तो आलाय...
आज काय स्पेशल...ऑफीसहून घरी आलेल्या नव-यानं घरात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वीच हा प्रश्न केला. लगेच माझ्या उत्तराचं वाट न पहाताच स्वतःच उत्तर देऊन मोकळाही झाला. आता काय पुढचे दोन-चार महिने मटार...मटार...आणि मटार हेच असेल ना...सकाळी पोह्यात, उपम्यात, इडलीत मटार. मटार पुलाव, मटार बिर्यानी, तुझी ती मटार करंजी, मटार कचोरी. मटार बर्फी आणि दर दोन दिवसांनी होणार मटार पनीरची भाजी. बरोबर ना. आज काय त्यातलं आहे, ते सांग. त्याच्या या प्रतीप्रश्नावर मी मोकळेपणानं हसून घेतलं. त्याचं बरोबर होतं. तो आलाय. अर्थात बाजारात मटार नावाची दाणेदार भाजी हजर झालीय. माझीच काय, पण तमाम गृहिणींची ही आवडती भाजी असावी. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून ही मटारची बहार बाजारात येऊ लागते. अगदी सुरुवातीला येणा-या कोवळ्या मटारच्या दाण्यांची चव तर शब्दात न सांगता येणार अशी अप्रतिम. तेव्हापासून या मटारचा घरात जो रुबाब सुरु होतो, तो पार डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत. तोपर्यत जवळपास सर्व पदार्थात मटारच मटार असे चित्र असते. सूपापासून ते मिठाईपर्यंत. या मटारच्या दाण्यांपासून दूर जावेसेच वाटत नाही. या दरम्यान घरात आरडा ओरड व्हायला सुरुवात होते. आज पुन्हा मटार, आत्ता पोह्यात पण मटार. अरे पराठे कोणी मटारचे करतात
का. स्वस्त झाला म्हणून काय मटारची बर्फी करायची. इथपर्यंत मटारचा उद्धार होईपर्यंत ही मटार बहार घरात चालूच रहाते. आत्ताशी कुठे तर त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळेच नव-यानं ज्या काही पदार्थांची नावं सांगितली होती, त्यापेक्षा पदार्थ तयार होत होता. मटारची रगडा चटणी आणि मटार-पनीर कटलेट. त्यानं मेनू ऐकून डोक्याला हात लावला. आता दोन महिने पार हिरवगार झाल्याशिवाय या मटारपासून सुटका नाही म्हणत तो फ्रेश व्हायला गेला. आणि मी त्या रगडा चटणीच्या झणझणीत फोडणीची तयारी करु लागले.
मटार. हिरवा ओला वटाणा. मला आठवतं लहानपणी श्रावणात मटारच्या
शेंगा बाजारात यायच्या, तेव्हाची ती सर्वात महागडी पण आवडती भाजी. श्रावणात कृष्णजन्मला रात्री थालीपिठांसोबत या मटारच्या कोवळ्या दाण्यांचा रस्सा असायचा. फक्त ओल्या खोब-याच्या वाटणाची त्याला सोबत. उपवास सोडतांनाची भाजी म्हणून फक्त जि-याची फोडणी, लाल तिखट आणि हळद. त्यावर परतलेल्या हिरव्या मटारच्या दाण्यांवर नारळाचं दूध. या रस्सा भाजीला उकळी यायला सुरुवात झाली की त्याच्या घमघमटानं अवघं घर भरुन जायचं. पुढे गणपतीतही अशीच बिना कांद्याची मटारच्या दाण्यांची भाजी व्हायची. अर्थात तेव्हा मटार हा आता पहिल्यासारखा युनिक राहिला नाही. तेव्हा अगदी श्रावणात सुरु होणारा आणि दिवाळीत सर्वात महागडी भाजी म्हणून हा मटार पंक्तीमध्ये मिरवायचा. तेव्हा आई त्या वटाण्याच्या शेंगाचा परिपूर्णपणे वापर करीत असे. वटाण्याच्या दाण्यासोबत त्याच्या शेंगेलाही काळजीपूर्वक सोलण्यात येई. मग या कोवळ्या सालीचे बारीक तुकडे करुन ते भाजीमध्ये भरीचे काम करायचे. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. मटारची भाजी मुबलक उपलब्ध होऊ लागली आणि तिच्या भोवतीचं श्रीमंतीचं आवरणं उतरलं. पण या मटारसोबत स्वादाचं आणि बहुआयामाचं जे समिकरण जोडलं गेलं आहे, ते मात्र अधिक घट्ट झालं आहे. कारण मटारच्या
शेंगाच्या राशी बाजारात दिसायला लागल्यावर प्रत्येक घरातील फ्रिजमध्ये या मटारच्या दाण्यांचे दोन-तीन डबे तर हमखास असणार. माझाही फ्रिज अशाच मटारच्या दाण्यांनी भरलेला असतो.
बरं घरातला फ्रिज हिरव्यागार मटारदाण्यांनी भरलेला असतांनाही मटारच्या शेंगाच्या राशी बाजारात दिसल्यावर जीव
अगदी वरखाली होणार. फ्रिजमध्ये ठेवलेल्या
मटार दाण्यापेक्षा अशा फ्रेश मटारदाण्यांची उसळ चांगली होते, अशी मनाची समजूत
काढून फक्त किलोभर दाणे खरेदीचा बेत होणार.
मग एक किलो घेण्याचा बेत हळूवार दोन किलोवर जाणार. फारकाय खाली भाजीवाला मटार....असं ओरडत आला की
फ्रिजमध्ये भरलेले मटारच्या दाण्यांचे डबे कचोरी, किंवा पॅटीसला कमीच पडणार असा
अंदाज बांधून पुन्हा किलोभर मटारच्या शेंगा घरी आणणार. हा महिना आणि पुढचा महिना अशाच मटार वॉरमध्ये
जाणार.
आत्ताशा तर या मटारची सुरुवात झाली आहे. आता रोजची सकाळ मटारसोबत होणार. पिवळ्या धम्मक कांदे पोह्यांमध्ये हे हिरवे मटारचे दाणे डोकावणार. शिवाय उपमा, इडली आहेच की. झालंच तर बटाटे वड्याच्या
भाजीतही या दाण्यांची पेरणी. शिवाय मिसळ पाव हा बेत असेल तर एरवी मूग-मटकीचा रस्सा होतोच की, म्हणत, मटारच्या मिसळीचा बेत. जेवणात तर काय विचारु नका. आज काय मराठी मसाले भात. नंतर पुलाव, मग बिर्याणी या तीन हक्काच्या भाताच्या प्रकारात मटार तांदळापेक्षा जास्त होत नाही, एवढा त्याचा सढळ हातानं वापर. मटारची पनीरसोबतची पक्की मैत्री. त्यामुळे मटार-पनीर ही जोडी प्रत्येक घराट सुपरहिट असते. तशीच आमच्याकडेही आहे. शिवाय पनीर भुर्जी नुसती कशाला करायची, हा विचार करुन त्यातही मटारच्या दाण्यांचा मुक्त संचार. मग कधीतरी भाजी-भाकरीचा कंटाळा येतो. अशावेळी मटारचे पराठे, मटार कचोरी, मटार करंजी. त्यातही किती तरी प्रकार. इंदौरी कचोरी हा एक अफलातून प्रकार. त्यात मटारचा वारेमाप वापर. एरवी कचोरी करतांना त्याचे आवरण मैदा, रवा किंवा गव्हाच्या पिठापासून केले जाते. पण इंदौरी कचोरी करतांना हे आवरण बटाटा आणि अगदी थोडासा कॉर्नफ्लॉवर वापरुन करण्यात येते. या आवरणात बडिशेप, धण्याच्या फोडणीवर परतलेले मटार, त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, मिठ आणि किंचीत साखर, यांचा गोळा. हा आमच्या घरातला सर्वाधिक आवडता प्रकार. बरं व्यवस्थित काळजी घेत ही इंदौरी कचोरी केली तर फ्रिजमध्ये आधी कचोरी करुनही व्यवस्थित रहाते. हवी असेल तेव्हा तेलावर कचोरी तळून घ्यायची आणि खोब-याच्या पातळ चटणीसोबत फस्त करायची.
मटारचं दही घातलेलं पिठलंही अशाच भन्नाट प्रकारापैकी. लसूण, आलं, मिरची, कडीपत्याच्या झणझणीत फोडणीवर शिजलेले आणि बारीक केलेले मटार टाकायचे. चांगले परतत असतांनाच त्यामध्ये कोथिंबीर, मिठ आणि हळद टाकायची. अगदी पाच मिनीटानंतर यामध्ये फेटलेलं दही टाकायचं. थोडी साखर. एक उकळी आल्यावर वरुन लाल मिरची, कडीपत्ता असलेली पुन्हा एक कडक फोडणी टाकायची. भातासोबत या मटारच्या पिठल्याचा बेत असेल तर दुसरी कोणाचीही सोबत लागत नाही.
अर्थात मटारच्या या सर्व झणझणीत रेसिपींसोबत मटार बर्फी हा गोडूस प्रकारही तेवढाच हिट आहे. पहिल्यांदा मटारची बर्फी केली आहे, हे घरी जाहीर केल्यावर लेक आणि नवरा या दोघांनीही डोक्याला हात लावला होता. अगदी नावाला कुरतडल्यासारखा मिठाईला करुन त्याची चव चाखली. पण या
बर्फीची चव काही न्यारी लागते. ते पाहून या बर्फीलाही आता घरात मानाचे स्थान मिळायला लागले आहे. मटारचे दाणे, साखर, मिल्कमेड आणि नारळ यांचा वापर करुन केलेली ही बर्फी पिस्ता बर्फीलाही स्पर्धा देते. एकूण काय, आत्ता कुठे मटार या हिरव्यागार शेंगामधील दाण्यांची सत्ता सुरु होतेय. डिसेंबर पर्यंत मटारची सत्ता अबाधित रहाणार आहे. घरातील विरोधकांनी त्याला कितीही विरोध केला तरी माझ्या एकटीचा सर्व पाठिंबा या मटारच्या दाण्यांच्या मागे रहाणार आहे. माझ्या घरातील स्वयंपाकघरावर माझी असलेली निर्विवाद सत्ता बघता, ही मटारच्या दाण्यांची बहार दिवसेंदिवस अधिक बहरत जाणार यात शंकाच नाही.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Zakaas Mataar Akhyan!!
ReplyDeleteMast lekh
Deleteआदरणीय सई जी सादर...
ReplyDeleteसाष्टांग प्रणाम
आपण लिहलेला लेख अतिशय सुंदर आहे आणि सुरुवात "तो आलाय" अशी केलीय !!
मटार ला जर भावना असत्या आणि बोलता आलं असत तर त्यानी हा लेख वाचून देवाकडे एकच मागितले असते ते म्हणजे "हे देवा मला हाच पुनर्जन्म दे"
धन्यवाद
तो आला कि खरच मजा येते पदार्थ करायल आणि खायला
ReplyDeleteदरवर्षीचाच मटारचे दाणे सोलण्याचा आणि भरण्याचा प्रोग्रॅम असतो.
ReplyDeleteमी तर पंधरा-वीस किलो मटार घेऊन त्याचे दाणे सोलून फ्रिजमध्ये भरून ठेवते.
मटार संपल्यानंतरही एखाद दिवशी भाजी नसते आणलेली तेव्हा पटकन मटारची उसळ करायला, तसंच पावभाजी साठी फार उपयोग होतो. एकदा तर रुखवतासाठी मी पालकाबरोबर मटारच्या वड्याही केल्या होत्या त्याचा उपयोग बीट गाजराच्या फुलांना म्हणून सजवण्यात झाला. आता उद्योग आहे मटार सोलून दाणे स्टोअर करण्याचा.
आपले लेखन फार छान सहज सोप्पे आणि मनमिळाऊ आहे, आवडण्यासारखेच आहे आणि मी पट्टीचा खवय्या असल्याने मला तर फार आवडले, पटले, धन्यवाद सई
ReplyDeleteसध्या सर्वच स्वयंपाकात मटारचा वापर होत आहे,आमच्याही घरी.
ReplyDeleteत्यात मटारची उसळ माझ्या आवडीची.आपण खूप विस्तृतपणे सुरेख वर्णन केले आहे