हिवाळ्याचे शास्त्रःभाग दोन
हुश्श...हुश्श...करत समोर ठेवलेल्या ताटात शेवटचा लाडू ठेवला. बरोबर सायंकाळचे सात वाजले होते. सकाळी अकरा वाजता मेथीच्या लाडवांचा घाट घातला. हिवाळ्यातलं हे आणखी एक महत्त्वाचं शास्त्र. पण हे थोडं अवघड शास्त्र. अख्खा दिवस या लाडवांच्या मागे लागावं लागतं. तसाच बुधवार गेला. सकाळी अकरा वाजता मेथीची पावडर करुन दुधात भिजवली. त्यांनंतर बरोबर चार तासांनी लाडू करायला सुरुवात केली. सायंकाळी बरोबर सात वाजता लाडू करुन झाले. दिवा लागणीच्या वेळी झालेल्या या लाडवांचा पहिला नैवेद्य देवाला दाखवला. मग त्याच लाडवाचा पहिला घास घेतला, आणि दिवसभराचा सगळा थकवा त्या चवींच्या मिश्रणात गायब झाला. हलकीशी मेथीची कडू चव, खारकेच्या पावडरीचा गोडूसपणा, त्यात काळीमिरी आणि सुंठीचा ठसका. सर्व चवींचा एका मागोमाग एक उलगडा करत लाडू संपला आणि माझी मीच पाठ थोपटून घेतली. थंडीत हमखास खावा असा हा लाडू अगदी योग्य प्रमाणाचा झाला होता.
मेथीचे लाडू. लहानपणी फक्त हाच एक लाडू होता, की ज्याचे नाव कानावर पडले तरी तोंडात कडू चव यायची. तोंड वाकडं व्हायचं. थंडीच्या दिवसात मेथीचा लाडू हातात पडायचा तेव्हा एका हातात पाण्याचा ग्लास घेऊनच बसायचे. लाडवाचा एक घास घेतला की लगेच पाण्याचा मोठा घोट घेत, लाडू गिळायचा. त्यामुळेच बळजबरीनं खालेल्या या लाडवांची चव कधी चाखलीच नाही. बाळतंपणात या मेथीच्या लाडवांचा डबा आईनं हातात दिला, आणि आता तूच ठरव कसं खायचं ते, पाण्यासोबत की चवीसोबत. कोणी देणार नाही. तूच तुझ्यासाठी आणि बाळासाठी स्वतःहून घ्यायचा आणि खायचा. जसं खाशील तसं लेकाला लागेल, म्हणत एक अनोखं चॅलेंज दिलं. आई झाल्यावर सर्व गणितंच बदलतात. मग या मेथीच्या लाडवांचं ते काय. सकाळी दुधासोबत मेथीचा लाडू खायला सुरुवात केली. तेव्हा कुठे या लाडवांची चव समजली. मेथी ही मुळात कडूच. पण या मेथीचे लाडू कडू असले तरी ते चवीचे असतात, याचा शोध तेव्हा लागला. मग या चवीची चटक लागली. सुरुवातीला विकत आणले. पण या लाडवांचं आणि माझं काही जमेना. मग लाडू करण्याचा प्रयत्न सुरु केला.
पहिल्यांदा या मेथीच्या लाडवांनी पार विकेट काढली. तेव्हा युटूब प्रकरण
एवढं नव्हतं. पुस्तकं वाचून पहिल्यांदा रेसिपी लिहून काढली. चार जाणकारांना विचारलं. मेथी किती घ्यावी इथपासून वाद सुरु झाला. मी सर्वांचं ऐकलं. प्रमाणातच गडबड केली. अर्धा किलो मेथीचे दाणे आणले. भाजले. मग मिक्सरवर बारीक केले. त्यात खोबरं, काजू, बदाम आणि गव्हाचे पिठ भाजून टाकले. पदार्थ बनवतांना प्रमाण हा शब्द महत्त्वाचा असतो. मी तोच पहिल्यांदा गाळून टाकला. मोठी परातभर सर्व सारण झालं. त्यात भरीस भर म्हणून गुळाचा पाक कडक झाला. तरीही न कंटाळता लाडू वळले. शेवटी तर हे सर्व मिश्रण एवढं कडक झालं की ते मिस्करचा आधार घेत बारीक करावं लागलं. एवढं करुन कसेतरी मेथीचे लाडू तयार झाले. आता प्रश्न होता की हे लाडू खाणार कोण. कारण एवढी मेहनत करुन लाडू प्रचंड कडू झाले होते. पण पहिल्यांदा घरी केलेले लाडू, लाडाचे ठरले. पहिले काही दिवस आम्ही दोघांनी कसेतरी पाण्याबरोबर संपवले. त्या प्रत्येक लाडवासोबत आता घरी कधीही मेथीचे लाडू करायचे नाहीत हा निश्चय पक्का होत गेला. पण पुन्हा येतो पावसाळा तसाच हिवाळाही येतोच की. पुढच्या वर्षी आलेल्या हिवाळ्यानं नवी उभारी दिली. यावेळी अगदी थोड्या प्रमाणाचे लाडू करायचे असे ठरवले.
पुन्हा रेसिपी वाचन सुरु झाले. या लावडवातील जाणत्यांना विचारलं. मग माझी स्वतःची रेसिपी ठरवली. या सर्व शोधाशोधीमध्ये एक महिती मिळाली, की मेथीचे लाडू असले तरी मेथी भरमसाठ वापरायची नाही. अगदी एक वाटी किंवा शंभर ग्रॅम मेथीचा वापर केला तरी डबाभर लाडू होतात. मग याच प्रमाणात अन्य जिन्नसांचा वापर करायचा असं ठरलं. मेथी भाजून त्याची पावडर केली. त्यात त्याच प्रमाणात सुकं खोबरं, डिंक, काजू, बदाम टाकले. गुळ मात्र डबल घेतला. तूप थोडे जास्तीचे घेतले आणि गुळाचा पाक केला. गेला अनुभव सोबतीला होता, त्यामुळे गुळ वितळल्यावर लगेच गॅस बंद करुन सर्व मिश्रण घातले. यावेळी जरा आवाका कमी होता. त्यामुळे लाडू वळायलाही कंटाळा आला नाही. लाडूही बरे झाले होते. म्हणजे, पाण्याशिवाय संपवता आले.
त्यानंतर मात्र येणा-या प्रत्येक हिवाळ्यात मेथीच्या लाडवांचा घाट घालू लागले. फोनमधील टेक्नोलॉजी जशी अपडेट होत जाते, तसेच या लाडवांचे दरवर्षी होत आहे. दरवर्षी या लाडवांमधील जिन्नसांची संख्या वाढत जाते. लाडू अधिक सकस होत गेले आणि स्वादिष्टही. आता गव्हाच्या पिठाचंच बघा ना, पहिल्यांदा साध्या गव्हाचं पिठ वापरायचे. आता खपली गव्हाचे पिठ वापरात आले आहे. किंचीत रवाळ असलेल्या या पिठानं लाडवांची लज्जत अधिक वाढली आहे. कमरकस नावाचा पदार्थ त्यात सामिल झाला. लाल रंगाचा डिंकासारखा हा पदार्थ पहिल्यांदा इंदौरला दिसला. तिथल्या मसाल्यांच्या दुकानात फेरफटका मारतांना या कमरकसची ओळख झाली. त्या दुकानात दुकानदाराची पत्नीही सोबत होती. तिनं तेव्हा या कमरकस बाबत माहिती सांगितली. शिवाय वापरायची पद्धतही सांगितली. मेथीच्या लाडवात तिथे हे कमरकस वापरतात. तिनं तो कमरकस घातलेला लाडू माझ्या हातावर दिला, चव बघायला सांगितली. तेव्हापासून माझ्या घरच्याही लाडवात कमरकस सामिल झाले. मी त्याचे मराठी नाव काय ते शोधायचा बराच प्रयत्न केला. पण मिळालं नाही. आता हे कमरकस अगदी अमेझॉनवरही याच नावानं मिळतं. असो, अगदी डिंकासारखा याचा वापर करायचा.
मुख्य म्हणजे, आता प्रमाणाचा वापर होतो. शंभर ग्रॅम मेथी आणि मग
बाकीचे सर्व जिन्नस त्या-त्या प्रमाणात. तीळ, आळशी, खसखस, मखाना, सुंठ पावडर, काळीमिरी पावडर, काजू, बदाम, अक्रोड, सुकं खोबरं, गुळ, गव्हाचे पिठ, भोपळा आणि चियाच्या बिया, खारीक पावडर, डिंक आणि कमरकस आणि वेलची. सध्या तरी एवढ्या साहित्यातील लाडू तयार केले. पुढच्या वर्षी कदाचित यामध्ये अजून काहीतरी सामिल होईल. आता या लाडवांवर एवढा हात बसला आहे की, लाडू करायचे म्हटले तरी डोळ्यासमोर सर्व जिन्नस समोर उभे रहातात. पण हे जिन्नस कितीही वेळा पुढे आले तरी लाडू मात्र कधीही करायचे नाहीत. कारण त्यांचं एक शास्त्र आहे, आणि ते हिवाळ्यातच सुरु होतं. हिवाळ्याच्या या शास्त्रामुळे असे कितीतरी अवघड वाटणारे पदार्थ शिकवले आहेत, ही शिकवणीचा दर्जा प्रत्येक हिवाळ्यात अधिक उंचावत जाणार आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khoop Chan
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप भारी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमेथीचे लाडू छान.
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteमेथीचे लाडू एकदम लाजवाब
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteहिवाळ्यात शास्त्र भारी आता पुढच्या ब्लॉगमध्ये हिवाळ्याचा शास्त्र तीन असे लिहून बाजरीचे पदार्थ लिही
ReplyDeleteनक्कीच...
Deletekhup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद....
Deleteमेथीचा लाडू मला आवडत नाही,कधी चवही बघितली नाही.
ReplyDeleteअपण्या विषयवार आपल्या खुमासदार शैलीत वर्णन केले आहे.छान
Mast
ReplyDeleteसुगरण सईचं खूप कौतुक.,. ललिता छेडा
ReplyDeleteChan lekh
ReplyDeleteChan lekh
ReplyDelete