घरात जीव आहेत....
दोन दिवस तू एकटी काय करणार...त्यापेक्षा आईकडे किंवा मावशीकडे रहायला जा...तुलाही जरा चेंज होईल...नवरा त्याच्या ऑफीसच्या ग्रुपबरोबर पिकनिकचा प्लॅन करत होता. तेव्हा मी एकटीनं घरात काय करावं...याचे तो पर्याय देत होता...अर्थात मी कुठेही जाणार नाही याची त्याला खात्री होती...खूप आग्रह केला तर माझं काय उत्तर येणार, याचीही त्याला माहिती होती, घरात जीव आहे...मी कुठेही जाणार नाही...हे माझं शेवटचं उत्तर असणार होतं...आणि नव-याला त्याची माहिती होती...घर बंद ठेऊन दोन दिवस कुठेही जायला निघालं की पहिली काळजी लागते ती घरातील जीवांची...अबोल असणा-या या जीवांनी घरात खास जागा केली आहे. मुळात या जीवांमुळे आमच्या घराला जिवंतपणा आला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...हे जीव म्हणजे काचेच्या एका पेटीत असणारे रंगीत मासे...हे मासे घरात आले आणि घरातील वातावरण एकदम बदलून गेलं...
जवळपास सहा वर्षापूर्वी नवरा गावाला गेला होता. लेकाची शाळा चालू होती. रविवारचा दिवस . भर दुपारी, अगदी दोन-अडीचच्या सुमारास लेकाला एका क्लासवरुन घरी घेऊन येत होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला काचेचे बाऊल मांडलेले दिसले. प्रत्येक बाऊलमध्ये दोन मासे होते...आम्ही बघून पुढे गेलो...पण लेकानं गाडी थांबव...गाडी थांबव म्हणून आरडा ओरडा केला...आपण ते मासे घेऊया म्हणून आग्रह धरला. या विषयावर आधीही आमच्या घरात चर्चा झाली होती...पण नव-याचा ठाम नकार असायचा...त्याचा पहिला मुद्दाच आम्हाला कधी खोडता आला नाही...आपण बाहेर गेल्यावर त्या माशांना कोण बघणार...यावर आम्ही दोघंही माघार घ्यायचो. पण आता भर रस्त्यात लेकांना गोंधळ घातला होता...मी त्याला, बाबा ओरडतील हे सांगून बघितलं...पण तो म्हणाला तेव्हाचं तेव्हा बघू...आता हे मासे घरी घेऊन जायचे म्हणजे जायचेच...शेवटी त्याच्या आग्रहाला मी बळी पडले. तो छोटा काचेचा बाऊल घरी आला आणि सोबत दोन मासेही आले. अगदी दरवाजाच्यासमोरच या माशांना जागा केली...हा पहिला दिवस लेकानं आणि मी सुद्धा त्या काचेच्या बाऊलभोवती घालवला होता...अगदी जेवलोही त्यांच्यासमोरच...दुस-या दिवशी नवरा घरी आला आणि आम्ही दोघंही बारीक चेहरा करुन बसलो होतो...नव-यानं घरातला बदल बघितला...छान...शेवटी घरी आलेच...एवढ्याच शब्दात त्यानं प्रतिक्रीया दिली...पण त्यानंतरच्या काही दिवसातच हे मासे आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. अगदी पहिल्यांदा नाही म्हणणारा नवराही त्यांच्या प्रेमात पडला.
लेकाची दहावी झाल्यावर या माशांचा आणखी मोठा टॅंक घरात आला. मग
मोठ्या टॅंकसह माशांची संख्याही वाढली....तसं आमचं त्यातील ज्ञानही वाढू लागलं. शहरात असे रंगीत मासे कुठे विकले जातात, त्या दुकानदारांची ओळख झाली. फारकाय आसपासच्या शहरात गेल्यावर अशी रंगीत माशांची दुकानं दिसली तरी पहिली भेट त्यांना द्यायला लागलो....मग अशा माहितीतून माशांचां टॅंक आधुनिक झाला. त्यांच्या खाण्याची बारीक पावडर बदलत गेली...या माशांचा सर्वाधिक फायदा कधी झाला असेल तर तो कोरोना काळात...त्या भयाण दोन वर्षात घरातील निरेशेचे वातावरण या माशांमुळे खेळकर झाले. त्या काळात आलेली निराशा...तणाव...भीती....या सर्व भावना या माशांनी दूर केल्या...आधीच घरातील सदस्य झालेले हे मासे त्या काळात अती महत्त्वाचे ठरले....या सर्व वर्षात माशांबाबत ज्ञान वाढतच गेलं...त्यात सकर नावाच्या माशाचा किस्सा सांगायलाच हवा...हा मासा म्हणजे सफाई कर्मचारीच...सर्व टॅंकची सफाई करायची जबाबदारी याची असते. एकदा असंच या माशांच्या दुकानात गेल्यावर माशांच्या टॅंकला चिकटलेला हा मासा दिसला. त्याबद्दल विचारल्यावर दुकानदारानं विचारलं, तुमच्या टॅंकमध्ये सकर नाही का...याला पहिलं घेऊन जा....हा सर्व काच लख्ख करेल बघा...आणि अगदी करंगळीएवढा सकर घरातील टॅंकमध्ये आला...पहिल्यांदा हा छोटू काय साफसफाई करणार
म्हणून काळजीच वाटायची...पण सकरनं ड्युटी चालू केली आणि काही दिवसात जाणवलं की काचा स्वच्छ होत आहेत. या सकरची वाढही पटापट झाली...पहिला सकर अगदी काही महिन्यात चांगला हाताच्या पंजाएवढा मोठा झाला...मग तो टॅंकमधील बाकींच्या माशांवर दादागिरी करु लागला....त्यामुळे सकर जवळच्याच विहीरीत सोडला आणि दुसरा सकर आणला...एकदा एक झुपकेदार असा एक्झॉटीक मासा हौशेनं आणला....या माशाची किंमतही खूप होती....या माशाचा पसारा खूप मोठा...टॅकमध्ये फिरु लागला की सर्व लक्ष त्याच्यावरच असायचं...एकदा दोन दिवसांसाठी या माशांना एकटं सोडून बाहेर गेलो होतो...घरी आल्यावर पहिल्यांदा टॅकमधले लाईट लावले...ऑक्सीजन चालू केला...सर्व मासे व्यवस्थित होते...पण तो झुपकेदार मासा कुठे दिसेना...कुठे गेला...शेवटी एका कोप-यात त्याच्या झुपक्याचे एक टोक दिसले...आमची
तिघांचीही नजर सकरवर गेली...मोठा झालेला सकर गप्प काचेला चिटकून बसला होता...आम्ही समजून गेलो...मनात हळहळलो...आणि मोठ्या सकरला बदलून पुन्हा छोटा सकर घरी आणला....तेव्हापासून हा सकर नावाचा मासा, थोडा मोठा झाला की लगेच बदलायला लागलोय....
या माशांमुळे एक छोटासा ग्रुपही झालाय. अनेकवेळा या माशांच्या दुकानात गेल्यावर यातील
कोण ना कोण भेटणारच...ही सर्व मंडळी यातील मुरब्बी...मग आम्ही आमच्या बालीश शंका
त्यांच्यासमोर मांडू लागलो. त्यातली पहिली
म्हणजे, दोन-चार दिवस घराबाहेर गेल्यावर
काय करायचं...अशावेळी आम्हाला आमच्या टॅंकमधील मासे बदलण्याचा सल्ला मिळाला... व्हिडिओ टेट्रा, टायगर टेट्रा, टायगर बार नावाचे मासे मग घरात
आणले...ही सर्व रंगीत-संगीत मंडळी...हे मासे अगदी आठवडाभर काहीही न खाता राहू
शकतात...पण असं भुकेलं कसं ठेवणार, हा माझा प्रश्न होताच...मग बाहेर जातांना
माश्यांना काही गोळ्या येतात याची माहिती मिळाली.
ही गोळी टॅंकमध्ये टाकायची...दहा ते पंधरा माशांना आठवडाभर ही गोळी
पुरते...आता दोन दिवसांसाठी कुठे जायचं असेल तर या गोळ्यांचा आधार होतो...पहिल्यांदा
या माशांना सोडून जायची वेळ आली ती लेकाला त्याच्या कॉलेजमध्ये सोडायला गेलो
तेव्हा...तेव्हा आठवड्यापेक्षा जास्त दिवस
लागणार होते...म्हणून मासे तातपुरते भावाच्या घरी ठेवले...
लेकाला त्याच्या कॉलेजच्या शहरात सोडून आम्ही दोघं घरी परतलो...घर उघडलं आणि पहिली जाणीव झाली...भकास...भयाण...सर्व घरात कमालीची शांतता होती...लेकाची जागा खाली होती....मी मोठ्यानं भोकाड पसरलं....नवराही रडू लागला होता...कधी नव्हे ती कमालीची निराशा जाणवू लागली...आता काय....त्याच्याशिवाय कसे रहायचे...आदी प्रश्न पडू लागले. शेवटी सर्व आवरुन भावाचं घर गाठलं....आमचे मासे पुन्हा घरी आणले...ती टॅंक पूर्ववत लावतांना आमची दोघांचीही तारांबळ झाली....पण त्यातूनच आम्ही दोघंही सावरलो....बराचवेळ त्या माशांकडे बघत राहिलो...त्यांनाही बहुधा आमच्या एकाकीपणाची जाणीव झाली होती...त्यामुळे ते सुद्धा आमच्यासमोर येऊन, आम्ही सोबत आहोत, म्हणत वरखाली उड्या मारत राहिले...त्यानंतर काही दिवसातच नवराही ऑफीसला जाऊ लागला....त्याचं वर्कफ्रॉम होम संपलं....पुन्हा मनात एकाकीपणाची भावना आली...पण यावेळीही या माशांना साथ दिली...त्यांचे अस्तित्व हे माझ्या मनातील अस्वस्थेला पुसून गेले...आता तर आम्ही आमच्याआधी त्यांची काळजी घेऊ लागलो आहोत. अगदी जेवायला बसायच्या आधी, पोरांना दिलं का...हा प्रश्न कायम असतो. या माशांमुळे खूप छान ओळखी झाल्या आहेत. यातील सर्व तरुण मुलं आहेत...ही मुलं म्हणजे ज्ञानाचे भंडार आहेत...त्यातील काही वकील, इंजिनिअर, उद्योजक आहेत...पण प्रत्येकाचं पहिलं प्रेम या रंगीत माशांवर आहे...आम्हाला काही अडचण आली...नवा माशाचा कुठला प्रकार घ्यायचा
असेल, तर आम्ही न बिचकता या मंडळींना गाठतो...मग ही हुशार मंडळी आमचा माशाचा प्रकार, त्याची रहाण्याची पद्धत...अन्य मासा...त्याची रहाण्याची पद्धत...आदी...आदी अनेक विषयांवार माहिती देतात...एकूण दर शनिवार-रविवार या माशांच्या दुकानात काही घ्यायचे नसले तरी चक्कर टाकायला शिकलो आहोत....काहीतरी नवी माहिती समजेल...मग आपल्या घरातील माशांना अधिक सोबत होईल...हीच त्यातील भावना...आता एकेकाळी जो माझा नवरा घरात माश्यांचा टॅक आणायला ठाम विरोध करत होता....तोच आता त्या घरातील टॅंकची आणि त्यातील माशांची प्रचंड काळजी घेतो....कधी जास्त वेळ घराच्या बाहेर रहायचा प्रश्न आला तर घरी परत जाण्याची घाई करतो...कोणी जास्तच आग्रह केला तर सांगतो...नको...आमच्या घरात जीव आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
नलिनी पाटील
ReplyDeleteसाध्या सोप्या घरगुती विषयातून अत्यंत माहितीपूर्ण व हलकाफुलका सुंदर लेख. एकाकीपणात सुद्धा हे इवले इवले मासे सखे सोयरे झाल्याची सुंदर अनुभूती.
चांगला फुलवला आहे
ReplyDeleteखूपच छान....हे खरं आहे की या मुक्या प्राण्यांमुळे आपले आयुष्य सहज होते.....माझ्याकडेही कुत्रा आहे....खूप जीव लावतात....🙏
ReplyDelete