एक दिवस पावसाचा आणि आठवणींचा

 

एक दिवस पावसाचा आणि आठवणींचा


सर्व दिवस पावसाचा.  सकाळपासून धो धो पाऊस.  बहुधा रात्रभरपण पाऊसच होता.  सकाळी उठल्यावर नेहमीची कामं झाली.  त्यावेळी टिव्ही लावण्याचं सुचलंही नाही.  सकाळी आठ वाजले तरी घरात काळोख होता.  नव-याचे डबे भरले आणि त्याचा नाष्टा, फळं टेबलावर ठेवली.  थोडा वेळ मिळाला.    बाहेरचा पावसाचा धमाका घाबरवत होता.  नव-याला सुचवलं.  घरी राहतोस का,   मिटींग आहेत, घरात बसून त्या होणार नाहीत, असं म्हणून नवरा तयार होऊ लागला.  टिव्ही लावल्यावर बातम्यांमध्येही पाऊस होता.  काही ठिकाणी तो रेड अलर्ट आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असल्याची माहिती मिळाली.  मी त्या अलर्टपेक्षा बाहेरच्या गडद काळ्या रंगानं घाबरले होते.  पण नव-यावर काहीही परिणाम नाही.  त्यांनं बॅगेतील लॅपटॉपला कव्हर घातलं आणि मग पूर्ण बॅगेला कव्हर घातलं.  आणि लढाईला जात असल्यासारखा ऑफीसला रवाना झाला.  मी घरात एकटी.  आज बाहेर पडत असणा-या धुंवाधार पावसानं घरातील एकाकीपण जरा अधिकच जाणवू लागलं.  रोजची कामं झाली.  योगा जरा लांबवला.  बाहेर जरा पाऊस कमी झाल्यासारखा वाटला.  पण अगदी थोडाच वेळ.  पुन्हा पाऊसाचा जोर वाढला.  पावसाचा हा मारा कधीतरी आठवणींच्या पूरामध्ये नेऊन ठेवतो.  तसंच होत होतं.  काम भरपूर होतं.  पण मन कशातही लागत नव्हतं.  तसाच तो धुंवांधार पावसाचा दिवस होता.


अगदी हातात कॉफीचा मगही काहीही करु शकत नव्हता.  आता टिव्ही बंद केला.  कारण बाहेर वाढणा-या पावसाच्या बातम्या चालू झाल्या होत्या.  सोबत थांबणा-या शहराच्या बातम्याही.  ट्रेन बंद होऊ लागल्या.  रस्त्यावर पाणी.  ऑफीसला गेलेला नवरा परत कसा येईल,  ही काळजी सकाळी अकरापासून करण्यात काहीच अर्थ नव्हता, त्यामुळे टिव्ही बंद केला.  बरचं लिखाण बाकी होतं.  त्या सर्व फायली ओपन करुन कंम्प्यूटरसमोर बसले.  गाणी लावली.  पण नेहमीच्या व्हॉल्यूमच्या लिमिटपुढे आवाजाची मर्यादा गेली.  कारण बाहेरचा धो धो आवाज.  पुन्हा काळजी वाटू लागली.  मनात तो जुना पाऊस पिंगा घालू लागला.  सगळं गुंडाळून ठेवलं.  घरातील कुंड्यांची थोडी साफसफाई केली.  दुपारचे जेवण तर तयार होते.  पण रात्रीच्या जेवणासाठी घरात फारसे काही नव्हते.  अगदी कांदे-बटाटेही संपलेले.  नेमकं आणायला जाणार असा बेत होता, आणि त्यात पावसाचा धिंगाणा सुरु झालेला.  आता रात्री काय करावं म्हणून प्रश्न पडला.  पुन्हा जुने दिवस आठवले.  आम्ही काही वर्ष पेणच्या गागोदे या गावात रहात होतो.    तिथे पाऊसाचा धिंगाणा काय असतो, याची पहिली कल्पना आलेली.  आठवडा आठवडा पाऊस पडायचा.  घराच्या बाहेर पडायची सोय नसायची.  अशावेळी आईची खूप कसरत व्हायची.  घरात एखादे तरी कडधान्य भिजवलेले असायचे.   बहुधा आई चणे भिजवून ठेवून द्यायची.  पेण कॉलेजमधून घरी येईपर्यंत पूर्णपणे भिजायला झालेलं असायचं.  त्यातला वातावरणातला थंडावा.  चांगलीच थंडी भरायची.  आई बरोबर चणे शिजवायला टाकायची.  शिजलेले चणे फक्त मिठ, मसाला टाकून हातात पडले की ती थंडी कुठल्या कुठे पळून जायची.  मग आई ते चणे शिजलेले पाणी वापरायची.  चांगला मुठभर लसूण ठेचून घ्यायची.  थोड्या तेलावर तो ठेचलेला

लसूण अगदी काळा होईपर्यंत परतला जायचा, मग त्यावर ते चणे शिजलेलं पाणी टाकायचं, उकळी आल्यावर त्यात अगदी नावाला मिठ आणि जर सर्दी झाली असेल तर ब-यापैकी काळीमिरी पावडर, हे सर्व उकळलं की त्या चण्याच्या पाण्याचं कडक सूप अगदी ग्लासभर आई प्यायला द्यायची.  या पाण्यानं थंडी कुठल्याकठे पळून जायची.  सोबत सर्दीही दूर व्हायची. 

पण आईएवढा समजदारपणा माझ्यात कुठला.  घरात चणे होते,पण ते बरणीत भरलेले.  त्यांचा काहीही उपयोग नाही.  आता बाहेर पावसाचा जोर वाढलेला.  त्यामुळे भाजीच्या नावानं घराबाहेर पडण्याचा विचार सोडून दिला.  पण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा मैत्रीचा मार्ग मदतीला येतो.  दुपारनंतर बिल्डींगमधली मैत्रिण घरी आली.  सोबत भाजीच्या अऴूची पुरचुंडी होती.  कालपासून तुझी बेल मारेतय, बाहेर होतीस का, गावचं अळू आणलंय, म्हणत हातात पुरचुंडी दिली.  गप्पा झाल्या, आणि ती गेली.  हातात ती अळूची पुरचुंडी राहीली.  या अळूसारखं पावसात साथ देणारं कोणीही नाही. गावाला, रेवदंड्याला असतांना तर अख्खा श्रावण महिना या अळूच्या साथीनं निघायचा.  भात आणि अळूचं फदफद यासारखा बेत नाही.  अळूची पानं साफ होती.  फक्त अळूची पानं खाजरी असली तर मात्र पंचाईत होते.  पण ही पानं छान होती.  म्हणजे अळू चांगलं होतं.  अळू करतांना फारसं काहीही लागत नाही.  शेंगदाणे आणि खोब-याच्या कापा.  सर्व मिळून शिजवायला ठेवलं, फोडणीची तयारी केली.  हिरव्या मिरचीची फोडणी.  थोडा चिंचेचा कोळ आणि गुळ.  संध्याकाळचे सहा वाजत असतांना अळूचं फदफद गॅसवर चांगलं खदखदायला लागलं.  अळूच्या प्रेमात जरा लवकरच जेवणाला लागल्याची तेव्हा जाणीव झाली.  या अळूसोबत भाताशिवाय काहीही चांगलं लागत नाही.  पण तरीही सोबत हवं होतं.  फ्रिजमध्ये सुरण होता.  सुरण म्हणजे, व्हेज सुरमईच.  त्या सुरणाच्या कापा केल्या, शिजायला ठेवल्या.  आता काहीही काम नव्हतं.  फक्त भात आणि सुरणाच्या कापा तळायच्या.  नवरा आल्यावर हे सर्व व्हायला अगदी पंधारा मिनिटं लागणार.  परत कंम्प्युटरकडे रोख वळवला.  सोबत पावसाच्या बातम्यांवर नजर टाकली.  पावसाच्या बातम्या आणि फोटो वॉटसपवर यायला लागले.  पुन्हा एकाकी वाटू


लगालं.  अशावेळी एकच उपाय असतो, तो म्हणजे, गावच्या गप्पा.  फोन हातात घेतला आणि एकापाठोपाठ एक फोन  सुरु केले.  कुठे कसा पाऊस आहे,  सर्वांना काळजी घ्या.  आज घरात काय केलंय.  असे फोन सुरु झाले..  सर्वत्रच पावसाचा जोर होता,  आणि आश्चर्य म्हणजे, ज्यांना फोन केले होते, त्यांच्यापैकी चार जणांकडे तरी अळूचं फदफदं, भात आणि पोह्याचा पापड असा बेत होता.  मग तू कसं केलंस फदफद.  मी कसं केलं याची विचारणा झाली.  तसं बघितलं तर या वेळकाढू गप्पा.  पण अशा वेळकाढू गप्पा कधीतरी माराव्यात की,  कधीतरी असं वाटतं काहीच करु नये.  फक्त बसून रहावं.  थांबावं.  कोणाशी तरी फक्त गप्पा माराव्यात.  पण गप्पा मारतांना समोर असलेली व्यक्ती आपल्याला समजून घेणारी असावी.  अशावेळी मैत्रिणींची मदत न घ्यावी तर कुणाची घ्यावी.  मी सुद्धा तसंच केलं.  मैत्रिणींची मदत घेतली.  अनेकींना फोन केले.  भरपूर गप्पा मारल्या.  एकमेकींची ख्याली खुशाली जाणून घेतली.  सकाळी मनात असलेली ती एकाकीपणाची भावना कुठल्याकुठे पळून गेली होती..  बाहेर तसाच धो धो पाऊस पडत होता.  अर्थात पावसाच्या दिवसात पाऊसच पडणार या विचारापर्यंत माझी

प्रगती झालेली.  रात्री नऊच्या सुमारास नवरा घरी आला.  त्यानं आल्याआल्या प्रवासात झालेल्या त्रासाची कथा सांगितली.  मग विचारलं तू काय केलंस,  मी सांगितलं,  आज काहीही काम केलं नाही,  फक्त गप्पा मारल्या.  त्यानं माझी मस्करी केली.  जेवतांना मात्र वाफाळता भात आणि त्यावरचं अळूचं फदफद पाहून नव-याची कळी खुलली.  सोबत सुरणाच्या कस-यांनी सर्व कसर भरून काढली.  पहिला घास घेतल्यावर नवरा म्हणाला, व्वा  दिवसभराची सगळी दगदग संपली.  त्याला हळूवार माझा दिवस कसा गेला हे सांगितलं.  त्याची प्रतिक्रीया अधिक बोलकी होती.  कधीतरी असं एकाकी वाटलं पाहिजे,  .बघ त्यातून तुझे किती फोन झाले.  गप्पा झाल्या.  जे होतं ते चांगल्यासाठीच.  नव-याचा हा पॉझिटिव्ह पॉईंट सर्वात भारी असतो.  अगदी ताटातल्या व्हेज सुरमईसारखा कुरकुरीत.

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Excellent... As usual... 😍😍😍😍😍😍😍😍😍.. ABOLI.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अबोली...

      Delete
  2. सुंदर लेख......

    ReplyDelete
  3. लेख छान आहे.👍👍👌👌🌹🌹

    ReplyDelete
  4. Dr Adwait Padhye23 July 2023 at 17:27

    खूपच छान...नेहमीप्रमाणे..साध्या,ओघवत्या शैलीत!!

    ReplyDelete
  5. खूप छान

    ReplyDelete
  6. नव-याची प्रतिक्रिया अधिक बोलकी! खूप छान लेख!!

    ReplyDelete
  7. लेख छान आहे.👍

    ReplyDelete
  8. भागवत सरांची आठवण होते

    ReplyDelete

Post a Comment