चिबुडाच्या एका फोडीसाठी

 

चिबुडाच्या एका फोडीसाठी


जिभेचे चोचले,  लाड असे काही असतात, की ते पूर्ण केले नाही तर चैनच पडत नाहीत.  याच जिभेसाठी आणि पोटासाठीही एक आवडतं फळ म्हणजे, चिबूड.  श्रावण महिना सुरु झाला की हे चिबूड विक्रीस येतं.  कोकणामध्ये तर गणपतीसाठी चिबूडाशिवाय दुसरं फळ नसतं.  पिवळा, नारंगी, गुलाबी अशा रंगाच्या छटा असलेलं, गोल आणि लांबट आकाराचं हे चिबूड अतिशय गोड.  भुकेची आणि पाण्याची गरज या एकाच फळातून पूर्ण होणार.  अर्थात माझं तर अतिशय लाडकं फळ.  या फळाबरोबर लहानपणाच्या अनेक आठवणी जोडल्यामुळेही हा चिबूड अतिशय लाडका आहे.  याच चिबुडानं यावर्षी माझ्याबरोबर दुरावा केला की काय हा प्रश्न पडला.  बाजारात चिबूड विक्रीसाठी यायला लागल्यावर माझी त्याच्यावर झडप पडते.  यावर्षी तर अधिक महिना आलेला.  त्याच्या मध्यावरच बाजारात चिबूड दिसायला लागले.  नेहमीच्या भाजीवालीकडून अगदी शंभर रुपये मोजून एक चिबूड घरी आणला.  पहिल्या चिबूडाचे कोण कौतुक.  नव-यानं त्याच्याकडे एक नजर टाकत सांगितलं,  खूप लहान आहे,  आणि खराब वाटतोय.  पण मी कशाला ऐकतेय.  सकाळी कुठलाही वेगळा नाष्टा करायचा नाही.  दुस-यादिवशी


चिबूडाचाच नाष्टा म्हणत, मी त्याला छान फळांच्या टोपलीत भरुन ठेवलं.  पण दुस-या दिवशी या चिबुडाला पार चिरा गेल्या.  घर एका खराब वासानं भरुन गेलं.  चिबूड कापल्यावर तो आतून खराब झाल्याचे समजले.  पहिल्याच चिबूडानं असं फसवल्यावर मग मात्र दुस-यावेळी काळजीपूर्वक खरेदी केली.  तेव्हाही असाच अनुभव.  काय झालं असावं.  मन खट्टू झालं.  त्यानंतर इच्छा असूनही या लाडक्या चिबुडाला घरी आणयला भीती वाटू लागली.  पण या अविट गोडीपासून किती दिवस दूर पळणार.  शेवटी अनहूतपणे हा चिबूड घरी आला.  सोनेरी रंग.  अगदी हलक्या हातानं, सुरीच्या सहाय्यानं त्याचे दोन तुकडे केले.  मग तो आतला अबोली, गुलाबी रंगाचा गर पुढे आला.  त्याच्या बिया ताटात पडल्या.  घाईघाईनं एक फोड तोंडात टाकली.  आहाही...हाच तो स्वाद.  रवाळ चव.  अप्रतिम.

चिबूड आणि कोकणाचं अनोखं नातं आहे.  कोकणात एप्रिल, मे या महिन्यात


काजू, फणस आणि आंबा यांच्याशिवाय दुसरं फळ दिसत नाही.  तसंच श्रावणात या चिबूडाशिवाय दुसरं फळ नसतं.  आमच्या आलिबाग, रेवंदडा भागातील हे चिबूड तर अधिक चवदार असतात.  लहानपणी तर कितीतरी उपवास फक्त या चिबूडाच्या आधारानं केलेले.  श्रावण महिना सुरु झाला, की टोपल्यामधून विकायला आलेले चिबूड खुणवायचे.  मुळात हिरवागार चिबूड पिकल्यावर सोनेरी, पिवल्या रंगात रंगून जातो.  नेहमी चांगला चिबूड कुठला हा प्रश्न पडायचा.  तेव्हा एका विक्रेत्या महिलेनंच सांगितलं होतं,  पिवळसर रंगाचा चिबूड गोडीला भारी.  का, तर तो अधिक काळ वेलीच्या सहाय्यानं असतो.  हिरवे चिबूड घरी आणल्यावर पिकतात.  पण त्यापेक्षा वेलीच्या आधारानं तयार झालेला चिबूड अधिक गोड लागतो.  हा चिबूड आवडायचं एक पहिलं कारण म्हणजे,  त्याला कापण्यात आणि खाण्यातही काही त्रास नाही.  नुसता कापला आणि फोडी केल्या की खायला सुरुवात.  या फोडींवर काहीजण साखर, मिठ, आणि काळीमिरीही टाकून घेतात.  मला तर ही बाकीची फोडणी या फळावर कधीच आवडली नाही.  नुसती या फळाची गोडीच इतकी अविट आहे, की त्याच्यापुढे या सोबतली घेतलेल्या चवी अगदीच उप-या वाटतात. 

गावी, रेवदंड्याला चिबूडाच्या साथीनं हरताळकेचा उपवास व्हायचा.  गणपतीपुढे तर चिबूड हवाच.  कोणाचा चिबूड मोठा याचीही स्पर्धा असायची.  गणपती विसर्जन होतांना बाप्पासमोर ठेवलेल्या सर्व फळांचा एकत्र नैवेद्य दाखवला जायचा.  पण या चिबुडाच्या मात्र मोठमोठ्या फोडी असायच्या.  या मोठ्या फोडी एकसाथ तोडांत भरुन खायची मजा काही औरच होती.  पुढे काही वर्ष आम्ही पेणला रहायला होतो.  तेव्हा तर अगदी घराशेजारच्या मळ्यामध्ये चिबूड व्हायचे.  अगदी डोळ्यासमोर तयार झालेल्या या सोनेरी फळाची चव शब्दात कधीच सांगता येणार नाही.  नंतर संसारात रुळल्यावर मध्येच कधीतरी स्वयंपाकघरात नवा प्रयोग करायची हुक्की येते, तशीच या चिबुडाबाबत एकदा झाली होती.  एका मैत्रिणीनं थोड्या कच्च्या चिबुडाची कोशिंबीर करायला सांगितली.  चिबुडाच्या बारीक फोडी करुन त्यात दही टाकायचं.  मग चवीला मिठ आणि साखर.  हिरवी मिरची बारीक करुन.  शिवाय डाळींबाचे दाणे.  मग हे सर्व मिक्स करुन वर तुप, जि-याची फोडणी टाकायची.  मी ही कोशिंबीर केली.  पण एका घासाशिवाय जास्त खाऊ शकले


नाही.  अर्थात त्याची चव छान झाली होती.  कारण नव-यानं तो कोशिंबीरीचा अख्खा बाऊल संपवला होता.  पण काही फळं अशी आहेत,  ज्यांच्यावर असे अत्याचार करणं मला कधी शक्यच होत नाही. त्यात या चिबुडाचाही समावेश आहे.  मध्ये कुणीतरी सांगितलं, की ते चिबूड आणि केळं मिक्स करुन स्मुदी नावाचा प्रकार चांगला लागतो.  याक....कसं लागेल ते.   मी विचार केल्यावरच तोंड वाकडं केलं.  ज्यांना आवडतं त्यांना सलाम.  चिबूड कापेपर्यंतच माझा संयम असतो.  नंतर तुट पडो....त्यात ज्या फळाची चव अविट गोडीची आहे.  त्याची सरमिसळ अन्य फळांसोबत कशाला करायची. 

तर यावर्षी जरा उशिरानं का होईना चिबूड चाखता आलं.   माझी मैत्रिण दरवर्षी गणपतीला तिच्या गावी गेल्यावर तिच्या शेतातील चिबूड आणते.  यावर्षी हा चिबूड घरी आला.  पण तेव्हा मी होते, बेळगावला.  त्यामुळे नव-याला आयती लॉटरी लागली.  त्यानं तो चिबूड एकट्यानं फस्त केला.  मी घरी आल्यावर आल्याआल्या त्या मधाळ चवीचं कौतुकही केलं.  माझं मन पुन्हा त्या चवीत रमलं.   दुस-या दिवशी बाजारात गेल्यावर नेहमीच्या भाजीवालीकडे चिबूड होते.  तिला आधीचा अनुभव सांगिताल.  तेव्हा तिनं


शोधून एक गोल चिबूड हातात दिला.  हा बघ याची चव सांगायला उद्या ये आणि पैसे दे....असं हक्कानं सांगितल्यावर काय करता.   घरी आल्यावर त्या सोनेरी फळाचे दोन भाग केले आणि त्याच्या अबोली रंगाच्या गरानं माझे गाल मात्र गुलाबी झाले.   

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. कोकणनच सर्वांचा आवडता "चिबुड"या विषयावरील लेख खुप छान आहे.👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान लेख वाचून आठवणींना उजाळा

    ReplyDelete
  3. छान झाले आहे लेख। तुम्ही खाता खाता लिहीत होता असे वाटले

    ReplyDelete
  4. चीबूड या विषयावर इतका सुंदर लेख लिहिता येतो हे तुम्ही दाखवून दिलेत. खरंच या फळाची चवच न्यारी.पण पनवेलला सेटल झाल्यापासून अलीबागच्या बऱ्याच गोष्टी मिस करतोय त्यापैकी एक म्हणजे चीबूड .खूप छान लेख...

    ReplyDelete
  5. मस्त लेख आहे

    ReplyDelete
  6. मस्त लेख आहे

    ReplyDelete

Post a Comment