इंदौरी चवीची बहार...

 

 इंदौरी चवीची बहार...


माझ्यासमोर एक पिशवी होती, आणि त्यात हिरव्या रंगाचं सोनं होतं.  चवीचं सोनं.  माझ्या एका मैत्रिणीनं नुकताच इंदौरची ट्रीप केली.  इंदौर हे माझं सर्वात लाडकं शहर.  अगदी गल्लीबोळाची माहिती.  त्यामुळे या मैत्रिणीनं तिच्या सर्व ट्रिपचा प्लॅन मला विचारुन केलेला.  हॉटेल बुकींगपासून ते खरेदीपर्यंत मी सगळं आखून दिलं.  तीन दिवसाच्या तिच्या या ट्रीपमध्ये इंदौरची पर्यटनस्थळं, तिथे जाण्याची योग्य वेळ, खरेदीचे पॉईंट, प्रवास कसा करायचा, इंदौरी आयबस,  सराफा आणि छप्पनभोगमधील फरक आदी सर्वांची माहिती दिली होती.  इंदौरमध्ये अनेक चवींची हॉटेल आहेत, त्यांची माहिती दिली होती.  मैत्रिणीनं मी आखून दिलेला प्लॅन शंभर टक्के कॉपी केला.  अगदी परत येतांना गाडीमध्ये जेवण करण्यासाठी पार्सलही मी सांगितलेल्या हॉटेलमधून घेतलं होतं.  तीन दिवसाच्या ट्रिप नंतर ती माझ्या घरी आली तिच ही पिशवी घेऊन.  माझ्या हातात पिशवी देऊन म्हणाली, तुझ्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळल्या.  फिरण्याच्या वेळा सांभाळल्या. आणि तू सांगितलीस तशीच खरेदी केली.  ही त्यातलीच खास वस्तू तुझ्यासाठी आणली,  एक


पिशवी तिनं माझ्या हातात दिली.  मी ती पिशवी अघडतांना त्याच्याच जवळपास आत माझं अर्ध डोकंच घुसवलं.  त्या पिशवीतील हिरवा रंग आणि तो मंद सुगंध घेत हळूवार मान वर केली.  माझे बंद डोळे आणि चेह-यावरील प्रसन्न हसू बघून ती म्हणलीच, हॅप्पी ना...बघ मला वाटलंच होतं.  यापेक्षा तुझ्यासाठी चांगलं रिटर्न गिफ्ट असणारच नाही म्हणून.  मैत्रिण कॉफी आणि गप्पा असा कार्यक्रम करुन निघली आणि मी त्या हिरव्या सोन्याच्या चवीत रमले.  ते हिरवं सोनं म्हणजे हरभरे. 

संक्रात जवळ आली की बाजारात या हरभ-याची गर्दी होते.  मुळासकट असलेल्या छोट्या हरभ-याच्या रोपट्यांच्या जुड्यांची विक्री होते.  मग काही दिवसात या हरभ-यांचा सुकाळ सुरु होतो.  सुरुवातीला हे हरभरे त्यावरील तशाच हिरव्या गर्द रंगाच्या सालीच्या आवरणासह किलोवर विकले जातात.  फेब्रुवारी महिना सुरु होताच मग त्यावरील हिरवी सालंही जाऊन सोललेला हिरवा हरभरा बाजारात मिळू लागतो.  मात्र आपल्यापेक्षा इंदौरमध्ये या हरभ-यांची आवक आधी चालू होते.  इंदौर हे खवय्यांचं शहर म्हणून की काय, पण


तिथे थंडीची चाहूल लागली की, बाजारात हे हरभरे दाखल होतात.  अर्थातच तिथली थंडी ही अधिक बोचरी असते.  त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीराला अधिक पोषक आहाराची गरज असते,  म्हणूनच बहुधा इंदौरच्या बाजारात या दिवसात हिरव्या हरभ-याची बहार आलेली असते.  संध्याकाळी या हिरव्या हरभ-यांचे ठेले जागोजागी दिसतात.  फक्त तिखट आणि  मिठ लावलेले हे हरभरे अप्रतिम लागतात.  मुख्य म्हणजे, इंदौरमध्ये रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाच्या समोर या ताज्या हिरव्या मसाल्याची भाजी आणि गरमा गरम फुलके मिळतात.  आमच्या एका इंदौर दौ-यात रात्री अकरानंतर थंडीत थरथरत या चवीचा आस्वाद घेतला होता.  हरभरे फक्त तेल, जिरे, काळीमिरी, बडीशेप, तिखट, मिठ यावर परतले होते.  सोबत गरम गरम फुलके.  पहिल्या दोन-तीन घासानंतर थंडीची थरथर दूर झाली होती.  कारण मन सर्व त्या चवीवर केंद्रीत झालं होतं.  ती भाजी वजा चाट करणा-याकडून मी नंतर त्या रेसिपीची माहितीही घेतली.  पण इथे आल्यावर तो स्वाद काही त्याला आला नव्हता.  अर्थात इंदौर ते इंदौरच.  त्याची कॉपी करणं कधीही शक्य होणार नाही.  मैत्रिण इंदौरला निघाली, तेव्हा मी तिच्या प्लॅनमध्ये पहिल्या क्रमांकावर या हरभ-याची नोंद केली होती.  जिथे मिळतील तिथून विकत घे.  अगदी दोन-चार किलो घे.  अशा सूचना तिला दिल्या होत्या.  तिनं त्या पाळल्याही होत्या.  त्यातूनच हाती आलेल्या त्या हरभ-यांचे करावे काय हा विचार करत एक छोटीशी लिस्ट तयार केली.


हरभ-यांचे दोन वाटे केले.  एक सॅलेडचा वाटा तर दुसरा वाटा भाजीसाठी.  हरभ-याचे सॅलेड ही सर्वात सोप्पी रेसिपी आणि चविष्टही.  सोललेले हरभरे बाजारात यायला लागले की हे सॅलेड मी हमखास करते.  अगदी सकाळी घाईच्या वेळीही झटपट होणारे.  सकाळी नव-याच्या डब्याच्या भाक-या झाल्यावर त्याच तव्यावर हरभ-याचा एक वाटा टाकला.  नावाला पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला.  दुसरीकडे डाळींबाचे दाणे, अननसाचे बारीक तुकडे एकत्र करुन ठेवले.  त्यात मग हे हरभरे, वर ती पेरीपेरी मसाला नामक पावडर येते,  ती पेरली. बस्स नव-याचा सॅलेडचा डबा भरला आणि माझी सॅलेडचा बाऊल भरुन ठेवला.  अगदी फार हौस असेल तर यावर शेव, कोथिंबीर, पेरली तर अजून स्वाद डबल होतो.  कांद्याचा वापर मात्र मी यात कधी केला नाही.  कारण हरभ-याचा एक वेगळा स्वाद असतो.  त्यात कच्चा कांदा टाकला तर कांद्याचा स्वाद या हरभ-याच्या स्वादावर स्वार होतो, असा मला तरी वाटलं, तेव्हापासून कांदा या सॅलेडपासून दूर ठेऊ लागले आहे.

सॅलेडनंतर आता राहिला दुसरा भाग.  त्याचे परत दोन भाग करुन घेतले.  एका भागातील हरभरे, थोडं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, ओवा, बडीशेप या


सर्वाला बारीक करुन घेतलं.  त्यात मग तीळ, हिंग आणि मिठ घातलं.  मग आपल्या गव्हाच्या पिठासोबत हे सर्व मळून छोटे गोळे तयार करायचे.  अगदीच तेलाचा तिटकारा असेल तर थालीपिठंही छान होतं.  हे पिठ घट्ट मळलं तर चपातीही लाटता येते.  नाहीतर छान पु-या तेलात तळता येतात.  माझ्या घरातले पहिले हरभरे होते.  त्यामुळे तेलाचा बाऊ न करता, उदार मनानं पु-या तळल्या.  त्या नाष्ट्यासाठी झाल्या.  नवरा खूष.  मग राहिला तो त्या हरभ-याचा एक वाटा.  रात्री जेवणासोबत तो कामी आला.  अगदी चमचाभर आलं खोबरं आणि जि-याचं वाटण केलं.  इंदौरचं नाव घेत, साधी फोडणी टाकली.  त्यावर तिखट आणि

हळद.  ठसका लागला की राहिलेले हरभरे टाकून परतलं आणि वर हे ओल्या खोब-याचं वाटण.  बाकी काही नाही.  रात्रीच्या जेवणात हा हरभ-याचा रस्सा आणि बाजरीच्या भाक-या.  इंदौरचं नाव जपत जेवणाचा बेत केला.  आमच्या ताटात दोन पदार्थ होते.  पण समोर इंदौरचा भरलेला सराफा बाजार दिसत होता.  त्याच सराफाच्या कोप-या कोप-यावर हे हरभरे विक्रीस येतात आणि माझ्यासारखे चोखंदळ खवय्यांच्या चिभेचे चोचले पुरवतात. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. हरभरा चटपटीत रेसिपी मस्

    ReplyDelete
  2. महेश टिल्लू30 December 2023 at 19:08

    खुप रसभरीत वर्णन केले आहे,इंदूर ला जाईन तेव्हा तुमच्याकडूनच सर्व माहिती घेईन.विषय तसा खूप साधा पण खमंग केला आहे..अप्रतिम

    ReplyDelete
  3. डॉ अद्वैत पाध्ये3 January 2024 at 22:56

    हिरवा हरभरा माझाही आवडता,तोंडाला पाणी सुचलं वाचताना!!

    ReplyDelete

Post a Comment