व्हिसाची बातमी आणि घालमेल...
पुन्हा गेल्या शनिवारची गोष्ट...कामाची यादी काही संपत नव्हती. शनिवार असूनही मी पहाटे पाचच्या ठोक्याला उठले होते...घरातील सर्व कामांची आवराआवर..ठराविक योगा...मग ब्लॉगचे काम...एव्हाना नवराही उठला...आम्हाला वेस्टन लाईनचं टोक गाठायचं होतं...अगदी विरार, वसई...त्यामुळे काहीही झालं तरी सकाळी साडेनऊला बाहेर पडायचं, हे नव-यानं आधीच जाहीर करुन ठेवलं होतं...ती डेडलाईन गाठण्यासाठी आम्ही दोघांचीही धावपळ चालू होती...त्यातच फोनची रिंग वाजायला लागली. शनिवारी शक्यतो सकाळी असा फोन येत नाही...एक नजर टाकली तर फोन वसंत काकांचा...आमच्या आसपास रहाणारे हे काका अगदी सकाळी फोन कशाला करत असतील याची विचार आला...पण या प्रश्नाचं मीच मला उत्तर दिलं...काका आणि त्यांची पत्नी हे दोघेही माझे ब्लॉग नेहमी वाचतात आणि आठवणीनं प्रतिक्रीया देतात...ब-याचवेळा त्यासाठी फोनही करतात....म्हणूनच हा फोन असेल, म्हणून मी फोन बाजुला ठेवला आणि पुन्हा आवराआवर सुरु केली. नाही नाही म्हणत साडेनऊचे दहा वाजले...स्टेशन गाठलं तर ट्रेन लेट होती...नेमकं ट्रेन पकडतांनाही काकांचा फोन...तो घेता आला नाही. पण ट्रेनमध्ये चढल्यावर पहिल्यांदा त्यांना फोन केला...काकांनी अगदी पहिल्या रिंगमध्ये उचलला...ते काहीतरी बोलत होते...पण त्यांना तोडत मी सुरु झाले, काका...ट्रेनमध्ये आहे....लेख वाचलात ना...मी करते तुम्हाला...आज संध्याकाळ होईल यायला...मोठा दौरा आहे...रात्री बोलू सावकाश...म्हणून फोन ठेवला...त्यानंतर वसंत काका काहीसे पुसले गेले...दिवस असाच कामात गेला...त्यात पावसाची एन्ट्री झालेली...घरी यायलाच सायंकाळचे सात वाजले...सगळं आवरुन साध्या खिचडीचा बेत केलेला...पहिला घास घेतांना पुन्हा काकांचा फोन आला...यावेळी मात्र मी शांत झाले...काका फोन करायचे...पण असे सतत नाही...आज काहीतरी बिघडलं आहे का...काका-काकू एकटे रहातात...त्यांची तब्बेत...असे सगळे विचार एकाचवेळी आणि काकांचा फोन उचलला...फोन उचलल्यावर मी बोलेन म्हणून काका शांत राहिले...तर मला वाटलं ते बोलतील म्हणून मी शांत....शेवटी काकाच बोलले...सॉरी, तुला त्रास देतोय...कधी आलीस...मी ठिक आहे, म्हटलं...काही झालं का...काकू कशा
आहेत, विचारलं...तर ते म्हणाले, सर्व ठिक आहे. तब्बेत उत्तम आहे दोघांची...पण एक प्रॉब्लेम झालाय...तुला वेळ आहे का उद्या किंवा परवा...फक्त काकूंबरोबर बोलायला ये...मला काही समजेना...तब्बेत ठिक आहे. मग प्रॉब्लेम कुठला...काहीच समजेना...त्यात रविवारीही माझी गडबड होती...म्हणून मीच त्यांना सॉरी बोलून सोमवारी आलं तर चालेल का....काही अडचण असेल तर सांगा आत्ता येते...ते पुन्हा म्हणाले, काही घाई नाही...पण सवड काढून ये....मी हो म्हटलं...फोन ठेवला...पण आता वसंत काका काही मनातून जाईनात...सोमवारी कधी त्या दोघांना भेटते असं झालं होतं...
एरवी माझी सोमवारची घाई असते...पण वसंतकाकांच्या घरी जायचं म्हणून जरा नेहमीच्या कामांना बाजुला ठेवलं. अगदी दहा वाजता काकांचे घर गाठले. वसंत काका हे आमच्याच भागात रहाणारे. अगदी हसतमुख व्यक्तिमत्व. लेक शाळेत असतांनाची आमची ओळख. त्याला शाळेच्या बसमध्ये बसवून आम्ही दोघंही चालायला जायचो. तेव्हा हे वसंत काका आणि काकूही दिसायचे. नंतर हसून त्यांना प्रतिसाद द्यायला लागलो. पुढे थोड्या गप्पा व्हायला लागल्या. मग काका-काकूही लेकाला बसपर्यंत सोडायला यायचे...अधीमधी घरी येणेजाणे सुरु झाले...त्यांचाही एकुलतला एक मुलगा...लग्न झालेला...आता तो अमेरिकेत जवळपास स्थाईक झालेला.
काका-काकू वर्षातून एकदा त्याला भेटायला जायचे. मात्र कोरोनामध्ये ही अमेरिकेची वारी बंद झाली. त्यांचा मुलगाही आलेला नाही...काहीतरी काम आहे, त्यासाठी यावेच लागेल, त्यामुळे तो त्याचा दौरा पुढे ढकलत होता. आता डिसेंबरमध्ये येणार असल्याचे काकांनी नुकतेच सांगितले होते. त्याला यायला पाच महिन्याचा अवघी होता, तरीही काकूंनी आत्तापासूनच तयारी सुरु केली होती...त्यावरुन आम्ही सर्वांनीच काकूची खूप मस्करीही केली होती...अगदी ही कालपरवाची घटना होती...त्यानंतरच काकांचा फोन आलेला...आणि मी त्यांच्या दारात दाखल झाले होते...
बेल वाजवल्यावर काकांनी दरवाजा उघडला...मला बघून त्यांना थोडं हायसं वाटलं. काकू बहुधा आतल्या खोलीत होत्या...काकांनी मोठ्या आवाजात हाक मारली, अग बघ कोण आलंय...मला बसायला सांगून काकांनी हळूच सांगितले...तुला मी बोलावले ते तिला सांगू नकोस...बापरे...नक्की झालंय काय...मी आणखीनच बावरले...काकू आतून पाणी घेऊन आल्या...पण काकूंचा चेहरा बघितल्यावर मात्र बेचैन झाले. नक्कीच काहीतरी झालं होतं...दोघंही लपवत होते...काकू, काय झालं....तुमचा चेहरा का एवढा पडलाय...मी विचरल्यावर काकूं ऐवजी काका बोलू लागले...हो ना...चेहरा पडलाय ना हिचा...बघ आता तूच काहीतरी समजावून सांग...मला काहीही समजत नव्हतं...एव्हाना काकूंना हुंदका आला...मी पाण्याचा ग्लास बाजुला ठेऊन काकंचा हात पकडला...त्यांना जबरदस्तीनं माझ्या बाजुला बसवलं...काय झालं...रडताय कशाला. काही त्रास होतोय का...तर काकूंचा जणू बांधच
फुटला...रडतच त्या म्हणाल्या...काही नाही ग...फक्त रवीची आठवण येतेय...रवीची...काकूंचा मुलगा...अमेरिकेतला...अहो, पण तो तर येतोय ना डिसेंबरमध्ये...तुम्ही तयारीही चालू केलीत...असा बघता बघता डिसेंबर महिना येईल...रडता कशाला...आता काका सुरु झाले...ती बातमी आली ना, अमेरिकेतही आता व्हिसाचे काम होणार त्यासाठी म्हणे भारतात यायची गरज पडणार नाही...रवी आणि त्याची बायको डिसेंबरमध्ये येणार होते, तेव्हा ते व्हिसाचे कामही करणार होते. आता तेच काम तिथेच होत असेल तर तो येणारच नाही, असं खूळ हिनं डोक्यात घेतलं आहे....आणि हे असं चालू आहे...तू बघ काय सांगून माझं काहीही ऐकत नाही...रवीचा फोनही टाळते आहे, काहीतरी कारण सांगून...मला काही कळत नाही...
काका-काकू दोघेही शांत बसले होते...काकू हुंदके देत होत्या...रवी त्यांचा एकुलता एक मुलगा...आम्ही कधीही भेटलो तरी काकू शंभरवेळा त्याचे नाव घेतात. आजही त्याला आवडणारे पदार्थ करतांना काकूंच्या डोळ्याला पदर लागतो. तो अमेरिकेत जाऊन स्थिरावला...काका-काकूही त्याला भेटण्याचं निमित्त करुन अमेरिका फिरुन आले आहेत अगदी चारवेळा...पण काकूंना तरीही समाधान लाभत नाही. आईच ह्दय ते...रवी या दोघांनाही तिकडे येऊन रहा म्हणून आग्रह करतो...पण तीन-चार महिन्याशिवाय या दोघांचही तिथं मन लागत नाही. फक्त रवी रोज दिसतो म्हणून तिथे रहायचं...हे काकूंचे शब्द...नाही म्हणायला त्या सगळीकडे जातात. मन रमवतात. घरी बाल्कनीमध्ये छोटीशी बगच केली आहे. त्यातही कुठल्याना कुठल्या देवस्थानला जातात. नातेवाईंकांना रहायला बोलवतात. विणकाम करतात...काय-काय करतात हे सांगताच येत नाही...इतक्या बिझी असतात.
पण कधीतरी त्यांनी त्यांच्या मनाभोवती उभारलेली ही सर्व आवरणं गळून पडतात....तसंच आत्ता झालं होतं...अजूनही त्यांचा हात माझ्या हातात होता. त्या माऊलीला मी काय धीर देऊ...माझेही हात दगडाखालीच आहेत की....उद्या लेक म्हणाला मी जातोय...तर मी काय करु...आता या नव्या पिढीला थांब हे सांगण्याचं धाडस नाही. त्यांना त्यांचे पंख आहेत....काहीतरी करुन दाखवण्याची उमेद आहे. माझा लेक बाहेर शिकायला गेला तेव्हा मला आलेला एकाकीपणा आठवला. तेव्हा हेच वसंतकाका आणि काकू माझे सोबती झाले होते...आणि मी सुद्धा त्यांच्याकडे बघूनन सावरले होते....
परदेशी मुलं आहेत, हे सांगायला खूप छान वाटते. पण ती एक कायमची ओली जखम आहे. त्याची खपली निघाली की अशी मनाची थरथर होते...आपण त्यांना कधी पाहू शकू...त्यांच्याबरोबर कधी मनसोक्त गप्पा मारु...असे एक ना दोन प्रश्न मनात असतात. अशी अनेक मंडळी आहेत, जी परदेशी गेलेल्या मुलांचे कौतुक करतांना थकत नाहीत...पण हळूच बोलतात...आठवण येते ग...पण काहीच करु शकत नाही...त्या व्हिडिओ कॉलमधून दिसतात फक्त...त्याला हात लावून कुरवाळता येत नाही...हे वाक्य बोलतांना त्यांचे उतरलेले चेहरे बरंच काही सांगून जातात....आता काकूही तशाच उतरलेल्या चेह-यांनी बसल्या होत्या...त्यांचा हा चेहरा बघून माझाही थरकाप झाला..आपलं काय...हा प्रश्न मनात आला...पण काही क्षणचं...काकूंचं
हात बाजुला केला...त्यांचं स्वयंपाकघर मला पाठ आहे...फ्रिजमधून दूध काढलं...माझ्यापाठोपाठ काका आत आले...त्यांनी डबे उघडले....काकूंनी सकाळचा नाष्टाही केला नव्हता हे कळलं...काकांनी बिस्किट, वेफर्स, भाकरवडी, चिवडा असा सगळा खाऊ मोठ्या डिशमध्ये छान लावून घेतला...मी एव्हाना कॉफी केली. ट्रे मध्ये तीन कॉफीचे कप घेऊन मी बाहेर आले. काकूंपुढे काकांनी ते फराळाचे ताट ठेवले होते. त्याच्याबाजुला मी कॉफी ठेवली...आम्ही तिघंही शांत होतो...प्रत्येकाच्या मनात एक वादळ चालू होतं....पण ते बाहेर येऊ द्यायचं नव्हतं...मी काकूंच्या हातात कॉफीचा मग दिला...फक्त रडत बसून चालणार आहे का...अशानं तब्बेत बिघडेल. मग रवी येईल तेव्हा धावपळ कशी कराल...पण काकूंनी परत हुंदका दिला...असं रडून नाही चालणार काकू...रवी बाहेर गेलाय, पण तुम्हाला विसरलाय का...किती आग्रह करतोय तिकडे या म्हणून...त्याची बायकोही छान आहे. त्याच्याचीही बोललात नाही...विचार करा त्याला काय वाटत असेल... तुम्हाला फोन केल्याशिवाय त्याचा दिवस सुरु होतो का...कितीही घाईत असेल तरी तुम्हाला बघितल्याशिवाय तो ऑफिसला जात नाही, म्हणून तुम्हीच सांगता...आता त्याच रवीवर रुसून बसलात...तिकडे तो काय फक्त ऐश करतोय....असा विचारही मनात आणू नका....मुलं दूर गेली तरी ती आपल्याबरोबर प्रेमाच्या बंधनात कायम बांधली गेली आहेत. ती विण कधीही सुटणार नाही....दोन वर्षापूर्वी याच काका-काकूंनी याच शब्दात मला धीर दिला होता...आता तेच शब्द मी त्यांच्यापाशी बोलत होते....दुनिया गोल आहे, ती अशा विचारांच्याबाबतही असते, हे आता समजत होतं...हे बोलणं चालू असतांनाच फोनची रिंग वाजली...रवीचा फोन...काका-काकू एकदम बोलले...आत्ता कसा केला...अमेरिकेत तरा आत्ता रात्रीचे दोन वाजून गेले असतील,असं म्हणत काकूंनी फोन उचलला...रवीला पहिला प्रश्न केला, काय झालं रे एवढ्या रात्री फोन केलास...रवी आणि त्याची बायको समोर होते...अग दोन दिवस कुठे होतीस...रवीच्या बायकोनं त्याच्याकडून फोन खेचून घेतला...आई, दोन दिवस तुम्ही बोलतात नाही तर याला करमत नाही...पहिलं याच्याबरोबर बोला...म्हणत तिनं हसत फोन पुन्हा रवीच्या हातात फोन दिला...तेव्हा हळूवार आवाजात रवीनं विचारलं, आई, काय झालं ग...कुठे आहेस....त्याच्या या स्वरांनी मोठी जादू केली...काही नाही रे बाळा...तू एवढी माझी काळजी करु नकोस...तुला जप...असं बोलत काकू सुरु झाल्या...क्षणात बदलेल्या त्या आईल मी बघत होते...असच रहायला पाहिजे...मन...मन म्हणत...त्या मनावर आवरणं घालायला आली पाहिजेत...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान व्यक्त झालात.
ReplyDeleteधन्यवाद....
Deleteखरंच शिल्पा छान लिहिलं आहेस
ReplyDeleteधन्यवाद....
DeleteSai khup ch chhan vachtana dolayla panyacha dhara laglya
ReplyDeleteआजकाल अशी परिस्थिती बहुतेक कुटुंबात आहे. अशावेळी नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणींचा पक्का ग्रुप करायला हवा...
DeleteKhup chhan lekh. Vachtana dolyatun ashru ale.
ReplyDeleteHruday starship lekh.
धन्यवाद
Deleteहे एक कटु सत्य आहे.१००% बरोबर आहे.आपले !!मनःपुर्वक अभिनंदन!!
ReplyDelete