टोमॅटोशिवाय जेवण करतांना....
सकाळची वेळ योगाची असते. अगदी खूप महत्त्वाचं काम असेल तरच योगाला विराम देते. तसाच योगा सुरु असतांना दारावरची बेल अगदी जोरजोरात वाजली. सकाळचे नऊ वाजलेले. एवढ्या सकाळी कोण आलं, म्हणून दार उघडलं. तर दारात सविताबाई उभ्या होत्या. माझी एक मैत्रिण. आधी दार उघड, तुझा योगा चालू असेल, माहिती आहे, तू कर, मी बसते. म्हणत बाईंनी अक्षरशः माझ्या योगा मॅटवरच बैठक मारली. वरुन किती गरम होतंय. पंखा लावत नाहीस का. थोडं पाणी तर दे. अशी आरडाओरड चालू झाली. सविताचा स्वभाव आणि तिचा मुड बघता आता योगा आटोपता घ्यावा लागणार याची कल्पना आली. मी तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. पंखा लावला. पुढे काय बोलू हा प्रश्न होता. कारण सकाळसकाळ कशी, असा प्रश्न विचारला तर बाई ओरडणार, मैत्रिणींकडे यायला मुहूर्त लागतो का, हे तिचं आवडतं वाक्य. त्यामुळे तिच्याकडे पहात राहिले, मग तिनेच विचारलं, कशाला आले हे नाही विचारलंस. मी फक्त हसले. अग तुमच्या जरा पुढे भाजीवाले येतात, माहिती आहे ना. त्यांच्याकडे आले होते. घरात टोमॅटोच नाहीत. किती महाग झालेत. हे भाजीवाले नाशिकहून येतात ना, मग त्यांच्याकडे जरा स्वस्त असतील म्हणून आले होते. तर त्यांच्याकडेही किती महाग. फक्त अर्धा किलो घेतले. आता
याच्यात आठवडा कसातरी काढणार. बाकी तुझं काय. घराच्या एवढ्या जवळ भाजीवाले येतात, तू कधी जाणार. योगाबिगा नंतर कर, आधी ते टोमॅटो बघ. सविता सगळं एका दमात बोलत होती. मी तिला मध्येच थांबवलं. तू बस. मी कॉफी आणते, आणि आवरुन येत. मग बोलू, म्हटलं. मी तिच्यासमोर कॉफी ठेवली, आणि ओल्या नारळाच्या करंजा ठेवल्या. तो मेनू बघून बाई खूष झाल्या, आणि मी आवरायला गेले.
साधारण अर्धा तासानं मी पुन्हा सवितासमोर बसले. एव्हाना बाईंनी कॉफी आणि करंजांचा फडशा पाडला होता. मग पुन्हा कॉफीचा आणि त्या करंजांचा बेत झाला. आता बोल, काय म्हणत आहेत टोमॅटो. अशी मी सुरुवात करायचीच खोटी की, सवितानं टोमॅटोची पिशवी माझ्यासमोर उलटी केली. त्यात मोजून पाच टोमॅटो होते. हे बघ फक्त पाच आहेत, पण यांची किंमत ऐकशील तर चक्कर येईल. तूझं काय. तू कसे आणतेस टोमॅटो. ठाण्याला जातेस की काय. जाणार असशील तर मलाही सांग. मी सुद्धा येते. परत सविताबाई सुरु झाल्या. पण तिला मध्येच थांबवत मी म्हटलं, अग गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून मी घरात टोमॅटो आणलेच नाहीत. त्यांची तशी गरजच पडली नाही. काय सांगतेस काय, सविता जवळपास ओरडलीच. तू जवण करतेस ना, की तुझं ते डायट बिअटचं खाणं चालू आहे. मी सगळं जेवण करते, अगदी मध्ये लेकही आला होता चार दिवसासाठी. तुला तर माहित आहे, त्याला ताट भरलेलं लागतं.
किती मेनू केले ते विच्चारु नकोस. पण यात एकही टोमॅटो नव्हता. मा अगदी आत्मसुती करत सविताला सांगितलं.
सविता, यावर चमकली. असं काय केलंस तू. मी तर एकही भाजी टोमॅटोशिवाय करु शकत नाही. अगदी डाळही टोमॅटोशिवाय मला जमत नाही. तुझं हे टोमॅटो शिवाय किचन इंजिनिअरिंग कसं चालतं ते तरी सांग. मला तिच्या किचन इंजिनिअरिंग शब्दाचं हसू आलं आणि मी सुरु झाले. हे बघ सविता आता अधिक महिना चालू आहे. आणि त्याच्या पुढचा श्रावण. या दोन महिन्यात मी शक्यतो कांदा आणि लसूण टाळते. यावेळी तर टोमॅटोही टाळला आहे. यात काहीही बिघडलं नाही. उलट अजून चार नविन प्रकार करायला लागले. तुझ्या त्या किचन इंजिनिअरिंग शब्दाप्रमाणे. बरं आंबट चवीसाठी म्हणशील तर मी जेवणात आमसूल आणि आवळ्याची पावडर वापरते. बाकी पावसाळी भाज्या आहेतच की. आता पांढरी भेंडी छान येतात. खोबरं, शेंगदाणे, तिळ, काळीमिरीचं वाटण करुन ती भरली झाली. त्याच वाटणानं वांगी आणि सिमला मिरचीपण भाजी झाली. छान रस्सा हवा असेल तर वर थोडं गरम पाणी टाकायचं काम होतं. भारंगी, फोडशी,टाकळा, कुडा, कर्टुलं, अबयच्या शेंगा या रानभाज्या करतांना मी कधीही टोमॅटो
वापरत नाही. बरं ती शेवळाची भाजी आहेच की. ती तर कधी एक दिवसाची होतच नाही ना, ती अगदी दोन तीन दिवस खाल्ली. बरं सार म्हणशील तर किती प्रकारची होतात. त्या पांढ-या भेंड्याचा बेत असेल तर सारही पांढ-या रंगाचं करते. आपल्या उडदाच्या डाळीचं काळीमिरी घातलेलं कढण किती छान होतं. मक्याच्या दाण्याचं सार होतं. अळूचं फदफद आहेच की. ताकाची कढी, सोलकढी, ओल्या शेंगदाण्याची आमटी, काजूची-मटारची आमटी, वालाची आमटी, शेगटाच्या शेंगांची शेंगवणी, पंचामृत, मुगाच्या डाळीची हिरवी डाळ, माठाच्या देठाची आमटी, कुळदाचं पिठलं, सुरणाची आमटी, डाळीच्या गोळ्यांची आमटी, झालचं तर डाळीचे गोळे घालून केलेली दह्याचं घट्ट कढी या कश्यातही एवढूसाही टोमॅटो घातला नाही. आंबट चवीसाठी प्रत्येकात आवळ्याची पावडर वापरली. आणि वाटण म्हणशील तर ओल खोबरं, जिरं आणि मिरची पुरेशी पडते. आता भाज्या बघ. लेक आला होता, त्यामुळे मिनी श्रावणी
फेस्टीवलच साजरा झाला आमच्याकडे. डाळ घालू केलेले शिराळी, दोडका. भरल्या मिरच्या. कंटोळ आणि करल्यासारख्या कडू चवीच्या भाज्याही छान तेलात परतून कुरकुरीत झाल्या. त्यांना तिळ आणि बडिशेपची फोडणी दिली. थोडा चवीत बदल. रताळ्याची गोड, तिखट भाजी, सोललेल्या मुगाची भाजी, गवारीच्या शेंगांची पातळ भाजी, आपली बटाट्याची हक्काची पिवळ्या रंगाची भाजी, मस्त तिखट चवीचा डाळीचा झुणका किती सांगू. बरं आज मस्त मोड आलेले चणे घातलेला भात केलाय. शिवाय लेकाच्या आवडीचा मूग आणि वालाचा भात करुन झालाय. या सर्वांच्या जोडीला भोपळ्याच्या तिखट पु-या, कितीतरी मिरच्या तळल्या ते विचारू नकोस. सोबतीला कोथिंबीर आणि अळू वडीही झालीय. बटाटा, तांदूळ आणि पोह्याचे पापड यांचा तर घाणाच चालू होता. आणि हो थोडा बदल म्हणून ज्वारीच्या पिठाच्या शेवयाही झाल्या. लेकाला त्या शेजवान सॉसमध्ये घालून भरपूर भाज्यांसोबत दिल्या. हे कमी पडलं म्हणून भज्या किती प्रकारच्या झाल्या ते विचारु नकोस. कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, मूगाची भजी, अगदी कांदा आणि बटाट्याचा कीस एकत्र करुन मस्त मिरचीचा मारा केलेली मिक्स भजीही झाली. अग या सर्वात आमच्या लाडक्या सुरणाच्या आणि वांग्याच्या कापा राहिल्या. मधल्या वेळेत बटाटे आणि रताळ्याचे पॅटीस झाले. माझं डायट माहित आहे ना, काहीही झालं
तरी वाटीभर कोशिंबीर लागते पानात. एक दिवसाआड ती खमंग काकडी होतेय. बिटाची भाजी झालीय. त्यावर दही टाकलं की मस्त गुलाबी रंगही येतो. लेकांनं त्याची फोटोग्राफीही केली. गाजराची कोशिंबीर, मी तर मुगाचे हे भले मोठे कोंब काढून ठेवले आहेत. हे मूग, जुकिनी, बेबी कॉर्न, ब्रोकोली, एस्पगैरस, पनीर घातलेलं सॅलेड झालंय. माझी ही लिस्ट चालू झाल्यावर आता सविता वैतागली. बस्स बस्स किती ते प्रकार. एक्कातही टोमॅटो घातला नाहीस. कमालच आहे तुझी. ती मला थांबवत होती. पण मी कशाला थांबते. मी म्हटलं, मी या कश्शा कश्शातही टोमॅटो घातला नाही. आणि आणखी पुढचे महिनाभर टोमॅटो घरात आला नाही तर मला फरक पडणार नाही. माझा मेनू तयार आहे. ऐक, आठवड्यानं ठाण्याच्या बाजारात फेरी मारतेय, ती गाभोळीची भाजी यायला लागली की विचारु नकोस, रोज गाभोळी आणि भाक-या, कांदा आणि तळलेली मिरची हा बेत असेल. यात टोमॅटो येतोच कुठे.
माझं हे किचन इंजिनिअरिंग ऐकता ऐकता बाईंनी ओल्या नारळाच्या केलेल्या
चार करजांचा फडशा पाडला होता. सोबत कॉफीही झाली होती. मला तिनं, तू काय बाई, कायपण करशील म्हणून डायलॉग ऐकवला. मग तोंड खूपच गोड गोड झालंय अशीही गोड तक्रार केली. काहीतरी तिखट असेल तर दे म्हणून आग्रह आला. मग पुन्हा चांगलं आलं घालून कॉफी केली आणि सुंठपावडर घालून केलेली बिस्किट समोर ठेवली. मग काय बाई खूष. जरा करंजा असल्या तर दे ना डब्यात, छान झाल्यात म्हणून प्रेमाची मागणी आली. थोड्यावेळानं तो करंजांचा डबा सांभाळत तिनं माझा निरोप घेतला. पण पुन्हा परतून आली, ते पंचामृत केलंस की फोन कर, माझं नाही होत तुझ्यासारखं म्हणून गळ्यात पडली. तो टोमॅटोचा थोडा आंबटपणा आमच्यात आला होता, तो या मिठीनं कुठे हरवून गेला. टोमॅटोशिवायही सर्व छान होतं ते अस्स.....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरंच टोमॅटो शिवाय दोन महिने काढले .काही फरक नाही पडला .या वेळेला कांदे म हाग झाले नाहीत ..नाहीतर कांदेही महाग होतात
ReplyDeleteहो की नाही....सध्या श्रावणी भाज्यांचा मौसम आहे. त्यात हा टोमॅटो बसतच नाही...
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteछान मांडणी, शब्द कौशल्य, त्यामुळे कधी वाचुन संपला ते कळलंच नाही, खूपच छान, नवनवीन भाज्याही कळल्या.
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteसई,लवकरच तऱ्हे तर्हेच्या भाज्यांचं रेसिपी पुस्तक काढ...
ReplyDeleteतू खरोखरच सुग्रण आहेस!
ललितामॅडम....हा सर्व तुमचा आशीर्वाद आहे....
Deleteखूप छान सांगितलय खरंय कशाला हवाय तो टमाटो
ReplyDeleteहो ना....
Delete👍
ReplyDeleteखूपच छान, नवनवीन भाज्याही कळल्या.
ReplyDelete