पुन्हा तेच...आईची,
आईसाठीची तगमग
जवळपास तासभर झाला होता, ती फक्त बोलत होती आणि मी समजावत होते, ऐकत होते. हे सर्व किती वेळ चालणार याची मला कल्पना नव्हती. समोर बोलणारी अवनी शांत होत नव्हती. आम्हीच एवढी सूट दिली का ग. की फक्त मी दिली. मी तिला कधीही हे करु नकोस, म्हणून थांबवलं नाही. पण आता तिला समजायला हवं ना. आणि तिनं तरी मला समजून घ्यायला हवं. मी तिच्यासाठी एवढं केलं, मग तिनं मला त्या बदल्यात काहीतरी द्यावं हे मी सांगेन का. तूच सांग ना. आमचं नातं काय व्यापा-याचं आहे. अग सख्खी लेक ना. असं बोलतं अवनीनं पुन्हा गळा काढला. खरं तर मला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. मी तिला बोलता बोलता चारवेळा तरी सांगितलं असेन चल घरी जाऊया. पण अवनी उठत नव्हती. संध्याकाळी काहीतरी वेगळा पदार्थ करायचं ठरवलं. त्यासाठी नेमक्या मिरच्या घरात नव्हत्या. फक्त त्या मिरच्या आणायला बाहेर पडले, आणि या अवनीच्या ताब्यात सापडले. माझ्या एका मैत्रिणीच्या लेकीच्या डोहाळजेवणाचे फोटो फेसबूकवर टाकले होते. ते या बाईंनी पाहिले. त्याचाच आधार घेऊन तिच्या मनातील दुखरी सल मला सांगत होती. भाजीवाल्याच्या बाजुलाच एका बाकड्यावर तिनं मला बसवलं आणि तिच्या लेकीच्या, आभाच्या तक्रारी सुरु झाल्या.
अवनीची एकुलती एक लेक आभा. अत्यंत हुशार. इंजिनीअर. मग एमबीए केलं. मोठ्या पगाराची नोकरी. लग्न होऊन पाच वर्ष झाली आहेत. तिचा नवराही मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर. उपनगरात मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये आभा रहायची. सोबत सासू सासरेही. एकुलती एक लेक असलेली आभा लाडात वाढलेली. अवनीनं कधी तिला काही करण्यासाठी थांबवलं नाही. लग्न झाल्यावर पहिलं वर्ष छान गेलं. अवनीचं आणि आभाच्या सासूची छान मैत्री झाली. पण लग्नाला वर्ष झाल्यावर सासूनं आभाला बाळाबाबत विचारलं. सर्व छान आहे. सेटल आहोत. आम्ही दोघंही आणि तुझे आई बाबाही बाळचं सर्व करु शकतो. लग्न झाल्यावर एक वर्षात बाळ झाल्यास हरकत नाही, असं तिनं आभाला सुचवलं. स्वतंत्र बाण्याच्या आभाला सासूचा हा सल्ला पटला नाही. थोडा वाद झाला. आभाच्या नव-यानंही ऑफीसचं कारण पुढे केलं. अमेरिकेमध्ये कंपनी पाठवत असल्याचे सांगितले. आभाही तेथे नोकरी करणार होती. या बातमीमुळे आभाच्या सासूला धक्का लागला. मग बाळाचं काय, असं तिनं थेट विचारलं. तेव्हा तिकडे गेल्यावर बघू, मग बाळाला त्या देशाचे नागरिकत्व मिळेल, असा मुद्दा आला. अरे ते बाळ आहे, मशिन नाही. तुम्हाला हवं तिथं व्हायला. असे एकापाठोपाठ एक मुद्दे पुढे आले. वाद वाढला. अगदी अवनीपर्यंत पोहचला. अवनीनं लेकीची बाजू घेतली. आम्ही तिला एवढी शिकवली ती कशाला. जाऊदे परदेशात. दोघंही तयार आहेत ना. मग तुमचं काय जातंय. या शब्दांनी तिचं आणि आभाच्या सासूचं नात तुटलं.
त्यानंतर काही महिन्यातच आभा आणि तिचा नवरा परदेशात स्थलांतरीत
झाले. मोठ्या फ्लॅटमध्ये तिचे सासू-सासरे एकटेच राहिले. तरीही सासू आभाला विचारायची. पण नवीन देश आहे. नोकरी नवी आहे. इथे जरा स्थिरावू दे. अशी कारणे पुढे आली. त्यानंतर कोरोना आला. मग ते कारण पुढे आले. दरम्यान आभाच्या सासू-सास-यांनी या विषयावर आता बोलायचे नाही हे ठरवले. कोरोनाच्या काळात त्या दोघांनी स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळले. इकडे आभाचे आईवडीलही एकटे होते. आभानं आणि तिच्या नव-यानं या चौघांना एकत्र रहाण्यासाठी सुचवले. आम्हालाही लक्ष ठेवलायला बरं होईल, असंही सांगितलं. पण आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही काळजी घ्या, असं सांगून या चौघांनीही त्यांचा प्रस्ताव फेटाळला.
आभाची लग्न होऊन आता पाच वर्ष होत आली आहेत. आभानं तिशी पार केलीय आणि तिचा नवरा पस्तिशीला पोहचालाय. दोघंही त्यांच्या आई वडीलांना इकडे या, म्हणून बोलवतात. पण तिथलं वातावरण, प्रवास आम्हाला झेपणार नाही म्हणून ते टाळतात. अर्थात यामागे कारण वेगळं आहे. आता काही दिवसापूर्वी एका कौटुंबिक समारंभात हे आईवडील एकमेकांना भेटले. तेव्हा पुन्हा बाळाचा विषय निघाला. आभाच्या वडिलांनी हात जोडले. तर सासरे म्हणाले सून खूपच मुक्त विचारांची आहे. आभा आणि तिचा नवरा चार महिन्यांनी येणार आहेत. तेव्हा त्यांना मी खडसावून विचारते, असं आभाची आई म्हणाली. तेव्हा तिची सासू नको म्हणाली. आता वेळ गेलीय, खडसवण्याची. आम्ही बोलणार नाही. तुमच्या लेकीला तुम्ही यासाठीच शिकवलत का. होऊदे तिला खूप मोठी. पुन्हा वाद झाले. तेही दुस-याच्या घरी. तिथून मान खाली घालून अवनी घरी आली. घरी आल्यावर तिच्या नव-यानंही यावर वाद घातला. हे सर्व तुझ्यामुळे, सांगून तिला बोल लावले. पहिल्यांदाच तू आभाला चार गोष्टी समजावल्या असत्यास तर आता बाळाची आई असती ती. या बोलांनी अवनी हळवी झाली. तिनं लेकीला फोन केला. ती नेमकी ऑफीसमध्ये. कधीपण काय फोन करतेस. म्हणून तिनं सुरवात केली. झालं. अवनीनं रडून घेतलं. अगं बाळाचं काय. कधी होणार तुझं करिअर म्हणून रडत प्रश्न विचारु लागली. व्हिडीओ कॉल. आभा वैतागली. या काय ऑफीसमध्ये बोलायच्या गोष्टी आहेत का, म्हणत फोन कट केला. नंतर घरी आल्यावर तिनं आईला
फोन केला. पुन्हा भांडण. इथे आम्ही काय मजा मारतोय की काय, म्हणत तिनं आईलाच परत ओरडून घेतलं.
अवनी तेव्हापासून पार कोलमडली आहे.
खूप मागे तिनं या विषयाबाबत मला सांगितलं होतं. आभाचा आणि माझा चांगला संपर्क असतो. मी तिला अवनीच्या शब्दाखातर मेसेज पाठवून
बाळाबाबत विचारले होते, तेव्हा आभानं प्रमोशन, नवीन घर, त्याचे हफ्ते, सासू-सासरे
रहात असलेल्या घराचे हफ्त अशी अनेक कारणं पुढे केली. हे सर्व आर्थिक नियोजन होण्यासाठी आणखी वर्षभर
लागेल. नंतरच बाळाचा विचार करु असे स्पष्ट
सांगितले. मी अवनीला ते मेसेज दाखवले
होते, आणि आता या विषयावर मी आभाबरोबर बोलणार नाही, असेही स्पष्ट केले होते. आता तीच अवनी पुन्हा मला आभाबरोबर बोलण्याचा
आग्रह धरत होती. जवळपास तासभर अवनी आणि मी
त्या बाकड्यावर बसलो होतो. दुपारचे दोन
वाजत आलेले. तो भाजीवालीही त्याचे दुकान
बंद करण्याच्या विचारात होता. त्यानं
माझ्या मिरच्या माझ्या हातात दिल्या आणि तो दुकानाची आवराआवर करायला लागला. तासभर भाजी घेण्यासाठी येणारे आमच्याकडे,
विशेषतः अवनीकडे बघून पुढे जात होते. मी
तिला म्हटलंही, अग बघ लोकं बघताहेत आपल्याकडे,
पण जाऊदे, लोकांचं लोक बघतील म्हणत ती सुरु होती. यावर काय सल्ला देणार. मी तिला आभाच्या सासू-सास-यांकडे जाण्याचा
सल्ला दिला. नाही म्हटलं तरी तेही
तिच्यासारख्याच मानसिकतेतून जात होते.
रागवतील, ओरडतील. पण
कितीवेळा. नंतर समजून घेतील. चार महिन्यात आभा आणि तिचा नवरा येईपर्यंत
तुमचे चौघांचे संबंध चांगले करा. कधीतरी
थोडा कमी पणा घेतला तरी काही होत नाही.
असं तिला सांगून बघितलं. अवनीनं
मान डोलावली. तू म्हणतेस तर प्रयत्न करुन
बघते म्हणाली. आता खूपच वेळ झाला
होता. हातातली मिरचीची पिशवी पकडत मी
माझ्याबरोबर तिलाही उठवलं. नात्यात मिरची
नको ग...गोडवा हवा. तुझी चूक आहे, असा
ठपका आलाय ना, मग तूच पुढाकार घे. तुमचं
चौघाचं बॉण्डींग झालं की एक प्रश्न सुटेल.
मग त्या आभाकडे बघता येईल. अवनी हो
म्हणत घराकडे निघाली. मी तिला पाठमोरी बघत
होती. एक थकलेली आई, आपल्या लेकराच्या नव्या वाटेसाठी पुन्हा कामाला
लागली होती.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Nice information very touching
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDelete