या मनमोहक जगात....

 

 या मनमोहक जगात....


गेल्या आठवड्यात नव-यानं सहज कधीतरी विचारलं होतं, क्रॉफर्डला माझं काम आहे, तू येशील का.  मी तेव्हा क्रॉफर्ड हा शब्द फक्त ऐकला आणि जोरात हो म्हणाले.  तो पुन्हा सांगत होता, मी शनिवारी जाणार आहे.  तुला शनिवारी खूप कामं असतात ना.  चालेल तर चल.  सोबत भुलेश्वरला पण जाऊया.  मला तर त्याचे हे वाक्य हिरेजडीत अत्तरदाणीतील चंदनाच्या अत्तरासारखे सुगंधी वाटले.  त्यामुळेच की काय त्याच्या या दुस-या ऑफरवर माझा हो अधिक तालासुरात आला.  नव-यासाठी हा विषय इथेच संपला.  आणि माझ्यासाठी मोठा अध्याय सुरु झाला.  कारण क्रॉफर्ड, विशेषतः भुलेश्वर हा भाग म्हणजे माझ्यासाठी एक परिराज्यच आहे.  किती फिरावं, आणि काय काय घ्यावं, याचा कधीही ताळमेळ न लागणारं ठिकाण.  नव-यानं सांगितल्या सांगितल्या मी कामाला सुरुवात केली.  घरात माझी एक वैयक्तिक तिजोरी आहे.  नव-यानं फक्त शब्द टाकला आणि मी या तिजोरीत काय काय कमी आहे याची लिस्ट करायला सुरुवात केली. 


प्रत्येकाला काहीना काही छंद असतो.  त्यातलाच हा माझा एक छंद.  लहानपणापासून घर सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवायला आवडते.  माझी चित्रकला अगदी छान नाही.  पण त्यातही वारली, मधुबनी, मांडला या कलेमधील चित्रे ब-यापैकी काढता येतात.  याचा आधार घेत आणि मणी, रेशीम, लोकर यांच्या सहाय्यानं अनेक वस्तू बनवण्याचा चांगलासा छंद मी जोपासला आहे.  घराच्या भिंती रंगवून झाल्या आहेत.  अनेक साड्या केल्या आहेत.  चादरी तर किती केल्या याची नोंद नाही.  सोलापूर येथील एक बचत गट ओळखीचा आहे.  जेव्हा एखादी साडी करायला घ्यायची असते, तेव्हा या सोलापूरवाल्या गटाला फोन करते.  ते हवा त्या रंगाचा कपडा पाठवून देतात.  पण यावेळी तर तेवढाही वेळ नव्हता.  अशावेळी आमच्या हक्काच्या चिंधी मार्केटचा उपयोग होतो.  दुपारी वेळ काढून पहिला या चिंधी मार्केटचा दौरा केला.  साधारण अर्धा तासाच्या शोधानंतर साडीसाठी हवे तसे कापड मिळाले.  मनात अजून काय डिझाईन करावी याची जुळवाजुळव होत होती.   त्यामुळे एका साडीचे कापड घ्यावे की अजून एखादे घेऊन ठेवूया म्हणून विचार चालू होता.  पण एकसे दो भले, हा विचार मनात आला आणि तासाभराचा चिंधी मार्केटचा दौरा आटपला.  यापेक्षा एक महत्त्वाचे काम या

क्रॉफर्ड भागाचा दौरा करेपर्यंत करायचे होते, ते म्हणजे, माझ्या तिजोरीतील मुद्देमालाची यादी करणे.  या तिजोरीत माझ्या असंख्य अमुल्य गोष्टी ठेवलेल्या आहेत.  असंख्य प्रकारचे मणी, टिकल्या, मोती, लोकर, जरदोजी आणि रेषमाचे धागे,  रंग, ब्रश,  वेगवेगळे स्केच या आणि अशाच कलाकुसरीच्या सामानांनी ही तिजोरी चांगली भरलेली आहे.  चिंधी मार्केटचा दौरा झाल्यावर दुस-या दिवशी सकाळची सर्व कामं झाल्यावर या सर्व खजान्याला बाहेर काढलं.  मोठं जिकरीचं काम. काय संपलं आहे, कुठले मणी कमी झालेत, कुठले  रेशीमचे धागे हवे आहेत, जरदोजीची सोनेरी लट किती राहिली आहे, याची सर्व नोंद केली.  याची एक लिस्ट केली.  दोन साड्या करायच्या आहेत, त्याच्यावर कोणतं डिझाईन असेल हे नक्की केलं.  आणि मग मी तय्यार झाले. 

शनिवारी अगदी पहाटे पाचला उठले.  नेहमीची सर्व कामं आटोपली. सकाळी अकराच्या सुमाराम आम्ही दोघंही या भुलेश्वर-क्रॉफर्ड भागाकडे निघालो.  नव-याचे क्रॉफर्डमध्ये काम होते.  ते होण्यासाठी दोन वाजले.  पोटपुजा झाल्यावर मग माझ्या यादीला सुरुवात झाली.  आधी सर्व क्रॉफर्डचे आवरुन घेऊ असे ठरले.  खरंतर या भागात काय मिळत नाही, हा प्रश्नच आहे.  दिवस खरेदीसाठी अपुरा पडतो.  जी यादी आणली आहे, त्यापेक्षा अधिकच खरेदी होते.  पण हे सर्व करतांना पायपीट भरपूर करावी लागते.  मला साडीसाठी लेस घ्यायची होती.  पहिल्यांदा ही लेस घेण्यासाठी शोधाशोध सुरु झाली. 


एक-दोन दुकानातून लेस बघितल्या.  त्यांच्या किंमती काढल्या.  मग आणखी एका दुकानात दौरा वळवला.  एव्हाना नव-याला कल्पना आली होती, की तो मला येथे आणून फसला आहे.  सर्वत्रच सारख्या लेस आहेत.  एकाच दुकानात जा आणि काय हवं ते घे.  सगळीकडे फिरु नकोस, असं त्यानं ठणकावलं.  पण माझं मन भरत नव्हतं.  अरे बघ ना किती प्रकार आहेत, जरा बघू तर दे, म्हणत मी आणखी दोन-तीन दुकानं पालथी घातली आणि जिथे पहिल्यांदा गेले होते, त्याच दुकानातून लेस घेतली.  मग मण्यांचा नंबर लागला.  भुलेश्वर मार्केट यासाठी  प्रसिद्ध आहेत.  या भुलेश्वर मध्ये मणी, मोती, मीनाकारी कामासाठी लागणारे साहित्य, जरदोजीचे धागे हे अगदी छान आणि स्वस्तात मिळतं.  या वस्तु जर स्थानिक बाजारात घ्यायची वेळ आली तर त्याच्यासाठी अव्वाच्यासव्वा किंमत द्यावी लागते. शिवाय आपल्याला हवे असे प्रकारही मिळत नाहीत.  त्यामुळे मी जेव्हा जेव्हा भुलेश्वरला येते, तेव्हा या वस्तु अधिकच्या खरेदी करुन ठेवते.  तसेच चालू होते.   मोत्यांच्या लडी घेऊन झाल्या.  साडीवर रेशीम काम करायचे होत.  त्याच्यासाठी रेशीम आणि त्या रेशीम कामाला कडा म्हणून हि-याची लड घेतली.  आता  फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या आणि अन्य बारीक मणी राहिले होते.  एव्हाना सायंकाळचे चार वाजून गेले होते. आमची खूप पायपीट झाली होती.  मुख्य म्हणजे नवरा वैतागला होता.  आता आवर, असा त्याचा घोषा सुरु होता.  पण एवढंच आहे, एवढंच आहे म्हणत मी त्याला अजून एका दुकानात घेऊन गेले.  आत्तापर्यंत या सगळ्यासाठी नव-याचेच पाकीट खाली होत होते.  मला आवर घालण्यासाठी त्यानं त्याचा हुकमी डायलॉग मारला.  आता पैसे तू दे, म्हणत



त्यानं दुकानातील एका स्टुलावर बसकण मारली.  मी भरपूर प्रकारचे मणी, टिकल्या खरेदी केल्या.   पैसे द्यायची वेळ आल्यावर माझ्या बॅगमध्ये शोधू लागले.  तर नेमकं पैशाचं पाकीटच विसरलेलं.  नव-याला सांगितलं.  आता तो पार वैतागला.  हे शेवटचं.  आता घरी निघूया, म्हणत त्यानं पैसे चुकते केले.  माझ्या खांद्यावर चांगल्या दोन पिशव्या झाल्या होत्या.  टॅक्सी करुया म्हणून नवरा मागे लागला.  पण माझी खरेदी कुठे झाली होती, बरं हे बोलायचीही आत्ता सोय नव्हती.  म्हणून मी चालत जाऊया, टॅक्सी

ट्रॅफीकमध्ये अडकेल असा सूर लावला.  तोही मग निमूट चालायला लागला.  माझी युक्ती कामी आली.  वाटेत बरीच छोटी-मोठी खरेदी झाली.  या क्रॉफर्डमधून बाहेर पडतांना नेमका मोठा पाऊस आला.  तेव्हा आम्ही फुले मंडईच्या समोरच.  पावसापासून बचाव करण्यासाठी या मंडईत गेलो तेव्हा जवळ असलेल्या पिशव्यांमध्ये आणखी दोन पिशव्यांची भर पडली.  दोन्ही खांद्यांवर दोन-दोन पिशव्या घेऊन मी मजेत चालत होते.   सीएसटीला ट्रेन पकडल्यावरही या मण्या-मोत्यांच्या पिशवीला मी माझ्यापासून दूर केले नाही.  नव-याचा फोन सतत वाजत होता, त्यानं उचलला तर लेकाचा फोन.  त्याची तक्रार चालू झाली.  कुठे आहात, आईला कधीचा फोन करतोय, ती फोन का उचलत नाही...मग नवरा सुरु झाला.  अरे माझं काम होतं क्रॉफर्डला.  तिला चुकून विचारलं येतेस का म्हणून आणि

फसलो.  आली ती आली आणि पाकीट विसरली म्हणे.   मुद्दामून नाही आणलं.  काय काय खरेदी  केलंय विचारु नकोस.  मग पलिकडून लेक बोलू लागला.  बाबा तुम्हाला माहित आहे ना आईचं....त्या दोघांचं चालू होतं.   मी मात्र माझ्याच जगात फिरत होते.  छातीशी घट्ट पकलेल्या त्या पिशवीत मणी, मोती, जरदोजी, रेशीम होतं.  मला त्यापासून तयार झालेला साडीच्या पदरावरील डौलदार मोर दिसत होता.   मनमोहक जग असतं हे छंदाचं.  त्याला फक्त बहरु द्यायचं असतं. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khup chhan lekh

    ReplyDelete
  2. अरे वा माझाही आवडीचा विषय ,गेल्यावर हे घेऊ की ते असंच होत हवरतासारखं ,कितीतरी नाविन्यपूर्ण साहित्य उपलब्ध आहे तिथे , मला कधी योग येतोय ??

    ReplyDelete
  3. मस्तच.मीसुद्धा मनाने भुलेश्वरला फेरफटका मारला.

    ReplyDelete
  4. Khup chan lekh

    ReplyDelete
  5. व्वा.. सई... छान लेख लिहिला आहे.. तुझ्या सर्व लेखनातून तूझ्या अष्टपैलू पेक्षा जास्त गोष्टी...चे दर्शन घडते.... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐👌👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment