वेणी...

वेणी


हे घे....केसात माळ...म्हणून त्या बाईनं देवीच्या ओटीतील वेणी माझ्या हातात दिली.  मी एकदा देणा-या त्या बाईंकडे आणि एकदा त्या हातातील वेणीकडे बघितलं.  मनातून खुदकन हसू आलं...देवीला तसाच हसत नमस्कार केला,  आणि मंदिराच्या बाहेर पडले.  हातात ती वेणी होतीच.  पिवळ्या शेवंतीची,  त्यावर लाल, हिरव्या रंगाच्या लोकरीचे तुकडे लावले होते.  आणि चकाकीचा तो दोरा.  नवरात्रीमध्ये देवीला ओटी भरायला म्हणून गेल्यावर त्या ओटीतील वेणी पुन्हा माझ्याकडे आली होती.  बराचवेळ ती वेणी हातातच पकडून मी चालत होते.  शेवटी नवरा म्हणाला, पिशवीत ठेव, नाहीतर केसात घाल,  हातात कशाला पकडली आहेस.  पुन्हा केसात वेणी घाल, हा सल्ला मिळाला, तेव्हा मनातील भावना अधिक गडद झाली.  आता अशा वेण्या घालायला केस कुठे आहेत.  लहानपणी दोन वेण्यांवर दोन-दोन शेवतींच्या वेण्या घातल्या आहेत.  आता तसा विचार करुन बघितला मनात, तर पहिला विचार आला, कसं ध्यान  दिसत असू आपण.  पण तेव्हा हा विचार कधी केला नाही.  अर्थात तेव्हाच्या शेवंती आणि अन्य फुलांच्या वेण्या


आणि आत्ताच्या वेण्या यातही माझ्या केसांसारखा कमालीची फरक पडला आहे. 

चौल येथील श्री दत्ताची यात्रा प्रसिद्ध आहे.  डिसेंबर महिन्यात येणा-या दत्तजयंतीपासून पुढचे पाच दिवस ही यात्रा भरते.   लहानपणी ही यात्रा म्हणजे, आमच्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात मोठा इव्हेंट होता.  काय धम्माल केली असेल या यात्रेत.  न चुकता पाच दिवस यात्रेमध्ये मनमुराद भटकंती केली आहे.  दरवर्षी यात्रा असणारच आणि दरवर्षी त्यातील दुकानांची जागा नक्की केलेली असायची.  पहिला दिवस, गेल्या वर्षीचे दुकान यावर्षी नेमके त्याच जागी आहे की नाही, हे पहाण्यात जायचे.  बाकी सर्व दुकानं शोधायला लागायची.  चौलच्या दत्ताचा डोंगर म्हणजे, जवळपास साडेसातशे पाय-या.  या पाय-यांच्या दोन बाजुला ही सर्व दुकानं लागलेली असायची.  या दुकानांच्या रांगेत जरा अंधार असायचा तिथे कुठलं दुकान आहे, हे न सांगताच समजायचं.  ती फुलांच्या दुकानांची रांग असायची.  ही सर्व रांग शेवंती, मोगरा, चमेलीच्या सुवासानं भरलेली असायची.  दत्त महाराजांसाठी शेवतींच्या फुलांचे भरगच्च हार लावून दुकानं सजवलेली असायची.  अंधार पडत आला की या दुकानात रॉकेलच्या आधारानं लागणा-या मोठ्या भणत्यांचे दिवे लावले जायचे.  त्या दिव्यांच्या आधारानं या दुकानांना वेगळेच सौदर्य चढायचं.  पांढरी, पिवळी शेवंती अधिक सुगंधी वाटायची.  अबोलीची फुलं


गडद दिसायची.  मोगरा, चमेली यांच्या उमलत्या कळ्या मोहक दिसायच्या.  या सर्वांमध्ये हिरव्या कंच रंगाची झिपरीची पानं आरामात पडलेली असायची.  तर एका कोप-यात चकाकणा-या झिकचे गुंडे आपल्या प्रकाशात चमकत असायचे.  या अशा वातारणात, ती वेण्या तयार करणारी मंडळी अगदी मानही वर न करता, आपल्या हातांच्या भराभर हालचाली करत सुंदर वेण्या करत असत.  पायाच्या अंगठ्याला गुंडाळलेला चारपदरी दोरा भक्कमपणे एका हातात पकडून दुस-या हातानं त्यामध्ये शेवंती किंवा अन्य फुलांची माळ लावली जायची.  दुस-या दो-याच्या गुंड्यानं भराभर त्याला गुंफले जायचे.  या पांढ-या-पिवळ्या फुलांमध्ये लाल कोंबड्याच्या फुलांचे तुरे, हिरवी झिप्रीची पानं पेरली जायची.  अशा शेवंतीच्या वेण्यांचा ढिग प्रत्येक दुकानात असायचा.  यात्रेच्या निमित्तानं या वेण्या आमच्या बहुधा सर्वांच्या घरात असायच्या.  रोज सकाळी याच शेवंतीच्या वेण्या, शाळेतल्या प्रत्येक मुलीच्या डोक्यात असायच्या. 

लहानपणी लांब केसांची हौस होती.  अर्थात केस कापायचे मनात जरी आले असते, तरी ते आईला सांगायची हिम्मत नव्हती.  असो.  आईच्या कृपेनं केस खरंच छान होते.  आई दर आठवड्याला केसांना रिठ्ठे आणि शिकेकाईच्या पाण्यानं धुवायची.  शिवाय खोबरेल तेलाचा अभिषेकही असायचाच.  याचा कितीही त्रास वाटत असला तरी त्याचा एक फायदा झाला होता, ते म्हणजे, केस छान लांब आणि दाट होते.  अशा केसांमध्ये मग फुलांच्या वेण्याही छान दिसायच्या.  कुठल्या फुलांच्या वेण्या घातल्या नाही, म्हणून विचारू नका.  शेवंती, अबोली, मोगरा, चमेली, गुलाब, कान्हेरी, गुलबाक्षी, बटन शेवंती.  अशा कितीतरी फुलांच्या वेण्या हौशीनं केसात माळल्या आहेत.  या वेण्यांचे प्रकारही छान असायचे.  एक वेणी असायची दुहेरी.  दोन रंगातील फुलांची.  


तिला बहुधा दुधभात वेणी म्हणायचे. एकीकडे पांढ-या रंगाची शेवंती तर दुस-या बाजुला पिवळ्या रंगाची शेवंती.  कोणी हौशी वेण्या तयार करणारा असेल तर त्यामध्ये झिपरीची हिरवीगार पानं खुबीनं लावलेली असायची.  शिवाय तो चकाकीचा दोराही असायचा.  दोन्ही बाजुंनी फुलं असल्यामुळे वेणी चांगलीच वजनदार असायची.  पण तेव्हा काळजी वाटायची नाही.  कारण केसही तसेच होते.  दोन वेण्या.  अगदी मजबूत  त्यावर आईनं लावलेलं भरपूर तेल.  रिबीनीनं या दोन वेण्या घट्ट बांधलेल्या असायच्या.   त्यावर कितीही वजनाची वेणी पेलता यायची आणि शोभूनही दिसायची.   अशीच एक वेगळी वेणी मिळायची ती गिरगावच्या गायवाडीमध्ये.  पिवळ्या बटन शेवंतीची ही वेणी अगदी नाजूक.  खूप दिवस टिकणारी.  आईला ती वेणी दिसली तर आई,  आठवड्याच्या वेण्या एकाचवेळी खरेदी करुन ठेवायची.  या वेण्या टिकायच्याही खूप आणि दिसायच्याही छान.  गुलबाक्षीच्या फुलांची वेणीही अशीच नाजूक.  मुळात ही फुलंच नाजूक.  सायंकाळी उमलणा-या या फुलांची वेणी म्हणजे, केसांत माळलेली रंगीबिरंगी फुलपाखरांची माळ वाटायची.  काहींना फक्त हिरव्या झिप्रीच्या पानांच्या वेण्या आवडायच्या.  त्यामध्ये तो चकचकीत दोरा भरपूर लावलेला असायचा.  एकदा मी विचारलंही होतं, या वेण्या का घातलात, यामध्ये फुलंच नाहीत.  तेव्हा कळलं की अगदी आठवडाभरही ही झिप्रीची वेणी ताजी, टवटवीत रहाते.  अशीच वेळी म्हणजे, कोंबड्याच्या तु-याची.  लाल रंगाचा हा कोंबड्याचा तुरा कधी खराब व्हायचा नाही.  त्याच्या वेण्याही तशाच सदैव ताज्या रहाणा-या.

पण आता या वेण्या गेल्या आणि ते माळण्यासाठी असणारे केसही.  आताच्या केसांना हा वेण्यांचा भार झेपतच नाही.  मुळात अलिकडे वेण्या बनवतांना काहीवेळा बारीक तारेचा वापर होतो.  ही तार केसात अडकून आहे ते केस तुटण्याची भीतीच अधिक वाटते.  शिवाय अलिकडे तर शेवंतीसारख्या झेंडूच्या फुलांच्या वेण्याच जास्त दिसतात.   त्यामुळे वेण्या माळण्याची हौस कमीच झाली.  या सर्वात खोट्या फुलांच्या वेण्या मदतीस आल्या आहेत.  त्या दिसाय़ला छान, आकारानं नाजूक, हव्या त्या रंगात मिळणा-या आणि मुख्य म्हणजे, वजनानं खूप हलक्या.  आत्ताच्या छोट्या केसांना


परवडणा-या.  आत्ता अशाच खोट्या फुलांच्या वेण्यांनी घरातला एक डबा भरलेला आहे.  देवीच्या ओटीतील मिळालेली ती शेवंतीची वेणी हातात पकडून मी लहानपणीच्या समृद्ध जगात फिरुन आले.  घरी आल्यावर ती देवीची वेणी आपसूकपणे देव्हा-यातील देवीजवळ ठेवली.  तिची तिला परत.  कारण आपण कितीही बदललो, तरी ती आहे, तशीच आहे.  कधीही मदतीला येणारी. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

  

Comments

  1. सुंदर लेख. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. रात्री
    झोपण्यापूर्वी वेणी ओल्या रूमालात ठेवली की दुसर्‍या दिवशीही छान ताजी दिसायची.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं...एक-एक वेणी चार दिवसही वापरली आहे....धन्यवाद...

      Delete
  2. सुंदर लेख नेहमीप्रमाणे

    ReplyDelete
  3. सुरेख

    ReplyDelete
  4. छान लेख आहे.. लहानपणी च्या लाबं केसांच्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद सई..

    ReplyDelete
  5. 👍👍👌👌🌹🌹

    ReplyDelete
  6. छान लेख!! गजरे, वेण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. आपण तेव्हा निसर्गाच्या जवळ होतो.

    ReplyDelete
    Replies
    1. हो...हे अगदी खरे आहे...तेव्हा फुलं म्हटली की कुठलंही वेणीमध्ये माळण्यासाठी चालायची....

      Delete
  7. शब्दांनाही येतो वेणीचा सुगंध🌸

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...खूप छान शब्दात प्रतिक्रीया दिली आहे...

      Delete
  8. सांस्कृतिक बदल खूप वेगाने होत आहेत. नव्या पिढीला यातील गंमत आत्ताच्या युगात अनुभवायला मिळणार नाही. मलाही अलीबागच्या वर्सोलीच्या यात्रेची आठवण झाली असो.खूप छान लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी...नवी पिढी या सर्वापासून खूप दूर झाली आहे. चौल आणि वर्सोली, आवास येथील यात्रांच्या आठवणी या कधीही न विसरता येतील अशाच आहेत.

      Delete
  9. Khup chhan lekh

    ReplyDelete

Post a Comment