पाऊस सुखाचा..दुःखाचा..
रविवारची संध्याकाळ. बाहेर पडायची तयारी करत असतानाच विजांचा कडकडाट सुरु झाला. बेमौसमी पावसाची सुरुवात झाली. अगदी पावसाळ्यासारखा पाऊस. थंड वारा आला आणि वातावरण बदलून गेलं. आमचा बाहेर जाण्याचा बेत बदलला. बाहेरचा वातावरणाचा बदललेला रंग पहाता हातात कॉफीचा मग घेतला. सोबतीला पुस्तक घेतलं तितक्यात फोनची रिंग वाजली. एका मैत्रिणीचा फोन होता. ती पुण्यातल्या कुठल्यातरी फार्म हाऊसवर गेलेली. तेथेही मुसळधार पाऊस पडत होता. तिची पिकनीक सफल झाली होती. त्या आनंदात तिनं फोन केलेला. तुला कितीवेळा सांगितलं, सोबत चल. बघ आली असतीस तर पावसाळी पिकनीकही झाली असती. किती मज्जा येतेय इथे बघ, मी एक उसासा टाकला. जाऊदे. इथेही पाऊस आहे. तू मजा कर आणि भरपूर फोटो काढ म्हणत मी फोन ठेवला. पाऊस खरचं धुंवाधार होत होता. तितक्यात अजून एक फोन आला. नाशिकच्या एका मित्राचा. तिथेही पाऊस होता. पण त्याच्या आवाजात पावसापेक्षा कमालीचा थंडावा होता. तिकडेपण आहे का ग, एवढंच बोलून त्यानं केवढा तरी पॉझ घेतला. आमच्याकडे नुसता कोसळतोय. न बोलवताच आलाय बघ. त्याच्याकडे बघावसंही वाटत नाही. हा सगळं घेऊन
जाणार. त्याचे शब्द त्या पावसाच्या मा-यापेक्षा तुफानी होते. मी मनात या अवकाळी पाऊसाची तुलना करत होते आणि त्याच्या सुखाच्या, दुःखाच्या रंगांत बुडून गेले.
शनिवार-रविवार या आठवड्यातल्या दोन दिवसात काय करता येईल, याची प्लॅनिंग आठवड्याच्या बाकीच्या पाच दिवसात केली जाते. माझी एक लाडकी मैत्रिण गेल्या महिन्याभरापासून मागे लागली होती. पुण्याच्या पुढे कुठलेसे फॉर्म हाऊस होते. नदिच्या काठावर असलेले. तिनं फोटो दाखवले होते. शनिवारी सकाळी जायचं, आणि रविवारी परत. गावात जाऊन राहिल्याचा आनंद त्या फार्म हाऊसवर मिळणार होता, अगदी बैलगाडीपासून ते चुलीवरच्या जेवणाची चव. नंतर नदीमध्येही मनसोक्त डुंबायला मिळणार होते. मैत्रिण प्रचंड मागे लागलेली. मात्र ते काही शक्य झालं नाही. तिच्या भरपूर आग्रहाकडे दुर्लक्ष करत मी नाही म्हटलं. नाराज झालेल्या माझ्या मैत्रिणीनं मग अगदी त्या फार्म हाऊसवर निघाल्यापासून माझ्यावर फोनचा आणि फोटोचा भडीमार केला होता. मिनिटामिनिटाचा नको असलेला हा रिपोर्ट देतांना तिला कोण आनंद होत होता. बैलगाडीवरुन फिरतांना, नदीत पाण्यासोबत मस्ती करतांना, त्या फार्म हाऊसमधील वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतांना, चुलीवरच्या जेवणावर ताव मारतांनाचे फोटो चालू होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास तिचा आनंदानं भरलेला फोन आला, तो तेथे पडणा-या पावसाची बातमी सांगण्यासाठी. धो धो पाऊस पडत होता. मैत्रिणीच्या कुटुंबाचा आनंद अधिक वाढला होता. कारण अनायसे पावसाळी पिकनीक साजरी करण्याचा आनंद त्यांना लुटता आला. पावसानं तेथील सर्व वातावरण बदलून गेलं होतं. हवेत
छानसा गारवा पसरला होता. पाऊसात मनसोक्त भिजत असतांना फार्म हाऊसमध्ये आलेल्या पर्यटकांसाठी छान भजीचा बेत केला होता. भजीचा आस्वाद घेत तिनं मला फोन केला आणि मी किती मोठ्या आनंदाला मुकले आहे, याची जाणीव करुन दिली. तिच्या आनंदात तेव्हा मीपण सहभागी झाले होते, भरपूर मजा कर. माझ्यावाटचंही भिजून घे, असं सांगत मी फोन ठेवला.
संध्याकाळी अचानक आलेल्या या पावसानं माझंही टाईमटेबल विस्कटून गेलं होतं. काही ठिकाणी जाण्याचा बेत केला होता, तो रद्द झाला होता. मैत्रिणीच्या आलेल्या फोनमुळे मनातली निराशा अधिक वाढली. तिच्यासोबत गेले असते तर मलापण अशीच मजा करता आली असती, हा विचार मनात डोकवला, तोच पुन्हा फोनची रिंग वाजली. माझ्या नाशिकच्या मित्राचा फोन. नाशिकला त्याची द्राक्षाची मोठी बाग आहे. दरवर्षी न सांगताही या बागेतल्या द्राक्षांची एक पेटी माझ्यानावानं तो हक्कानं मैत्रीच्या नात्यानं मला पाठवत आहे. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. त्याच्या शेतीमध्ये तो अनेक प्रयोग करत होता. अनेकवेळा त्याच्या या प्रयोगाबद्दल माझी आणि त्याची चर्चा होते. आताही काही बोलायचे असेल, असा विचार आला आणि फोन उचलला. पण त्याच्या शब्दाचा पहिल्याच फटका-यानं मी हादरले. नाशिकमध्येही तुफान पाऊस पडत होता. हा पाऊस त्याच्यासाठी आणि तो जिवापाड जपत असलेल्या द्राक्षांच्या बागेसाठी मारक होता. एरवी शेतक-यांसाठी पाऊस हा एखाद्या देवासारखा असतो. पण आज पडत असलेल्या या पावसानं माझ्या मित्राला रडवलं होतं. बाहेर पडणा-या पावसाला बघायचीही त्याची इच्छा नव्हती. पावसाचा आवाज सुरु झाला आणि तो हतबल झाला. द्राक्षांसाठी आताचे काही दिवस महत्त्वाचे होते. द्राक्ष भरायला
लागली होती. त्याच्याकडे येणारी द्राक्षे बहुधा परदेशात पाठवली जातात. त्यांच्या ऑर्डर आल्या होत्या. त्याची तयारी चालू होती. पण पावसानं सगळ्यांवर विरजण टाकलं होतं. बाहेर पाऊस पडत होता आणि माझा मित्र आतल्याआत रडत होता. बाहेरचा पावसाचा आवाज त्याला ऐकायचा नव्हता. त्या आवाजापासून दूर जाण्यासाठी त्यानं मला फोन केलेला. तो रडत नव्हता, पण त्याच्या आवाजातील ती शांतीच सर्व काही बोलत होती. सर्व विस्कटलं ग. नकोसा हा पाहुणा आलाय, आणि आम्हाला लुटायला लागलाय. सर्व पिक हातचं जाणार बघ. सगळ्या ऑर्डरी रद्द होणार. हातात काहीच रहाणार नाही. हे शब्द तो हळूवार बोलत होता. प्रत्येक शब्द बोलतांना मोठा पॉझ घेत होता. त्याच्या या थंडगार शब्दामुळे मी मात्र फ्रिज झाल्याचा अनुभव घेत होते. बराचवेळ माझा मित्र फोनवर होता. त्याचे शब्द कमी होते, पण त्यातील आक्रोश जास्त होता. तक्रार तर कुणाबद्दल करणार. फक्त मन मोकळं करण्यासाठी त्याला कोणीतरी हक्काचं हवं होतं. मी जाणत होते. बराचवेळ हा फोन चालला. त्याला धीर दिला. सगळं ठिक होईल, तू काळजी करु नकोस, म्हणत असतांना इकडे माझेही डोळे भरत आले होते. त्यानं फोनवर सांगितलं होतं, आता काय त्या द्राक्षांच्या मळ्याकडे बघायची हिम्मत नाही. आता सकाळीच बघेन म्हणत त्यानं फोन ठेवला.
आता बाहेरचा पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात या पावसाच्या रंगानं
धुमाकूळ घातला होता. एकच पाऊस. पण त्याची दोन वेगळी रुपं माझ्यासमोर होती. एकाला तो आनंद देत होता, तर दुस-याच्या आनंदालाच त्यानं मुळापासून उखडून टाकलं होतं. पण माझ्यासाठी तो कसा आहे, सुखाचा की दुःखाचा...मी विचार करत असतांनाच पिकनीकला गेलेली मैत्रिण भरभरुन फोटो टाकत होती, पावसाचे आणि तिच्या आनंदाचे. पण आता त्या फोटोंना बघण्याचेही धाडस माझ्यात नव्हते, कारण माझे मन माझ्या मित्राच्या त्या शब्दाच्या फटका-यात गुंतले होते. पाऊस चांगलाच असतो, पण त्याचे हे अचानकपण धडकणे हे नक्कीच चांगले नव्हते. काहींना त्याचा क्षणिक आनंद येत असेल पण अनेकांच्या आनंदावर त्यानं विरजण टाकलं होतं. त्या अनेकांच्या बाजुनं आता माझंही मन अस्वस्थ झालं होतं.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
हं......
ReplyDeleteMast lekh
ReplyDeleteआदरणीय सईजी सादर...
ReplyDeleteसाष्टांग नमस्कार
आपण वरील लिहिलेल्या लेखात आयुष्याच्या नाण्यात असलेल्या दोन बाजू ..एक अतिशय आनंदाची आणि एक अतिशय दुःखाची, अतिशय सुंदर प्रणे प्रस्तुत सादर केले आहेत यात एक व्यक्ती निसर्गाच्या वर्षावाचा आनंद घेतो आहे तर त्याच दुसऱ्या बाजूला दुसरा व्यक्ती निसर्गाच्या कोपाचा दुःख सोसत आहे!! जेव्हा आपण एका बाजूला सुखाची आणि अनुभूती घेतो तेव्हाच दुसऱ्या बाजूला दुःख आपल्याला त्याच्या उपस्थितीची जाण करून देत असतो हेच तर माणसाच्या जीवनाच्या कथेचे दोन भाग आहेत.
मात्र "आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू नसतात .
या आयुष्याच्या नाण्याच्या तीन बाजू असतात जसे बालपण तरुणपण म्हातारपण, दिवसाचे तीन पल असतात सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी सूर्य उगवतो तेव्हा अतिशय आनंदात आणि जोमात आपण उठून कामाला लागतो दुपारी पोटात आग ओकायला लागली की आपण पोटाची तृष्णा अन्नपूर्णेने भागवतो संध्याकाळी तेच शरीर थकल्यावर त्याला रात्रीचा विसावा देतो हेच उन्हाळा हिवाळा पावसाळा असे ऋतू चक्र सुरूच राहाते. जीवनाच्या संपूर्ण कथेत नाण्याच्या या तीन बाजू असतात"...
(Wretched)
हे एक कटु सत्य आहे.पाऊस...सुखाचा. दुःखाचा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.
ReplyDeleteलेख वास्तव व्यक्त करणारा आहे. अवकाळी ने दुःखद वेदना बळीराजा ला दिल्या.
ReplyDeleteपाऊसाचे रंग प्रत्येकासाठी वेगळे असतात.कुणाला आनंद देणारा तर कुणाच्या डोळ्यात अश्रू आणणारा .अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर ओरबडनारा असतो.उभे पीक हातचे जात असताना त्या गरीब शेतकऱ्याला काय वाटत असेल याची कल्पना शहरात राहून करणे अवघड आहे
ReplyDeleteआपण योग्य विषय घेतला त्याबद्दल अभिनंदन
खूप छान लेख
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDelete