एक फळ....पोटभर....

 

 एक फळ....पोटभर....


काचेच्या ग्लासामध्ये भरलेले पोपटी रंगाचे ज्युस बघून नकळत ओठावर हसू आलं.  दोन मोठे ग्लास या पोपटी रंगानं सजलेले दिसत होते,  की त्याच्यावर अन्य काही सजावट करण्याचंही मन झालं नाही.  घट्ट पोपटी रंगाचा हा रस म्हणजे आमच्या दोघांचाही भारी आवडीचा.  दोघांनीही पहिला घोट घेतला आणि एकच प्रतिक्रीया आली, छान झालाय.  हा ज्युस म्हणजे अव्हाकाडो या फळाचा.  वरुन काळसर हिरव्या रंगाच्या या फळामध्ये आत हिरव्या रंगाचा गर असतो.  या गराचे ज्युस म्हणजे, एकवेळचे जेवणच असते.  एक ग्लासभर ज्युस प्यायल्यास जेवणाचीही गरज भासत नाही, एवढे ते पोटभर होते.  काही वर्षापूर्वी या अव्हाकाडो फळाबद्दल कमालीची उत्सुकता होती.  एकतर त्याच्यावर बसलेला परदेशी शिक्का.  त्याची किंमत.  यामुळे ही उत्सुकता सतत वाढत जायची.  ती टीएलसी सारखी चॅनल कधीही लावली तरी त्याच या अव्हाकाडोच्याच रेसिपी चालू असायच्या.  त्यामुळे या परदेशातल्या फळाची न चाखताच गोडी लागली होती.  एवढं काय आहे, या फळात, हे प्रश्न पडायचे.  एकदा एका मॉलमध्ये गेल्यावर हे फळ नजरेस पडलं.  अगदी पाच-सहा वर्षापूर्वीची गोष्ट.  तेव्हा या फळावर किंमत होती पाचशे रुपये.  मी ती किंमत बघितल्या बघितल्या, केवढं महाग, म्हणत लगेच ते हिरव्या, काळ्या रंगाचं फळ लगेच खाली ठेवलं.  पण माझ्यापेक्षा नवरा खूप हौशी.  एकदा चव चाखायला हरकत काय, म्हणत त्यानं अव्हाकाडो घेतलाच.  घरी पहिल्यांदाच अव्हाकाडो आल्यावर काय कौतुक.  दुस-या दिवशी त्याचा ज्युस करायचा ठरलं.  कधी नाही ते नवरा आणि लेकही स्वंयपाकघरात दाखल झाले होते.  मी त्या टीएलसी चॅनेलवर दाखवतात तसं अव्हाकाडोला कापलं.  त्यातील मोठी जायफळासारखी बी समोर आली.  त्याचा गर बाजुला केला आणि साखर घालून सर्व मिश्रण एकदा मिक्सरमधून शेक केलं.  पण जेव्हा जेव्हा मिक्सर फिरवायचे तेव्हा तेव्हा तो गर फूगून आल्यासारखा व्हायचा.  चांगले दोन ग्लास पाणी घातलं.  भजीच्या पिढाएवढा पातळ झाला.  अगदी नावापुरतं मिठ घातलं आणि तीन ग्लासात तो पोपटी रंगाचा ज्युस ओतला.  लेकानं पहिला घोट घेतला.  त्याचा तो चेहरा बघितल्यावरच कळलं की काम फसलं आहे.  मग आम्ही दोघांनी घाबरत पहिला घोट घेतला.  तो अव्हाकोडाचा ज्युस पार फसला होता.   कसली चवच नाही.  कुठला तरी गर पाणी टाकून पितोय असं वाटत होतं. 


खरंतर टाकण्याचं मन होत होतं.  पण ती पाचशे रुपये किंमत समोर आली आणि अगदी कसातरी तो ज्युस पोटात ढकलला.  असा अनुभव आल्यावर हे फळ चारहात दूर करायला हवं होतं.  पण  तसं झालं नाही.  उलट आपल्याला का आलं नाही.  ही सल मला सतावू लागली.  मग या फळाचा जणू पाठलाग करायला सुरुवात केली.  जे जे वाचता येईल ते वाचलं.  अनेक व्हिडिओ बघितले.  मग पुन्हा एकदा आत्मविश्वासानं हे फळ घरात आणलं.  गेल्यावेळेचा अनुभव पहाता नव-यानं आकारानं लहान असलेला अव्हाकोडा घेतला.  म्हणजे, वाया गेलं तर तेवढं वाईट वाटायला नको.  ज्युस करतांना या फळासोबत अननसाच्या कापाही मिक्सरमध्ये टाकल्या, नेहमीच्या मिठाऐवजी काळं मिठ, साखर आणि वेलची एवढं सर्व एकत्र केलं.  त्या दाट रसाची तीन ग्लास भरली आणि चवीला सादर केली.  लेकानं पहिला घोट घेतला आणि ग्लास खाली न ठेवता पूर्ण ज्युस पिऊन टाकला.  अशीच तर असते पावती.  तेव्हापासून हे अव्हाकोडा आमच्या घरी हक्काचे फळ झाले आहे.  आता या फळाचे कित्ती प्रकारचे ज्युस मी करते हे नक्की सांगता येत नाही, एवढे विविध प्रयोग या फळासोबत केले आहेत, आणि ते सर्व यशस्वी झाले आहेत.

एकदा या फळाबरोबर चांगली मैत्री झाली आणि त्याबद्दल वाटणारी भीती कमी


झाली.  त्याच्या चांगल्या-वाईटाची कल्पना येऊ लागली.   अव्हाकोडा हे फळ आत्ताशा सर्वत्र मिळत असलं तरी ते कुठलं चांगलं निघेल हे मात्र सांगता येत नाही.  कधीतरी अगदी आकारानं लहान असलं तरी सर्व फळ छान मऊ गर असलेलं निघतं.  तर कधी चांगल्या मोठ्या आकारातलं फळ घेतलं तरी त्याचा काही भाग काळा निघतो.  एकूण अव्हाकोडा म्हणजे एका लॉटरीसारखं आहे.  मात्र त्याच्या सालावरुन त्याची ओळख करता येते.  साल साधारण कडक असेल तर आतील फळ छान असतं हे मी जाणून घेतलं आहे.  लेकाच्या जेईईच्या परीक्षांचा सर्व वेळ करोनानं व्यापलेला होता.  तेव्हा ठाण्याच्या एका कॉलेजमध्ये त्याचा नंबर यायचा.  त्या कॉलेजसमोर मोठा मॉल होता.  तिथे करोनाचे सगळे नियम पाळून काही भाग सुरु करण्यात आले होते.  त्यातील एक भाज्यांचा आणि फळांचा टप्पा होता.  मी लेकाला परीक्षेला सोडून आधी त्या मॉलमध्ये दाखल व्हायचे.  कारण तिथे फळांच्या भागात या अव्हाकोडाचे चार प्रकार ठेवलेले असायचे.  एक भारतातला, एक अमेरिकेचा, एक ऑस्ट्रेलियाचा, एक कुणा अन्य देशातला.  असे सर्व अव्हाकोडा छान रॅकमध्ये ठेवलेले असायचे.  सर्वांचे रंग थोडेफार वेगळे.  पण किंमतींमध्ये खूप फरक.  काहीही असलं तरी आपण भारतीय.  त्यामुळे मी ठरवून भारतीय अव्हाकोडा घ्यायचे.  एकदा चवीतला फरक कळायला हवा म्हणून नव-यानं ऑस्ट्रेलियाचा अव्हाकोडाही घेतला होता.  पण जेव्हा त्याची चव बघितली तेव्हा तो आपल्या भारतातल्या अव्हकोडाच्या चवीसारखाच होता.  त्यामुळे मुळ विदेशी आणि आत्ता पक्का देशी झालेला आपला भारतीय अव्हाकोडा पुन्हापुन्हा घरी डोकवायला लागला.  आत्ताही कुठल्या मॉलमध्ये गेल्यावर पहिली नजर असते, ती याच फळावर. 

बरं या फळाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, त्याचा ज्युस करतांना तो अगदी पातळ होत नाही, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे.  जेवढं मिक्सरमध्ये टाकून तो शेक केला जातो, तेवढ्यावेळा तो अधिक फेसल्यासारख वर येतो.  पहिल्यावेळा मी ज्युस करतांना फक्त आणि फक्त अव्हाकोडा ठेवला होता.  पण हे फळ महाग असलं तरी त्याची चव अशी नाही.  तर ज्या फळासोबत त्याचे मिश्रण केले जाते, त्या फळाच्या जोडीनं हा खुलतो, हे लक्षात आलं आहे.   त्यानुसारच या फळाच्या ज्युसमध्ये मी अनेक प्रकार शोधले.  जसे अननस, डाळींब, मोसंब, संत्र, कलिंगड या रसाळ फळांसोबत अव्हाकोडाचा ज्युस हा फारच चविष्ठ होतो.   पण अननस-डाळींब आणि मग अव्हाकोडा अशी मिक्स दुनिया केली तरी तरी छानच होते.  उलट अधिक चवदार होतो.  आता प्रश्न आला, की प्रत्येकवेळा या अव्हाकोडाचा ज्युस करतांना दुसरे एखादे


रसदार फळ घरीच असावे लागणार.  तर अजिबात नाही.  आपल्याकडे लिंबू सर्वच घरात असते.  या लिंबाचा रस, अव्हाकोडाचा गर, काळे मिठ, साखर आणि जायफळाची पूड असे ज्युसही अप्रतिम लागते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे ज्युस अगदी पोटभर होते.   ब-याचवेळा रात्रीच्या जेवणाऐवजी हा अव्हाकोडाचा ज्युस आणि सोबतीला सुरणाच्या कस-या एवढा बेत असेल तरीही संपूर्ण जेवल्यासारखे पोट भरते. 

आणखी एक गम्मत सांगू का, या अव्हाकाडो फळाच्या प्रेमात जेवढी मी आहे, तशीच त्यातील बी च्याही प्रेमात आहे.  या अव्हाकाडोची  बी ही एकदम कडक, आपल्या जायफळासारखी असते.  पण एवढ्या चांगल्या फळाची बी कच-यामध्ये टाकायला काही मन होत नव्हतं.  त्यामुळे एका वेगळ्या कुंडीमध्ये या अव्हाकाडोच्या बी ला रुजवायला घालायला सुरुवात केली.  सुरुवातीला बी रुजायला घातली आणि मी विसरुन गेले. पण नंतर मोठ्या पानांचे रोपटं आल्यावर कोण आनंद झाला होता.  आत्तापर्यंत या अव्हाकाडोची अनेक रोपं घरी तयार करुन ती ज्यांच्याकडे छान बाग आहे,


त्यांच्याकडे दिली आहेत.  आत्ताही दोन बीया रुजायला घातल्या आहेत.  एकूणकाय या हिरव्या रंगाच्या अव्हाकाडो फळाच्या प्रेमात मी आहे.  हो, पण फक्त त्याचे ज्युस होते असे नाही.  अनेक प्रकारची सॅलेड आणि टोस्टही होतात.  ते नंतर पुन्हा कधीतरी....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. Khup chhan lekh

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती मिळाली.... मस्त!!!

    ReplyDelete
  3. Informative plese do continue writing

    ReplyDelete
  4. फारच छान माहिती मिळाली.. ललिता छेडा

    ReplyDelete
  5. Dr Adwait Padhye6 August 2023 at 08:58

    छान व नवी माहिती मिळाली !!

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख,विषयाची निवड,सुंदर मांडणी अप्रतिम👍👍👌👌🌹🌹

    ReplyDelete

Post a Comment