कोजागिरीचा चंद्र आणि भेळ

 

कोजागिरीचा चंद्र आणि भेळ


आज काय केलंस,  हा लेकाचा आणि माझा नेहमीचा प्रश्न.  रात्री फोनवरुन त्याचा दिवसभरचा दिनक्रम जाणून घ्यायचा,  आणि उद्याचा विचारायचा.  हा संवादाचा पॅटर्न ठरलेला.  नंतर तो मला विचारणार, आज तू बाबासाठी काय केलंस, हेही नेहमीचंच.  थोडं मला चिडवायला.  मी उत्तर दिलं, आज कोजागिरी, रात्री फक्त भेळ आणि मसाले दूध.  यावर त्याचं लेक्चर सुरु झालं.  काय हे,  बाबाला तू तुझ्या डायटींगच्या प्लॅनमध्ये कशाला घेतेस. त्याच्यासाठी कर ना काहीतरी छान.  कोजागिरी आहे ना, मग पनीर भजीबिजी कर, भेळेनं कुठे पोट भरतं.  कोजागिरी आणि भेळ हे कॉम्बिनेशन कोणी केलंय काय माहित, पण तू ते नक्की पाळतेस.  लेक फोनवरुन लेक्चर देत होता.  पण त्याला माहित होतं, त्यानं कितीही सांगितलं तरी मी हा बेत काही बदलणार नव्हते.  कॉम्बिनेशन वगैरे शब्द माहित नव्हते, तेव्हापासून हे गोड समिकरण जुळलं आहे.  ते काही सहजासहजी सुटणार नाही, हे लेकाला कसं सांगायचं.  कारण, मोठाल्या अंगणात बसून एका बाजुला भेळीचा डोंगर उभारलेला आणि दुस-या बाजुला तीन दगड लावून केलेल्या चुलीवर मोठया तपेल्यात दूध आटवतं ठेवलेलं,  या सर्वांवर चंदेरी छाया देणारा तो आकाशातला चांदोबा.  अशा वातावरणात कितीतरी कोजागिरी पौर्णिमा साज-


या केल्यात.  त्या भेळीच्या डोंगरांनी आणि चुलीवरील दुधानं मनात असं कायमचं घर केलंय की हे समिकरण सहजासहजी मिटूच शकत नाही.  अर्थात, हे सर्व लेकाला कसं सांगू.  कारण घराचं अंगण आणि बिल्डींगची गच्ची हा फरक कधीही शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही. 

गेल्या काही वर्षात वॉटसअपवर सर्व प्रकारचे मेसेज येतात.  काहींनी तर सर्वपित्री आमवशेच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.  मग कोजागिरीला तर विचारुन नका.  नुसता पाऊस.  तोही आटवलेल्या दुधाचा.  शिवाय कोजागिरी म्हणजे काय,  त्याचे आरोग्यदायी परिणाम वगैरे याची तर मालिकाच चालू होती दिवसभर.  ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय, हे सांगण्यासाठी युट्यूब किंवा सोशल मिडियाची अन्य साधनं नव्हती, तेव्हापासून कोजागिरीचे महत्त्व कळले आहे.  घराघरातील मोठ्या माणसांना ही माहिती होती.  त्यामुळ आपसकच आम्हाला माहिती झाली.  कोजागिरी, किंवा तस्सम सण हे  उत्तम निमित्त असायचे, कुटुंबानं एकत्र येण्याचं.  नातेवाईक, मित्रमंडळी सर्व एक व्हायचे.  सर्वजण कोणाच्या तरी अंगणात एकत्र यायचे.  मोकळ्या अंगणात


शेणानं सारवलेल्या जमिनीवर पेपर टाकले जायचे.  त्यात पहिल्यांदा कुरुमु-यांचा पांढरा डोंगर.  मग कोणी काका, कांदा, टोमॅटो कापून द्यायचा.  कोणी मिरची आणि कोथिंबीर.  मग आणखी एक काका, फरसाणाचं पाकीट त्यावर खाली करायचा.  मिठाचा अंदाज घ्यायला मात्र मंडळी पुढे व्हायची.  झाली भेळ.  यावरच सर्वांची पोटं भरायची.  त्यातही घरातील महिलांसाठी ही रात्र सुखाची असायची.  कारण स्वंयपाकाची धावपळ नाही.  चूल मांडण्यापासून सर्व काम पुरुषमंडळी हौशेनं करायची.  अंगणातच एका बाजुला चूल लावली जायची.  फक्त तीन दगडं लावले की चूल तयार.  मग मोठ्या टोपाला लेपन लावून त्यात दूध आणि साखर घातली जायची.  दूधावर थेट चंद्राची किरणं पडत असायची.  दूध आटत आलं की मग त्यावर चाराळो घातली जायची.  तेव्हा कुठले ड्रायफूट वगैरे त्या दूधात कधीच डोकवले नाहीत.  पण ती छोटी चारोळी मात्र अमाप असायची.  शिवाय आमच्या घराघरात असणारं जायफळ.  झालंच तर वेलची.  एवढ्यावरच त्या दुधाचा स्वाद स्वर्गिय लागायचा. 

पण तो नंतर.  कारण त्याआधी भेळीचा डोंगर सपाट करण्याची जबाबदारी असायची.  नशीबानं तेव्हा तो हायजीन नावाचा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नव्हता.  आम्ही मुलांना लायनीत बसवले जायचे.  मग एक कोणीतरी हातात कागद आणून द्यायचा आणि त्याच्यापाठोपाठ एक हातानं ती भेळ त्या कागदावर टाकत येत असे.  कोण आनंद व्हायचा तेव्हा.  मोठे मोठे घास घेत भेळ कोणाची पहिली संपतेय, याची स्पर्धा लागायची.  पण तेवढ्यात कोणीतरी अधिकारवाणीनं दटावायचं.  हळू हळू खा.  घासभर कमी खा.  पोटात जागा ठेवा.  आज दुधाचा मान आहे.  काहीवेळी भेळीची एक फेरी झाल्यावर आम्ही


बच्चे कंपनी खांब खांब किंवा स्टॅच्यू नावाचा खेळ खेळत असू.  मोठ्यांचा गप्पांचा फड रंगायचा.  आमची खेळाची एक फेरी झाली की मग उरलेला भेळीचा डोंगर पार संपवून टाकायचा.  मग सुरु व्हायचा तो त्या अविट गोडी असलेल्या दुधाबरोबरचा खेळ.  चुलीवर आटलेल्या त्या दुधाला धुराचा वेगळा सुंगंध असायचा.  कोणाच्या पेल्यात किती चारोळ्या आल्यात, हे मोजत मग ते मसाला दूध संपवले जायचे.  मोकळ्या अंगणात चाललेला हा कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा अगदी पहाटे पर्यंत चालायचा.  त्या गप्पा, ते वातावरण इतकं मनात आहे, की कोजागिरी म्हणली की कुठल्याही व्हिडिओचा आधार नकोसा वाटतो.  कारण लहानपणी दूध घेण्यासाठी जराही टंगळमंगळ केली तरी मोठे काका-काकू या दुधामागचे कारण समजवून सांगायचे. चंद्राच्या किरणांचा फायदा पुन्हापुन्हा सांगितला जायचा.  हे सर्व लेकाला कसं सांगणार.  कारण हे सांगण्यापेक्षा अनुभवण्यातली जी मजा होती, तिची तोड कुणालाच नाही. 

आत्ता कोजागिरी झाल्यावर एकाला विचारले काय केलंस,  तर म्हणाला मस्त ग्रुप झाला होता.  मस्त साऊंड इफेक्टचे दोन स्पिकर लावले.  अशी दणाणली ना बिल्डींग.  आसपासच्या बिल्डींगमध्येही आमच्याच गाण्यांचा आवाज.  मग काय, नाचलो.  छोले, पुरी, बिर्याणी आणि ते मसाला दूध.  एकानं सांगितलं,  आम्ही पत्ते खेळलो. वरुन म्हणाला पौर्णिमा पावली.  मी त्या महान व्यक्तीस कोपरापासून नमस्कार केला.  या सर्वात  आणखी एका बिलंदर निघाला.


  म्हणाला वार कशाला वाया घालवायचा.  छान कोंबडीवड्यांचा बेत केला.  पण त्याच्यावर दूध लगेच घेत नाहीत ना.  मग टाईमपास म्हणून पिक्चर बघत बसलो.  रात्री उशीरा दोन तासांनी दूध पिऊन झोपलो.  मी धन्य आहात, म्हणून फोन बंद केला.  अर्थात आता कोजागिरीचा चंद्र दिसला तरी लॉटरी लागण्याचा आनंद होतो.  घराच्या बाल्कनित किंवा खिडकीमध्ये दुधाचा टोप कसातरी अँडजस्ट होतो.  कोजागिरीनंतर येणारा दुसरा दिवस सुट्टी असेल तर रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागरण केलं जातं.  नाहीतर शाळांसाठी लवकर उठण्याची धास्ती एवढी असते की चंद्राचे दर्शन नुसते झाले तरी, कोजागिरी फळल्याचे समाधान

होते.  हा आत्ताचा दिनक्रम आहे.  मी सुद्धा काही काळ त्यातून गेले.  परिस्थिती बदलते.  त्यातून आपणही बदलतो.  पण नशिबानं काही गोष्टी अशा आठवणीच्या कोप-यात बसल्या आहेत, की त्या पुन्हा पुन्हा कराव्याश्या वाटतात.  अगदी त्या तशाच होणार नाहीत, याची खात्री असते.  पण पुन्हा एकदा त्या आठवणीच्या रजयीत हलकेसं शिरावसं वाटतं.  हे कोजागिरी आणि भेळ यांचे समिकरण तसेच आहे.  कितीही बदललं,  तरी ते समिकरण दूर होणं शक्य वाटत नाही. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khupach chan lihile ahe 🙏👍😊

    ReplyDelete
  2. खूप छान लेख

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लेख आहे, जून्या काळातील आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी...

      Delete
  4. पारंपारीक कोजागिरी व आजची कोजागिरी याचं सुंदर वर्णन लेखात आहे.कोजागिरी व भेळ हि परंपरा आजही जपायला हवी.सुंदर लेख,मनःपुर्वक अभिनंदन👍👍👌👌💐💐

    ReplyDelete
  5. कोजागरी आणि आपलं अतूट नातं आहे कोण जागरण करतं असं म्हणत देवी येते आणि आपण तिला हो आम्ही जागे आहोत असं सांगतो. असं आई नेहमी म्हणायची. यात एकच गोष्ट खरी की देवीच्या निमित्ताने आपण त्या टिपूर चांदण्याचा आस्वाद घ्यावा. कोजागिरीचा चंद्र फारच वेगळा वाटतो. नेहमीप्रमाणे तू छान लिहिलं आहेस सई

    ReplyDelete
  6. खूप छान आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद सई... 💐💐

    ReplyDelete

Post a Comment