हिवाळ्याचं शास्त्र
थंडी आताशा कुठे सुरु झालीय. सकाळी थोडीफार गार हवा आहे. तरीही थंडीचं शास्त्र मात्र सुरु झालंय. हे शास्त्र म्हणजे काय, हे जाणण्यासाठी बाजारात फेरफटका मारावा. सगळा बाजार सजला आहे. कितीतरी भाज्या, कितीतरी फळ, कंदमुळं. कसलाही तोटा नाही. नुसती गर्दी. काय घेऊ आणि काय नको घेऊ...शिवाय किती घेऊ हा प्रश्नही आहेच की. यावेळी असायला हवी तशी थंडी नाही. पण या भाज्यांनी मात्र त्यांचा नेम चुकवला नाही. भरभरुन आलेल्या या भाज्यांनी भरलेल्या बाजारात माझ्यासारखी भाजीप्रेमी बाई जेव्हा जाते ना, तेव्हा अक्षरशः वेड लागायला होतं. माहित असतं, घरात कोथिंबीरीचा डबा भरलाय, मेथी आहे, पालक आहे, मटार दाण्यांचे डबे भरलेत, गाजर, बीट, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो सर्व भरभरुन आहे. अगदी कुठल्या वाराला काय भाजी करायची आहे, ते ठरलंय. बाजारात गेल्यावर आता काहीच घ्यायचं नाही, हे मनाला ठासून चारवेळा बजावलंय. तरीही बाजारात गेल्यावर असे काही समोर येते, की या मनालाही मोह आवरत नाही. हिरव्या रंगाची अगदी कोवळी पालेभाजी बघितली, की मनाला जरा बाजुला ठेऊन जिभेच्या चवीला प्राधान्य दिले जाते. या अशा कोवळ्या पालेभाजीची एक जुडी घ्यावी की दोन घ्याव्या हा प्रश्न येताच परत मनाला उभारी येते. एकच बस. असा संदेश येतो. पण पुन्हा मनाची समजूत
काढली जाते. कारण हातात असलेली भाजी म्हणजे, निव्वळ आरोग्य. पाठदुखीवर रामबाण उपाय. म्हणजे, मला ज्यांनी भाजी करायला शिकवली, त्यांनीच हे वाक्य माझ्याकड़ून घोकून घेतलंय. ही कोवळी, हवीहवीशी वाटणारी भाजी म्हणजे, अळीवाची भाजी. त्यामुळे ही भाजी, पिशवीत कधी येते, याचा अंदाजही लागत नाही.
थंडीत अळीवाचे बरेच पदार्थ खाल्ले जातात. अळीवाचे लाडू होतात. पण याच अळीवाची भाजीही असते. अगदी कोवळी. फक्त मुळं उडवायची आणि अन्य पालेभाज्यांसारखी भाजी करायची. चवीला भन्नाट, शिवाय पाठदुखी, कंबरदुखी सारखी दुखणी दूर होतात, हा सल्ला मला थेट भाजीवाल्या मावशींकडून मिळालेला. गेली काही वर्ष त्यांच्या या सल्ल्याला नमस्कार करत मी अळीवाची भाजी नेमानं घेते. गेल्या आठवड्यात अशाच अळीवाच्या पालेभाजीच्या जुड्या घरी आल्या. या भाजीसोबत अळीवाच्या अन्य पदार्थांचीही रेलचेल सुरु झाली.
गेल्या आठवड्यात बाजारात मारलेला फेरफटका फायदेशीर ठरला. थंडीच्या दिवसात फ्रिज कायम हाऊसफूल असतो. तसाच माझाही आहे. त्यामुळे एरवी काय घ्यायचे याची लिस्ट घेऊन जाते. आता काय घ्यायचे नाही, याची लिस्ट तयार करुन नेते. तशाच लिस्ट सोबत बाजारात फिरत असतांना माझ्या नेहमीच्या भाजीवाल्या मावशी दिसल्या. या मावशी ठराविक दिवशी येतात. त्यांच्या शेतात लावलेल्या आणि विहिरीच्या पाण्यावर केलेल्या पालेभाज्या त्यांच्याकडे असतात. त्यामुळे त्या दिसल्यावर मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले. भाज्या काय आहेत, हे बघत असतांनाच त्यांनी एक लहानशी पालेभाजीची जुडी हातात दिली. त्या जुडीकडे बघितलं आणि माझी कळी खुलली. अरे व्वा, म्हणत तिच्या टोपलीतील दुसरीही जुडी उचलली. अगदी चारच जुड्या विकायला आणल्या होत्या. दोन संपल्या. माझ्यासाठी या दोन उरल्या होत्या बहुधा. ही अळीवाची भाजी. अगदी कोवळी. नाही म्हटलं तर साफ करायला वेळ जातो. पण या भाजीच्या चवीपुढे सगळं फिकं आहे. ही भाजी करायची पद्धतही मी याच मावश्यांकडून शिकले. मुळात अळीवाची अशी पालेभाजी असते, याची माहितीही मला नव्हती. मुळा, पालक, माठ, मेथी, चवळी, चाकवात, आंबटचुका अशा पालेभाज्यांची माहिती होती. पण काही वर्षापूर्वी या मावशींनी या अळीवाच्या भाजीची जुडी माझ्या हातात दिली. ही कधी भाजी खाल्लीस का, खा. तुझी पाठदुखी बघ बरी होईल, म्हणत त्या मावशीनं भाजी करायची पद्धत सांगितली. अगदी इतर पालेभाज्या करतो तशी, भरपूर
लसूण आणि कांद्याचा मारा, हिरवी मिरची आणि वरुन खोब-याची पेरणी. पण या भाजीची चव अफलातून असते. या मावश्यांनी सांगितल्याप्रमाणे कंबरदुखीसाठी ही भाजी म्हणजे, रामबाण उपाय. अगदी ठराविक महिन्यात या भाजीसाठी अळीवाची पेरणी होते. नोव्हेंबर, डिसेंबर. त्यातही या मावश्या, फक्त स्वतः पुरती भाजी तयार करातात. त्यातली जास्त झाली की विकायला आणतात. मला तेव्हा सांगतांना त्या अभिमानं म्हणाल्या होत्या, आमच्यातली उरली तर आणतो. ही भाजी या दोन महिन्यात पोटभर खाल्ली की, वर्षभर कंबरदुखी नाव नाही काढत बघ. तू घेऊन जा, म्हणत माझ्या हातात तेव्हा लहानशी जुडी कोंबली होती. या जुडीचा भाव डबल होता. त्यामुळे मी सुरुवातीला किंमत किती, म्हणून बोललेही. तेव्हा या हक्काच्या मावशी म्हणाल्या, औषधापेक्षा कमी आहे ना, घेऊन जा, कर, खा, आणि मग सांग. एवढ्या हक्कानं दिलेली भाजी मग मी घरी आणली. केली. भाकरीसोबत भाजीचा पहिला घास घेतला तेव्हापासून या भाजीची मी चाहती झाले. या भाजीवाल्या मावशांना दुस-यादिवशी लगेच जाऊन रिपोर्ट दिला होता. तेव्हापासून अळीवाची पालेभाजी या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात एखाद्या राणीच्या थाटात घरी येते.
काही गोष्टी आपल्या आसपासच असतात, पण त्यांच्या गुणधर्माची माहिती आपल्याला नसते. तसेच या अळीवाच्या बाबतीत आहे. अळीवाच्या पालेभाजीची माहिती मिळाली, त्यानंतर या अळीवाच्या अंकुराचीही माहिती मला मिळाली. मुंबईच्या एका मोठ्या मॉलमध्ये भाज्यांच्या विभागात फेरफटका मारतांना एक कोवळ्या अंकुराचा डबा हाती लागला. त्यात अळीवाचे अगदी कोवळे अंकूर होते. त्या स्टॉलवर देखरेख ठेवणा-या मुलीकडे चौकशी केल्यावर तिनं त्याचा वापर कसा करावा याची माहिती दिली. सॅलेडमध्ये हे अंकूर मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात, याची माहिती तिनं
दिली. मग मी माझ्यापद्धतीनं शोधाशोध केल्यावर समजलं की, हे अळीवाचे अंकूर वेगवेगळ्या सॅलेडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. अळीवाच्या पालेभाजीनंतर हे अळीवाचे अंकूर जेव्हा जेव्हा मिळतील, तेव्हा माझ्या घरी येऊ लागले.
थंडी आणि हे अळीव यांची पक्की मैत्री आहे. थंडी येऊ वा नको येऊ दे, थोडेसे अळीव पोटात गेलेच पाहिजेत. अळीवाची खीर ही सकाळच्या नाष्टासाठी संपूर्ण खाद्य म्हणून पुरेशी पडते. ज्यांना झटपट काहीतरी उत्तम खाद्य करायचे असेल त्यांच्यासाठी ही अळीवाची खीर सर्वोत्तम आहे. अगदी वाटीभर अळीव हलकेस भाजून ठेऊन द्यायचे. मग जेव्हा खीर करायचीय, तेव्हा अगदी चमचाभर अळीव गरम दुधात घालून उकळी काढायची. वरुन साखर आणि जायफळाची पूड. झाले काम. थंडीतला हा आरोग्यदायी नाष्टा आहे. असेच अळीवाचे लाडूही. शाहळ्याच्या पाण्यात भिजवलेले, चिकट अळीव आणि वरुन भरपूर खोबरं आणि गुळाचा मारा. सोबत ज्यांना हवा तेवढा सुकामेवा आणि जायफळ. चिकट, चिवट अशा या अळीवाची पहिली
भेट बाळंतपणात झाली होती. तेव्हा हे कसं खायचं, म्हणून नाक मुरडलं होतं. पण बायकांचा जन्म म्हणत, जी काही दुखणी मागे लागतात, त्यातलं मासिक पाळीच्या दरम्यानची कंबरदुखीही होती. अशाच या कंबरदुखीच्या कळा सोसत असतांना अळीवांनी साथ दिली. अळीवाच्या पालेभाजीनं थोडा आधार दिला. बाकीची कसर, खीर आणि लाडवांनी भरुन काढली. आता थंडी लागली की अळीवाचे पदार्थ हमखास करते, आणि खातेही. कारण आपल्या आरोग्यावर कुटुंबाचे आरोग्य अवलंबून आहे, याची जाणीव झाली आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Nice lekh
ReplyDeleteAliv ladu che importance khup chaan samazavale aahay
माझ्या भाजीच्या आवडीनिवडी खूप आहेत,त्यामुळे भाजी खरेदी हा विषय आमच्या सौ कडे असतो.आठवड्याची भाजी एकदाच आणायची असे असते,
ReplyDeleteविषय छान निवडला आहे
नवीन माहिती नेहमी देत असते अळीवाचे महत्त्व छान. लेख चांगला वाटला.
ReplyDeleteउपासनी.
वेगळ्या भाजीची छान माहिती दिली आहे
ReplyDeleteखुप छान👍👍👌👌
ReplyDeleteअळीवाची पाले भाजी असते हे प्रथमच कळलं आणी सईचा परीस र्यश झारुपावर लेख दी नेहमी प्रमाण उत्कंठावर्धक !!
ReplyDeleteअळीवाची भाजी खरंच पहिल्यांदा कळलं किल्ला केल्यावर मोहोरीप्रमाणे अळीवहीआम्ही रुजत घालत असू. पण त्याची भाजी करून खायची हे पहिल्यांदाच कळले
ReplyDelete