आठवणींच्या गुंत्यातील खरवस..
नेहमी दूध घेऊन येणा-या दादानं दुधाच्या दोन बाटल्या माझ्या हातात दिल्या. मी त्याला अधिकच्या दुधाची ऑर्डर केली नव्हती, म्हणत एक बाटली परत केली. त्यानं ती हातात घेतली, आणि परत माझ्या हातात दिली. ताई, तुमच्यासाठीच आहे. अरे नाही, काहीतरी गडबड झाली असेल, तू भाऊंना परत विचार. म्हणत ती दुधाची बाटली मी पुन्हा त्या दादाकडे दिली. आता त्यानं ती बाटली स्वतःच्या हातात घट्ट पकडली. अहो, ताई ऐका तरी, भाऊ म्हणालेच होते, तुम्ही काही घेणार नाही, पण त्यांना देच, वाटलं तर तुम्ही भाऊंना फोन करुन विचारा. पण ही दुधाची बाटली तुमच्याकडेच द्यायला सांगितली आहे. हे चिकाचं दूध आहे. चिकाचं. तुम्हाला द्यायला सांगितलंय. भाऊ म्हणाले, ताईंना आवडत नाही खरवस. पण तरीही आग्रहानं दे, एवढे मोठे वाक्य, तेवढ्याच मोठ्या आवाजात मला ऐकवल्यावर त्यानं ती चिकाच्या दुधाची बाटली, माझ्या हातात जवळपास शाळेत बाई पट्टी हातावर मारायच्या ना, तशा जोरात दिली. मी तोंडाचा आ आणि कपाळावर आलेल्या अढ्यांनी त्या बाटलीकडे आणि त्या दादाकडे बघत होते. त्यांनी त्याची बॅंग बंद केली आणि मला पुन्हा भाऊंना फोन करा, म्हणून सांगत आपला रस्ता पकडला. मी हातात आलेल्या त्या चिकाच्या दुधाकडे बघत राहिले होते. याचा खरवस करायचा. गेली कित्येक वर्ष हा पदार्थ मी केला नव्हता. आवडत नाही असे नाही, पण का कोण जाणे खसवसपासून मी चार हात दूर राहिले आहे. आता त्याच खसवससाठी चिकाचे दूध कधी नव्हे ते घरी आले होते.
आपल्याला न आवडणारा पदार्थ करायची वेळ आली तर काय होतं, तशीच चिडचिड माझी चालू झाली. फोन हाती घेतला, आणि नेहमी घरपोच दूध पाठवणा-या भाऊंना फोन लावायला घेतला. तर त्यांचाच फोन आला. त्यांनी अगदी माफी मागत सुरुवात केली. अहो ताई रागवू नका. तुम्हाला खरवस आवडत नाही, हे माहीत आहे. पण एकदा करुन बघायला काय हरकत आहे. तुम्हाला या दुधात फक्त साखर, वेलची घालायला लागेल. अगदी एक प्लेट होईल. बघा तर करुन, एक वडी खा, आणि मग मला सांगा. चला फोन ठेवतो. म्हणत त्यांनी फोन ठेऊनही दिला. मी पुन्हा निराशेनं त्या दुधाच्या वाटलीकडे बघितलं. त्यावर एक कागद लावला होता. त्यात माहिती दिली होती. गायीचे दूध होते ते. शिवाय खरवस कसा करतात याची रेसिपीही दिली होती. आता यांना काय सांगणार, आमचा अर्धा जन्मच यात गेला, म्हणून मी डोक्याला हात लावला.
खरवस आवडत नाही असेही नाही. त्याचा तो नॉशिया की काय म्हणतात, तो आलाय असेही नाही. पण जन्मापासून हा खरवस खाल्ला आहे. त्यामुळे या खरवसापासून मन तृप्त झालंय. आमचा गोठा गायींनी भरलेला होता.
अगदी महिन्यांनी एखादी गाय व्यायची. त्या गायीचे पहिले तीन दिवसांचे दूध चिकाचे असायचे. त्यापासून खरवस केला जायचा. नंतरच्या चार-पाच दिवसांच्या दुधापासून आई कांजाळ करायची. गुळ टाकून उकळलेला हा पदार्थ. आता ब-याच ठिकाणी चिकाचे दूध विकले जाते. पण आम्ही कधीही या चिकाच्या दुधाची विक्री केली नाही. आई भरभरुन ते वाटून टाकायची. आमच्या घरात तर खरवस हा कायमचा असायचा. चिकाच्या दुधात जायफळाची पूड आणि साखर टाकून केलेली ती खरवसाची वडी येता-जाता कधीही तोंडात टाकली जायची. महिन्यातल्या तीन दिवस जवळपास हा खरवसच नाष्टा असायचा. नंतर दूधात गुळ टाकून केलेले कांजाळ भरुन मोठी वाटी असायची. त्याची गोडसर चव अजूनही जिभेवर आहे. गाव सुटलं आणि ही खरवस, कांजाळची साथही सुटली.
त्यानंतर अनेकवेळा खरवस समोर आला.
पण कधीही खावासा वाटला नाही. का,
ते सांगता येत नाही. पण त्या एका
पदार्थासोबत कितीतरी आठवणींचा गुंता गुंतून पडला आहे. त्यातून बाहेर काही पडता आले नाही.
आता तो आठवणींचा गुंता पुन्हा समोर आलेला. पुन्हा एकदा त्या चिकाच्या दुधाच्या बाटलीकडे बघितले. अगदी एक प्लेट होईल, एवढा खरवस त्यापासून होणार होता. वास्तविक नव-याला ही खरवसाची वडी खूप आवडते. पण माझा नकार बघत त्यानंही कधी आग्रह केलेला नव्हता. आज खरवस घरी केल्यावर त्याची प्रतिक्रीया काय असेल, हा विचार मनात आला. मनातील आठवणींचा गुंता तसाच ठेवला. मी स्वयंपाकघरात गेले. गायीचे चिकाचे दूध असेल तर त्यात दूसरे अधिकचे दूध घालावे लागत नाही. म्हशीचे चिकाचे दूध असेल तर तेवढेच दुसरे दूध घालावे लागते. लहानपणीपासूनचा हा धडा अजूनही घ्यानात होता. एका भांड्यात दूध घालून बेताची साखर टाकली. थोडावेळ ढवल्यावर साखर विरघळली. आता काय फक्त कुकरमध्ये ते भांडं ठेऊन द्यायचे. पण पुन्हा लहानपणीचा धडा आठवला. स्वच्छ करुन ठेवलेला कूकर पुन्हा एकदा चांगला घासून घेतला. त्याला जराही वास नको.
कारण खरवसाची वडी कुठलाही वास पटकन पकडते, हाही एक लहानपणीचा धडा होता. तसा तो कूकर पुन्हा घासला. थोडं पाणी टाकून गरम करुन घेतलं. ते पाणी टाकून दिलं. आता खात्री झाली, की कूकर स्वच्छ झाला. मत त्यात पुन्हा पाणी टाकलं. रिंग ठेवली. एका छोट्या भांड्यात ते दूध हळूवर ओतलं, वरुन जायफळाच्या पावडरीचा पेर घातला. आता करतेच आहे, तर अगदी मनापासून करायचा, म्हणत केशराची डबी काढली. अगदी थोड्या अशा त्या दुधावर केशराच्या चार काड्या जरा जास्तीच्याच टाकल्या. केशराच्या त्या मंद सुवासानं मन प्रसन्न झालं. तो भूतकाळातला आठवणींचा गुंता तिथेच थांबला. पंधरा मिनीटानंतर खरवस झाल्याची जाणीव झाली. कूकर थंड झाल्यावर तो खरवस बाहेर काढला. केशराच्या काड्यांनी आपलं काम केलं होतं. पांढ-या शुभ्र रंगाच्या खसवसाच्या अगदी दहा-बारा वड्या कापल्या. तळाला हलकीशी जाळ आली होती. जायफळाची पूड वरच्या भागात स्थिरावली होती. केशरच्या काड्यांनी आपला रंग सोडला होता. हलकेच पिवळसर रंग त्या वडीत पसरला होता. काही केशराच्या काड्या हट्टानं वरच राहिल्या होत्या. त्यातून केशरी रंग हलकासा बाहेर आला होता. एकूण सर्व छान दिसत होतं. एखादी वडी तोंडात टाकण्याचा मोह मात्र होत नव्हता. त्या वड्या तशाच एका डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्या.
रात्री जेवण झाल्यावर नवरा नेहमीप्रमाणे गोडाच्या शोधार्थ फ्रिजमध्ये
शिरला. तेव्हा त्याला तो डबा घ्यायला
सांगितलं. त्यानं तो डबा उघडला, आणि
जवळपास जोरात ओरडलाच. खरवस. कोणी दिला.
तू विकत आणलास. मी फक्त हसले. हातांनी मी केला, अशी खूण केली. काय सांगतेस काय. सगळा रेकॉर्ड तोडलास म्हणत, त्यानं एक खरवसाची
वडी घाईघाईनं तोंडात टाकली आणि हातांनी एक नंबर अशी खूण केली. तसाच डबा माझ्यासमोर धरला. मी नको म्हणायचीच खोटी होती, तो डबा अर्धा खाली
झाला. हे उद्यासाठी राहूदे म्हणत, त्यानं एखादा
लहान मुलासारखा त्याचा आवडत्या खाऊचा डबा फ्रिजच्या कोप-यात ठेऊन दिला. मी त्याच्या चेह-यावरील आनंदाकडे बघत
होते. माझ्या आवठणींच्या गुंत्यांची वीण
मला बसू नये, म्हणून तो किती जपत होता.
माझ्यासाठी स्वतःच्या आवडीच्या पदार्थापासून दूर राहिला होता. काही न
आवडणा-या गोष्टी नव्यानं करुन बघायला हव्यात, याची जाणीव झाली.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
फारच छान
ReplyDeleteअतिशय सुंदर, बालपणीचा काळ डोळ्यासमोर सर्रकन आला, त्या आठवनित पूर्ण बुडाले, लवकर लेख संपला असं वाटलं
ReplyDeleteMast lekh
ReplyDeleteKhupach sunder
Sarvan Cha avdi cha kharvas mast lihile ahe
ReplyDelete✍️👌🏻👍. . .परत बनवला की बोलवा हो नक्की🤓
ReplyDeleteखरवसावरचा अप्रतिम लेख,परंतु मला काही खरवस आवडत नाही,कधीही खात नाही...
ReplyDeleteखूप आवडला खरवस आणि आठवणींचा लेख... ललिता छेडा
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteमला खुप.आवडतो खरवस.....हा फक्त लेखाच्यारुपात.आमच्यासमोर खरवस ठेवला.
ReplyDelete