मी...मी...आणि मी....
सकाळी आठ वाजता फोनची रिंग वाजली...डब्यासाठी भाकरी करत होते...नंतर बघू म्हणून भाकरी आणि डब्याची तयारी सुरु केली...पण फोन पुन्हा वाजला...पुन्हा-पुन्हा वाजला...त्यामुळे कोण एवढ्या सकाळी कोण फोन करत आहे, म्हणून मी फोनमध्ये डोकावले....तर जवळच्याच बिल्डींगमधल्या एका मैत्रिणीचा, अपर्णाचा...एवढ्या सकाळी तिचा फोन कशाला आला...काहीतरी काम असेल म्हणून हातातली कामं बाजुला ठेवली आणि फोन उचलला...तर फोनवर अपर्णाचा नवरा होता...ताई, मी बोलतोय...प्लीज महत्त्वाचं काम होतं, म्हणत काळजीयुक्त आवाजात बोलू लागला...अपर्णाचा पाय फॅक्चर झाला होता...गेल्या पंधरा दिवसापासून ती झोपून आहे....पण काळजी ती नव्हती, तर त्यांची काळजी वेगळीच होती...घरात काम करण्यासाठी कोणीतरी मावशी हवी होती...अपर्णाचा नवरा एकापाठोपाठ एक सांगत होता. कोणी मदतनीस असेल तर सांगा...पण तुमच्याकडे कोणी मावशी आहेत ना कामाला, म्हणत मी त्यांनी पुन्हा प्रश्न केला...तर अपर्णाचा नवरा अगदी खालच्या आवाजाच म्हणाला, ताई...तुम्हाला अर्पणाचा स्वभाव माहित आहे ना...तिला कोणी केलेले काही काम आवडतच नाही...सतत सूचना देत असते...आता त्या मावशी कंटाळल्या...आणि काम सोडून गेल्यात...नेमके त्यानंतर आठवड्यानंतर अपर्णा पडली...पाय फॅक्चर झालाय...मी, मुलं सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतोय...पण काही जमत नाही...कोणी काम करणारी मावशी असेल तर प्लीज पाठवाल का...त्यांचा स्वर अत्यंत काकुळतीला आलेला होता...ते बोलत असतांना माझ्यासमोर अपर्णा उभी राहिली...
अपर्णा, आमच्याच भागात रहाणारी माझी अगदी लांबची मैत्रिण...खरंतर मैत्रीमध्ये लांबची...जवळची असं काही नसतं...मैत्री ही मैत्रीच असते...पण त्यासाठी सूर जमावे लागतात...हे सूर जमले की मैत्रिण कितीही लांब रहात असली तरी ती ह्दयात कायम असते...पण या अपर्णाच्या बाबतीत मी नेहमी लांबची मैत्रिण हा शब्दच वापरते...कारण अपर्णाचा स्वभाव...जेव्हा-जेव्हा आम्ही भेटलो...तेव्हा तेव्हा...अपर्णाचा मी चा होरा चालू असायचा...मी हे केलं...मी हे करते...मी अशी आहे...अग जरा समोरच्याचं तरी कधी ऐक
ना...नाहीच...सकाळी चालण्यासाठी जाण्याची माझी नियमीत सवय होती. तेव्हाच तिची ओळख झाली. नंतर अधीमध्ये भेट होत गेली...मग जशी मैत्री वाढू लागते, तशीच तिची आणि माझी मैत्री वाढू लागली. घरी हळदीकुंकू, एखादा नवा पदार्थ, कार्यक्रम...अशा प्रसंगी घरी येणे जाणे वाढले. त्यातून तिची मुले माझ्या लेकाच्याच शाळेत...मग अधिक ओळख झाली. पण जेव्हा आपण जरा जास्त जवळ जातो, तेव्हा कधीकधी नाण्याची दुसरी बाजू समोर येते...अपर्णाच्या बाबतीतही तेच झालेलं...कधी एखादा खाऊ घेऊन अपर्णाच्या घरी गेलं तर तू हे कसं केलंस हा प्रश्न विचारणार...आणि मग असं करु नकोस, मी सांगते तसंच कर...म्हणत आपली रेसिपी सांगणार...हा पदार्थ असाच चांगला लागतो...अग पण मी केलेल्या पदार्थाची चव तर बघ...अशी आपण विनंती केली, तर बघते, पण मला ठराविक चवीचाच पदार्थ आवडतो, म्हणून शेरा मारणार....एकदा माझा एक डबा तिच्याकडे होता, तो घेऊन घरी आली...डबा हातात देऊन म्हणाली...बघ कसा तुझा डबा चकाकतोय...मी बघितला..आणि तिला वाचिरलं...तर म्हणाली...चांगला घासून घेतलाय बाईकडून...कुठल्याश्या साबणाचं नाव सांगितलं...हाच वापर तू...बघ भांडी लकाकून निघतील...मला अशीच लख्ख भांडी आवडतात...म्हणून मला आणखी एक सल्ला दिला...अर्थात मलाही स्वच्छ भांडी आवडतात...सर्वांनाच आवडतात...पण हे सांगतांना दुस-याला नको ते सल्ले कशाला द्यायचे...या अशा घटनांमधून आमच्या दोघींच्या होऊ घातलेल्या मैत्रीमध्ये दुरी वाढत गेली...मध्यंतरी तिच्याकडे काम करणा-या मावशी भेटल्या...त्या तिच्याच घरातून बाहेर पडल्या होत्या...मी ओळखीचा चेहरा बघून कसं काय म्हणून विचारलं...तर त्या मावशी एवढ्या वैतागल्या होत्या काही विचारु नका...या बाईला कुठलंही काम पसंत पडत नाही...सतत सूचना...गरज आहे, म्हणून काम करतो...पण या बाईचं काही समाधान होत नाही, म्हणून ती बाई दुसरीकडे वळली...अपर्णाच्या स्वभावाचे असेच काही पैलू समोर आल्यावर माझा आणि तिचा संपर्क अगदी विरळ झाला...आता जवळपास दोन महिन्यांनी आमचं बोलणं झालं...
पहिल्यांदा तिची चौकशी केली...पायाला फॅक्चर कसं झालं म्हणून
विचारलं...आता तिला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली होती...किमान महिनाभर तरी आराम करावा लागणार होता...त्यातले पंधरा दिवस पार पडले होते...पण ती खूप वैतागली होती...तिच्या मनानुसार काहीच चाललं नव्हतं...लादी सध्या नवरा पुसतो...पण लादी पुसण्यासाठी त्यांनी ऑनलाईन काही मागवलं आणि त्याच्या सहाय्यानं लादी पुसली जातेय...कुठल्याश्या पोळी भाजी केंद्रातून सकाळ संध्याकाळचा डबा येतो...मुलांना भांडी घासायचा फार त्रास नको म्हणून पत्रावळ्या आणून ठेवल्या आहेत...मुलं त्या डब्यातील जेवण काढून घेतात, जेवतात...आणि त्या पत्रावळ्या कच-याच्या डब्यात टाकून मोकळ्या होतात...कपडे मुलं आणि नवरा मिळून रात्री वॉशिंगमशीनमध्ये लावतात...तेव्हाच झाडांना पण पाणी घालतात...एकूण सर्व चालत होतं...पण अपर्णा खूष नव्हती...अशी उभ्यानं लादी पुसली जाते का....अख्ख्या घरासाठी एकाच बादलीतून पाणी घेतो...काळी पडलीय लादी...वॉशिंगमशीनचे कपडे स्वच्छ नसतात...साबणाचा वास येतोय...बाथरुममध्ये सफाई कोण करणार...पत्र्यावळीत जेवायला कसं वाटतं...अशा एक ना दोन अनेक तक्रारींचा पाढा अपर्णानं चालू केला होता...पण मला यात तिच्या मुलांचं कौतुक दिसत होतं...नववी-दहावीला असणारी मुलं घर व्यवस्थित सांभाळत होती...बाबा ऑफीसला गेल्यावर आईला तिची औषधं वेळेवर देत होती...पत्रावळीत का होईना आणि गार का होईना पण जेवण तर वाढून देत होती...तिला संध्याकाळी फळं सोलून हातात देत होती....शिवाय आईला एकटं वाटायला नको, म्हणून मुलीनं तिच्या डान्स क्लासमधून सुट्टी घेतली होती...ती आईच्या आसपास वावरत होती...या सर्वांची अपर्णानं साधी दखलही घेतली नव्हती...तिचा मी...चा हेका चालूच होता...आता तर पायाच्या दुखण्यामुळे ती अजून वैतागली होती...सर्व बोलणी झाल्यावर ती सुद्धा म्हणाली, कोणी ओळखीच्या मावशी असतील तर सांग...मी हो म्हणत फोन ठेवला...
खरंतर मैत्री हा व्यापक अर्थ आहे...कोणी मैत्रिण अशी आजारी होऊन पडली
आहे, हे कळलं असतं तर लगेच धावाधाव सुरु केली असती...काही खाऊचे डबे तिच्या घरी
पोहचवले असते...पण अपर्णाची बातच वेगळी होती...तिला काय पसंत पडेल...हाच पहिला
प्रश्न पडला...आणि मनातला बेत बाजुला ठेवला...थोड्यावेळानं कामासाठी बाहेर
पडल्यावर ओळखीच्या एक मावशी भेटल्या...आमच्या बिल्डींगमध्ये त्या कामाला
येतात...त्यांना विचारलं, एका घरात काम आहे,
जाल का...त्या हो म्हणाल्या...त्यांचे एका घराचे काम कमी झाले होते, ती
मंडळी सुट्टीसाठी दोन महिने गावाला जाणार होती....त्यामुळे या मावशींना सुट्टी
मिळाली होती...पण हे सांगतांना त्यांनी मध्येच विचारलं....कोणाकडे...तुमच्याकडे
नाही का...मी म्हटलं नाही हो...अपर्णाचा पत्ता सांगितला...तर त्या बाईनं डोक्याला
हात लावला...ती बाई होय...ती जाम कटकटी बाई आहे...तिच्याकडे कामाला होती ना, त्या
मावशीला मी ओळखते...तिनं सोडलं ना काम...मी हो सांगितलं...आणि आत्ता अपर्णाच्या
घरची परिस्थिती सांगितली....त्यावर त्या मावशी म्हणाल्या...मी दोन महिने काम
करेन...नंतर नाही जमणार...तुम्ही सांगा त्यांना...माझं काम चांगलं असतं...उगीचच
कटकट करु नका म्हणून आधी सांगा...मी हो सांगितलं...अपर्णाला फोन करुन त्या
मावशींबद्दलच सांगितलं...दोघीही फोनवरुन बोलल्या....आता थोडी बाजू पलटल्याची जाणीव
झाली...माझ्यासमोर असलेल्या मावशी त्यांच्या अटी सांगत होत्या...आणि तिकडून अपर्णा
हो...हो...बोलत होती...सर्व अटी सांगून झाल्यावर कामाची वेळ ठरली आणि माझा फोन
हातात देऊन त्या मावशी म्हणाल्या...आत्ताच सांगितलं..नंतर कोण कटकट ऐकणार...त्या
मावशी ऐटीत निघून गेल्या...यावर काय बोलणार...निदान आता तरी अपर्णाचा मी चा हेका
कमी होईल अशीच आशा मनात होती....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आपला लेख चांगला आहे👍👍👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख आपल्या स्वभावाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, तुम्ही ते प्रसंगानुसार दाखवून दिले आहे. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे .खूप छान लेख धन्यवाद 🙏🙏🌹
ReplyDeleteसईबाई, छानच आहे लेख!कामवाली हा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय! आपल्या अवतीभवती अपर्णा सारख्या व्यक्तीहीआढळतात. पण त्यांनी कधी तरी स्वतःचं परीक्षण करावं असं वाटतं. काही बाबतीत आपणही खूप आग्रही असतो. असावं ही! पण काळ-वेळ बघून त्यात लवचिकता आणता आली पाहिजे.
ReplyDeleteकामवाली पण माणूस आहे आणि तिच्यातही काही चांगलं-वाईट असणारच की! उगाच ती गुलाम असल्यासारखं वागवू नये. स्वभावाला औषध नसतं हे बाकी खरं. पण आपल्यासोबत इतरांनाही त्रासात ढकलणारा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे.
काही वेळा अडला नारायण अशीही स्थिती अनुभवावी लागते.
ग्रेट अपर्णा
ReplyDeleteआजारपणाला औषध आहे पण स्वभावाला अजूनतरी औषध नाही. पायाने चालायचे असेल तर इतर गोष्टी जशा होतील तशा चालतील म्हणून सोडून द्यावे.
ReplyDeleteअपर्णा आहे प्रातिनिधीक स्वरूप आहे .
ReplyDeleteअशा अनेक जणी भेटतात आपल्याला