माळ आली घरा...
घरात किती कांदे आहेत....रोज किती कांदे लागतात...उगाचच त्यात नव्या कांद्यांची
भर...आत्ता आणले नाहीत तरी चालतील...पुढच्या शनिवारी बघूया...आमच्या घरात शनिवारची
लिस्ट चालू होती...काय-काय आणायचे याची नोंद चालू होती...मी पहिल्या नंबरवर कांदे
लिहिले होते...नव-यानं कांद्याची टोपली बघितली तर ती अर्धीअधिक भरलेली...त्यामुळे
पहिलाच नंबर नव-यानं खोडून काढला...पण मी ठाम होते...कांदे आणायचेत म्हणजे
आणायचेत...पुन्हा नव-याचा नकार...पण मी ठाम...कांदे आणायचेत म्हणजे माळ
आणायची...पांढ-या कांद्याची माळ...मार्च महिना सुरु झाला की आमच्या
आलिबाग-रेवदंड्यात या पांढ-या कांद्याच्या माळा दिसू लागतात. मार्च महिना संपता संपता घरोघरी विकायला
येतात...या भागात साठवणुकीसाठी हे कांदे घेतले जातात, आता इथे तसे शक्य होत नाही...पण पांढ-या
कांद्याची माळ घरात आली की त्या पांढ-या शुभ्र कांद्याच्या दर्शनानंच अवघा कडक
उन्हाळा सुसह्य जाणार याची जाणीव होते...बाकी या पांढ-या कांद्यामध्ये किती पेक्षा
कितीतरी गुणकारी गुणधर्म आहेत. कोणी
आलिबागचा पांढरा कांदा आणलाय, असं सांगितलं तरी मुठभर मास चढतं...आमच्या गावाचा
असा अभिमान चेह-यावर येतो...त्याला कारण म्हणजे, लहानपणापासून खाल्लेली या
कांद्याची चव कधीच गेली नाही...अगदी गोडसर...कोशिंबीर असो वा कांदेपोहे...ते सर्व
या पांढ-या कांद्याच्या सोबतीनं झालं आहे.
आमचा रेवदंडा-आलिबाग हा भाग अशा काही खास वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.
त्यात पांढरा कांदा पहिल्या नंबरवर बसेल बहुधा....या भागात पांरंपारिक पद्धतीनं या पांढ-या कांद्याची शेती केली जाते. साधारण भाताचे पिक काढल्यावर मग पांढ-या कांद्याचे बियाणे लावले जाते. मग हा कांदा मार्च-एप्रिलमध्ये तयार होतो...कांद्यात सौदर्य असतं का...हा प्रश्न पडला तर पांढ-या कांद्याची माळ बघायची. पांढ-या कांद्याची ही विण जेवढी भक्कम असते, तवेढीच ती देखणी असते. या अशा पांढ-या कांद्याच्या माळा आलिबाग, चौल, रेवदंडा भागातील अनेक घरांच्या सामान ठेवण्याच्या खोलीत एका काठीच्या आधारानं टांगून ठेवल्या जातात...लहानपणी जेवतांना हा कांदा ताटात नाही असा दिवस गेला नाही. असाच हा कांदा घरात आणण्यासाठी नव-यासोबत वाद चालू होता. पण तो वाद एका शब्दातच मिटला. पांढरा कांदा हे शब्द ऐकल्यावर नव-यानं फक्त ठिक आहे...एवढं बोलून पुन्हा यादीत कांदे लिहिले, पण त्याच्यासमोर पांढरा हा शब्द लिहायला तो विसरला नाही....
शनिवारी एखाद्या पाहुण्यासारख्या पांढ-या कांद्याच्या दोन माळा घरात आल्या. मग सगळा स्वयंपाक या पांढ-या कांद्याभोवती फिरला. साधी खिचडी आणि त्यासोबत पांढरा कांदा घातलेली टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर. खरंतर हा पांढरा कांदा नुसता खाल्ला जातो. त्यात आलिबागकडचा पांढरा कांदा मिळाला, तर बातच काही वेगळी असते. कारण हा कांदा चवीला थोडा गोड असतो. त्यामुळे नुसता कचाकच कच्चा खातांनाही त्रास होत नाही. रविवारची सकाळ या कांद्यापासून सुरु झाली. कांदेपोहे म्हणजे रविवारचं शास्त्र....आता जोपर्यंत हे पांढरे कांदे घरात असणार, तोपर्यंत कांदेपोहे या पांढ-या कांद्यांचेच होणार...एरवी पोह्यांमध्ये चवीसाठी थोडी साखर टाकली तर त्याची चव अधिक वाढते. पण या पांढ-या कांद्यामध्ये पोहे परतले तर साखर घालण्याची गरजच भासत नाही पोहे आपसूक गोड होतात.
पांढरा कांदा कितीतरी गुणकारी आहे. उन्हाळ्यात हा कांदा म्हणजे एका औषधासारखा आहे. पण त्याची खायची पद्धत आहे. या पांढ-या कांद्यापासून कितीतरी प्रकार करता येतात. त्यातील आमच्या घरात कोशिंबीर आणि पोहे जास्त होतात. पोह्यात सुद्धा हा कांदा घातला तर फार लालसर होईपर्यंत वाट बघायची नसते...अगदी तेलावर नरम झाला की लगेच पोहे घालायचे...चूकून या कांद्याचा रंग बदलला तर त्याची चव बदललीच असे समजा...पण हा कांदा कच्चा म्हणून अधिक खुलतो...कोशिंबीरीचा तर हा राजाच असतो. मी कोशिंबीरचे अनेक प्रकार या पांढ-या कांद्याच्या सोबतीनं करते. गावठी फ्लॉवर म्हणून एक फ्लॉवर येतो. अगदी छोटा...थोडा पिवळसर...हा फ्लॉवर
कच्चा खाण्यास छान लागतो. हा फ्लॉवर बारीक किसणीवर किसून घ्यायचा....त्यात पांढरा बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची...चवीला मिरची आणि मिठ...जर हवं असेल तर दही...हे सर्व मिक्स करुन वर जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची....ही कोशिंबीर छान लागते...शिवाय पोटभरही होतं. उन्हाळा जास्त तापू लागला की सर्वांचीच एक तक्रार असते, भूक लागत नाही. अशावेळी ही कोशिंबीर कामी येते. मे महिन्यातील माझी दुपार बहुधा या अशाच कोशिंबीरीवर पार पडते. जर फुल मिल म्हणून या कोशिंबीरीचा वापर करायचा असेल तर त्यात काकडी आणि शेंगदाण्याचं कुटही चांगलं जिरुन जातं...पांढ-या कांद्याची नुसती भाजीही अशीच सोयीची आणि गोडीची होते....वांगी, भेंडी जशी मध्ये चिरली जातात तसेच हे पांढरे कांदे चिरुन घ्यायचे. त्यात ओल्या खोब-
याचे वाटण किंवा अगदी घाई असेल तर भाजलेलं थोडं चण्याचं पिठ आणि शेंगदाण्याचा कुट, आलं खोबरं, मिठ, मसाला, कोथिंबीर हे चांगलं मळून भरुन घ्यायचं. या भरल्या कांद्याला बाजुला ठेवायचं आणि फोडणीची तयारी करुन घ्यायची...अगदी साधी फोडणी....तेलावर जिरं, राई, हिंग, कडीपत्ता घालायचा...सोबत मिठ, हळद आणि बेताचं तिखट घालायचं...मसाला जळू नये म्हणून यावर लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा...थोडी कोथिंबीर...मग अगदी दोन किंवा तीन चमचे पाणी...हे सर्व छान मिक्स झालं की यावर भरलेले कांदे लावायचे आणि भाजी ज्यात फोडणीला घातली आहे, त्या भांड्यावर झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी घालायचं...अगदी दहा मिनीटात ही कांद्याची भाजी तयार होते. भाकरीसोबत भाजी छान लागतेच...पण फक्त गरम गरम भात असेल तरीही ही भाजी छान लागते. कारण भाजीचा रस्साही घट्टसर आणि छान चवीचा होतो...एरवी या पांढ-या कांद्याचे लोणचेही घातले जाते...पण मी हा प्रयोग अद्याप केलेला नाही. बाकी या पांढ-या रंगाचाच जास्त मोह होतो....त्यामुळे भाजी वगळता त्यावर कुठलाही प्रयोग करण्याचे धारिष्ठ होत नाही....कारण या रंगाची मोहीनीच जास्त पडलेली असते. अख्खा एप्रिल-मे महिना या पांढ-या कांद्याच्या साथीनं गोड होतो. अर्थातच हे पांढरं सोनं आहे....त्यातील औषधी गुणधर्माची मोजदाद करता येणार नाही...पण चवीपुरता जरी विचार केला तर या कांद्याच्या चवीएतकी चव अन्य कुठल्याही कांद्याला नाही.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सुंदर लिहले आहे🙏👍
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lakh.
ReplyDelete