पावडर,लिपस्टिक, आयलायनर...

 पावडर,लिपस्टिक, आयलायनर...


सकाळी सात वाजले तरी उठावेसे वाटत नव्हते...कालचा दिवसच तसा त्रासदायक ठरला होता....पण तेवढ्यात फोनची रिंग वाजली...नव-याचा सुट्टीचा वार...म्हणून तो वैतागला...तुझा आहे ना, घे...मी नाईलाजानं उठले...फोन अभयचा होता...माझी झोप पार उडाली...मी जोरात म्हटलं,  अभयचा फोन...माझ्या आवाजातील रागामुळे नवराही जागा झाला....अभयचं नाव ऐकल्यावर बोलला...नको राहूदे...काल झाला तेवढा तमाशा पुरे झाला...त्यानं तरी सकाळी सकाळी कशाला फोन केलाय...पुन्हा एकदा फोनची रिंग वाजली...मी उचलला नाही.  पण लगेच नव-याच्या फोनवर त्याचा फोन आला.  शेवटी फोन उचलावा लागला.  मी फक्त हॅलो म्हणायच्या आत, पलिकडून अभयचा जोराचा आवाज ऐकू आला...सॉरी...सॉरी ग...काल उगीचच वाद होत गेले...तुझं म्हणणं पटतयं मला...रात्री मी आणि साधनाही खूप बोललो, त्याच विषयावर...साधनानं मला काही सांगितलं...मी स्वतःही शॉक आहे...तुला पहिलं सॉरी म्हणायचंय....आम्ही दोघं येतो तुझ्याकडे...बोलूया...चालेल  ना...चल भेटू...असं तुटक तुटक बोलत अभयनं फोन ठेऊन दिला...मी त्या फोनकडे बघत होते...नवराही उठून बसलेला...आदल्या दिवशी, शुक्रवारी, एका मित्राच्या कुटुंबासह जेवायला गेलो होतो...अभय, त्याची पत्नी साधना आणि आणि मुलगी आभा...आणि आम्ही दोघं...पाच जणांच्या जेवणाची ही छोटीशी पार्टी पार विस्कटली होती...वाद-विवाद झाले नाही...आवाज चढवून कोणी बोललं नाही...तरीही असे मुद्दे आले की या छोट्या पार्टीची पार वाट लागली.  घरी येईपर्यंत डोकंही दुखायला लागलं होतं...त्यात घरात आल्याआल्या नव-यानं तू थोडं शांत रहायला हवं होतंस...हा सल्ला दिलेला...एकूण आमच्या आठवड्याचा पहिला सुट्टीचा वार म्हणजे, शनिवार पार बेक्कार जाणार अशी चिन्ह होती....तेव्हाच सकाळचाच पहिला फोन अभयचा आला होता...


नव-यानं मला विचारलं...काय झालं...कालच्यासारखा वाद नको आता पुन्हा...काय म्हणाला तो...मी त्यावर तो घरी येते असल्याचे नव-याला सांगितले...त्यालाही आश्चर्य वाटलं...कशाला ते, विचारलंस का...मी नाही म्हटल्यावर त्याचे परत प्रश्न सुरु झाले...नाष्टा करायला येणार आहे का...जेवणार का...की फक्त कालची चर्चा पुढे करायचीय...काय बोलला...मी कुठे अभयला काय विचरलं होतं...आदल्या दिवशी झालेले हलके वाद माझ्या डोक्यात अजूनही फिरत होते...मी नाही म्हटल्यावर नव-यानं अभयला फोन केला...तो काही तरी त्याच्या हलक्या आवाजात बोलत होता...ठिक ठिक आहे, म्हणत बोलणं संपलं...आणि नंतर म्हणाला, पोहे टाक...अभय येतोय....मी पुन्हा आश्चर्यात...आदल्या दिवशी झालेल्या आमच्या बोलाचालीमध्ये जास्त कोण वैगातला होता तर तो माझा नवरा...जेवणाला गेल्यावर वाद येतील असे मुद्दे मांडायचेच कशाला...आणि एकानं ते मांडल्यावर दुस-यांनी त्याला खतपाणी घालायचेच कशाला....असा त्याचा मुद्दा होता...पण आता तो रिलॅक्स होता....मी बाकीचं आवरुन कांदेपोह्यांची तयारी करु लागले...

अभय, पत्नी साधना आणि बारा वर्षाची लेक आभा, हे त्याचं कुटुंब आमच्या   मित्रपरिवारपैकी एक....गेल्या काही दिवसांपासून भेट झाली नाही, म्हणून आम्हा दोन्ही कुटुंबाच्या तक्रारी होत्या.  शेवटी शुक्रवारच्या संध्याकाळी एका लांबच्या हॉटेलवर जाऊ...भरपूर गप्पा मारु, असा बेत ठरला.  आमच्या गप्पात आभा कंटाळेल, अशी शंका होती...पण त्या हॉटेलमध्ये मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे, अशी माहिती मिळाली...शुक्रवारी आम्ही ठरलेल्या हॉटेलमध्ये रात्री नऊच्या सुमारास पोहचलो...सुरुवातीला खूप दिवसांनी भेटण्याचा आनंद....आपापली ख्यालीखुषाली...लेकाची चौकशी...आभाची शाळा...ऑफीसमधलं टेन्शन...पाऊस...अशा सर्व विषयांवर गप्पा झाल्या....जेवणाची ऑर्डर दिली...पण आम्ही बोलत असतांना मध्ये मध्ये अभय उठून जात होता...आभा बहुधा खेळत होती, तिथे जाऊन येत होता...शेवटी ऑर्डर केलेले पदार्थ यायला सुरुवात झाली आणि त्याला आभाला घेऊन यायला सांगितलं...खूप दिवसांनी मी आभाला भेटले होते...एरवी अभय नेहमी त्याच्या या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असे...आत्ता आत्ता आभाचे तो सोशल मिडियावर छोटे छोटे व्हिडिओ करुन शेअर करत होता...कुठे फिरायला गेल्यावर आभाचा व्हिडिओ पहिला असायचा...अगदी रोज घरात जेवायला काय केलंय, असे फोटोही अभय शेअर करत असे...या प्रत्येक फोटोसोबत आभाचाही फोटो...

आता आम्ही जेवायला बाहेर गेलो तेव्हाही हे फोटो सेशन सुरु होतं...अभय


आपल्या लाडक्या लेकीचे फोटो काढण्यात गुंतला होता.  त्यांच्या या फोटो काढण्यावर साधना वैतागली होती...कुठेही गेलं की या दोघांचा हा फोटोचा कार्यक्रम सुरु होतो....मला कंटाळा येतो, म्हणत तिनं नापसंती नोंदवली.  तितक्यात आमच्या जेवणाच्या ऑर्डर यायला लागल्या...आम्ही सर्वांनीच अभय आणि आभाला जेवणासाठी बोलावलं...आल्याआल्याच आभानं,  बाबा...पहिले फोटो काढा...माझा पहिला फोटो म्हणत डिश समोर उचलून घेतली..एका हातात त्यातला पनीरचा पीस उचलला...डोळे मोठे करुन वडिलांना पोज देऊ लागली...असाच प्रकार बाकीच्या पदार्थांसोबत झाला...अभय आभाचं कौतुक करत होता...बघितलंस...कसला फोटो सेन्स आहे आभाला...मला सांगते, कसा फोटो काढायचा ते...दिवसातून पन्नास-साठ तरी फोटो असतात...असं अभय लाडानं सांगत होता...पण माझं लक्ष आभाकडे होतं...आमचा जेवणाचा साधा कार्यक्रम होता...मी पावडर आणि साधीची लिपस्टिक लावली होती...साधनाकडे बघितलं तर ती सुद्धा अशीच माझ्यासारखी साधी होती...पण आभा मात्र गडद लिपस्टिक आणि डोळ्याला लायनर लावून बसली होती...त्यात तिच्या छोट्या केसांत काहीतरी चकचकीत लावलेलं होतं...मी साधनाला त्याबाबत विचारलं...तेव्हा समजलं केसांमध्ये लावायचे असे काही क्लिप येतात...आभाला हे सर्व आवडतं.  अभयचं बोलला...अग त्यानं फोटो छान येतात...तिची लिपस्टिक पाहिलीस का...लहानमुलांसाठी असते तशी स्पेशल आहे...आयलायनरही स्पेशल आहे.  साधनापेक्षा या बाईंचं मेकअप सामान जास्त आहे.  रोज मॅडम वेगवेगळ्या लिपस्टिक वापरतात...आमची राजकुमारी आहे...अभय, आभाचं कौतुक करतांना थकत नव्हता...मध्येच साधना म्हणाली, मी यावर खूप ओरडते दोघांना...पण माझं कोण ऐकतंय....बाहेर जायचंय म्हटलं की, माझ्यापेक्षा हिलाच जास्त वेळ लागतो तयार व्हायला...केसांचं बघ काय ते...अग आपण किती तेल लावयचो केसांना....हिला जरा थेंबभर तेल टाकलं तर आकाश पाताळ एक करते...आता या अभयनं कसलीतरी जेली आणून दिलीय...ती फक्त शनिवारी लावायची...मलातर टेन्शन आलंय आभाचं...साधनाचं बोलून झाल्याझाल्या,  अभय सुरु झाला...काही नाही ग...लिपस्टिक काय किंवा आभाचे कुठलंही मेकअपच सामान काय,  मी सर्व ब्रॅन्डेड आणतो...त्याचा कुठलाही त्रास होत नाही स्किनला...आमच्या जेवणाच्या बेतात या मेकअपच्या विषयांनं एन्ट्री घेतली आणि जेवणाचा बेत मात्र हळूहळू बिघडू लागला....

एकापोठोपाठ एक मुद्दे येत राहिले...मी म्हटलं...ते ठिक आहे रे...पण अशानं मुलांना सारखं त्या मोबाईलपुढे उभं रहाण्याची सवय लागते...फोटो काढण्याचे वेड लागतं...सारखं प्रेझेंटेबल असावं म्हणून अट्टाहास करतात काही मुलं...शिवाय आभाचं हे अभ्यासाचं वय आहे.  अभ्यास, खेळ, वाचन यात तिला आवड असायला हवी...हे फोटो काढून ते सोशल मिडियावर शेअर करत बसल्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला नको....माझ्या या बोलावर अभयनं नाराजीचा सूर लावला...सगळ्या मुलांनी कशाला अभ्यास करायला हवा...तिला


फॅशनचा सेन्स आहे, करे ना ती मॉडेलिंग...आत्तापासून समज आली तर काय फरक पडणार आहे.  अभयचा स्वर थोडा तापला होता....मला काय बोलावं ते कळेना...मदतीला साधना आली....तसं नाही रे अभय...ती काय बोलते त्यामागचा आशय समजून घे...आपल्या मुलीनं कुठलंही क्षेत्र निवडावं...पण हे तिचं अभ्यासाचं वय आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं म्हणायचं....मी हो म्हटलं...पण आमच्या जेवणावर ती मेकअपची छाया पसरली होती...नंतर पुढचा वेळ आम्ही सर्व शांततेत जेवत होतो...त्या शांततेच मला माझ्या शाळेचे दिवस आठवले...गॅदरिंगमध्ये भाग घेतला की असा मेकअप करायची संधी लाभायची...त्याचा कोण आनंद...तेव्हा ती ग्लुकोज पावडर आणि सर्वांसाठी एकच लिपस्टिक असायची...ती सुद्धा लिपस्टिक हातानं लावायचं स्वातंत्र्य नव्हतं.  वॉलेंटिअर नावानं मोठ्या वर्गातल्या मुली असायच्या.  यातीलच एका ताईच्या हातात ही लिपस्टिकची कांडी असायची...ती ताई सर्व तयारी झाली,  स्टेजवर जायची वेळ आली की लिपस्टिक लावायची....मग डान्स झाला की ती किंवा दुसरी मुलगी आधी लिपस्टिक पुसा म्हणून मागे लागायची...तरी घरी गेल्यावर आई त्या हलेकच लालसर असलेल्या ओठांवर व्हॅसलिन किंवा खोबरेल तेलाचा हात लावयची...का तर त्यानं त्रास होतो म्हणून....आणि मग हातात मावेल तेवढं तेल डोक्यावर थापायची...खोबरेल तेलाला तर कधी नाही म्हटल्याचं आठवत नाही...आणि कधी चुकून म्हटलं असेल तर आईनं ते ऐकल्याचेही आठवत नाही....

आता समोर बसलेली आभा बघून शाळेतील गॅदरींगमधला अवतार आठवत होता...समोर बसलेली ही बारा वर्षाची आभा त्यामानानं खूप आधुनिक होती...भुरभुरीत केस उडत होते...ओठांवरची लिपस्टिक सांभाळत ती जेवत होती...तिच्या केसांतील त्या सोनेरी केसांच्या बटा मध्येच येत होत्या...माझी तिच्यावरची खिळलेली नजर पाहून साधना म्हणाली, आमचं अलिकडे या  विषयावर वाद होतो...आत्तापासूनच या सर्वांचीच गरज आहे का, हा मला प्रश्न पडतो..पण अभय ठाम आहे.  आणि आत्ताशा आभाही ऐकत नाही...साधना जमेल तेवढ्या हळू आवाजात सांगायचा प्रयत्न करीत होती...पण अभयनं ऐकलंच...हिला नसत्या काळज्या असतात....स्कीनला त्रास होतो...अभ्यासावरुन लक्ष उडतं...कशाला असल्या काळज्या करायच्या....असं तुटक बोलत त्यांनी आम्हा दोघींनाही या विषयावर बोलू नका, म्हणून सूचक इशारा दिला. 

शेवटी जेवणाचा बेत मेकअपमुळे ढेपाळला होता...थंडगार आयस्क्रीमही त्यावर उतारा ठरु शकले नाही.  आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा निरोप घेतला....पण मनातून उगाचच आजचा बेत केला हा विचार काही पाठ सोडत नव्हता....

त्याच अभयचा दुस-या दिवशी अगदी सकाळी फोन आला होता...काही वेळातच तो, साधना घरी आले...सगळं मोकळं वातावरण...कालच्या जेवणातील कुठलाही मुद्दा गप्पांमध्ये येणार नाही, याची आम्ही काळजी घेत होतो...त्यांनी सोबत येतांना गरम गरम जिलेबी आणली होती...कांदेपोहे आणि जिलेबीच्या बेतासह सगळ्याचे मुड खुलले...हा बदल कसा झाला, हे कोडं मला पडलं होतं...अभयनंच तेही सोडून दिलं...घरी गेल्यावर त्या दोघांचही भांडण झालं या विषयावर...अभय ऐकायला तयार नव्हता...तेव्हा साधनानं एक लपवलेली गोष्ट सांगितली...गेल्या आठवड्यात आभाच्या शाळेत तिला बोलावलं होतं...आभा,


मेकअपचं सामान शाळेतही घेऊन जात होती...बाकी मुलींना ती सुट्टीमध्ये मेकअप करुन द्यायची....टिचरच्या ही गोष्ट लक्षात आली.  तिच्या बागेची तपासणी झाली.  आणि समिधाला शाळेतून बोलवणं आलं...टिचरसमोर आभा ऐकायला तयार नव्हती...माझे बाबा आणतात ते सामान मी कधीही वापरेन...माझं सामान आहे...हा तिचा मुद्दा होता...साधनानं टिचरसमोरच तिला खूप ओरडा दिला...पण टिचरनं तिला थांबवलं होतं...आभाचा बदललेला स्वभाव आणि अभ्यासात होत असलेलं दुर्लक्ष याकडेही लक्ष वेधलं...आभाला घेऊन साधना घरी आली...बाबाला सांगेन अशी धमकी तिनं आभाला दिली....आणि आभानंही बाबांना सांगू नकोस, पण मी आता निट वागेन असं प्रॉमिस तिला दिलं होतं....पण तेव्हापासून साधना खूप टेन्शनमध्ये होती...त्यानंतरच आमचा जेवणाचा कार्यक्रम झालेला...अभयला तेव्हा कुठे त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवू लागला होता...मुलांचे लाड करतांना ब-याचवेळा त्या मुलांना त्यांचे आईवडीलच नको तेवढं बिघडवून ठेवतात...अभयनं ही गोष्ट कबूल केली...आणि मी सुरुवात केली, मीच सुधारणार म्हणून प्रांजळपणे कबूलीही दिली...आमचा पुन्हा जेवणाचा बेत त्यानं ठरवला...आभाला तसंच शाळेतून पिकअप करणार होतो...शनिवार...म्हणजे, आभाची शाळा लवकर सुटणार होती...आम्ही दोघंही पटापट तयार झालो...आभाच्या शाळेच्या गेटवर जाऊन चौघंही उभं राहिलो...आभाला आम्ही येणार याची कल्पना नव्हती...बसच्या रांगेत उभ्या असलेल्या आभाला आम्ही दिसलो आणि तिला कोण आनंद झाला...धावत आली आणि आई बाबांच्या गळ्यात पडली...माझ्याकडे बघून म्हणाली,मावशी...आज पुन्हा जेवणाचा बेत का...वा मज्जा...अभय म्हणाला आभा...आज खरी मजा आहे....आज आपला नो फोटो डे आहे...तुला आवडेल ना....आभा थांबली...मग म्हणाली...पण मग आपण सर्व भरपूर खेळूया...कुठल्याश्या लांबच्या हॉटेलमध्ये जायचं नक्की केलं...आभा कितीतरी गोंडस दिसत होती...शाळेचा युनिफॉर्म आणि घट्ट बांधलेले दो बो...गोड...सुंदर...निरागस...तिचा हा निरागसपणाच जपायचा होता....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

Post a Comment