आम्ही बायका... आणि आमच्या सवयी...

 

आम्ही बायका...

आणि आमच्या सवयी...




सुबहका नाष्टा कब करतो हो....एक बजे...एक...तब तो खाने का टाईम होता है....फिर खाना कब...दो-अढाई बजे...सर्दीनं जाम झालेलं नाक आणि प्रचंड दुखणारं डोकं, यामुळे बेजार होऊन मी डॉक्टरकडे गेले होते...नेहमीप्रमाणे एक-दीड तासांची प्रतीक्षा करुन शेवटी नंबर आला.  माझ्याआधी एक साठ-पासष्टीची महिला तिच्या मुलासह आली होती...त्यांना सगळा त्रास होता...अगदी थायरॉईड ते मधुमेह...सगळ्यांच्या गोळ्या चालू होत्या...त्यातून आता खूप थकवा जाणवत होता...म्हणून पुन्हा सगळ्या तपासण्या करुन त्यांचा मुलगा डॉक्टरांकडे घेऊन आलेला.  सगळे रिपोर्ट नॉर्मल...डॉक्टर त्या बाईंना एक गोष्ट पुन्हा पुन्हा समजवून सांगत होते...आणि त्या त्यांचं ठराविक उत्तर देत होत्या...त्यामुळे गाडी पुन्हा जिथे होती तिथेच येत होती...मला आत असलेल्या एक बेडवर बसवण्यात आलं होतं...तिथल्या सिस्टर आणि माझ्या हळू आवाजात गप्पा चालू झाल्याच होत्या तितक्याच डॉक्टरांचा चढलेला आवाज कानावर पडला आणि आम्ही शांत झालो...डॉक्टर त्या महिलेला सांगत होते...गोली कम से कम लेनी चाहिए...टाईमपे खाना खाओ...नाष्टा और खाना इसमे फरक है...नाष्टा नऊ बजे करो...दस बजे करो...सुबह फ्रुट खाओ...एक बजे खाना खाओ...कभी तो ऐसा करो...डॉक्टरांनी असेच आहाराबाबतीत मोठ्या आवाजात एक लेक्चरच तिला दिले...बाई हिंदीभाषिक होती...डॉक्टरांचे बोलणे झाल्यावर हळुवार आवाजात म्हणाली...एक बजे के करीब सब काम पूरा होता है...तभी कुछ खा लेती हूं...अब आदत हो गई...क्या करु...यावर ते डॉक्टर काय म्हणणार...डॉक्टर ताडकन उठले...ठिक है...फिर गोली खाओ...और हर चार महिने बाद ब्लड टेस्ट करके यहा आना...मेरा क्या है...एक बजाए चार गोली खाओ...वैतागलेले डॉक्टर मला तपासायला आले...तुम्हाला काय झालंय...मी सर्दीचं सांगितलं...बाकी


काय...नाही सगळं ओके आहे...असं सांगितल्यावर डॉक्टरांनी नशीब.. एवढाच शब्द वापरला...मला तपासून औषधं लिहून देतांना म्हणाले, वेळेवर खा..बाकी काही नाही....मी डॉक्टरांचे आभार मानून तिथून बाहेर पडले...सोबत एक वाक्य होतं...वेळेवर खा...

सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण,  आणि रात्रीचे जेवण...या सगळ्यांच्या ठराविक असतात.  त्या वेळा योग्यपणे पाळल्या गेल्या तर आजाराचे प्रमाण कमी होते.  गेल्या काही वर्षात हा सल्ला मी स्वतःवर अनुभवला आहे.  काही वर्षापूर्वी मला जबरदस्त असिडीटीचा त्रास जाणवायचा...हा आजार मग कुठल्या ना कुठल्या अन्य आजारात बदलायचा...कधी पोटात दुखायचं तर कधी पाठ...सतत डॉक्टरांच्या वा-या...नशीबानं आमचे डॉक्टर चांगले...सतत फे-या वाढल्यावर त्यांनी माझे रुटीन विचारले...मी तेव्हा त्यांना अभिमानानं सांगितलं होतं...सकाळी चारला उठते...लेकाचे...नव-याचे डबे...मग सगळं काम उरकायचं...दहा-साडेदहापर्यंत सगळं आटोपलं की मग सावकाश कॉफी...आणि त्यानंतर नाष्टा...त्यानंतर दुपारी तीन वाजता लेक शाळेतून आल्यावर जेवण...संध्याकाळी डब्यात काय मिळेल तो खाऊ खायचा...रात्री तर दहा नंतर जेवण....डॉक्टरांनी तेव्हाच हात जोडले होते...गोळ्या बंद केल्या...आणि डायट सुधारण्याचा सल्ला दिला...लगेच हा बदल झाला नाही...मलाही सुरुवातीला प्रचंड त्रास झाला...तेव्हाच एक चांगली गोष्ट झाली....योग करायला सुरुवात झाली...नकळत आहाराच्या सवयी बदलल्या...आणि डॉक्टरांच्या गाठीभेटी कमी झाल्या...

ब-याच दिवसानंतर मला माझे जुने दिवस आठवले...तेव्हा लेक वाढत्या


अंगाचा...त्यामुळे आपल्या ताटात काही घेण्याआधी मी ते त्याच्या ताटात द्यायचे...पहिलं लेक खाणार, नवरा, मग मी...त्या  दोघांना गरम गरम वाढण्यासाठी माझी खूप धावपळ सुरु असायची...पनीर, चिकन, मच्छी असेल तर पहिले पोटभरुन लेकाला खाऊ द्यायचे...अगदी फळं खातांनाही मी स्वतःबाबत असा भेदभाव करुन घ्यायचे...आंब्याच्या सगळ्या फोडी लेकाच्या ताटात टाकून मी ब-याचवेळा बाठ खायचे...सुरुवातीला नव-यालाही सल्ला दिला होता...लेकाला आधी दे...त्याचं खाऊन होऊदे...पण यावर तो चिडायचा...माझ्या शरीराला याची गरज आहे...तुझ्याही शरीराला या सर्वांची गरज आहे...जेवढी गरज लेकाला आहे, तेवढीच तुलाही आहे...तुला खायचं नसेल तर नको खाऊ, पण मी खाणार...आमचे दोघांचे यावरुन ब-याचवेळा वादही झाले...प्रत्येकाच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळाली पाहिजेत...आपण काही त्या हिरो हिरॉईनसारखं परफेक्ट डायट फूड नाही खात...पण जे उपलब्ध आहे, ते योग्य प्रमाणात शरीरात गेले पाहिजेत...नवरा बरेचवेळा या वाक्यानं मला गप्प करायचा...शेवटी डॉक्टरांकडून कानउघडणी झाल्यावर मी आहाराच्या सवयी बदलल्या...ताटात सर्व वाढून घेण्याचा प्रयत्न करु लागले...तेव्हापासून भाज्यांचे सूप जे काही सामिल झाले...ते आत्तापर्यंत...आत्ता तर लेक आणि नवरा या सूप पिण्याच्या सवयीवरुन माझी ब-याचवेळा मस्करीही करतात...असो...

नंतर मी अनेक मैत्रिणींबरोबर या खाण्याच्या सवयींबद्दल बोलले...जवळपास सर्वच माझ्यासारख्या होत्या...ज्या नोकरदार आहेत, त्यांचे तर हाल विचारु नका...सकाळी उठा...मुलांसाठी, नव-यासाठी आणि स्वतःसाठी असेल स्वतःसाठी डबे तयार करा...सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी डब्यातला


खाऊ...बहुधा बिस्किट आणि खारी, टोस्ट यावर समाधान...काही जणी चहा-चपाती हाच नाष्टा करुन बाहेर पडणा-या...फळं खायला वेळ नाही...मग ब-याचवेळा बाहेर मिळते ते बर्फ घातलेलं ज्युस पोटात जाणार...शनिवार-रविवार काहीतरी स्पेशल होणार...पण घरच्या बाईला ते धड बसून खायलाही वेळ नाही...अशी बरीच उदाहरणं आजूबाजूला पाहिली...आजूनही अशा अनेक जणी भेटतात.  सकाळी योगाला येतात...आणि अभिमानानं सांगतात, अकरा शिवाय पोटात पाणीही जात नाही...सात वाजता पहिला चहा घेतला की काय एनर्जी मिळते...मी आता या सर्व अनुभवातून गेले आहे...योगाचा वर्ग सुरु करण्यापूर्वी त्यांना हात जोडून सांगते...बायांनो...आपलं शरीर आपल्या हातात आहे...चहाच्या किंवा कॉफीच्या कपात नाही...सकाळी फळं खा..शक्य झालं तर ड्रायफ्रूट खा...थोडा केलात तरी चालेल...पण नाष्टा करा...मुलांनी ठेवलेला...उरलेला पदार्थ खाऊ नका...तुमच्यासाठी पुरेसा होईल अशा अंदाजानंच करा...जेवणातही सर्व सामावून घ्या...चपाती, भाकरी, डाळ, भात आणि वाटीभर कोशिंबीर...इतपर्यंत पाळलं तरी खूप...ब-याचवेळा अनुभव येतो की, बायका ऐकतात...अगदी एक-दोन महिने हे वेळापत्रक पाळतात...पुन्हा काहीतरी होतं...योगा सुटतो...मग येरे माझ्या मागल्या...मग कधीतरी अचानक आठवण होते...पुन्हा आहाराचे

वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करतात...थोडा योगा करायचाय, म्हणून सकाळी घरी येतात...आता मला या सवयी माहिती झाल्या आहेत...त्यात बायकांचा तरी काय दोष...आम्ही बायका पहिला विचार करतो तो कुटुंबाचा....त्यातील प्रत्येक सदस्याचा...मग स्वतःचा...अशात स्वतःचे आरोग्य हे दुय्यम स्थानावर असते...मग काहीजणी मला डॉक्टरांकडे भेटलेल्या महिलेसारखी शरीराची अवस्था करुन घेतात...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Dr Adwait Padhye8 July 2023 at 13:00

    जीवनशैली खूपच महत्वाची आहे !!आहारशैली,विचारशैली व आचारशैली योग्य असणे गरजेचे आहे!!

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच डॉक्टर....आहारशैलीवरच बाकीच्या गोष्टी अवलंबून आहेत....

      Delete
  2. प्रत्येक स्त्रीची ही कहाणी आहे, सर्व कळते पण वळत नाही, शेवटी आम्ही कुटुंब वत्सल

    ReplyDelete
    Replies
    1. हो हे खरे आहे...पण प्रत्येकीनं सर्व कुटुंबासोबत आपल्या स्वतःच्या शरीराचाही विचार करायला हवा...

      Delete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. स्वतःकडे दुर्लक्ष हा बऱ्याच बायकांचा फंडा असतो आणि त्यामुळेच अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. आपण नक्कीच टाळायला हवं हे

    ReplyDelete
  5. आता बऱ्याच स्त्रिया सुद्धा मग वर्किंग किंवा हाऊस वाईफ ,दोन्ही प्रकारच्या , आता थोड्या तरी जागरूक व्हायला लागलेल्या आहेत. आणि खरंतर आपली पुढील पिढी यांना लहानपणापासून योग्य आहार, झोपण्याची, उठण्याची खाण्यापिण्याची वेळ असते , तसच व्यायामासाठी ही वेळ द्यावा हे लहानपणापासूनच शिकवलं तर पुढल्या पिढीला खूप कमी प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील....अबोली.

    ReplyDelete

Post a Comment