उसाचा रस...आणि बरच काही...

 

उसाचा रस...


आणि 

बरच काही...

रविवारी काय करायचं....या मोठ्या प्रश्नाची चर्चा नव-यानं सुरु केली होती...अर्थात मला त्यात फार इंटरेस्ट नव्हता...कारण रविवार असो वा आठवड्याचा अन्य कुठलाही वार...माझी कामांची यादी तयार होती...पण नव-याचा फार हट्ट सुरु झाला...त्याला ठराविक परफ्युम घ्यायचे होते...कुठल्याशा मॉलमध्ये त्यावर सवलत होती...तिथेच महिन्याचे अन्य सामानही भरुया...तुला एखादा ड्रेस आवडला तर तोही घेता येईल, अशी लालूच दाखवून नव-यानं माझा होकार मिळवला...रविवारी एरवी मॉलमध्ये ही...गर्दी असते...त्यामुळे सकाळी लवकर निघूया...असा बेत ठरला...रविवार सकाळचा ब्रॅडेंड नाष्टा...कांदापोहे करुन आम्ही त्या मॉलमध्ये बरोबर दहा वाजता दाखल झालो.  सकाळची वेळ असल्यामुळे अगदी तुरळक गर्दी होती...नवरा त्याच्या खरेदीसाठी गेला...आणि मी ट्रॉली पकडून महिन्याचे सामान भरायला लागले.  नेहमीचे ठिकाण असले की अगदी कमी वेळात ही खरेदी होते...पण नवीन ठिकाण असले तर आपल्या यादीतील वस्तू शोधायला जरा वेळ लागतो...माझेही तसेच चालले होते...त्यात तिथे अनेक कंपन्यांच्या वस्तू...ते बघण्यात वेळ चालला होता...त्यातच एका बाटलीवर नजर पडली...Sugarcane Juice हा शब्द मी पुन्हा पुन्हा वाचत होते.  त्याच्याच बाजुला, Coconut Water लिहिलेल्या बाटल्या मांडून ठेवल्या होत्या...पण हा Sugarcane Juice शब्द माझ्या पचनी पडत नव्हता...म्हणून मी ती बाटली हातात घेऊन त्यावरील लेबल वाचायला घेतले...तितक्यात नवरा त्याची खरेदी करुन आला...माझ्या हातातली बाटली घेऊन म्हणाला, उसाचा रस घ्यायचा आहे का...त्याचवेळी Sugarcane Juice या शब्दाची उकल झाली...म्हणजे, आता


उसाचा रसही बाटलीत येतो का...हा माझ्यासाठी नवा शोध होता...नव-याच्या आग्रहाला विरोध करत...मी ती Sugarcane Juice ची बाटली होत्या त्या जागी ठेऊन माझ्या खरेदीसाठी लागले...पण तो Sugarcane Juice शब्द काही मनातून जाईना.

उसाचा रस कधीपासून आवडायला लागला, हे सांगणं कठीण आहे.  पण या उसाच्या रसाच्या अनेक आठवणी आहेत.  पण लक्षात असलेली पहिली आठवण ती आमच्या गावची...चौल-रेवदंड्याची...चौलच्या प्रसिद्ध दत्ताच्या यात्रेत या उसाच्या रसाची अनेक गु-हाळं असायची...एक बैल डोळ्यावर पट्टी बांधून गोल फिरत असायचा...मोठ्या गोलाकार जागेत हे गु-हाळ असायचं...बाजुलाच जी मंडळी रस प्यायला येणार त्यांच्यासाठी घोंगड्या अंथरलेल्या असायच्या...आणि शेरावर मिळणारा उसाचा रस मग त्या सर्वांना मिळायचा...अगदी ताजा ताजा...समोर तयार झालेला.  याच गु-हाळाच्या बाजुला कांदा-बटाटा भजींचे दुकान असायचे...त्यांच्याकडून ती मिक्स भजी, वडे आणि भरल्या मिरच्या असं वडिल विकत घ्यायचे...मग तो भजीचा पुडा त्या गु-हाळात उघडला जायचा...आणि उसाच्या रसाबरोबर ती भजी खाल्ली जायची...माझी उसाच्या रसाची ही पहिली आठवण कधीही जाणार नाही...कारण तो शेराच्या मापानं मिळणारा हा उसाचा रस तेव्हा किती प्यायला जायचा याचा हिशोब नसायचा...आरोग्याला चांगला असतो...असं कोणीतरी म्हणत, आणखी एक शेर


आग्रहानं पुढे करायचे...

पुढे धुळ्याला काही वर्ष रहाण्याची संधी मिळाली.  धुळ्याला या उसाच्या रसाचे प्रचंड आकाराले ग्लास पाहिले आहेत.  अगदी एक-एक लिटर उसाचा रस एका दमात पिणारे बाहुबलीही पाहिले आहेत.  या उसाच्या रसाच्या काही रेसिपीही होतात, हे धुळ्यात आल्यावर समजले.  गव्हाच्या पिठात गुळ आणि दुध घालून होणारे मालपुवा येथे उसाच्या रसात होतो.   शिवाय ज्वारी-बाजरीच्या पिठातही हा उसाचा रस घालून त्याच्या गोड आंबोळ्याही येथे करण्यात येतात.  पण या पदार्थांपेक्षा मला या उसाच्या रसाची चवच न्यारी लागायची...कारण शेतातून अगदी काही तासाच्या अंतरानं आलेल्या उसाचा ताजेपणा सर्व त्या रसात उतरलेला असायचा...

पुढे लग्न झाल्यावरही हा उसाचा रस सोबतीला होता...लेकाला पाळणाघरातून घरी घेऊन येतांना रोज एक उसाचा रसाचा ग्लास रिचवूनच घराकडे यायचे...सोबत लेकालाही सवय लागली.  तो त्या छोट्या ग्लासातून मिळालेला रस अगदी मिशी येईपर्यंत प्यायचा...दिवसभराचे ऑफीसचे काम...मग ट्रेनची गर्दी...या सर्वातून आलेला थकवा या एका ग्लासानं दूर व्हायचा...शिवाय लेकाला आलेल्या त्या खोट्या खोट्या पांढ-या मिशीमुळे आमची संध्याकाळ हसत खेळत सुरु व्हायची...उसाच्या रसात बुडलेल्या या असंख्य आठवणी आहेत.  मॉलमध्ये ती Sugarcane Juice ची बाटली दिसल्यावर त्यावरची झालर पुन्हा हलली...अगदी उसाचा रस काढणा-या त्या मशिनला लावलेल्या घुंगरांचा जसा हलकासा आवाज होतो...तशीच किणकिण कानाशी झाली...आमची खरेदी झाल्यावर पुन्हा एकदा नव-यानं विचारलं  घ्यायचीय का ती Sugarcane Juice ची बाटली...घरी गेल्यावर आरामात पिता येईल...मी नको म्हटलं...आपल्या नेहमीच्या दुकानात जाऊन ताजा रस घेऊया म्हणून


त्याला सांगितलं...कारण एव्हाना दुपारचा एक वाजायला आला होता...बाहेर उन मी म्हणत होतं...

गाडीवरुन येईपर्यंत आणखी अर्धातास गेला...आम्ही नेहमी जिथून उसाचा रस घेतो, त्या दुकानासमोर नव-यानं गाडी लावली...दुपारची वेळ, रस्त्यावर तुरळक माणसं...तरी या गु-हाळात गर्दी होती...तो दुकानदार नेहमीचा...आमचं गाडीवरचं सामान आत घ्यायला मदत केली...मी बसल्यावर त्याची चौकशी सुरु झाली...एवढ्या दुपारी कुठे गेला होतात...लेक कसा आहे.  त्याचा मुलगा निटची परीक्षा देत आहे, त्याची माहिती...आमच्या गप्पा सुरु झाल्यावर नवरा चुळबुळायला लागला...तेव्हा त्या दादांनं ओळखलं...देतो-देतो...ताईंना स्पेशल रस लागतो...थांबा..म्हणत त्यानं त्याच्या माणसाला बाजुला व्हायला सांगितलं...दोन उसाचे दांडे शोधले आणि ते मशिनमध्ये घातले...सोबत लिंबू, आलं आणि पुदिन्याची चार पानं त्यावर टाकली...मग हा बिनबर्फाचा उसाचा रस आमच्या समोर दिला...नव-याच्या हातात तो मोठा ग्लास देत म्हणाला...ताईंसाठी स्पशेल असतो नेहमी...नव-यानं काही न बोलता ग्लास हातात घेतला आणि उसाच्या रसाचा पहिला घोट घेतला...त्याच्या चेह-यावरचे समाधान टिपत तो दादा म्हणाला..मग, स्पेशलच आहे...मग पुन्हा थोड्या गप्पा मारुन मी त्या दादांचा निरोप घेतला...बाहेर उन मी म्हणत असलं तरी पोटातल्या त्या उसाच्या रसानं कमालीचं समाधान मिळालं होतं...त्याच समाधानात घर गाठलं...

उसाचा रस हा असा आहे...अगदी हक्काच्या माणसांसारखा...तसाच साधा पण


चवदार...काही जण सांगतात...तो थंड...काही सांगतात तो गरम...पण मला वाटतं ते तो रस घेणा-याच्या प्रकृतीवर अवलंबून असावं...कारण धो-धो पावसातही मी उसाचा रस प्यायले आहे...आणि कडकडत्या थंडीतही...पण कधीही त्रास झाला नाही..फक्त त्यात बर्फ नाही याची काळजी घेतली होती...आता तर म्हणे घरी छोटंसं मशीनही मिळतं...त्यातून घरच्याघरी उसाचा रस काढता येतो...आणि आता ती Sugarcane Juice ची बाटली बघितल्यावर मनात अजून चलबीचल सुरु झाली होती...अर्थात कुठेतरी आपल्या आवडत्या उसाच्या रसाचे हे आधुनिक रुप पाहून थोडं समाधानही वाटत होतं....पण त्या मंदशा वाजणा-या घुंगराच्या साथीनं...आणि त्या रसवंती चालवणा-या दादाच्या आपुलकीनं जी चव त्या रसात येते, ती बाटलीतील रसात नक्कीच नसणार...असो...एक पाऊल प्रगतीचे म्हणत या उसाच्या रसाला बाटलीमध्ये बंद करणा-या कलाकाराचेही थोडे कौतुक हवे...कारण कोणत्याही कोल्डड्रिंकपेक्षा हा बाटलीबंद उसाचा रस अधिक फायदेशीर...बाकी माझ्यासारख्या अस्सल चवी शोधणा-यांसाठी रसवंती आहेतच की...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 


Comments

  1. आदरणीय सईजी फार वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी आपण छान पैकी जपून ठेवल्यात आणि अतिशय सुंदर वर्णन केलं

    ReplyDelete
  2. Khup chhan lekh

    ReplyDelete
  3. "उसाचा रस" अगदी सहज व अतिशय उत्तम लेख लिहीला आहे.आपले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.आपले मनःपुर्वक अभिनंदन!!

    ReplyDelete
  4. Khup god lekh ऊसाच्या रसासारखाच👌

    ReplyDelete
  5. खूप छान,शिल्पा
    लेख वाचून रस प्यायची इच्छा तीव्र झाली.

    ReplyDelete

Post a Comment