातेवाईकांना...मित्रपरिवाराला वाटतात.  त्यांचा मुलगा परदेशात असतो.  आता तो तीन वर्षानंतर आला होता.  त्यामुळे त्याला देण्यासाठी काजू हवेत म्हणून काका गावी गेलेले.  मुलासाठी बागेतले काजू, केळी असं घेऊन ते परत येत होते.  या बागेत त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन एवढे परफेक्ट आहे की त्यांची बाग सदैव फुललेली असते.    आम्हाला त्या बागेचे आणि घराचे व्हिडीओ काकांनी दाखवले.  पातीचहा, आबोली, पारिजातक आणि काजू अशी बहरलेली काकांची बाग खरचं सुरेख होती.  पण त्यासोबत काकांचा उत्साह कमालीचा होता.  काकांनी बोलता बोलता त्यांचे कार्ड हातात दिले.  ते एका पक्षाचे पदाधिकारी होते,  पण राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस असल्याचे त्यांनी सांगितले.  अर्थात हे सांगण्याची गरज नव्हती....अगदी पाच-सहा तासांच्या प्रवासात त्यांची वागण्याची पद्धत,  सतत मदतीला पुढे येण्याचा स्वभाव बघून आम्हाला न सांगताही त्यांची आवड कळली होती.  पनवेलला ट्रेन थांबली आणि आमची उतरण्याची घाई सुरु झाली....तेव्हाही शिरोडकर काका पुढे होते....निघतांना ओळख ठेवा म्हणून  निरोप दिला...आम्ही आमच्या मार्गाला लागलो आणि ट्रेन पुढच्या स्थानकाकडे रवाना झाली...प्रवास हा सुखाचा कधी होतो, जेव्हा अशी जीवाभावाची माणसं भेटतात...काही तासांचा हा प्रवास, पण अशी छान माणसं भेटली की तो सुसह्य होतो आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये वाढ करुन जातो....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. मला लक्झरीने प्रवास करायला अजिबात आवडत नाही.जेव्हा ट्रेनचा पर्यायाला पुर्णविराम मिळतो तेव्हा पर्यायच उरत नाही,लक्झरीने प्रवास करनं भाग पडतं.खरच मी भाग्यवान आहे कारण आपल्यासारखी चांगली मानसं भेटतात.प्रवासाची आवड असलेलं अभासु व्यक्तीमत्व अहात अस मला वाटलं, परंतु आपल्या संवाद साधल्यानंतर आपला बोलका स्वभाव आहे हे लक्षात आलं.सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो.ससनेह जय महाराष्ट्र!!

    ReplyDelete
  2. जणू काही आम्हीच रत्नागिरीला जाऊन आलोय आज , असे लिखाण आहे..अगदी दृश्य उभे केली प्रवासाचे !! अबोली..

    ReplyDelete
  3. सई, तुझ्या बरोबर रत्नागिरीला जाऊनयेवून ट्रेनचा प्रवास मस्त झाला. तुझ्या लिखाणातली माणसं तू तर जोडतेसच आणि आमच्या पण जवळची करून टाकतेस..

    ReplyDelete
  4. खूप छान लेख लिहिला आहे . प्रवासाची आवड असलेल्या कोणालाही नक्कीच आवडेल! 👍👍

    ReplyDelete
  5. सुरेख वर्णन केले आहेस.

    ReplyDelete
  6. घे अजून एकटे फिरून एकटीच मजा कर

    ReplyDelete

Post a Comment