एक पिढी आणि त्यातील अढी
बेळगावहून आमच्यासाठी आठवणीनं कुंदा घेऊन ये...नाहीतर...गेल्या आठवड्यात मी बेळगावला जाण्याआधी माझ्या घरी येऊन मला धमकवण्यासाठी माझी मैत्रिण सुमन, तिच्या सुनेसह आणि नातवासह आली होती. दोघींनी भरपूर गप्पा मारल्या, नातवांनं मस्ती केली आणि पुन्हा मला प्रेमळ दम भरुन निरोप घेतला होता. त्याच सुमनच्या घरात मी बेळगावचा तिचा आवडता खाऊ घेऊन पहिलं पाऊल टाकलं आणि जाणवलं, की वातावरण बिघडलं आहे. माझ्या हातातील कुंद्याचे पाकीट बघूनही सुमनची कळी खुलली नव्हती. घरात अजाण शांतता होती. तिची सूनही बहुधा घरात होती. नातू कोप-यात काहीतरी खेळत बसला होता. सुमननं हातातला कुंद्याचा बॉक्स घेतला, आणि माझी चौकशी केली. प्रवास कसा झाला, विचारलं. पण नेहमीचा उत्साह नव्हता. मी तिचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळले, तोच आतून माझं नाव घेत सून बाहेर आली. आज ऑफीसला सुट्टी का, म्हणत आम्ही दोघी बोलायला लागलो. सुमनच्या सुनेचा, अभिलाषाचा स्वभावही सासूसारखा मनमोकळा. मला हात पकडून तिनं बसवून घेतलं. म्हणाली, आमच्या दोघींमध्ये आज पहिल्यांदा एका गोष्टीवरुन थोडासा वाद झालाय, तुम्ही सांगा, कोण बरोबर आहे ते....मी डोक्याला हात लावला. मी नको, तुम्ही दोघीही छान आहात, सुजाणा आहात, तुमच्यातच बोलून वाद मिटवा, असा प्रस्ताव ठेवला. तर यावेळी सुमननं गळ घातली. बस ना...काय सांगते ते ऐक तरी. मग काय इलाजच नव्हता.
सुमनची सून, अभिलाषा ही पहिल्यापासून स्वतंत्र विचारांची. स्वावलंबी. मोठ्या पदावर कामाला असलेली. ब-याचवेळा परदेशातही तिचा दौरा असतो. या सगळ्यात सुमन तिच्या मागे उभी असते. सुमनला तिच्या याच स्वभावाचं भारी कौतुक आहे. कारण अभिलाषा कुठेही जाणार असली तरी तिचे एक वेळापत्रक ठरलेले असते. घरातील कामाला सुमनला मदत. घरातील सामानाची यादीही पाठ. शिवाय घरच्या सर्व समारंभासाठी सुमनसोबत ती पदर खोचून उभी असते. ब-याचवेळा सुमनच तिला ओरडून आराम करायला पाठवते. आर्यन झाल्यावरही अभिलाषा माहेरी गेली नव्हती. सुमनचं तिचं बाळतंपण केलं. ती पुढे पुन्हा ऑफीसला जायला लागली आणि आर्यनची सर्व जबाबदारी सुमनलं हसत स्विकारली. बघता बघता सहा वर्षाचा आर्यन शाळेत जाऊ लागला. या छोट्या आर्यननं आपली कामं स्वतः करायला शिकायला हवं म्हणून अभिलाषाचा हट्ट सुरु झाला. अगदी शाळेतून आल्यावर आर्यन आपले शूज रॅकमध्ये ठेवत नाही, म्हणून तिनं काही दिवसापूर्वी त्याला दम दिला होता. तेव्हा सुमन मागून धावत आली, अग राहू दे, लहान आहे तो...म्हणत ते शूज तिनं रॅकवर ठेवले होते. अभिलाषानं तेव्हा पहिल्यांदा सुमनला अडवलं होतं. हा शिस्तीचा भाग आहे, त्यानं त्याची कामं आत्तापासूनच केली तर चांगलेच आहे, म्हणून सुमनला सांगितले. तिच्या या बोलण्याकडे सुमननं दुर्लक्ष केलं होतं. पण अभिलाषा आर्यनला अलिकडे जास्तच सूचना करते, म्हणून सुमनची तक्रार आली. कामं तरी काय, जेवणाची प्लेट बेसिनमध्ये ठेवायची, शूज रॅकमध्ये ठेवायचे. खेळून झाल्यावर खेळणी आवरायची, अभ्यासाचे टेबल स्वच्छ ठेवायचे, गॅलरीतील झाडांना पाणी घालायचे, अशाच सूचना अभिलाषा कायम आर्यनला देत असे. सुमन प्रत्येकवेळा, मी आहे
ना...तू कशाला त्याला ओरडतेस म्हणत आर्यनला बाजुला करत असे.
पण मी गेले त्या दिवशी या छोट्याशा कारणानं सुमन आणि अभिलाषामध्ये पहिल्यांदा वाद झालाच. त्या दिवशी आर्यनचे गॅदरिंग होते. त्याचे पहिले गॅदरिंग म्हणून सुमनच्या लेकानं आणि अभिलाषानं सुट्टी घेतली होती. आजी-आजोबा आणि आई-बाबांसोबर आर्यन गॅदरिंगला गेला. तिथे त्याचा कार्यक्रम झाला. सर्व आनंदानं घरी आले. येतांना आर्यनला आवडते पदार्थ घेऊन सर्व घरी आले. दुपारची जेवणं झाली. जेवण झाल्यावर अभिलाषानं आर्यनला पुन्हा सूचना केली, ताट जागेवर ठेव. आर्यननं याबरोबर त्याच्या आजीकडे बघितलं. आजीनं नेहमीप्रमाणे त्याची बाजू घेतली. आज कशाला. एवढा छान डान्स केलाय, दमला असेल तो...म्हणत आर्यनला बाजुला व्हायला सांगितले. त्यावर अभिलाषा अडून बसली. आजपासूनच त्याला ही सवय लागू दे. आजचा दिवस चांगला आहे. आजपासून आर्यननं त्याचं ताट जागेवर ठेवलं नाही तर त्याला माझा ओरडा खावा लागणार. या वाक्यानं घरात वाद सुरु झाला. सासू आणि सुना अडून राहिल्या. अभिलाषा काही वर्ष हॉस्टेलमध्ये राहिल्यानं तिला तिची कामं करायची सवय लागली होती. तशीच आर्यनलाही सवय लागू दे म्हणून तिनं आग्रह धरला. तो काय हॉस्टेलमध्ये आहे. इथे मी आहे ना. त्याला कशाला कामं करायला हवीत. मी आहे, त्याचे आजोबा आहेत, आम्ही बघू. तू काळजी करु नकोस. म्हणत सुमननं अभिलाषाला ऐकवलं. यावर माझ्या मुलाला मी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर कुठे
काय बिघडलं, म्हणत आणखी एक सूर लावला. त्यावर सुमन उखडली. तो महिन्याचा होता, तेव्हापासून मी सांभाळतेय त्याला. तुला कधी बोलले का मी...उगीच वाद वाढवू नकोस, म्हणत तिनं घरातील एक कोपरा पकडला. घरातील बिघडलेल्या वातावरणाचा अंदाज घरातील पुरुषांना आल्यावर दोघांनाही गाडीचे काम आहे, म्हणत काढता पाय घेतला. राहता राहिला छोटा आर्यन. त्यानं नवीन मिळालेली गाडी पकडली होती. आई-आजी पासून दूरचा एक कोपरा पकडून त्याचे चालू होते.
आता त्या दोघींमध्ये आयती फसले मी. मी यावर काय बोलणार. मला दोघींचीही बाजू बरोबर असल्याचा साक्षात्कार झाला. मुलांनी स्वतःची कामं स्वतः केलीच पाहिजेत याची जाणीव झाली. मग आठवलं मी कुठे माझ्या लेकाला काय करु दिलं होतं. पण याच लेकानं मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती. त्यात या सुमन आणि अभिलाषाच्या वादावर उपाय होता. Old enough नावाचा जपानी टिव्हीवरचा कार्यक्रम आहे. त्यात अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून ते दहा वर्षाच्या मुलांपर्यंत सर्वांना बाहेर दुकानात जाऊन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते. हातात कामाची लिस्ट आणि पिशवीत पैसे दिले जातात. घरापासून लांब असलेल्या या दुकानातून मग ही छोटी मुलं जाऊन पालकांनी सांगितलेल्या वस्तू आणून देतात. मासे बाजारात जाऊन माश्यांची खरेदी करतात. भाजी आणतात. घरातील सामान आणतात. बागेत काम करतात. हे सर्व करणारी मुलं अगदी दोन वर्षापासून असतात. सामानानं भरलेल्या पिशव्या भरुन येतांना ही मुलं पडतात. त्यांना लागतं. पण त्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून आई-वडिलांनी सांगितलेली कामं करतात. अर्थात हे सर्व ती मुलं करत असतांना त्यांच्या आसपास त्यांच्या प्रत्येक हालचाली शूट करण्यासाठी कॅमेरामनची टीम असते. हा Old enough नावाच कार्यक्रम माझाही आवडता झाला. सुमन आणि अभिलाषाच्या मध्ये बसून मी हा कार्यक्रम मोबाईलमध्ये लावला. दोघींनीही पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. पण नंतर दोघीही त्यामध्ये गुंतल्या गेल्या. अगदी पंधरा-वीस
मिनिटाच्या या कार्यक्रमाला दोघींनीही शांतपणे बघितलं.
कार्यक्रम संपल्यावर मी उठले.
तुम्ही दोघीही आर्यनसाठी काय निर्णय घ्याल तो चांगलाच असेल. पण असे वाद घालून कुठलाही निर्णय होणार नाही.
वाद नको, तर दोघीही पहिल्यासारख्या बोला आणि यातून मार्ग काढा म्हणत बाहेर
पडले. मला आठवलं, पहिल्यांदा मला लेकानं
हा कार्यक्रम दाखवल्यावर मी त्याचा कान पकडून, शहाण्या, मला कधी अशी मदत का केलीस
नाहीस म्हणत, जोरात पिरगळला होता. माझाच
लेक तो. त्यानं दुस-याच क्षणी माझाही कान
पकडला, आणि तू मला असं का पाठवलं नाहीस, म्हणून जाब विचारला. सुमनच्या घरातून
बाहेर पडतांना मला आम्हा मायलेकामधला तो प्रसंग आठवला आणि खुदकन हसू आलं. एका पिढीमधील असलेली ही अढी अनुभवानंच दूर होते
हे मात्र खरं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
There are differences in thoughts.we should respect each other than reaction
ReplyDeleteKhup mast lekh
Deleteखूप छान लेख.मुलांवर जबाबदारी टाकली की मुलं आपोआपच स्वतंत्र विचार करु लागतात.
ReplyDeleteखूपच छान आणि योग्य पद्धतीने आरसा दाखवण्याचं काम केलंय
ReplyDeleteमुलांना वेळीच शिस्त लावणं, घरगुती काम करू देणं हे त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी पडते.छान लेख!
ReplyDeleteSundar aahe mulana lahan panapasoon swavalmbi बनवले पाहिजे palakanni,mothepani,sare सोपे होईल
ReplyDelete