भगवान का दिया हुआ सबकुछ है....बस्स....
आठवड्याचा पहिला दिवस तसा धावपळीचा. दोन दिवसानंतर मी घरी आलेली....त्यामुळे घर आवरणे हे पहिले काम. त्यातच नव-यानं ऑफीसमधून उशीरा येणार हे जाहीर केले. घरी रात्री दहाला येणारा नवरा रात्री अकरा वाजता घरी आला. जेवणाची ताटं वाढत असतांनाच फोन वाजला, रात्रीचे बारा वाजायला आले होते. एवढ्या रात्री फोनची रिंग वाजली की काळजी वाटते. तशाच काळजीनं फोन उचलला. मित्रपरिवारातील एकाचा फोन होता. थोडी मदत हवी होती, ती सुद्धा लगेच. आम्ही दोघांनीही तब्बेतीची चौकशी केली, त्रास होतोय का. दवाखान्यात जायचं आहे का. तर उत्तर नाही आलं. पलिकडील व्यक्ती हट्टालाच पेटली. प्लीज, शक्यतो लगेच या. ताटात वाढलेली भाकरी तशीच अधाशासारखी तोंडात कोंबली, पाणी प्यायलो आणि जायला निघालो. त्या पंधरा मिनिटात पुन्हा एक फोन येऊन गेला होता, येताय ना...प्लीज, गरज आहे तुमची. त्या आवाजातील काळजीनं आम्ही दोघं अजून काळजीत पडलो. रात्री बाराच्या सुमारास गाडी घेऊन त्या गृहस्थांच्या घरी जायला निघालो. स्वेटरची चैन लावत लावत, मी नव-याला चारवेळा विचारलं काय झालं असेल. पण त्याच्याकडेही उत्तर नव्हतं. पंधरा मिनिटांनी आम्ही त्या गृहस्थाच्या घरी गेलो. दोघं नवराबायको रहात होते. दोघांचेही चेहरे पार उतरले होते. काय झालं तब्बेत ठिक आहे ना, म्हणून आम्ही विचारलं तेव्हा बायकोनी घाईघाईनं दरवाजा लावून घेतला. त्या गृहस्थांचा फोन माझ्या नव-याच्या हातात दिला, आणि हे बघ, यांनी काय व्याप करुन ठेवले आहेत. त्या गृहस्थानं डोक्याला हताशपणे हात लावला. त्यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू बघून आमची दोघांचीही उरलीसुरली झोप पार उडाली.
अलोककाका आमच्या मित्रपरिवारातील. अलोककाका, त्यांची पत्नी संगिता आणि अमोघ, संजना ही दोन मुले. आमचं लग्न झाल्यावर ज्या काही मित्रपरिवारांनी संसाराची घडी बसवण्यासाठी मदत केली त्यामध्ये हे जोडपं अग्रक्रमानं येतं. सुरुवातीला आम्ही एकाच भागात रहायचो. शेअर रिक्षातून ओळख झाली. पुढे ती वाढली आणि कौटुंबिक मैत्री झाली. त्यांची दोन्हीही
मुलं इंजिनिअर झाली. आता दोघंही इंग्लड, अमेरिकेत स्थाईक आहेत. अलोककाकाही दरवर्षी या मुलांकडे जातात. शिवाय कुठल्या ना कुठल्या ट्रिपवर जात असतात. रिटायर आयुष्य कसे एन्जॉय करावे, याचे ते मुर्तीमंत उदाहरण. सदैव कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतात. कधीही कुठे भेटले तरी भरभरुन बोलणारे, मुलांची प्रगती कौतुकानं सांगणारे, आमच्या लेकाची आस्थेनं चौकशी करणारे. काकांचा हसरा चेहरा आम्ही कायम बघितलेला. पण आता जे काका समोर होते ते पूर्णपणे वेगळे होते.
काका गप्पच होते. त्यांच्या
पत्नी सांगू लागली, ते म्हणे गेल्या काही
महिन्यापासून फोनवरुन पत्त्यांचा गेम खेळायला लागले होते. छान वेळ जातो म्हणाले सुरुवातीला. मग त्यांचा फोन टाईम वाढायला लागला. ऐरवी पुस्तक, पेपर वाचणारे काका सतत फोनवर
व्यस्त दिसायला लागल्यावर त्यांच्या पत्नींनही त्यांना विचारलं होतं. त्यावर वेळ छान जातो, म्हणत त्यांनी तिलाही या
पत्त्यांच्या गेमबद्दल सांगितले. सुरुवातीला
काही दिवस पैसे लावत नव्हते. पण नंतर काका
पैसे लावून खेळायला लागले. एक-दोन वेळा
त्यांना ब-यापैकी पैसे मिळालेही. त्यांनी
ते काकूंना दाखवले. आम्ही गेलो त्यादिवशीही
ते सकाळपासून फोन घेऊन बसले होते. पैसे
लावून खेळता खेळता, लाखापर्यंतचा आकडा कधी गेला हे त्यांच्या लक्षात आले
नाही. पण बॅंकेचा मेसेज आल्यावर
हादरले. त्यांचा मुलगा दर महिन्याला
ठराविक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करत होता.
दोघांचेही जॉईंट अकाऊंट होते. आत्ता
मुलानं विचारलं, एवढ्या पैशाचं काय केलं, तर त्याला सांगायचं काय....काकूंनी हा
प्रश्न एवढ्या जोरात विचारला की आम्ही दोघंही हादरलो. पण अलोककाका हुंदके देऊन रडायला लागले. चूक झाली माझी. चूक झाली...तू जरा फोन चेक कर. बॅंकेचे अकाऊंट चेक कर. अजून पैसे जाणार नाहीत ना...मला काळजी
वाटतेय. काकूंनी एक डायरी पुढे केली. त्यात त्यांच्या बॅंकांचे नंबर आणि पासवर्ड
लिहिले होते. नव-यानं काकांचा फोन ओपन
केला. आधी त्या पत्त्यांच्या खेळाला ब्लॉक
केलं. नंतर बॅंकेचे अकाऊंट ओपन केले. काकांना दाखवले. त्यांना त्यांच्या अकाऊंटमधील रक्कम
दाखवली. त्यांनी फक्त मान डोलावली. मुलाला सांगितलंत का. त्याचा काही फोन आला का, म्हणून विचारलं. आज नेमका त्यांचा मुलगा तिथली सुट्टी म्हणून
कुठेतरी फिरायला जाणार होता. त्यांनी
काका-काकूंना आधीच तशी कल्पना दिली होती. अरे,
पण त्याला मेसेज गेलेच असणार. त्यानं
उद्याला विचारलं तर काय सांगू, म्हणत काका पुन्हा रडायला लागले. एव्हाना काकूंचाही पारा उतरला होता. त्या काकांच्या बाजुला बसल्या आणि म्हणाल्या,
सर्व खरं सागूया. तो समजून घेईल. पाहिजे तर पुढच्या महिन्यात पैसे पाठवू नकोस
म्हणा, आम्ही भागवून घेऊ. असं म्हणत त्याही रडू लागल्या. आम्हा दोघांनाही काय बोलावं हे कळेना. अलोककाकांचे हे वेगळे रुप आम्ही बघत होतो. एरवी आनंदी असणा-या काकांच्या चेह-यामागचा
चेहरा वेदनांनी भरलेला होता याची जाणीव झाली.
काकू काकांना समजवू लागल्या, नव-यानं त्यांचा हात हातात घेऊन
सांगितलं, जाऊदे काका रडू नका. आता गेलेले पैसे परत येणार नाहीत. तुमचा मुलगाही समजूतदार आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी फोन करु का. तुम्ही त्याच्याबरोबर बोललात आणि रडलात तर त्याला वाईट वाटेल, एवढ्या दूर आहे तो. उगाच त्याला काळजी कशाला. काका-काकू हो म्हणाले. हे सर्व होईपर्यंत घड्याळात दिड वाजून गेलेले. काकांनी पहिल्यांदा घड्याळाकडे बघितलं आणि विचारलं, तुम्ही आज इथेच रहा. एवढ्या रात्री तुम्हाला त्रास दिला. पण पैशाचं काम, विश्वास कोणावर ठेवणार म्हणून तुम्हाला बोलावलं. आता इथेच झोपा, उद्या सकाळी जा. खरंतर त्यांच्या घरापासून आम्ही गाडीनं पंधरा मिनिटाच्या अंतरावर रहायला होतो. पण येतांना बाहेरच्या थंडीचा अंदाज आला होता. आता बाहेरचं वातावरण अधिक थंड झालं असणार. आणि या दोघांनाही कोणाच्यातरी सोबतीची गरज होती, याची जाणीव झाली. आम्ही दोघांनीही लगेच होकार दिला. आता काका शांत झाले होते, त्यांनी विचारलं, तुम्ही एका शब्दानंही विचारलं नाही, की मी हा पत्त्यांचा खेळ का खेळायला लागलो, हिनं तर मला शंभरवेळा विचारलं. आता जाऊदे, काका, उद्या सकाळी बोलूया, म्हणत मी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण काकांच्या डोळ्यात पाणी आलं, अगं कितीही आनंदी रहाण्याचा प्रयत्न केला तरी पोरांची आठवण येते. ते सर्व पाठवतात. कधी कधी सरप्राईज म्हणून नाष्टा, जेवणही घरी येतं. आमच्या दोघांच्या वाढदिवसाला केक येतो. लग्नाच्या वाढदिवसाला कपडे येतात. मग आम्ही ते कपडे घालून केक कापायला बसतो. समोर मुलं असताता...पण ती मोबाईलमध्ये....कुठल्यातरी दूरच्या देशात. तिकडून टाळ्या वाजवतात. आम्हाला शुभेच्छा देतात. मग आम्ही खूष असल्यासारखे दाखवतो. थोड्यावेळानं ते ऑफलाईन होतात. मग त्या मोठ्या केककडे बघत बसतो. ती दोघं लहान होती, तेव्हा फक्त त्यांच्या वाढदिवसाला केक आणायचो. तोही लहानसा. तेव्हा परिस्थिती नव्हती रे. पण त्या लहानश्या केकचे किती तुकडे व्हायचे ते विचारु नकोस. अगदी चमचाभर केक प्रत्येकाच्या वाट्याला यायचा. आता घरी केक येतो, तो हा एवढा. खाणारे आम्ही दोघंच. दोघंही सांगतात, भरपूर खा...पण शप्पथ सांगतो, एक घासही घशाखाली उतरत नाही. त्या चमचाभर केकची मजा, आत्ताच्या मोठ्या केकमध्ये येत नाही. म्हणून सतत पळत असतो. पण किती फिरणार. तिकडे आम्ही कायमचे राहू शकत नाही, आणि आता मुलं इथे येऊ इच्छित नाहीत. काय करावं ते तू सांग. मग आठवण यायला लागली आणि हे असं काहीतरी हातून झालं. तू सांग माझं काय चुकलं. तो नाना पाटेकरचा पिक्चर आहे ना, भगवान का दिया हुआ सबकुछ है...दौलत है...शौहरत है...इज्जत है...तसंच झालंय बघ....वेळच नाही जात...बस्स टाईपास होना चाहिए...
अलोककाका हताशपणे पुन्हा रडायला लागले. मग काकूही तशाच रडायला लागल्या. आमचेही डोळे भरुन आले. या प्रश्नावर उत्तर काहीच नव्हते. काकांची समजूत काढली. दोघांनाही झोपायला पाठवले. दुस-या बेडरुममध्ये आमच्या झोपायची सोय केली
होती. आम्ही झोपायचा प्रयत्न केला, पण
डोळा काही लागत नव्हता. नव-यानं फोन हातात
घेतला आणि काकांच्या मुलाला मेसेज पाठवला.
तिकडे किती वाजले होते, काय माहीत.
काही वेळात त्याचे उत्तर आले, फोन करु का म्हणून. फोनचा आवाज कमी केला आणि त्याला फोन करायला
सांगितलं. त्याचा फोन आला. नव-यानं त्याला हळू आवाजात झालेल्या प्रकाराची
कल्पना दिली. तो हादरला. त्यानं आम्हाला थांबवून व्हिडिओ कॉल केला. त्याच्या बहिणीलाही ऑनलाईन घेतलं. दोन्ही मुलांना या प्रकारानं धक्का बसला
होता. पैसे गेले त्याचं वाईट वाटत नव्हतं,
पण हताश झालेल्या वडिलांची परिस्थिती सांगितल्यावर काकांची मुलगी तर रडायलाच
लागली. त्या दोघांना समजवलं. ती पुढच्या महिन्यात येण्यासाठी प्रयत्न करणार
होती. त्यानंतर आई-वडिलांना मुलगा
त्यांच्याकडे बोलावणार होता. सध्या तरी या
प्रश्नावर हेच उत्तर आम्हाला सुचलं. बाहेर
गाड्यांचे आवाज यायला लागले. मुलांबरोबर
बोललल्यावर आम्ही काकांबरोबर सकाळी काय बोलायचे याची जुळवाजुळव करु लागलो. राहून राहून काकांचा तो डायलॉग आठवत होता, भगवान
का दिया हुआ सबकुछ है...आता डोळे भरुन येण्याची वेळ आमची झाली होती....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khoop Chan
ReplyDeleteReal fact of today's life
ReplyDeleteTime pass
ReplyDeleteखरं आहे. आज काल बऱ्याच घरी हीच परिस्थिती आहे.
ReplyDeleteबऱ्याच वयोवृद्धांची हिच समस्या आहे. अशा गोष्टी ऐकल्या की आपण आपल्या आई वडिलांच्या सतत बरोबर आहोत याचं समाधान वाटतं.
ReplyDeleteआई वडिलांना सोडून लांब राहू नये हेच खरे आहे.तेच खरे दैवत आहे.
ReplyDeleteअगदी खरं आहे.सत्य परिस्थिती आहे.
ReplyDeleteखरं आहे अगदी हे
ReplyDeleteपण तुमच्या सारखे सोबती असणे पण देवाची कृपा
हे एक.कटु सत्य आहे.
ReplyDelete