प्रिमिक्स आणि जेवण...

 

 प्रिमिक्स आणि जेवण...


चार दिवस घरापासून दूर रहायचे होते, तारीख नक्की झाल्यावर नव-याचा पहिला प्रश्न आला, माझ्या जेवणाचं काय.  गेल्या काही दिवसापासून मी या चार दिवसांसाठी प्रयत्न करत होते.  माझी पॅकींग चालू होती.  जिथे जाणार तिथे थंडी जास्त, त्यामुळे तसे कपडे घेतलेले, बाकी राहिलेल्या लिखाणासाठीचा दौरा, त्यामुळे लॅपटॉप मुख्य.  त्याचा चार्जर आदी सगळ्या वस्तूंची लिस्ट काढली आणि तशी पॅकींग करुन घेतली.  मात्र या सगळ्यात मुख्य प्रश्न बाकी राहीला होता, तोच नव-यानं विचारला.  चार दिवस मी घरी नसतांना त्याच्या जेवणाचं काय.  सकाळचा प्रश्न नव्हता.  खाऊचे डबे भरुन ठेवले होते.  लाडू, बिस्कीट तयार आहेत.  दुपारी ऑफीसमध्ये जेवण. पण रात्री उशीरा घरी आल्यावर जेवणाचं काय, हा प्रश्न घेऊन नवरा समोर उभा राहिला.  रात्री दहा वाजता घरी येणा-या नव-याला साग्रसंगीत जेवण लागतं असंही नाही, पण जे असेल ते अगदी गरम गरम असावे अशी अपेक्षा असते.  अशावेळी चारदिवस त्याच्यासाठी काय सोय करुन ठेवावी हा विचार आला आणि पहिले नाव समोर आले ते रसम पावडरचे.  फक्त पाण्यात मिक्स करायची आणि एक उकळी काढायची.  वरुन नावाला फोडणी. अगदी वाफाळते


रसम तयार.  नव-याची संमती मिळाली आणि मी तयारीला लागले.

नोकरी, घर, लेकाचे पाळणाघर अशी तारेवरची कसरत चालू होती, तेव्हा जेवण करतांनाचे अनेक शॉर्टकट मी शोधून ठेवले होते.  आठवड्याचा एक सुट्टीचा दिवस या सगळ्या शॉर्टकटमध्ये जायचा.  पण त्यामुळे अगदी अर्धातासात दोनवेळचे जेवण तयार व्हायचे.  त्याचवेळी अशा वेगवेगळ्या पावडर करुन ठेवायची सवय लागली.  नंतर ही सवय छंदामध्ये बदलली.  सुरुवातीला टोमॅटोचा ज्युस काढून त्याचे आईसक्युबमध्ये टाकून क्युब तयार करत असे.  हे क्युब जेवण करतांना भाजीमध्ये टाकले की काम व्हायचे.  पण लाईट गेला, फ्रिज बंद झाला की हा सगळा खटाटोप व्यर्थ व्हायचा.  मग यावर उपाय काय, हा विचार सुरु केला.  त्यातूनच माझे प्रिमिक्सचे जग निर्माण झाले.

खिडकीतून येणा-या उन्हाचा आणि आपल्याकडील उष्ण वातावरणाचा वापर


सुरु केला.  पहिला प्रयोग अत्यंत सावधपणे केला तो बिटरुटवर.  अर्धाकिलो बिटाची सालं काढून ते मोठ्या किसणीच्या सह्यानं बारीक केले.  मोठ्या परातीमध्ये हा बिट वाळत ठेवला.  संध्याकाळपर्यंत अगदी खडखडीत नाही पण ब-यापैकी वाळला.  नंतर अगदी दोन दिवसात खडखडीत बिट हाती आला.  त्याला मिक्सरमधून फिरवल्यावर छान पावडर हाती आली.  अर्धाकिलो बिटामधून अगदी थोडीशी पावडर तयार झाली.  पण तेवढीही बस पडली, पुढे भाजीमध्ये या बिटाच्या पावडरची पुड टाकायला सुरुवात केली.  बिर्याणी बनवतांना भाताच्या थरावर बिटाच्या पावडरची पेरणी केली.  छान रंग आणि बिटाचे गुण, दोन्हीही मिळायला लागले.  मग मार्च महिना सुरु झाला,  सूर्य चांगला तापला की अशा पावडरी करण्याची स्पर्धाच मी माझी लावून घेतली.  कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, गाजर, बिट, लसूण, आलं, पुदीना या सर्वांवर प्रयोग सुरु झाले.  त्यातून खूप शिकता आलं, आणि बरंच काम सोप्प झालं.  अशाच पावडरी मिक्स करुन सूप तयार करायला लागले, तेव्हा नवरा आणि लेकानं डोक्यावर हात मारुन घेतला.  पण चहा, कॉफी, सूपचे हे प्रिमिक्स बाहेर कुठे फिरायला गेल्यावर किती उपयोगी पडतात, याची जाणाव झाल्यावर त्यांनी कौतुक केले. 


हा एक टप्पा होता, आता पुढे काय हा विचार सुरु झाला.  त्यातूनच प्रिमिक्स करायला सुरुवात केली.  आयत्यावेळी भाजी, सार, बिर्याणी सारखे पदार्थ करायची वेळ आली, तर हे प्रिमिक्स उपयोगी पडतात.  शिवाय त्यातून  अस्सल चवही मिळू लागली.  मसाले करण्याचे व्यसन लागले की त्यात कसं गुंतायला होतं, हे कळत नाही.  कितीतरी प्रयोग होतात.  ब-याचवेळा असे प्रयोग फसले.  मग हे फसलेले मसाले घरी वापरतांना अधिक तारांबळ झाली.  पहिला घास घेतला की लेकाचा सूर बिघडायचा.  नव-याचा तर थेट प्रश्न, हा नवा मसाला कधी संपणार.  कधी कधी तर दोघंही मागे लागायचे, टाकून दे.  पण मी कधीही असे फसलेले मसाले टाकून दिले नाही, कारण त्याच्यापासून केलेल्या पदार्थाचा प्रत्येक घास घेतांना मी काय कुठला सुका मसाला जास्त वापरला किंवा कमी वापरला याचं गणित मनातल्या मनात करत असे.  असे फसलेले मसाले पुन्हा करायला घेतल्यावर शंभर टक्के यशस्वी झाले.  ते बनवतांना घर त्यांच्या वासांनी भरुन गेले.  त्यातूनच पावती मिळायची.  चहा, सांबार, रस्सम, बिर्यानी, मसाले भात, पावभाजी, पनीरच्या अनेक भाज्या, असे अनेक प्रिमिक्स करायला लागले आणि ते यशस्वीही झाले.  तिथूनच माझ्या छोट्या स्टार्टअपची सुरुवात झाली, जसई नावाची.   

आता जेव्हा नवरा माझ्यासमोर जेवणाची सोय काय, हा प्रश्न विचारत होता


, तेव्हा हिच जसईची रस्सम पावडर मदतीला आली.  नव-याला हा प्रस्ताव पटला.  चारदिवस त्याला ऑफीसमधून यायला उशीर होणार होता.  रात्री हॉटेलचे जेवण नको होते,   अगदी घरचा डाळभातही चालला होता.  पण डाळ शिजवायचा प्रश्न होता.  अशावेळी ही रस्सम पावडर चांगलीच उपयोगी पडते.  चणाडाळ, तूरडाळ भाजून त्यातच कडीपत्त्याची पानेही परतायची.  मग जिरं, धणे, काळीमिरी, लाल मिरच्या भाजून घायचे.  हे सगळं छान थंड झालं की बारीक वाटायचे.  मग शेवटचा मिक्सर फिरवतांना त्यात मिठ, हळद, टोमॅटो पावडर, सुंठ पावडर आणि हवी असेल तर लसूणाची पावडर टाकून  मिक्सर एकदा फिरवायचा.  म्हणजे, सगळं छान मिक्स होतं.  बाटलीबंद करुन ही पावडर भरुन ठेवली तर अगदी सहा महिनेही टिकते.  पण तेवढी ती रहातच नाही, कारण या रस्समची चव एवढी भन्नाट होते, की ते सुपासारखेही प्यायला छान वाटते.  भातावर घ्यायचे असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण कमी करायचं.   नव-यानं जेवणाचं काय हा प्रश्न विचारला आणि अगदी तासाभरात रस्सम पावडर तयार केली.  एक चमचा एका व्यक्तीसाठी हे माझं प्रमाण.  नव-याला माझ्यासमोर प्रात्यक्षिक कर म्हणून सांगितले.  मी एका बाजुला

भात लावला.  त्यानं दोन चमचे रस्सम पावडर पाण्यात भिजवून एका टोपात ठेऊन दिली.  छान उकळी आल्यावर त्यात वरुन जिरे, राई, हिंगाची फोडणी घातली.   सोबत पोह्याचे पापड तळले आणि हळदीचे लोणचे.  गरम गरम रस्सम भाताचा पहिला घास घेतला आणि पहिला शब्द निघाला तो व्वा...अर्थातच रस्समच्या वासानं त्याच्या चवीची कल्पना चव घेण्याआधी आलीच होती.  प्रिमिक्स हा एक शॉर्टकट आहे.  पण मी या मसाल्यांना माझा मित्रपरिवार मानते,  आयत्यावेळी मदतीस येणारे आणि भरभरुन स्वाद पसरवणारे...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा.     

 

Comments

  1. Khar aahay sadyachya paristilala sajusa lekh

    ReplyDelete
  2. खूप भारी गं सई.
    शिकायला हवं तुझ्याकडून

    ReplyDelete
  3. Ajay Gurunath Nikte27 January 2024 at 14:22

    मस्तच , एक नंबर

    ReplyDelete
  4. लयी भारी ......

    ReplyDelete
  5. रसमची रेसिपी फारच आवडली. तुझे ब्लॉग वाचल्यावर शिकणं पण अतिशय असतं!!

    ReplyDelete
  6. Very good experiments,so such innovations in food and other areas also .

    ReplyDelete
  7. क्या बात है सई !बढिया !

    ReplyDelete

Post a Comment