तू हवी होतीस ग....

 

 तू हवी होतीस ग....


गेल्या शनिवारी ब्रिटीश राजघराण्याचा नवा राजा म्हणून, राजा चार्ल्स यांचा राज्यभिषेक झाला.  चार्ल्स सोबत कॅमिना यांना राणीपदाचा दर्जा मिळाला.  हा सोहळा अवघ्या जगानं लाईव्ह बघितला.  त्यापैकी मी सुद्धा एक होते.  या राजघराण्याची फॅन वगैरे आहे, म्हणून नाही....तर हा सर्व सोहळा बघतांना मला तिची कमालीची कमी जाणवत होती.  राहून राहून वाटत होतं, ती आज हवी होती.  तो राणीपदाचा मुकुट तिच्याच डोक्यावर अधिक खुलून दिसला असता.  ती असती तर तिच्या नातंवंडांकडे तिनं एकदा तरी तिचा तो खास स्टाईलचा कटाक्ष टाकला असता...तिचे हिरवे-निळे डोळे प्रेमानं भरले असते...आणि मग तिच्या चेह-यावर पुन्हा ते खोडकर हसू आलं असतं.  तो सर्व सोहळा मला तरी निर्जिव वाटत होता.  अगदी सर्व पारंपारिक रिती ठरल्याप्रमाणे...अगदी यंत्रवत पार पाडल्या जात होत्या...पण ती असती तर...पुन्हा तोच प्रश्न...ती असती तर हा सोहळा अधिक बोलका झाला असता...तिच्या सौदर्यानं न्हावून गेला असता...ती म्हणजे डायना...राजकुमारी डायना...सौदर्यसम्राज्ञी डायना...एका अपघातानं ही सौदर्यवती राजकुमारी निघून गेली...पण मागे अनेक प्रश्न ठेऊन गेली आणि माझ्यासारखे तिचे चाहतेही....


ब्रिटीश राजघराण्याबाबत मला कधीही प्रेम, आपुलकी, उत्सुकता वाटली नाही.  उलट जसाजसा इतिहास समजायला लागला.  तसे या राजघराण्याबाबत मन अघित कडू व्हायला लागलं.  ब्रिटीशांनी केलेले अत्याचार आठवायचे...मध्येच राणी किंवा या राजघराण्यातील कोणी सदस्यांचे फोटो यायचे...त्यांनी घातलेल्या दागिन्यांचे कौतुक वाचायला मिळायचे...पण माझं मन त्या दागिन्यांच्या मुळ मालकाला शोधायला जायचं...कारण ब्रिटीश राजघराण्यांनी आपली तिजोरी भारतासारख्या अनेक देशांना लुबाडून भरली आहे.  आपल्या कडून ओरबडून नेलेल्या संपत्तीवर ऐश करणारं घराणं म्हणूनच मी या राजघराण्याकडे बघत होते...पण या सर्वात डायनाची एन्ट्री झाली...तेव्हाचा राजकुमार आणि आत्ताचा राजा चार्ल्स यांच्या आयुष्यात या अठरावर्षीय युवतीनं प्रवेश केला...आणि माझी नजर बदलली...डायनाचा पहिला फोटो पाहिला...आणि तिच्यावर लेख लिहिला...तेव्हा गांवकरी या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होते...गांवकरीच्या युवा या पुरवणीमध्ये माझा डायनावर हमखास लेख असायचा...तिनं घातलेल्या दागिन्यावर...कपड्यांवर...मग तिच्या

लग्नावर...तिच्या बाळंतपणावर...तिच्या आजारपणावर...एकाकीपणावर...कश्या कश्यावर लेख लिहिला नसेल ते विचारा...डायना माझी लाडकी झाली होती...ती कुठे...आणि मी कुठे...पण तिच्या व्यक्तिमत्वाच्या मी प्रेमात पडले...पुढे डायना आणि चार्ल्सचा घटस्फोट झाला...या दिवशी तर मी डायनापेक्षा अधिक दुःखी झाले...का...तर एका भावी राजानं एका दुस-या स्त्री साठी आपल्या बायकोचा अपमान केला होता...तोही डायनासारख्या सौदर्यवतीचा...अर्थात मी त्याच्यावरही लेख लिहिला...

पुढे डायना आणि तिचं व्यक्तिमत्व बहरत गेलं...राजघराण्याच्या कुंपणात दडलेली डायना, घटस्फोटानंतरच खुलली...समारंभात ती अधिक आत्मविश्वासानं वावरु लागली...समाजजेवेत तिचा पुढाकार होता...पण या सगळ्यापेक्षा डायनाच्या प्रेमप्रकरणाची जास्त चर्चा व्हायची...अर्थात चार्ल्सला क्लिन चिट मिळाली होती...तो या सगळ्या दरम्यानही कॅमिला बरोबर फिरत होता...पण याकडे दुर्लक्ष करुन डायनाच्या प्रेमप्रकरणांची चर्चाच अधिक रंगली....तेव्हा  मला या डायनाचा आत्मविश्वास आवडू लागला...कारण दुनिया को गोली मारो...हा फंडा तिनं स्विकारला होता...तिला आवडणा-या व्यक्तीबरोबर ती मनमुराद फिरत होती...आणि का नाही फिरावं...आयुष्यात आपल्यावरही कोणीतरी प्रेम करावं...आपल्याला जपावं..ही भावना प्रत्येकाकडे असते...ती डायनाकडेही होती..पण तिच्या सौदर्यानं आणि एकाकी आयुष्यानं तिच्याभोवती फिरणा-यांची संख्या अधिक होती....आता नव्यानं डायनाच्या आयुष्याकडे बघितलं तर जाणवतं...तिचं सौदर्य हेच तिच्यासाठी शाप ठरलं होतं...तिच्या सौदर्यावर भुळून तिला चार्ल्सनं लग्नाची मागणी घातली...पण


नंतर त्याच्यापेक्षा डायनालाच अधिक प्रसिद्धी मिळू लागल्यावर अस्वस्थ झालेला चार्ल्स त्याच्या जुन्या प्रेमाकडे, कॅमिलाकडे परत फिरला होता...कॅमिला आणि डायना यांची सौदर्याबाबत तुलनाच होऊ शकत नव्हती...आणि इकडे डायना एकाकी पडली...डायनाचा अपघात झाल्याची बातमी पीटीआयवर आली...बहुधा सुट्टीचा वार होता...मी ऑफीसमधून निघत हते...तेवढ्यात एकानं डायना गेली, तेवढी बातमी करुन दे म्हणून कोणीतरी सांगितलं..बापरे मी किती हादरले होते तेव्हा...माझी खूप जवळची मैत्रिण...बहिण गेल्याची माझी भावना होती...बातमी बनवतांनाही डोळे भरुन आले होते...अर्थात नंतर मी डायनाच्या आठवणींचा दर्दभरा लेख लिहिला होता.

डायना जाऊन पंचवीस वर्ष  झाली पण तिच्यासारखी सौदर्यवती पुन्हा नजरेस पडलीच नाही...म्हणून डायना मनात कायम राहिली....नाही म्हणायला राजकुमार विल्यमची पत्नी राजकुमारी कॅथरीनला पाहिल्यावर थोडीफार


डायनाची झलक पाहत असल्याची भावना होते...पण डायनाच्या चेह-यावरचे बोलके, लाघवी भाव मात्र कोणाच्याही चेह-यावर येऊ शकत नाहीत...आताही कामाचा भाग म्हणून या ब्रिटीश राजघराण्यावर लेख लिहिण्याचा प्रसंग येतो...तेहा मनात कायमचा एक विचार असतो...आता जर डायना असती तर...आत्ताही तेवढीच सुंदर दिसली असती...अगदी सासू म्हणूनही ती तिच्या दोन्ही सुनांपेक्षा वरचढच दिसली असती...आणि आपल्या सौदर्याचा अजिबात गर्व न करता डायना आपल्या नातवंडांमध्ये रमली असती...कारण डायनाचा हाच खेळकर स्वभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू होता...आणि बहुधा हाच तिच्यासाठी मारक ठरला.  चार्ल्सचा राजा म्हणून होणारा समारंभ बघतांना ही खेळकर स्वभावाची डायनाच नजरेसमोर येत होती...त्या ठोकळ्यांच्या जगात तिच एक सजिव होती...म्हणून कायम वाटतं ती तेव्हा हवी होती...

तिची आठवण पुसून राजा झालेल्या चार्ल्सनं राजेपदाचा मुकूट डोक्यावर घेतला...त्याच्यासोबत कॅमिलाही राणी झाली...हा समारंभ बघतांना म्हणूनच डायनाची कमी जाणवत होती...तिची कोणी आठवण काढली असेल का...चार्ल्सच्या मनात तिच्याविषयी काय भावना असतील...तिच्या जागी बसलेल्या कॅमिलाला काय वाटत असेल...हे नको ते प्रश्न नक्कीच मनात येतात...अर्थात, या प्रश्नांचं आणि माझ्या मनाचं त्या राजघराण्याला काही देणंघेणं नाही याचीही जाणीव आहे...पण मनातली डायना काही जात नाही...नाही म्हणायला तिची मोठी सून, मात्र सासूच्या आठवणीत रमलेली दिसली.  एवढ्या मोठ्या समारंभासाठी तिनं तिच्या सासूचे दागिने घातलेले होते.  डायनाचे हि-याचे कानातले डूल घालून कॅट आली आणि पुन्हा सर्वांच्याच नजरेसमोर निळ्या डोळ्यांची आणि चेह-यावर अवखळ हसू घेतलेली डायना उभी राहिली.  अगदी त्या समारंभाची लाईव्ह कॉमेंटरी करणा-यांनीही कॅटनं घातलेले दागिने बघून डायनाची आठवण काढली.  राजाचा मुकुट घालून चार्ल्स


आणि कॅमिला त्या बाल्कनीमध्ये आले तेव्हाही हलकीशी कळ ह्दयात गेली...राजघराण्याच्या त्या प्रसिद्ध बाल्कनीतून राणी म्हणून डायनानं हात केला असतास तर माझ्यासारख्या लाखो-करोडो अशा चाहत्यांना कोण आनंद झाला असता....पण हे दृश्य बघतानाच जाणीव झाली...डायना, अशा कुठल्याही मुकुटासाठी राणी झाली नसती...तिला कसलीही हाव नव्हती...हाव असती तर राजेपदावर हक्क असणा-या नव-यापासून दूर होण्याची हिम्मतच तिनं केली नसती...त्याला सहन करत राहिली असती...अगदी त्याचे लग्नाव्यतिरिक्त असलेले अन्य स्त्री बरोबरचे

संबंधही...पण ती डायना होती...तिला कसल्याही सोनेरी आसनापेक्षा आपल्या सत्वाचा अभिमान होता...याच सत्वात ती राहिली आणि मुक्तही झाली...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. Good information.

    ReplyDelete
  3. ती इंग्लंडची डायना तू लिहिण्यामधली आमची डायना

    ReplyDelete
  4. भावपुर्ण लेख. लेख वाचून मन सुन्न झाले.

    ReplyDelete
  5. Very nice article.
    Khup chhan lakh.

    ReplyDelete
  6. खूप छान 🙏🌹

    ReplyDelete
  7. डायना सारख्या एका सौंदर्यवती वरचा भावपूर्ण सुंदर लेख.... ललिता छेडा

    ReplyDelete

Post a Comment