एक दिवस परीक्षेचा....

 

 एक दिवस परीक्षेचा....


फक्त सहा तास...अजून थोड्या वेळानं घड्याळात बघितलं, त्यावर फक्त दहा मिनिटं झालेली.  वारंवार नजर टेबलावरील ट्रे वर जात होती.  पण इलाज काहीच नव्हता.  टेबल आणि त्यावरील ट्रे अगदी हाताच्या अंतरावर, तरीही ट्रेमधील ती वस्तू घेण्यासाठी मन तयार होत नव्हतं.  ही गोष्ट आहे, रविवारची आणि ती वस्तू म्हणजे, माझं, तुमचं, आपल्या सर्वांचं पहिलं प्रेम झालेला मोबाईल.  मोबाईलमध्ये आपला बराच वेळ जातो, ही नव-याची कायमची तक्रार. काही दिवसांपूर्वी आम्ही नो स्क्रीन टाईम हा व्हिडिओ बघिलता होता, अर्थात तोही मोबाईलवरच.  त्यात ठराविक काळासाठी मोबाईलपासून दूर रहायला शिकायला हवं, आणि असा प्रयत्न करतांना काय काय काळजी घ्यावी या सगळ्या सूचना त्यात दिल्या होत्या.  हा व्हिडिओ बघितल्यावर नव-यानं पहिल्यांदा जाहीर केलं, हे मला शक्य आहे, पण तुझं काही खरं नाही.  पहिल्या तासाभरात तू ढेपाळशील.  त्याचा तो ढेपाळशील हा शब्दच जिव्हारी लागला.  शक्यच नाही.  मी ठरवलं तर काहीही करु शकते.  रविवारी हा प्रयोग करुया.  एरवी रविवारची कामंही जास्त असतात.  त्यात कळणारही नाही.  हे सर्व मी जाहीर केलं, आणि दुस-याच क्षणाला जाणीव झाली, मी फसलेय.  किंवा फसवले गेलेय.  पण आता पर्याय नव्हता.  रविवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मोबाईल वापरायचा नाही.  अगदी फोनही नाही.  फक्त काही महत्त्वाचे फोन असतील तर ते घ्यायचे आणि मोजक्या शब्दात बोलायचे, हे ठरले. 


शनिवारी रात्री उशीरापर्यंत मी फोनवरुन जी सगळी कामं करायची होती ती केली.  अगदी नाही करायची ती सुद्धा मोहात पडून केली.  म्हणजेच, दोन-चार रिल बघितल्या.  रविवारी कुठला नवा पदार्थ करायचा आहे, त्याचे काही व्हिडिओ बघितले.  पुढच्या ट्रीपचा प्लॅन तयार होतोय, त्यासाठी त्या जागेचे व्हिडिओ बघितले.  उगाच एक-दोन फॅशन, भविष्य, राजकारण या विषयावरील व्हिडिओही बघून झाले.  दुस-या दिवशी अगदी कडक उपवास असेल तर, आदल्या दिवशी जसं पोटभर खाऊन घेण्याचा प्रयत्न होतो, तसंच चाललं होतं.  नव-यानं त्याची फोनवरची कामं कधीच उरकली.  रिलबिलच्या फंदात तो कधीच नसतो, त्याचं एकच, शेअर बाजाराची खबर.  त्यानं आपला फोन ठेऊन दिला होता.  पुस्तकाचं पान पलटत असतांना मला विचारुन बघितलं, बघ जमणार आहे का, नाहीतर मी ठरवलंय, मी पूर्ण वेळ करणार, तुला जमणार नसेल तर आत्ताच सांग.  आपण माघार कशाला घ्यायची.  मी फोन ठेऊन दिला.  मोह नकोच, म्हणून घरातील नेटवर्कचं मशीनच बंद करुन टाकलं. 
न रहेगा बांस ना बजेगी बांसुरी.

रविवारची नेमकी लवकर जाग आली.  अगदी सहा वाजता.  पहिली जाणीव झाली ती, दोन तास हातात होते.  काही फोन करायचे होते, काही मेसेज पाठवायचे होते.  काही मेसेजना उत्तरं द्यायची होती.  वाढदिवसाचे मेसेज आवश्यक होते.  सकाळी उठून पहिली ही सर्व कामं करुन घेतली.  अगदी वीस मिनीटात सर्व कामं झाली.  फोन बाजूला ठेवला.  तोपर्यंत नवराही उठला.  फोन घरी ठेऊन चालायला जाऊया, असा त्याचा प्रस्ताव, त्याबदल्यात नाष्टा बाहेरुन आणण्याचं त्यानं जाहीर केलं.  फोन घरी ठेऊन बाहेर जाणं म्हणजे, माझ्या दृष्टीनं एखाद्या तान्ह्या बाळाला घरात कोंडून ठेवणं.  मग ते रडलं तर, त्याला काही झालं तर, त्याला भूक लागली तर, असे नाना प्रश्न जसे मनात येतात, तसेच या फोनबाबतही आहेतच की.  कोणाचा फोन आला तर.  मेसेज आला तर.  व्हिडिओ कॉल आला तर...ही फोनची रांग समोर आली आणि मी नाराजी व्यक्त केली.  आपलं सकाळी आठ पासून ठरलं होतं.  अजून एक तास बाकी आहे,  मी नव-याला जाणीव करुन दिली.   तर
त्यानं संध्याकाळचा एक तास कमी करुया म्हणून सांगितलं.  आता भरपूर चालूया, येतांना भाजी, फळं आणि नाष्टा घेऊन येऊया.  नव-याची ऑफर छान होती.  भाजीच्या निमित्तानं फिरतांना मला फोनची आठवण होत नाही, हा त्यातील एक प्लस पॉईंट होता.  शिवाय रविवारचा नाष्टा आयता मिळणार.  मी होकार दिला.  सकाळचे नाही म्हणायला अडीच तास बाहेर

गेले, फोन शिवाय.   चालत असतांना पार टेकडी गाठली.  सकाळचा सूर्यदेव आणि पक्षी पहात फोनची आठवण झाली.  हे क्षण टिपायला हवे होते, असं वाटायला लागलं.  पण ते काही क्षणभर.  नंतर त्या वातावरणाची धुंदी चढली.  फोनची आठवण विरळ झाली.  त्यानंतर माझं आवडतं काम, भाज्यांची खरेदी झाली.   हातात दोन-दोन पिशव्या घेऊन आम्ही घरी आलो.  पिशव्या ठेवल्यावर पहिल्यांदा त्या नो स्क्रीन चॅलेंजचा विसरच पडला.  फोनला बघितलं आणि काहीतरी अमूल्य दिसल्याचा आनंद झाला.  धावत मोबाईलजवळ गेले, पण मागून नव-यानं आवाज दिला.  अरे विसरलीस का...मी शॉक लागल्यासारखी मागे फिरले.  दहा-साडेदहा वाजले होते.  अजून काही तास,  तेही भरभर जातील, म्हणून मी मागे आले. 

पुढचा अख्खा दिवस भाज्या साफ करण्यात, स्वयंपाकात गेला.  दुपारच्या जेवणात अगदी लांबलचक मेनू करुन झाला.  घरातील खाऊच्या बरण्या खाली झाल्या होत्या.  बिस्कीट,  चटण्या  या बरण्या पुन्हा भरायला घेतल्या.  गॅलरीमधल्या कुंड्यांची साफसफाई झाली.  आदल्याच दिवशी क्रॉफर्डचा दौरा केलेला.  त्यात बरेच रेशमाचे धागेदोरे, टिकल्या, कुंदन आणलेले.  हे सर्व सामान भरुन झाले.  एक पुस्तक बरेच दिवस वाचत होते, ते पूर्ण झालं आणि नवीन पुस्तक हातात पकडलं.   या कामात वेळ गेला.  फोन सोबत नाही, याची जाणीव होत होती.  मध्येच एक-दोन फोनही आले.  ठरल्याप्रमाणे अगदी जुजबी बोलून फोन ठेऊन दिला.  पण फोन बाजुला ठेवतांना मेसेज बघायचा मोह पडत होता.  कुणाचा अगदी आवश्यक मेसेज आला असेल तर...हा प्रश्न काही मनातून जात नव्हता.  सायंकाळी कॉफी घेतांनाही त्या फोनवरच नजर ठेऊन होते.  मेसेज येत असल्याचा लहान आवाजानं कॉफीवरील लक्ष उडत होतं.  शेवटी नव-यानं विचारलंही,  अजून दोन तास बाकी आहेत.  तू मोबाईल बघितलास तरी चालेल.  सनम पुरीला ऐकत त्याचा चहा चालू होता.  मोबाईल नावाची वस्तू या जगात आहे, हे तो विसरुनही


गेला होता.  त्याच्या चेह-यावरील शांततेनं माझं मन शांत झालं.  मोबाईलवरील लक्ष कमी झालं आणि गाण्यांवर लक्ष केंद्रीत केलं.  हळूहळू दिवसभर मी काय केलं याची उजळणी चालू झाली.  दिवसभरात काय केलं...तर सगळी कामं नेमानं झाली होती.  आठवड्यासाठीची भाजी साफ करुन झाली होती.  खाऊ करुन झाला होता.  ही कामं तर नेहमी होतात, पण यासोबत भरपूर गप्पा मारुन झाल्या होत्या.  यातील प्रत्येक कामात नव-यानं मदत केली होती, ते करतांना दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या.  एरवी रविवारीही अशी कामं होतात, पण ब-याचवेळा एका कानाला फोन लावलेला असतो.  दुसरीकडे नवराही रविवारी या फोनच्या अवती भोवती असतो.  त्यानंही हा अवती भोवती शब्द एक दिवसासाठी गाळून टाकला होता.  एकूण बारा तास फोनशिवाय हा प्रयोग यशस्वी झाला होता.  

बारातासांचा फोनचा उपवास सुटला.  पण हा उपवास सुटतांनाही अधाश्यासारखी त्या फोनवरी झेप टाकली नाही.  अजिर्ण व्हायला नको,  मनाशी खुणगाठ बांधली.  दिवसभर फोन आले होते, मेसेज होते.  त्यांना सावकाश उत्तरं दिली.  आणि पुन्हा एकदा फोनला बाजला ठेवलं.  फोन गरजेचा आहे,  पण तो आपल्यावर स्वार व्हायला लागला की हा असा उपवास कामी येतो, याची जाणीव झाली आणि पुढच्या सर्व रविवारचा मेनू नक्की झाला. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा.     

Comments

  1. Phone बाजूला ठेवणे खूप अवघड आहे असे आपल्या मनावर आपणच कोरलेले आहे.प्रयत्न केला तर अशक्य असे काहीच नाही,फोन आजची गरज आहे,त्याच्याकडून योग्य तो उपयोग करून घेण्यासाठी.शेवटी आपली विवेकबुद्धी.
    अत्यंत ज्वलंत प्रश्नाला आपण हात दिला आहे,मोबाईल हे व्यसन बनू नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे.

    ReplyDelete

Post a Comment