लाल मातीच्या सौदर्याला जपण्याची गरज
घरातील पंखेही जेव्हा उपयोगी पडत नाहीत...एसी लावूनही मन शांत होत नाही...सततची चिडचिड...त्यातून ठरलेले डायलॉग...काय ही गर्मी...जरा हवा नाही...झाडांची पानही हालत नाहीत...वैताग आलाय...पाऊस कधी येणार...घरात जेव्हा सतत हे संवाद व्हायला लागतात...तेव्हा एकच ठिकाण समोर येतं, ते म्हणजे माथेरान...अगदी जवळ...दोन-अडीच तासांच्या अंतरावर...जायला सोप्प...बॅगा भरायच्या, ट्रेन पकडायची, चाळीस मिनिटात नेरळ आणि मग तिथे असलेल्या टॅक्सीमधून अगदी अर्धा तासात माथेरान...एवढ्या छोट्याश्या वेळेत सर्व समीकरण बदलतं..गर्मीच्या झळा एकदम गायब होतात. थंड हवा चालू होते...अगदी तापत्या मे महिन्यातही या लाल मातीच्या गावात गारवा जाणवतो...हा गारवाच आम्हाला नेहमी मोहात पाडतो...मुळात माथेरानला जाण्यासाठी मोठ्ठं प्लॅनिंग करावं लागत नाही. फक्त हॉटेलचं बुकींग महत्त्वाचं...आधी आठवडाभर किंवा अगदी आदल्या दिवशीही फोन करुन आपलं बुकींग करायचं...बाकी काही खास तयारी करायची गरज नाही...आपापल्या बॅगा उचलायच्या...जेवढं आपल्याला उचलता येऊ शकेल आणि गरजेचं आहे, एवढंच सामान घ्यायचं आणि त्या पाठिला लावलेल्या बॅंगांसह माथेरान गाठायचं...बाकी मग सगळा मार्ग येथील लाल माती दाखवते...यावेळीही तसंच झालं...आमची ही माथेरानला कितवी भेट हे सांगता येत नाही. प्रत्येक भेटीत या माथेरानचं वेगळं रुप बघण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यावेळीही तोच प्रयत्न केला...कोरोनाच्या काळात जेव्हा
सगळं जग थांबलं होतं तेव्हा या माथेराननं आपलं रुपडं बदलायला सुरुवात केलेली...मातीच्या वाटा आता पेवर ब्लॉकनं सजू लागल्या...सोबतीला चि-याची तटबंदीही आली आहे. पण यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे...आलेल्या पर्यटकांची बेफिकीरी...कारण या लाल मातीच्या सुंदर गावाला जणू प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे ग्रहण लागल्यासारखे चित्र यावेळी पहायला मिळाले...
माथेतरान...सह्याद्रीच्या कुशीतले हे पर्यटन स्थळ....गेली पंचवीस ते तीस वर्ष या माथेरानला मी भेट देतेय....कधी मे महिन्याचा फार त्रास होऊ लागला की थेट या माथेरानची वाट धरायची...तर कधी पावसातल्या हिरव्यागार माथेरानला पहायचा मोह झाला की रेनकोट घेऊन या गावात दाखल व्हायचं...वर्षात किमान दोनवेळा तरी माथेरानला मी भेट दिलीय. असं असलं तरी सगळं माथेरान माझं तोंडपाठ आहे, अशी गुर्मी मी कधीही दाखवत नाही. कारण दरवेळी हे माथेरान चकवा देतं. या लाल मातीच्या गावातील सर्व पॉईंट पायपीट करीत आम्ही बघितले आहेत. अगदी अवघड असा शालिमार पॉईंटही....हे करतांना दरवेळी वेगवेगळ्या वाटा शोधल्या आहेत.
मुळात माथेरानमध्ये सगळे पॉईंट बघायचे असले तर पायपीट हाच चांगला पर्याय आहे. तसे जमत नसेल तर घोड्यावर स्वार व्हावे लागते, किंवा हातानं ओढणा-या रिक्षांमध्ये बसावे लागते. अगदी पहिल्यांदा गेल्यावर घोड्यावर बसून माथेरान बघण्याचा पराक्रम मी केला आहे. पण तेव्हा आजूबाजुचे सौदर्य बघण्यापेक्षा त्या घोड्याला सांभाळण्यातच...आणि त्याच्या चालीमुळे घाबरण्यातच वेळ गेला आहे. त्यामुळे पुढच्या सर्व भेटीत वन-टू-वन-टू करत माथेरान बघितलं आहे.
माथेरान एरवी लाल मातीच्या वाटेनं सजलेलं पर्यटन स्थळ आहे. पण कोरोनामध्ये या शहरानं थोडंसं आधुनिक रुप घेतलं. पर्यटनावर अवलंबून असलेल्या या माथेरानला कोरोनाचा फटका जबरदस्त बसला. रोजगार थांबला. तेव्हा येथे स्थानिक प्रशासनानं अनेक चांगली कामं हाती घेतली. त्यात पेवरब्लॉक टाकण्याचं काम सुरु करण्यात आलं. मुळात माथेरानमध्ये पाऊस धो-धो पडतो. एकदा सुरु झाला की आठवडाभर थांबत नाही. त्यामुळे सर्व वाटा पाण्यानं भरतात. एकतर लाल माती...तिही चिकट...मग सगळीकडे या लाल पाण्याचा पूर असतो. या वाटा चिखलांनी भरत असल्यामुळे पर्यटकांचा ओघ पार कमी व्हायचा...पण अलिकडे पॉईंटकडे जाणा-या सगळ्या वाटा सुशोभित करण्यात येऊ लागल्या. काही ठिकाणी रोलिंग्ज लावली. लाईटचे खांब उभारले...या थोड्या पण गरजेच्या सुविधांचा परिणाम असा झालाय की आता माथेरानमध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यात जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी पावसाळ्यात होते. त्यात पेवरब्लॉकच्या वाटांनी पर्यटकांना अधिक सुलभता झाली आहे. कोरोनाच्या सुट्टीनंतर आम्ही जेव्हा माथेरानला गेलो
तेव्हा हे पेवरब्लॉकचे काम पाहून सुखावलो होतो. तेव्हाच माहिती मिळाली की आता माथेरानमध्ये ई रिक्षा चालू होणार आहेत. यावेळी गेल्यावर पहिल्यांदा अशा ई रिक्षा चालू झाल्या आहेत का, याची माहिती घेतली, तेव्हा कळलं की काही काळ या ई रिक्षा आल्या पण त्यामुळे घोडेवाले आणि हातावर रिक्षा ओढणा-यांनी विरोध केला...त्यामुळे या ई रिक्षा आल्याआल्याच बंद झाल्या.
यावेळी आम्ही माथेरानला गेलो आणि गेल्यागेल्या एक शुभशकूनच झाला...तो म्हणजे धो-धो पाऊस सुरु झाला. अगदी विजांच्या गडगडाटासह. चांगला दोन- अडीच तास पडलेल्या या पावसांनं सगळा माहौलच बदलला. सोबत आमचं वेळापत्रकही...कारण माथेरानला गेल्यावर बॅगा रुममध्ये ठेवल्यावर आमची पायपीट सुरु होते. पॉईंटच्या भेटी सुरु होतात. पण तो कार्यक्रम रद्द करावा लागला...पाऊस एवढा की सनसेट पॉईंटलाही जाता येणार नाही, असं वाटत होतं...पण बघताबघता निसर्गाचं रुप बदललं..जिथे धो-धो पाऊस पडत होता...अगदी समोरचं दिसत नव्हतं...तिथे आता स्वच्छ उन पडलं...बरं पावसानं हे उनसुद्ध अगदी स्वच्छ...धुतल्यासारखं भासत होतं...लगेच आमची सगळी आयुधं घेतली आणि सनसेटपॉईंटकडे जायचा रस्ता पकडला. सनसेटपॉईंटकडे जाणारा हा रस्ता सगळ्यात घनदाट झाडांनी व्यापलेला आहे. अगदी कडक उन जरी असले तरी या मार्गावर काळोखच असतो...तसेच यावेळेही होते...पाच वाजण्याच्या सुमारास या पॉईंटवर पोहचलो...कारण सनसेटपॉईटच्या सुळक्यावर बसून तिथला मनसोक्त
पिऊन घ्यायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम...कारण या पॉईंटवर सायंकाळी सहा नंतर पर्यटकांची गर्दी सुरु होते...तोपर्यंत हा सगळा पाईंट सुनासुना असतो...नेहमीच्या अनुभवानुसार आम्ही सनसेट पाईंटचे टोक गाठले...पण आमचा भ्रमनिरास झाला...कारण हे सगळे टोक एका टोळक्यांनी जणू ताब्यात घेतले होते...सिगरेच्या धुराचे लोट येत होते...वा-याच्या झुळकीबरोबर सिगरेटचा वासही यायला लागला. काळजी म्हणजे या पॉईंटच्या बाजुला लावलेले कठडे तुटलेले होते...ते तुटलेले कठडे पार करत अधिक पुढे जाणा-या दोन-तीन तरुणांना आम्ही दोघांनी हात जोडून रोखलं...नको रे बाबा...एवढं धाडसं करु...मागे हो...अशी विनंती त्यांना केली...त्यांनी आमची हसून टिंगल केली...पण त्यांनी काही होत नाही...नेहमीच्या या लाडक्या पॉईंटची आमची आवडती जागा मग आम्ही सोडून दुस-या जागी बसलो...पण लक्ष वारंवार त्या तरुण मुलांकडे जात होते...त्यांना आवरणारे निदान बोर्ड तरी येथे लावले पाहिजेत ही जाणीव होत होती...सूर्यास्त झाल्यावर या वाटेवर अधिक काळोख होतो...चालायला वीस मिनिटे लागतात...त्यामुळे सूर्यास्ताच्या आधीच पॉईंट सोडला...पण परत जातांना आधीची उत्सुकता नव्हती...त्यामळे लालमातीच्या वाटेभोवती नजर फिरत होती...सगळीकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या....काचेच्या फोडलेल्या बाटल्या...ज्यांना निसर्ग जपता येत नाही, ती मंडळी येतात कशाला अशा ठिकाणी हा प्रश्न पडत होता...पण त्याला उत्तरच नव्हतं याची जाणीव होती...
दुस-या दिवशी अजून एक अनुभव आला. माथेरानचा राजा पॉईंट म्हणजे
लुईझा पॉईंट...हा पॉईंट सगळ्यात लांब आहे. त्यामुळे बहुतांशी घोडेवालेही या पॉईंटवर जात नाहीत. या पॉईंटवरही दोन्ही बाजुला भरगच्च झाडी आहेत. यामध्ये अनेक पक्षी रहातात. या वाटेनं चालतांना या पक्षांना बघणं...त्यांचा आवाज ऐकणं हे आमचं आवडतं काम....त्यासाठी एक छोटी दुर्बिणही आम्ही घेतली आहे. असेच पक्षांचे आवाज टिपत असतांना चक्क पुष्पा चित्रपटातलं ऊ अंटवा हे गाणं ऐकून आलं....जंगलात कोण गाणं ऐकतंय म्हणून रस्त्यावर मागे नजर टाकली तर एक कुटुंबही लुईझा पॉईंटच्या वाटेवर होतं...यातील एका लहानमुलाच्या गळ्यात स्पिकर अडकवले होते...आणि त्यावर हे गाणं मोठ्या आवाजात लावले होते...आपण कुठे आलोय...काय ऐकतोय..काय बघायला पाहिजे...या कशाचीही जाणीव नसलेली ही मंडळी आमच्या समोरुन आरडाओरडा करत पुढे गेली...अर्थात अशा मंडळींना सांगून काहीही उपयोग नसतो त्यामुळे ते पार पुढे गेल्यावर आमची पक्षांची शोधमोहीम सुरु केली. संध्याकाळी माथेरानचा शार्लेट लेक गाठला...येथे पर्यटकांची तुफान गर्दी...अगदी लेकच्या काठावरही मोठ्या संख्येनं पर्यटक बसले होते...आम्हीही त्या गर्दीत सामिल झालो...पण त्यासोबत लेक काठावर पडलेल्या काचेच्या तुकड्यांवर जास्त लक्ष जात होते. सगळा काठ या बाटल्यांच्या तुटलेल्या काचांनी भरला होता...एकूण येथेही ज्यांना निसर्गाच्या सौदर्याला जपण्याची
जाणीव नाही, त्यांचाच भरणा अधिक होता, याची जाणीव झाली...
रात्री उशीरा मार्केटमध्ये फेरफटका मारला...आमचे नेहमीचे दुकानदार आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या...बदलत्या माथेरानवर त्यांची मते ऐकली...माथेरान सोडतांना जरा आधीच हॉटेलबाहेर पडलो. माथेरानचे सौदर्य जपण्यासाठी माथेरान नगरपरिषद अनेक उपक्रम करतेय. जागोजागी कच-याचे डबे ठेवले आहेत. प्रत्येक पॉईंटवर असे डबे असून पर्यटकांनी या डब्यात टाकावा अशी अपेक्षा आहे. पण ही जाणीव ज्यांना नाही, अशा पर्यटकांनी टाकलेला कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेची एक टिम रोज संपूर्ण माथेरान पायी फिरते. सकाळी याच टिममधील महिला सदस्यांची भेट घेतली. साठ जणांचे हे पथक आहे. त्यातील सोळा महिला आहेत. या सकाळी माथेरानमधील घरात, हॉटेलमध्ये जाऊन कचरा गोळा करतात. त्यानंतर हे सगळे माथेरानच्या सगळ्या पॉईंटला जाऊन पर्यटकांनी
टाकलेला कचरा गोळा करतात. या सर्व मंडळींचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पण बेशिस्त पर्यटकांना रोखणार कसे हा प्रश्नच आहे. उत्तराखंडात अनेक भागात पर्यटकांनी प्लॅस्टिकचा कचरा टाकल्यास त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येतो. तसाच दंड माथेरानला खराब करणा-या पर्यटकांकडून वसूल करायला हवा...नाहीतर एकीकडे सुधारणा होत असतांना हे लाल मातीचे गाव प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या वेढ्यात अडकणार आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सुंदर
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteलाल मातीचा गोडवा छान पध्दतीने मांडला आहे.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteछान माहिती दिली आहे.👌
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteछान माहिती दिली आहे. वर्णनही सुरेख केलंय
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
Delete"लाल माती" लेख अतिशय छान आहे.
ReplyDelete!!अभिनंदन!!
.
धन्यवाद...
Deleteअगदी अनेकांच्या मनातलं लिहिलं आहेस.. माथेरान ची एक चक्कर मारून आलो असे फिल झाले..
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDelete