कलिंगड एके कलिंगड...
कलिंगड दुणे…….
शिगचैन नावाचं कार्टून कोणी बघतं का...अत्यंत वात्रट कार्ट असं या शिगचैनचं वर्णन अनेकजण करत असले तरी हा शिगचैन माझा आणि माझ्या लेकाचा आवडता आहे. या कार्टून सिरीजचे बहुतेक भाग आम्हा दोघांचेही पाठ आहेत. त्यातील एक भाग नुकताच आमच्या घरी झाला....हा भाग म्हणजे कलिंगडाच्या बरसातीचा...या शिगचैनच्या घरी एकदा एवढी कलिंगडं येतात की ती कशी संपवायची हा प्रश्न त्याची आई मिक्सी आणि वडील हॅरी यांना पडतो...मग ही मंडळी त्या कलिंगडांचा नाष्टा करतात...त्यांच्यापासूनच दुपारचे जेवण होते आणि रात्रीच्या जेवणातही कलिंगडाचा मेनू...एवढं करुनही पुन्हा त्यांच्या घरात कलिंगड येतात...असंच काहीसं आमच्याकडे घडलं...फरक एवढाच होता की त्या शिंगचैनच्या घरात आलेली सर्व कलिंगडं चांगली...लाल चुटूक आणि चवीला पण चांगलीच असावीत...आणि आमच्या घरात आलेली कलिंगडं....एकजात सगळी पचपचीत निघाली....रंगांचं तर काय विचारुच नका...अत्यंत कोवळी...बरं असं एक कलिंगड असेल तर ठिक...पण घरात एकाचवेळी तब्बल सहा कलिंगडं आली...आम्ही दोघांसाठी हा आकडा मोठाच की...त्यात एक कलिंगड कापलं तर ते कोवळं होतं...म्हणून दुसरं कापलं...मग दुसरंही तसंच..मग तिसरं...अशी माळ सहापर्यंत चालली...आणि आता या कापलेल्या सहा कलिंगडांचे करायचे काय हा प्रश्न आमच्यासमोर उभा
राहीला....
कलिंगड....हा शब्दच मनात आला की समोर येते ती लालचुटूक रंगाची फोड...त्याला गर्द हिरव्या रंगाचे काठ...मध्येच एखादी पांढरी ओळ आणि त्या लाल रंगात पेरलेले काळ्या मनुकांसारख्या त्याच्या बिया...मग ही लाल चुटूक फोड तोडांत गेल्यावर करकर असा आवाज येणार...आणि मग साखरेच्या गोड पाण्याचा आटवलेला मावाच तोंडात गेल्याचा भाव...मग तोंड बंद करत तो गोड स्वाद अनुभवायचा...मध्येच त्या गोड गोळ्याचा पाण्याचा एखादा थेंब बंद तोंडातून बाहेर डोकावतो...तेवढाही थेंब वाया घालवायचा नाही...लगेच हा थंब एका बोटानं आता ढकलायचा...आणि मग पुढचा घास घ्यायचा....कलिंगड हे असंच खायचं...काही फळं खातांना तोंडाचा आकार कसा होईल...कसा आवाज होईल...आजुबाजुचे काय म्हणतील...आदी..आदी प्रश्न मनातून साफ काढून टाकायचे असतात. तरच त्या फळांमधील गोडव्याचा अनुभव घेता
येतो...त्यापैकी एक फळ म्हणजे कलिंगड...
आमच्या रेवदंड्याला या कलिंगड सोबत अनेक सोहळे झाले आहेत. सायकलच्या मागच्या सिटवर ठेऊन पप्पा भलंमोठं कलिंगड घरी घेऊन यायचे...मग त्याला थंडगार करण्यासाठी पाण्याच्या मोठ्या टाकीत ठेवलं जायचं....शाळेतून आल्यावर मग या कलिंगडाची मेजवानी असायची...तो थाट काही वेगळाच असायचा...आता असलं मोठ्ठं कलिंगड बघायलाच मिळत नाही...हल्ली अगदी एका हातात मावतील अशी कलिंगडं....त्यातही भेसळ आलेली. पाच-सहा वर्षापूर्वी असंच एक इंजेक्शन दिलेलं कलिंगड माझ्या खाण्यात आलेलं...चांगलं लालसर...गोड...त्यामुळे मी त्यावर आडवा ताव मारला होता....नंतर पोट एवढं बिघडलं की हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं की काय अशी परिस्थिती आलेली. त्या वर्षी आणि त्याच्या पुढच्यावर्षीही मी कटाक्षानं कलिंगड खाणं टाळलं होतं...पण किती दूर रहाणार...शेवटी पुढच्या वर्षी कलिंगड घरी आणलंच...पण त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, कलिंगड गोड करण्यासाठी त्याच्यात इंजेक्शनद्वारे कृतिम गोडवा आणि रंग टाकला जातो. त्यामुळे कलिंगड घरी आणल्यावर मोठ्या भांड्यात पाण्यात बुडवून ठेवायचे. समजा या पाण्याचा रंग बदलला तर
कलिंगड खराब आहे हे ओळखायचे...या सूचनेचा मी आत्ताही तंतोतंत वापर करते. ब-याचवेळा कलिंगड त्या विक्रेत्यांकडून कापून घेतले जाते...अशावेळी हे मिक्स केलेले कलिंगड ओळखता येत नाही...त्यामुळे तसा प्रकार टाळतेच....पण यामुळे अनेकवेळा पार पांढ-या रंगाची कलिंगडंही घरी आली आहेत. बरं कलिंगड हे फळ असं आहे की त्यापासून काही पदार्थ करायची कल्पना मला मान्यच होत नाही. कारण कलिंगडम्हणजे पाण्याचा भंडार...त्याची बर्फी केली तर किती आटवायला लागेल...हा विचार करुनच माझी माघार असते...त्यात हे फळ अविट गोडीचं...निसर्गानचं त्याला किती गोडवा दिलाय...या चवीत फेरफार कशाला करा...म्हणून मी त्यापासूनच्या पदार्थांचा कधी विचारही केलेला नाही...फारतर ज्युसपर्यंत माझी झेप गेलीय...
पण हे सर्व आराखडे यावेळी फोल ठरले...गेल्या शनिवारी सकाळी भाजी घ्यायला बाजारात गेले तर घराजवळच एक कलिंगड विक्रेत्याची गाडी आलेली...थोडी लहान आकाराची कलिंगडं होती...मी पहिल्यांदा एक घेतलं...पण सुट्टे पैसे नव्हते...त्यामुळे दुसरंही घ्यावं लागलं...घरी आल्यावर त्या दोघांनाही पाण्यात बुडवून ठेवलं...दुपारी नवरा कामासाठी बाहेर गेलेला....येतांना त्यानंही अशीच दोन कलिंगडं आणली...मी दारातच तो असतांना डोक्याला हात लावला...अरे घरात आधीच दोन आहेत, तुला दिसली नाही का म्हणून विचारलं...मग पाण्यात बुडवलेल्या त्या दोन कलिंगडांना काढून त्याजागी नवी दोन कलिंगडं टाकली....आता संध्याकाळचा नाष्टा नाही...कलिंगडं मिळणार..म्हणून जाहीर केलं...त्यानंही सांगितलं...चालेल...रविवारी ज्युस वगैरे
करु असं सुचवून मी कापेन, आणि सर्व साफ करेन अशी ग्वाही दिली...मी त्यावरच खूष झाले...दुपारी जेवायला बसल्यावर बेल वाजली...दारात मैत्रिणीचा लहान मुलगा अवजड पिशवी घेऊन उभा होता...आईनं दिली, म्हणत माझ्या हातात पिशवी देऊन पटकन पळ काढला...मी पिशवी उघडून बघितलं तर त्यात दोन कलिंगडं...अरे देवा...काय हे..कलिंगडंच कलिंगडं....
आता मात्र प्रश्न गंभीर झाला होता...घरात सहा कलिंगडं...त्यावरही नवरा
रिलॅक्स...रविवारचं निमित्त काढत घरात सर्व प्लंबिंगचं काम काढलं होतं...आमच्या
परिचयाचा एक दादा हे काम करतो..तो आणि त्याचे कामगार येणार होते...नव-यानं
सांगितलं, त्यांना देऊया...तू छान पाण्यात टाकून गार करुन ठेव...त्यांना बरं
वाटेल...
रविवारी सकाळीच ही मंडळी आली...त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मी इकडे कलिंगड कापायला घेतलं...पहिलं कापलं तर पांढरा रंगच समोर आला...मग दुसरं घेतलं...ते बरं होतं पण गोड नव्हतं...मग नव-याला दाखवलं...असं खराब कसं देणार...मग तिसरं कापलं...तर तेही ब-यापैकी होतं...मग नवरा पुढे झाला...मी कापतो म्हणत त्यानं बाकीची तीनही कलिंगडं कापली...ओट्यावर कलिंगडंच कलिंगडं...आणि ती सर्व फारशी गोडीची नव्हती....बाथरुममध्ये नळाचं काम करुन आलेली मंडळी किचनमध्ये
आली...त्यांनी ओट्यावरचा तो कलिंगडाचा पसारा बघितला...आणि आमची समजूत काढली...ताई, जाऊदे....त्यातल्या एकाच्या फोडी करुन द्या...म्हणून सांगितलं....त्यातल्यात्यात चांगली लाल दिसणारी दोन कलिंगडं कापून त्या कामगारांना दिली...आम्ही बाकीच्या एका कलिंगडाला कापून घेतलं...पहिला घास घेतल्यावर एकच शब्द मनात आला...पचपचीत...
आता आमच्यासमोर पसरलेल्या या कलिंगडांचं करावं काय हा मोठा प्रश्न
होता...तीन कलिंगडं कशीतरी संपली होती...बाकी तीन कलिंगडं तशीच पडली होती...शेवटी
त्यातला त्यात चांगले असलेल्या कलिंगडाचा गर कापून घेतला आणि तीन प्रकारचे ज्युस
केले....एकात काळीमिरी आणि काळं मिठ घातलं...दुस-यात पुदिन्याचा मारा केला तर
तिस-यात लिंबू आणि साखर घातली...तेवढंच समाधान...रविवारचा संध्याकाळचा नाष्टा झालाच
नाही...यातला पुदिना घातलेला ज्युस संपवला...बाकीचे दोन तसेच बाटलीत भरून
ठेवले...सोमवारी सकाळी फ्रूटडीश मिळणार नाही...त्याऐवजी हेच संपवावं लागेल...आणि
रात्रीही ऑफीसमधून आल्यावर एक संपवावं लागेल.
असं नव-याला सांगून झालं...त्यावर त्यानं उदारपणे मला, तुला उद्या वाटलं तर
तू सर्व ज्युस संपवलंस तरी चालेल...असं सांगून बघितलं...
एकूण काय कलिंगडाच्या प्रश्नावर तात्पुरता उपाय सापडला होता...दोन
दिवसात एवढ्या कलिंगडाचा फडशा पाडूनही एक रुखरुख कायम राहीलीय...ती म्हणजे तो गोडवा...ती मधाळ चव कधी मिळेल याची...त्यामुळे सोमवारी त्या साध्या चवीच्या कलिंगडाचा ज्युस बळेबळेच प्यायल्यावर आता कधी कलिंगड घ्यायचं...या मोठ्या प्रश्नावर आमची बरीच चर्चा झाली...आणि पुढच्या शनिवारी ही कलिंगड खरेदीची मोहीम एकत्रच करुया इथपर्यंत त्या चर्चेती समाप्ती झालीय....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सही आहे कलिंगड puran तोंडाला पाणी सुटले
ReplyDeleteखुप छान👍👍👌👌
ReplyDelete