खिरापत

 

खिरापत


त्या भागात गेले तेव्हाच जाणवलं,  आपली वेळ चुकली.  नव-यानं आठवड्यात काही कामासाठी सुट्टी घेतलेली.  तेव्हा वेळ पाहून मी मॉलमध्ये जाण्यासाठी त्याला सुचवलं.  मधला वार.  मॉलमध्ये एरवी असणारी तुफानी गर्दी कमी असेल हा हिशोब करत नव-यानंही होकार दिला.  मात्र मॉलमध्ये गेल्यावर आपणच फक्त शहाणे असल्याचा समज दूर झाला.  ही....गर्दी.  अगदी मोठी रांग लागलेली.  आता मध्येच काय, किती गर्दी.  असे म्हणत असतांनाच गणपती बाप्पांची आठवण झाली.  अगदी दहा-बारा दिवसांवर बाप्पांचं आगमन आहे.  त्यामुळेच मॉल तुफान भरलेला.  नव-यानं एकदा विचारलं, जाऊया का परत.  खूप वेळ लागेल.  पण एकदा आल्यावर परत कशाला जायचं.  नाही, म्हणत मी त्या गर्दीमध्ये सामावण्याचा प्रयत्न करु लागले.  मॉलमध्ये प्रवेशाची सगळी प्रोसेस झाल्यावर बघितलं तर अजून एक आश्चर्य.  सुरवातीचा सगळा भाग खाली.  एवढी गर्दी गेली कुठे, म्हणून पुढे बघितलं तर खाऊ असलेल्या ठिकाणी, कोल्डड्रींकच्या रॅकजवळ गर्दी होती.  मला उत्सुकताच फार.  माझं सामान खरेदी करायचं सोडून बाकीजण काय खरेदी करत आहेत, हे बघण्यासाठी मी सुद्धा पुढे गेले.  तर सर्वांच्याच ट्रॉली भरलेल्या.  त्यात ड्रायफूट मिक्स, छोटी बिस्कीटं, चॉकलेट यासोबत कोल्डड्रिंकच्या बाटल्यांनी ट्रॉली भरल्या होत्या.  एक ट्रॉली तर फक्त कोल्डड्रींकच्या बाटल्यांनीच भरली होती.  मी डोळे मोठे करत म्हटलं, बापरे, एवढं सर्व बाप्पासाठी.  त्यावर ती ट्रॉली पकडून असलेल्या


महिलेनं सांगितलं, नाही हो, गावाला गणपतीला हे बरं पडतं.  प्रसादाला चॉकलेट आणि येणार जाणा-यांसाठी  कोल्डड्रींक ठेवलं की आपलं एक काम कमी होतं.  तिच्याबरोबर आणखी काही बोलणार होते, तितक्यात नव-यानं मागे खेचलं.  दुस-यांनी काय घेतलं आहे, याची चौकशी करायला आलीस का.  आपल्या सामानाचं बघ, म्हणत त्यानं आमची ट्रॉली हातात दिली.  मी मागे फिरले.  पण जेवढ्या ट्रॉल्या दिसत होत्या, त्या अशाच प्रसाद आणि कोल्डड्रिंकनं भरल्या होत्या.  मला आठवलं,  लहानपणी दिड दिवसाच्या गणपतीसाठी घरात अवघं गाव यायचं.  पण त्यांना काय द्यायचा हा प्रश्नच कधी याचचा नाही.  कारण खिरापतीनं आमचे डबे कायम भरलेले असायचे.  आलेल्या प्रत्येकाच्या हातावर खिरापत द्यायची आणि हळूच आईचा डोळा चुकवत त्याचा बकाणा मारायचा. 

अलिकडे सर्वच कल्पना बदलत चालल्या आहेत.  त्यापैकीच ही प्रसादाची पद्धतही बदलत चालली आहे.  अर्थात सध्याच्या या धावपळीत प्रत्येकजण ज्या भक्तीनं गणरायाची सेवा करतात त्याचं कौतुक वाटतं.  पण या सर्वात काही ठिकाणी गणरायाच्या साध्या आगमनाला एकदम स्टायलिश आवरण


घातलं गेलंय.  गणपती बाप्पा अगदी साध्या राहणीचा देव.  मातीचा.  आणि पुन्हा मातीत सामावणारा.  त्याचं आगमन हे खूप मोठा संदेश देऊन जातं.  त्याला फार मोठी सजावट लागत नाही की प्रसादाची धामधूम.  अगदी साध्या मखरावर बसवलं आणि बाजुनं दोन समया लावल्या, तरी त्या देवाला तेज मिळतं.  अगदी फार नाही, पण बाजुला दोन कुंड्या ठेवल्या तरीही किती छान साजवट तयार होते.  तसंच त्या देवाच्या प्रसादाचं.  त्याला काय आवडतं तर मोदक.  मोदक करायला फक्त तीन पदार्थ पुरे पडतात.  नारळ, गुळ आणि तांदळाचं पिठ.  या तिघांचे मोदक दिले की आमचा बाप्पा खूष.  बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणा-यांच्याही हातावर अगदी हेच गुळ खोबरं दिलं तरी तेही खूष असायचे.  माझं तर सर्व बालपणचं गुळ खोब-याच्या आवरणात गेलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  आमच्या रेवदंड्यात नारळाची कधी कमतरता जाणवली नाही.  गणपती-गौरीच्या दिवसात तर घराघरात दिवसभर बहुधा नारळ खोवला जातो.  गणपतीच्या दिवसात तर सर्वात नारळ.  अगदी प्रसाद म्हणूनही नारळ, साखर हातावर दिला जायचा.  त्यातही हा मोहाचा नारळ असेल तर अगदी लॉटरी.  मुळात गणपती जवळ आल्यावर हे मोहाचे नारळ बाजुला पडायचे.  या खोवलेल्या पांढ-या शुभ्र नारळाच्या खोब-यात थोडीशी साखर आणि अगदीच चैन म्हणजे, वरुन जायफळाची पूड घालायची.  हा प्रसाद हातावर दिला की तो लगेच तोंडात जायचा.  बाजुला ठेवा, मी नंतर खाईन, अशी भानगडच नाही.  या सर्वांसोबत आणखी एक प्रसाद असायचा तो म्हणजे, खिरापत.  ही खिरापत एक मेजवानीसारखीच असायची.  ब-याचवेळा येणा-या जाणा-यांपेक्षा आम्ही घरातील बच्चे मंडळीच या खिरापतीवर ताव मारायचो.  त्याच्यावरच पोट भरलं जाचयं.  अर्थात आई, हलकेस ओरडायचीही.  पण त्या खिरापतीमध्ये पोषक घटकही खूप असायचे, त्यामुळे तिचा हा ओरडाही वरवरचा असायचा. 


खिरापतीसाठी मुख्य साधन म्हणजे, खोबरंच.  पण ते सुकं. साखर, खसखस, काजू, बदामाचे तुकडे, थोडी खारीकेची पावडर आणि जायफळाची पूड.  गणपती बाप्पा येणार त्या रात्री सगळी कामं झाली की आई खिरापयत करायला घ्यायची.  सुक्या खोब-याच्या वाटीला असलेली काळी साल हलकीशी काढून टाकायची.  मग पांढरा शुभ्र खोब-याचा पेरा पडायचा.  त्याला तसाच शुभ्र रंग राहील अशा बेतात भाजायचं.  थंड झाल्यावर त्याला अगदी बारीक केल्यासारखं करायचं.  मग त्यात बेतांन बारीक केलेली साखर, खारीक पावडर किंवा खारीकेचे बारीक केलेल तुकडे,  भाजलेली खसखस आणि हवे असतील तेवढे सुक्या मेव्याचे तुकडे,  वरुन जायफळाची पूड.  झाली की खिरापत.  कितीसा वेळ लागतो ती करायला.  गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमय वातावरणाचाही बहुधा त्यावर परिणाम व्हायचा.  अप्रतिम चवीचे  हे खिरापतीचे डबे ठेवायचीही जागा वेगळी असायची.  देवाचा मखर केलेल्या टेबलाखाली ही खिरापत असायची.  म्हणजे, देवासमोरची खिरापतीचा वाडगा संपला की लगेच डब्यातून तो भरला जायचा.  पण  जर टेबलाखाली खिरापतीचे दोन डबे ठेवलेले असले, तर नक्कीच एखादा छोटा डबा आई तिच्या खास तिजोरीत ठेऊन द्यायची.  का, तर तिला माहित असायचं. ही बाहेरची खिरापत येणा-यांपेक्षा आम्हा मुलांच्याच पोटात अधिक जाणारी.  आयत्यावेळी खिरापत संपली तर राखीव असावी म्हणून तिची नेहमीची युक्ती कामी यायची.  या खिरापतीशिवाय प्रसादासाठी हमखास असणारा प्रकार म्हणजे, खडीसाखरेचे मोठे तुकडे आणि साखर फुटाणे.  या दोन्ही गोष्टींची आगळी गम्मत असायची.  कारण गणपती दर्शन करायला गेल्यावर कोणाकडे खडीसाखरेचे किती मोठे तुकडे आहेत, याची नंतर गम्मतशीर चर्चा व्हायची.   साखर फुटाण्यांचीही तशीच गम्मत.  आकाशातील

ढगांच्या आकाराच्या या फुटाण्यांच्या आता चणे किंवा शेंगदाणे असायचे.  आम्हा लहानग्यांना कामं काय.  खडीसाखर एका गालात भरायची.  ती बर्फगोळा भरला अशा थाटात चोखत खायची.  आणि मग कोणाच्या कडे किती मोठी खडीसाखर मिळाली.  कोणाच्या साखर फुटाण्यात चणे मिळाले की शेंगदाणे मिळाले.  आणि कोणी छोट्या चमच्यानं खिरापत दिली की मोठ्या चमच्यानं दिली, या आधारावर प्रत्येक घरातील गणपतीच्या प्रसादाचे विश्लेषण व्हायचे.  अगदी सर्व साधं सरळ होतं. 

पण आता या भरलेल्या ट्रॉल्या बघून जाणवलं, आपल्यासोबत देवही बदलला आहे की काय.  देवानंही प्रसाद म्हणून चॉकलेट, चांदीच्या आवरणातल्या मिठाया आणि ड्रायफ्रूटला पसंती दिली आहे.  सोबत भरलेल्या खाऊची पाकीट


हातात दिली की सर्वांचेच काम सोप्पं होतं.  आलेल्या पाहुण्यांचे आणि यजमानांचेही.  अर्थात यालाच कालाय तस्मै नमः म्हणतात नाही का. 




सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. रेवदंडा यासारखी खिरापत बनवुन ठेव पुढील रविवारी घ्यायला येतो

    ReplyDelete
  2. खिरापत....लेख खुप छान आहे👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment