लाईकच्या दुनियादारीतील मैत्री...
माझे हात जाम झालेले....दोन्ही हातात भाज्यांच्या पिशव्या अगदी काठोकाठ भरलेल्या. हातात फक्त रिक्षाला लागतील एवढे पैसे कोंबून पकडले होते. मोबाईल आणि पर्स हे सुद्धा त्याच पिशव्यांमध्ये कुठेतरी टाकले होते. रिक्षा शोधण्याच्या नादात फोनची रिंग ऐकू आली. पण दोन्ही हात आधीच बुक होते...त्यात ऐन पावसाळ्याच्या दिवसात मी म्हणणारे उन...सकाळी दहा-साडेदहाची वेळ...यावेळी बहुधा नव-याचा फोन येतो. तो ऑफीसला पोहचल्याचा हा फोन असणार, म्हणून मी फोनकडे दुर्लक्ष केलं...आणि रिक्षा पकडायची मोहीम सुरु ठेवली. दोन-तीन रिक्षावाल्यांनी नकार दिल्यावर शेवटी एक रिक्षावाला तयार झाला. त्या पिशव्या रिक्षात कोंबून मी रिक्षात बसले. रिक्षात बसतांना पुन्हा एकदा फोनची रिंग वाजली...फोन शोधायचा प्रयत्नही केला...पण तो भाजीच्या खाली पार लपलेला...जाऊदे, घरी गेल्यावर पहिला नव-याला फोन करते, म्हणत फोन होता तिथेच ठेवत मी घरी पोहचले...घरात पोहचल्यावर तो भाज्यांचा ढिग पुढे उभा राहिला. पाऊस कधीही सुरु होईल, या धाकात मी जरा जास्तच भाज्यांची खरेदी केलेली. त्यात माझ्या
नेहमीच्या भाज्यावाल्यांनी प्रेमानं पालेभाज्या दिलेल्या...भाज्या घेतांनाचा जो उत्साह होता, तो आता तो मोठा ढिग बघून पार गार झालेला...थंडगार पाणी पिऊन आधी भाज्या साफ करायला घेतल्या....त्यात ते फोनचं प्रकरणंही बाजुला राहिलं..
सोमवारची सकाळ...हा दिवस कायम भरपूर कामाचा....त्यात कधी नव्हे ते फ्रिजमधील भाजीचा ट्रे मोकळा झालेला. एरवी सोमवार, घरच्या साफसफाईत जातो. ती बाजूला ठेवत आधी भाजी आणायला बाहेर पडले. नव-याच्या मते एकवेळ ही बाई चारदिवस उपाशी राहिल...पण घरातले कांदे आणि भाजी संपली तर वेडी होईल...तसंच काहीसं झालेलं...भाज्या घरात नाहीत, या विचारानं मी वेडीपिशी झाले होते...आणि बाजारातून अक्षरशः ढिगानं भाज्या घेऊन घरी आले...कोथिंबीर, पालक, मेथी, लाल माठ, चवळी या पालेभाज्या आणि टोमॅटो, कांदे, बटाटे, शिराळी, तोंडली, भोपळा, दुधी....अशी मोठी यादी समोर होती....सर्व भाज्या साफ करुन व्यवस्थित फ्रिजमध्ये भरुन ठेवल्या...तो खाली झालेला ट्रे भरुन गेला...आता माझ्या चेह-यावर हसू आलं...हिच वेळ कॉफी घेण्याची....तेवढ्यात फोनची रिंग वाजली....बघितलं तर नव-याचा फोन...मी फोन उचलला, तेव्हा तोच सुरु
झाला....आल्या का ढीगभर भाज्या घरात...झालं का तुझं समाधान...तू या मोठ्या खरेदीत बिझी असशील म्हणून फोन केला नव्हता....आटपलं का तुझं...अशी त्याची औपचारिक चौकशी सुरु झाली...मी ही मोजकंच बोलून फोन ठेवला....म्हणजे, बाजारात आलेला फोन नव-याचा नव्हता...मग कोण फोन करत होतं, म्हणून फोनवर बघितलं तर निताचा फोन होता...तिनंच दुस-यांदाही फोन केलेला....
निताचा फोन येऊन गेलेल्याला दोन तास होऊन गेले होते. मी तिला फोन केला. सुरुवात सॉरीनं केली. मी बाजारात होते, हातात दोन पिशव्या होत्या, त्यामुळे तुझा फोन घेता आला नाही...परत सॉरी म्हटलं...तर निताचा आवाज थोडा गंभीर वाटला...ती म्हणाली...माहित आहे, मी मागेच होते तुझ्या...पण रिक्षात बॅगा ठेवल्यावर तुला फोन घेता आला असता...माझा फोनही घ्यायचं नाही का तुला...निताचा हा प्रश्न ऐकल्यावर मी चकित झाले...काय झालं...निता तू रागावलीस का...अग मी फोन कोणाचा हे बघितंच नव्हतं...फोन पिशवीत होता...भाज्या खराब होतील, म्हणून फोनही काढत बसले नाही...आता काम झालं आणि तुला फोन केला...काय झालं...रागवलीस का...म्हणून मी बोलू लागले...त्यावर निता काही नाही...तुला हल्ली वेळच कुठे असतो...माझ्यासाठी तर थोडा वेळही नाही तुझ्याकडे, म्हणत तिनं चक्क फोन ठेऊन दिला....माझ्या अंगावर काटा आला....कधीतरी काहीतरी गडबड
असल्याची चाहूल मनाला लागते, अशीच चाहूल लागली. निता माझी चांगली मैत्रिण....अगदी नेहमी बोलंणं होणारी...ती अशी अचानक का रागावली...चक्क फोन ठेऊन दिला...मला काय करावं ते सुचत नव्हतं....शेवटी अगदी दोन मिनिटात विचार केला...आणि सरळ घराची चावी, फोन आणि पर्स हातात धरुन निताच्या घरी मोर्चा वळवला...
आमच्या घरापासून अगदी चालत सात-आठ मिनीटावर तिचं घर आहे. बाहेर उन वाढलेलं....त्यात माझी सकाळची कॉफी राहीलेली. पण या सगळ्यात निताचा राग महत्त्वाचा होता...तिचा फोन येऊन गेल्यावर मी पंधरा मिनिटांनी तिच्या दारासमोर उभी होते....दरवाजा तिनंच उघडला...मुलांच्या शाळा सुरु झालेल्या...नवरा कामाला...ती एकटीच होती...तिला मी घरी येईन अशी अपेक्षा नव्हतीच...दरवाजा उघडल्यावर चमकली...तू...म्हणत, मला घरी घेतलं...पण लगेच आत गेली...माझ्यासाठी तिचं घर नवीन नव्हतं...मी घरी गेले...दरवाजा लावून बसले...तिनं आतून पाणी आणलं...एका दमात प्यायले...अजून थोडं दे...म्हणून तिला सांगितलं...ते ऐकल्यावर तिच्या रागावलेल्या चेह-यावरचा ताण थोडा कमी झाला....भरलेला ग्लास माझ्या हातात दिला...आणि धावत कशाला आलीस...एवढं काय नव्हतं...म्हणून सांगू लागली....मी दुसरा ग्लासही रिचवला...आणि एक मोठा श्वास घेऊन म्हणाले...तू चक्क रागावलीस...फोन ठेऊन दिलास...मला काही सुचेना...म्हणून आले...काय झालं...एवढी का रागावलीस....अग आपण मैत्रिणी आहोत....माझं काही चुकलं तर हक्कांनी सांग...पण अशी रागवू नकोस....बघ माझी काय अवस्था झालीय...निता आता पूर्णपणे निवळली होती...पूर्वीची माझी हसरी निता समोर आली...तिनं तिचा मोबाईल पुढे केला...त्यात काहीतरी शोधू लागली...मी म्हटलं, अग निता, काय झालं, ते सांगतेस ना....तेव्हा तिनं माझ्यासमोर थांब असं सांगत हात
दाखवला...पुन्हा मोबाईलमध्ये घुसली...काहीतरी शोधलं...आणि माझ्याबाजुला येऊन दाखवू लागली. तिचं फेसबुकचं अकाऊंट होतं....त्यात तिच्या घरातले फोटो तिनं शेअर केले होते....मुलांच्या शाळा सुरु झाल्यावर त्यांचे शाळेतल्या युनिफॉर्ममधले फोटो होते. शिवाय कुठल्याशा कार्यक्रमला निता गेली होती...तिथे नऊवारी साडी नेसली होती. ते तिचे छान फोटो फेसबुकवर शेअर केलेले होते...ते फोटो बघितल्यावर मी म्हणलं, अरे व्वा...निता काय भारी दिसतेस ग...मस्तच तयार झालीस....साडीचा रंग खुलून दिसतोय तुला...लग्नाला गेली होतीस का....आणि हे काय तुझा लेक केवढा उंच दिसतोय...आणि हे फोटो कुठले...घरात पुजा केलीस का...मला नाही बोलवलंस...तेव्हाही रागावली होतीस का...म्हणून मी तिला प्रश्न विचारला....यावर निता आश्चर्यानं माझ्याकडे बघत होती...तू हे फोटो बघितले नव्हतेस....आत्ता बघितलेस...मी हो म्हटलं...खरोखर तिचे फोटो तेव्हाच बघत होते...मी हो बोललं...पण का...असं का विचारतेस म्हणून तिला विचारलं...नाही, मला वाटलं, तू हे फोटो बघितलेस...पण साधं लाईकही माझ्या फोटोंना केलं नाहीस आणि एखादीही कमेंट टाकली नाहीस म्हणून मला राग आला होता....त्यात तू सकाळी भाजीमार्केटमध्ये दिसलीस...तुझ्या हातात पिशव्या होत्या...तरीही तुला फोन केला...पण तू फोनही नाही उचललास म्हणून अजून रागवले...मी डोक्यावर हात मारला...डोंगर पोखरुन उंदिर मिळाला....मी निताचा कानच पकडला...अग हे फेसबुक आणि सोशल मिडियापासून दूर रहा जरा...यावर लाईक केला म्हणजे, तू माझी मैत्रिण आहेस असं नव्हे...यावर आपलं नातं नाही...मी अगदी मोजक्यावेळीच हे फेसबूक आणि इतर सोशल मिडिया बघते...त्यावरच्या लाईकवर काय आपली मैत्री झालीय...वेडीच आहेस, म्हणत तिच्या पाठित धपाटा टाकला...
एव्हाना निताच्या मनावरचं मळभ दूर झालं होतं....ती मला चारवेळा सॉरी सॉरी बोलत होती...मी म्हटलं...सॉरी बाजुला ठेव माझी सकाळची कॉफी राहीली आहे...कॉफी हा शब्द ऐकल्याबरोबरच निता लगेच उठली...मी करते...स्ट्रॉग करते...म्हणत आत पळाली...मी एवढ्या वेळात माझ्या फोनवरुन तिचं फेसबुक बघितलं...तिच्या सगळ्या पोस्टना लाईक आणि मेसेज टाकला....तोपर्यंत मॅडम कॉफी घेऊन आल्या...सोबत चॉकलेट कुकीज...तू माझ्यावर रागवू नकोस प्लीज...मी कधीकधी वेड्यासारखी वागते...म्हणत पुन्हा आपलीच वकीली करु लागली...मी तिला थांबवलं...कॉफीचे मग पुढे ठेवले...ते दोन मग आणि कुकीजच्या डिशचा फोटो काढायला लावला...हा आता शेअर कर मी लगेच लाईक करते, म्हटलं...मग मात्र गाडी रुळावर आली होती...नको ग...सारखं त्यात बघून वेड लागेल....तू म्हणालीस ते बरोबर आहे. या लाईक, मेसेजवर नातं नको...मी म्हटलं लवकर समजलं...यावर दोघीही हसलो...निताच्या डोळ्यात थोडसं पाणीही डोकावलं...मी तिचा हात हातात पकडला...पुन्हा मैत्रिचा निर्मळ प्रवाह सुरु झाला होता....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छोट्याशा गोष्टीतून आभासी व वास्तव मैत्रीतला हा सांगितलेला फरक खूपच आवडला !!
ReplyDeleteधन्यवाद डॉक्टर
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान आणी वास्तव लेख .
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान👍👍👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवास्तव आणि आभासी यात हल्ली खूप जण आभासी च्या जाळ्यात अडकायला लागले आहेत हे खरे आहे. सुंदर लेख लिहून वास्तवाची जाणीव करून दिलीत या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद....मित्र मैत्रिणी....नातेवाईक यांना या अभासी जगापासून दूर ठेवलं पाहिजे....
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान लिहिले आहेत तुम्ही. Maturely वागणारी माणस सुद्धा खूप सोशल मीडिया मुळे खूप immaturely वागतात.
ReplyDeleteधन्यवाद..अगदी खरं आहे...
DeleteVery nicely described the latest issue of mobi addiction.
ReplyDeleteKeep on writing.
धन्यवाद
Deleteछान फरक दाखवला आहेस सई
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद
Delete