एक्सिलेटर आणि मी....
पुढे बघ...पडणार आहेस...माझ्या दंडाला धरुन नव-यानं माझी मान वळवण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या मागे येत असलेल्या त्या माणसाच्या चेह-यावरील आत्मविश्वासाकडेच बघत होता. तो, मी आणि माझा नवरा एका एक्सिलेटर होतो. मला या एक्सिलेटरची कमालीची भीती वाटते. पण माझ्या मागे त्या एक्सिलेटर उभा असलेला तो माणूस हातात ट्रे घेऊन बिंधास्तपणे त्या एक्सिलेटरच्या पाय-यांवर उभा होता. त्याच्या हातातील ट्रे मध्ये चहा किंवा कॉफीचा मग होता. ट्रे एका हातात तोलून तो कुठेही हात न पकडता उभा होता. नव-यानं माझ्या दंडाला धरुन मला त्या एक्सिलेटरवरुन उतरवलं तेव्हाही मी त्या व्यक्तीकडे बघत होते. असाच प्रकार पुन्हा एकदा झाला. पुन्हा हा माणूस तसाच बिंधास्त उभा. यावेळी माझ्याबरोबर नवरा नव्हता. त्यामुळे मी त्या एक्सिलेटरच्या साईडला पकडून ठेवलं होतं. दुस-या मजल्यावर माझ्या पाठोपाठ तोही हातात ट्रे घेऊन आला. तेव्हा त्याला विचारलंच, तुम्हाला भीती नाही वाटत. हातातला ट्रे नाही पडत. माझ्या प्रश्नावर तो तशाच आत्मविश्वासात म्हणाला, खाली कशाला बघायचं, फक्त आपलं पाऊल पुढे टाकायचं. बाकीचं काम तोच करतो, आपण फक्त छान सर्व बघत उभं राहायचं. मी हो म्हटलं, पण तेवढ्यानं काही माझ्या मनातील एक्सिलेटरची भीती कमी होईल अशी आशा नव्हती.
एक्सिलेटर....हा शब्दच उच्चारायला किती अवघड आहे. मग या एक्सिलेटरला पाहून माझ्या मनात किती धागधुग होत असेल हे फक्त मीच जाणते. एक्सिलेटर म्हणजे काय, तर यांत्रिक शिडी. यावर फक्त आपण पाय देऊन उभं राह्यचं, मग ही शिडी आपल्याला वरच्या मजल्यावर पोहचवते, किंवा खाली घेऊन जाते. वास्तविक अतिशय सुलभ वाटेल अशीच ही तांत्रिक प्रगती. पण माझ्या मनानं मात्र अद्यापही या प्रगतीला स्विकारले नाही. त्यामुळे हे एक्सिलेटर बघितल्यावर पहिल्यांदा घाम फुटतो. गेल्या आठवड्यात अख्खा दिवस या एक्सिलेटरवर घालवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्षातला एक नियम म्हणजे, आरोग्याची तपासणी. त्यासाठी आम्ही दोघं जिथे जातो, त्या हॉस्पिटलमध्ये सर्व छान आहे. फक्त माझ्यासाठी अडचण एक आहे, ती म्हणजे, तेथील एक्सिलेटर. कारण या हॉस्पिटलमध्ये होणा-या काही चाचण्या या पहिल्या मजल्यावर होतात, तर काही दुस-या मजल्यावर. बरं त्यातही आधी पहिल्या मजल्यावरच्या चाचण्या संपवा, मग आम्ही दुस-या मजल्यावर जाऊ, असा प्रकारही नाही. एक चाचणी झाली की, मग दुस-या मजल्यावर जा, परत पहिल्या मजल्यावर जा. अशा खो-खो दिवसभर चालू होता. मी प्रत्येकवेळा त्या एक्सिलेटर पाय पुढे करतांना देवाचा धावा करत होते, आणि सोबत असलेला नवरा, चला कशाला तरी घाबरते, म्हणून हसून घेत होता.
मी या एक्सिलेटरला पहिल्यांदा पाहिले ते नव-याच्या ऑफीसमध्ये. लेकाला तेव्हा कुठल्याश्या फॅशन शो मध्ये निवडले होते. त्याला घेऊन मी ऑफीसमध्ये गेले. तिथे हा शो झाल्यावर मुलांसाठी खालच्या मजल्यावर काही कार्यक्रम ठेवला होता. त्या भागात जातांना अचानक हे एक्सिलेटर समोर आलं. काही समजायच्या आत लेकानं आनंदानं उडी मारली. त्याच्यासाठी नवीन मशिन भेटल्याचा आनंद होता. तो माझा हात सोडून धावतच त्यावर जाऊन उभा राहिला. मलाही ओरडून यायला सांगू लागला. पण हे सांगेपर्यंत तो खालच्या मजल्यावर पोहचलाही होता. लेक माझा हात सोडून खाली गेला. तिथे खूप गर्दी. एवढ्या गर्दीत तो कुठे गेला तर हा विचार माझ्या मनात आणि त्या एक्सिलेटरचं भीती एकाचवेळी पिंगा घालायला लागली. परिणामी त्याची जी भीती बसली ती कायम. शेवटी लेकाला वरुन ओरडून जिथे आहेस तीथेच थांब मी खाली येते असं सांगून लिफ्टचा आधार घेतला. खाली आल्यावर पहिल्यांदा त्याचा हात घट्ट पकडला. त्याला ओरडा दिला आणि एक्सिलेटरनं जायचं नाही, असं सांगितलं. तोपर्यंत लेकासोबत असणा-या मुलांनी एक्सिलेटरचा शिडीसारखा वापर सुरु केला होता. एकानं वर जा, दुसरीकडून खाली या. त्यांच्यासोबत जाणा-या लेकाला मी माझ्या भीतीबाबत सांगितलं. तेव्हा त्यानं मनमुराद
हसून घेतलं होतं.
पुढे याच लेकानं ही माझी एक्सिलेटरची भीती कमी करण्याचा प्रयत्न
केला. त्याला क्लाससाठी ठाण्याला घेऊन जायचे. तेव्हा कितीही गर्दी असली तरी एक्सिलेटरनच
जाऊया म्हणून तो थांबून रहायचा. माझा हात
नको पकडू, तू स्वतः उभी रहा, असाही त्याचा
सल्ला असायचा. एकदा याच एक्सिलेटरवर
गावावरुन आलेल्या काही महिला अडकल्या होत्या.
त्या पुढेही जात नव्हत्या आणि मागे प्रचंड गर्दी झालेली. त्यातील काहींनी त्यांना मागे फिरा, आम्हाला
जाऊदे, म्हणून आरडाओरडा सुरु केला होता.
तेव्हा माझ्यात कुठला आत्मविश्वास आला काय माहित, पुढे होऊन त्यातील एका महिलेचा दंड पकडला आणि
तिला त्या एक्सिलेटरवर घेऊन गेले. तिच्या
पाठोपाठ तिच्यासोबत असणा-या अन्य महिलाही आल्या.
वर चढल्यावर आम्ही सर्वजणी हसायला लागलो.
आमच्या गावात असलं काही नसतं ना ताई, घाबरायला झालं म्हणून माझ्यासोबत
एक्सिलेटरवर चढलेली ती महिलाही हसत होती.
या सर्वात माझा लेक बाजुला उभा होता.
तो हसत होता, म्हणाला तुला एक्सिलेटरची खरचं भीती वाटते, की तू नाटक करतेस
नेहमी. मलापण हे समजलं नाही. पण असं कधीकधी होतं हे नक्की.
मॉलमध्ये गेल्यावर हे एक्सिलेटर नावाचं यंत्र मला त्रासदायक ठरतं. एकतर वरच्या मजल्यावर जातांना काही वाटत नाही. पण पुन्हा खाली येतांना मात्र प्रचंड दडपण येतं. त्यात ते मॉलमधील वातावरण. तेथील गर्दी. हातात असलेल्या पिशव्या. हे सर्व सांभाळत खाली येणा-या एक्सिलेटरवर पाय
ठेवतांना प्रचंड दडपण मनात आलेलं असतं. त्यातही तरुण पिढी या एक्सिलेटरवर ज्या आत्मविश्वासानं वावरते, ते बघून कौतुक वाटतं. एकदा तर एअरपोर्टवर गेल्यावर माझी अशीच त्या एक्सिलेटर तारांबळ उडाली होती. तिथे खूप मोठे एक्सिलेटर. हा...असा उभा. मी तर पहिल्यांदाच पहात होते. मी घाबरत त्यावर पाऊल टाकलं. ही माझी भीती नव-याला माहित होती, त्यामुळे तो सराईतपणे त्याकडे दुर्लक्ष करीत होता. असो. या तांत्रिक प्रगतीला आता आयुष्यातून दूर करता येऊ शकत नाही, या मतापर्यंत मी पोहचले आहे. त्यामुळे एक्सिलेटरवर पाय ठेऊन वर चढतांना वाटणा-या भीतीला दूर केलं आहे. आता फक्त एक्सिलेटरवरुन खाली उतरतांना वाटणारी थोडीशी भीती दूर करायची आहे. त्यावर काम चालू आहे. गेल्या आठवड्यात एक्सिलेटरुन येजा करतांना मला मिळालेला सल्ला मी मनात ठेवला आहे. आपण फक्त पाऊल पुढे करायचं, बाकीचं काम तोच करतो, मग आपण फक्त आजुबाजुच्या वातावरणाचा आनंद घ्यायचा. तसा प्रयत्न सुरु केला आहे. फक्त त्या मॉलमध्ये एक्सिलेटरुन खाली येतांना हाती असलेल्या पिशव्या नव-याच्या हातात कोंबायचे लक्षात राहिले पाहिजे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
लेख छान आहे.भावो यशस्वी वाटचाली मनःपुर्वक शुभेच्छा!!👍👍🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteमस्त लिहिलंय.., नाशिकला सिटी सेंटर मॉल मध्ये अनेक जण पहिल्यांदा येतात त्यांची पण तारांबळ उडते. पण मॉल मध्ये आल्याचा आनंद असतो. एकदा यांत्रिक शिडी चढून आले किंवा उतरले तर खूप आनंदित असतात.
ReplyDelete👌🏻
ReplyDeleteएक्सलेटर सारख्या अगदी साध्या विषयावर इतकं सुंदर शब्दांत लिहिलंयस की तुझं कौतुक वाटतं... अशीच लिहिती रहा खूप शुभेच्छा 🌿
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDeleteVery nice
ReplyDelete