आता मला जगू द्या.....

 

आता मला जगू द्या.....


ब-याच दिवसांनी मी संध्याकाळी चालायला बाहेर पडले होते.  एरवी सकाळी चालण्याचा नेम होता.  पण आता तो सगळा वेळ योगामध्ये जातोय, त्यामुळे चालायला फार कमी मिळतं.  बुधवारी काम लवकर आटपलं...वेळ सत्कार्णी लावावा म्हणून, मी सहाच्या सुमारास घराबाहेर पडले...पहिली फेरी झाली तोच सकाळी फेरी मारतांना काही मैत्रिणी झाल्या होत्या, त्यापैकी एक काकू दिसल्या...मी त्यांना हाक मारली...आता काय सायंकाळीपण चालता का, म्हणून विचारलं...तर त्या म्हणाल्या मी चालत नाही...माझ्या मनाप्रमाणे जगत आहे...मला काही कळलं नाही...पण त्या त्यांच्याच गुंगीत होत्या...आम्ही सोबत चालत होतो...अगदी रस्त्यातले खड्डे चुकवत त्या गप्पगुमान चालत होत्या...इतक्या की त्यांना त्या काय बोलल्या हे पुन्हा विचारायचं माझं धाडसंच झालं नाही...पण मी काय करु...त्यांच्यासोबत चालू की दुसरीकडून चालू, हे सुद्धा कळत नव्हतं...मग मीही त्यांच्यासारखी गप्पगुमान चालू लागले...दुसरी फेरी अशीच शांततेत गेली...मी अजून एक फेरी मारली की घरी परत जाण्याच्या बेतात होते...काकू किती फे-या मारणार हे विचारायची सोय नव्हती...शेवटी तिसरी फेरी अर्धी झाल्यावर मी ती शांतता दूर करत त्यांना सांगितलं...मी ही फेरी झाली की घरी जाईन, तुम्ही अजून मारणार का फे-या...तेव्हा काकू तशाच शांततेत म्हणाल्या...नाही, मी पण थांबणार..पण घरी जाणार नाही...बागेत बसून राहीन...पुन्हा गप्प...काय झालं असेल...माझं डोकं गरगरलं...कारण काकूंच्या कुटुंबाला मी चांगलीच ओळखते...दोन मुलं...एकाचं लग्न झालेलं...आणि काका-काकू...तसं पाहिलं तर संपन्न कुटुंबातील काकू अचानक अशा काय वागू लागल्या हे मोठं कोडचं होतं...शेवटी त्यांना बागेजवळ सोडून मी परत आले...दुस-या दिवशी फे-या मारतांनाही परत काकू दिसल्या...पण त्यांच्या जवळ जायचं धाडसं होईना...पण त्यानींच जवळ बोलावलं...फे-या सुरु झाल्या...आणि काकूंच्या मनातील अस्वस्थताही बाहेर पडू लागली.

काकूंच्या मोठ्या लेकाचं लग्न होऊन चार वर्ष झालीत.  वयाच्या तिशीमध्ये बोहल्यावर चढलेला हा मोठा मुलगा आता चौतीशीत आलाय.  त्यानं त्याच्या मैत्रिणीबरोबर लग्न केलंय.  ती सुद्धा त्याच वयाची.  आता चार वर्षानंतर तरी या दोघांनी मुलाबाबत विचार करावा म्हणून काकू मागे लागल्यात.  तशा त्या लग्नानंतर सहा महिन्यापासून घरात हा विषय काढत होत्या.  पण त्याकडे


दुर्लक्ष केलं गेलं.  त्यांची मस्करी केली गेली.  सुनेनं ऑफीसच्या प्रमोशनचं कारण पुढे केल आणि त्यांची समजूत काढली.  त्यानंतर कोरोनाच्या काळ आला....पण तेव्हाही दोघं दोन टोकावर हातात लॅपटॉप घेऊन बसलेले असायचे...पुन्हा ऑफीस सुरु झाल्यावर मग परत तेच...प्रमोशन...टार्गेट..दरम्यान दोघांनीही कुठलिशी ट्रीप केली.  काकूंनी तेव्हा त्यांना आतातरी मला गोड बातमी द्या म्हणून सांगितलं...तर आई खूप कटकट करतात असा सुनेचा सूर आला.  त्याला लेकानंही साथ दिली.  काकू विचारतात यात कटकट काय आली.  त्यात धाकटा मुलगाही तिशी पार करतोय...पण त्याला लग्नाची घाई नाही.  अजून सेटल व्हायचंय....काकू विचारतात अजून सेटल म्हणेज काय...त्यानं स्वतंत्र फ्लॅट घेतलाय.  गाडी आहे.   चांगली नोकरी आहे.  त्यांच्या दृष्टीनं हेच सेटल होणं आहे.  पण मुलाची सेटल होण्याची व्याख्या वेगळी आहे, ती त्यांना काही कळत नाही. 

या सर्वात त्यांचे पती थोडे निर्धास्त आहेत.  ते कायम काकूंना सांगतात, मुलं आता मोठी झालीत.  त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू दे.  पण काकू म्हणतात, एवढी वर्ष मी मुलांचीच मर्जी सांभाळतेय.   मी कुठे चुकले.  फक्त घरात बाळ येऊदे अशीच माझी इच्छा आहे.  बाकी बाळाचं मी सर्व करेन.  आपलेही हातपाय धड आहेत, तोपर्यंत नातवंडांना आपण खेळवू, असं त्या काकांना सांगतात.  आणि मुलं मोठी झाली की त्यांना काही सांगायचंही नाही का...हा एक प्रश्न आहे.  पण काकाही त्यांच्या व्यापात गुंतलेले.  गावी घर आहे.  आंब्यांची झाडं आहेत.   दोन महिन्यातून ते आठवडाभर गावी चक्कर टाकतात.  शिवाय इथे असल्यावर त्यांचा वेगळा ग्रुप आहे.  त्यांच्याबरोबर सकाळ संध्याकाळ गप्पा,  बागेची सफर, झालचं तर सोसायटीचीं काम यात त्यांचा वेळ जातो. 

मुलं आईची चिडचिड वाढलीय हे जाणून तिलाही कुठेतरी बाहेर जा, म्हणून सांगतात.  फिरायला जा आम्ही तिकट काढतो, हॉटेल बुक करतो, असं सांगतात.  एकदा गेल्याही.  पण घरात आल्यावर चार दिवसांचं घर आवरता आवरता त्या हैराण झाल्या.  घरासाठी...घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांनी जणू स्वतःला वाहूनच घेतलंय....पण कुठेतरी त्यांच्या मनाची अस्वस्थता बाहेर आली.  त्यांची एक बहिण तिच्या लेकीला झालेल्या बाळाचे पेढे घेऊन घरी आली आणि त्या पेढ्यांनी काकूंचे मन कडू झाले.  घरात सायंकाळी वाद झाला.  मोठा लेक आणि सून घरात आल्याआल्या काकूंनी विषय काढला.  तुमचं काय ठरलं.  बाळाबाबत विचार कधी करणार...शब्दाला शब्द लागत वाद वाढला.  कधी नव्हे ते घराच्या बाहेर आवाज गेला.  लेक आणि सूनबाई जेवायचे निमित्त करुन घराबाहेर पडले.  छाकट्या लेकानं आईची शाळा घेतली.  तू त्यांच्यामध्ये लुडबुड कशाला करतेस....तुझ्या याच स्वभावामुळे मी लग्न करत नाही म्हणून त्याचं मत नोंदवलं.  आधीच दुखावलेल्या काकू छाकट्याच्या बोलांनी पुरत्या कोलमडल्या.  त्यात भर म्हणून काकांनीही त्यांना मुलांवर निर्णय थोपवू नकोस म्हणून सांगितलं.  झालं.  काकू पुरत्या खचल्या. 

घरात दोन दिवस अबोल्याचे गेले.  काकूही कोणाबरोबर बोलल्या नाहीत.  या दोन दिवसाच्या शांततेत त्यांनी आपल्या मागच्या आयुष्यात डोकावून बघितलं.  पहाटेपासून त्यांची गडबड सुरु होते.  मोठ्या लेकाला काय आवडतं.  धाकट्याची ही पसंत.  सुनेचा डबा.  काकांचं पथ्य.  सगळे कामावर गेले की घर आवरणं...मग रात्रीच्या जेवणाची तयारी...त्यातही प्रत्येकाची वेगवेगळी पसंद...ताटात गरमगरम भाक-या...चपात्या....वाफाळता भात...काकूंनी आठवून बघितलं तर त्यांच्या ताटात असा गरमगरम भात कधी आलाच नव्हता.  सुट्टीमध्ये तर पार धावपळ...मुलं त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्या स्वयंपाकघरात...या सर्वांच्या मागे धावता धावता त्या थकल्या नव्हत्या...पण


मनानं पुरत्या खचल्या होत्या.  दोन दिवसानंतर त्यांनी जाहीर केलं, मला आता एवढी धावपळ होत नाही...घरात कामाला कोणीतरी ठेवा.  आता घरात साफसफाई, झाडू, लादी, भांडी यांच्यासाठी एक मावशी ठेवल्या आहेत.  शिवाय जेवण करतांनाही त्रास होतो म्हणून काकूंनी तक्रार केली.  आता सकाळ, संध्याकाळ चपात्या, भाजी करण्यासाठी एक मावशी येतात.  मुलं तक्रार करतात आई, तुझ्या हाताची चव नाही.  काकाही कूरकूर करतात, फार काय काकूंनाही सुरुवातीला हे आयतं जेवण गेलं नव्हतं...पण त्यांनी मनावर जणू दगड ठेवलाय.  आत्ता त्या घराबाहेर पडतात.  सकाळी फिरतात आणि संध्याकाळी फिरुन झाल्यावर बागेत वेळ घालवतात.  दोन्ही लेकांच्या स्वतंत्र खोल्या त्या पूर्वी आवरायच्या.  आत्ता नाही.  तुमचं तुम्ही करा...असं सांगतात.  आईत झालेला हा बदल लेकांनी, सुनेनं टिपलाय.  पण त्यांना आता बोलता येत नाही.  त्यांच्यातील शांतताच सर्व बोलतेय.  काकू सांगत होत्या,  आणि मी ऐकत होते.  एव्हाना आमच्या तीन फे-या मारुन झाल्या   आणि काकू बागेत निवांत बसल्या होत्या.  मला म्हणाल्या, अशी आहे आपली परिस्थिती...तू निघ...तुला कामं असतील...मी आत्ता असचं वागणार...मोठ्या झालेल्या मुलांना सुधारण्यासाठी दुसरं काय करणार....हे बोलून काकू पुन्हा अबोल झाल्या.

मी घराकडे निघाले.  पण मनात काकूंच होत्या.  गेल्या आठवड्यात आमच्या महिला महासंघाच्या परिसंवादात अशाच विषयावर चर्चा झाली.  कुटुंबातला संवाद संपतोय.  सोशल मिडियाचं वर्चस्व वाढलंय.  आणि मुख्य म्हणजे, कुटुंब वाढवण्याबद्दल असणारी अनुत्सुकता.  त्या परिसंवाद जे-जे मुद्दे मांडले गेले ते मुद्दे मला काकू बोलतांना आणि घरी गेल्यावरही आठवत होते.  प्रश्न आहे आणि त्याला उत्तरही....संवाद हवा...आणि कुटुंबाला ताजं ठेवणारे बोबडे बोलही...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप सुंदर

    ReplyDelete
  2. विचार करायला लावणारा लेख!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....वास्तव आहे...

      Delete
  3. खरं आहे.
    आजकाल पैसा, नोकरी आणि करियर च्या नादात माणसाला स्वतःसाठी जगायला वेळच मिळत नाहीये. यात परिस्थिती बरोबर आपण बदलायला/शिकायला हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो बरोबर आहे. हे सर्व करतांना आपल्या कुटुंबाचा आणि कुटुंबातल्या ज्येष्ठांच्या मतांचा आदरही करायला हवा.

      Delete
  4. अगदी खरं आहे. मुलंना जबाबदारी नकोय.

    ReplyDelete

Post a Comment