रील्स आणि रिॲलिटी

 

 रील्स आणि रिॲलिटी

फोन बघ फोन.  कितीवेळा मेसेज टाकलाय तुला.  रिंगही केलीय.  तू आहेस कुठे.  पहिले मेसेज चेक कर आणि मग मला फोन कर परत.  अशी ऑर्डर देत मैत्रिणीनं फोन बंद केला.  कधी नव्हे ती दुपारची सर्व कपाटांची साफसफाई सुरु केली होती.  अरजित सिंगच्या आवाजानं माझी रुम भरुन गेली होती.  त्यात ती फोनची रिंग कुठल्या कुठे विरुन गेली होती.  अरजितचे गाणे तसेच ऐकत मेसेजबॉक्स ओपन केला.  मैत्रिणीचा मेसेज म्हणजे, एक रील होतं.  तिनं केलेलं आणि तिच्यावर केलेलं.  मी ते पाहिलं, डोक्यावर हात मारुन घेतला आणि फोन बंद केला.  त्याबरोबर सेकंदानं तिचा फोन आला.  अग पाहिलंस का....सेम टू सेम झालंय ना.  कसली प्रॅक्टीस केली होती, त्याच्यासाठी.  आज सकाळपासून त्याच्याच मागे लागलेय.  पाच टेकनंतर आता ओके झालंय.  सॉलिड झालंय ना...तू काय म्हणतेस.  मी तर सारखं तेच बघतेय.  सर्वांना पाठवलं.  तू कितीवेळा बघितलंस सांग ना.  मैत्रिणीच्या या प्रश्नावर मी काय बोलणार...एक्कच शब्द तोंडातून आला.  कप्पाळ.  मी तिचा फोन कट केला.  मनात आलेला राग,  झालेली चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न केला.  त्या अरजित सिंगलाही बंद केलं.  खिडकीवर नशीबानं चार साळुंक्या येऊन बसल्या.  त्यांच्या आवाजात मैत्रिणीच्या त्या रीलला पुसण्याचा प्रयत्न केला.

अर्थात त्या चार साळुंक्या दाणे टिपून आणि पाणी पिऊन पुन्हा मार्गस्थ


झाल्या.  पाच मिनिटभर त्यांनी खिडकीवर ताबा मिळवला होता.  त्यांच्या आवाजानं माझ्या मनावरही ताबा घेतला होता.  पण त्या गेल्यावर पुन्हा मैत्रिणीच्या रीलमधील गाण्यावर लक्ष जाऊ लागलं.  काहीही झालं तरी ती माझी मैत्रिण होती,  तिचा फोन फक्त कप्पाळ हा शब्द बोलून मी कट केला होता.  मला फोन केला तेव्हा ती खूप आनंदात होती, तसाच आनंद ती माझ्याकडून अपेक्षित असणार.  पण माझी प्रतिक्रीया जाणून तिला काय वाटलं असेल, असे विचार मनात यायला लागले.  तिचे ते रील पुन्हा बघितले.  काही दिवसांपूर्वी आलेला रणबीर कपूरचा चित्रपट अॅनिमलमधलं गाणं होतं ते.  जमाल कडू.  चित्रपटात या गाण्यावर तो बॉबी देवल डोक्यावर दारुची बाटली घेऊन आणि तोंडात सिगरेट धरुन नाचला आहे.  अॅनिमल हा चित्रपट माझ्यामते विकृत आहे.  त्या चित्रपटानं भलेही करोडो रुपये कमावले असले तरी त्याचा समाजावर काय परिणाम होतो, तरुण पिढी त्यातून काय घेणार हा प्रश्न विचारला तर उत्तर हे गाणं येतं, असं माझं मत आहे.  नेमकं त्याच जमाल कुडू गाण्यावर मैत्रिणीनं रील बनवून  पाठवून दिलं.  तिनं त्या बॉबी देवलसारखा डान्स केलाच शिवाय डोक्यावर दारुऐवजी ज्युसचा ग्लास ठेवला होता.  मी पुन्हा तिचं ते रील बघितलं आणि तिला फोन केला. 

आत्ता काय पुन्हा कप्पाळ बोलणार आहेस का...हा तिचा प्रश्न ऐकून कळलं स्वारी रागात आहे.  रील छान झालंय.  पण ज्या गाण्यावर तू रील केलंस ना ते गाणं आणि तो चित्रपट दोन्हीही मला आवडलेले नाहीत.  त्यामुळे राग आला.  सॉरी.  मी लगेच माघार घेत तिची माफी मागितली.  तरीही मैत्रिण रागातच होती.  तुला आवडत नाही, मान्य.  पण माझी मेहनत  तर बघायची होतीस ना.  मी किती मेहनत घेऊन ते रील बनवलं.  अर्थातच.  म्हणून तर तुला सॉरी बोलले, पहिल्यांदा.  पण सांग ना तो चित्रपट कधी बघितला आहेस का.  त्या चित्रपटात तो रणबीर कपूर किंवा तो बॉबी देवल जसा वागला, तसा तुझा लेक वागला तर चालेल का तुला.  मी मैत्रिणीला हा प्रश्न विचारला आणि तिचं उत्तरही तेवढ्याच वेगानं आलं.  अरे तो फक्त चित्रपट आहे,  तीन तासांचा.  त्याचा कशाला आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय.  बरोब्बर...मला आता कोण आनंद झाला होता.  चित्रपटाचा आपल्या


आयुष्यावर परिणाम होत नाही म्हणूनच तू अगदी बॉबी देवलसारखा डान्स करत गाणं बनवलंस ना.  किती मेहनत घेतलीस त्या गाण्यावर आठव.   नशीब तू दारु ऐवजी ज्युसचा ग्लास घेऊन नाचलीस.  आता तूझं ते रील बघून तुझ्या  लेकाला आणि कुटुंबांला काय वाटेल.  त्या मुळ गाण्याची आठवण येईल ना.  तुझ्याबरोबर ते त्या दारुड्या बॉबी देवलची आठवण काढतील.  आत्ता तूच सांग चित्रपटाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो की नाही ते.  मी मैत्रिणीला बरोबर तिच्याच शब्दात पकडले होते.   तिनं लगेच माघार घेतली.  या चित्रपटातील बिभत्स दृष्यावर तिची आणि माझी आधीही चर्चा झाली होती.  तिच्या लेकानं अॅनिमल बघण्याचा हट्ट केला होता.  पण तिनं त्याला नकार दिला होता.  आता त्याच चित्रपटातील गण्यावर आपण रील बनवण्यासाठी एवढी मेहनत घेतली याचं तिला वाईट वाटत होतं.  माझा फोन कट करत म्हणाली, आता ज्यांना ज्यांना पाठवले आहे, तिथून पहिल्यांदा डिलीट करते. 

आम्ही दोघींनी ओके म्हणून फोन ठेऊन दिला.  आजकाल तर या रीलनं आयुष्य व्यापून गेल्यासारखं झालंय. काहीही करा, कुठेही जा रील करुन लगेच सोशल मिडियावर शेअर करा.  पण हे रील बनवतांना आपण कुणाचं आणि कुठल्या विचाराचं अनुकरण करावं, याचं बंधनंही अनेकवेळा सुटलेलं दिसत.  


मध्यंतरी माथेरानला गेलो होतो, तिथे तर हे रील करणारे थव्यानं वावरत होते.  प्रत्येक पॉईंटला असे रील बहादूर होते.  या रीलच्या नादात त्यांनी माथेरानच्या निसर्गाला किती जवळून पाहिलं हे देव जाणो.   रोज फोन हातात घेतल्यावर असे भारंभार रील आलेले असतात.  अर्थातच त्यातील काही चांगलेही असतात.  नवीन डिशची माहिती देणारे,  अगदी छोट्या छोट्या वस्तू नेमक्या कशा वापरायच्या याची माहिती देणा-यांपासून ते घराची साफसफाई, कुंड्यांची साफसफाई अशा कुठल्याही विषयावरील रील शेअर झालेली असतात.  ती बघायलाही आवडतात.  पण हे सर्व करतांना आपण ज्यांचं अनुकरण करतो, ते त्या लायकीचे आहेत का हे पहाणं मला तरी आवश्यक वाटतं.  विशेषतः चित्रपटातील गाण्यावरील रील बनवतांना त्या गाण्याचा अर्थ न जाणून घेत, लहान मुलांकडून डान्स करुन घेतला जातो.  मला तर तो प्रकार लहान मुलांवर अत्याचार केल्यासारखाच वाटतो.  सोशल मिडिया चांगलाच आहे.  फक्त त्याचा वापर तेवढ्याच सजगपणे झाला पाहिजे.  या रीलच्या बाबतीतही हाच नियम आहे.  नशिब माझ्या मैत्रिणीला त्याची जाणीव झाली. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. RAJESH kalgude
    So nice... Very very

    ReplyDelete
  2. अगदी योग्य लिहीलं आहेस!! हल्ली सोशल मीडियावर काय ‌टाकायचं,काय लिहायचं ह्याला धरबंधच उरला नाहीये... ललिता छेडा

    ReplyDelete
  3. सोशल मिडियाचा वापर योग्य पध्दतीने न झाल्यास त्याचे दुष्परिणाम तरुण पीसीवर होऊ शकतात.सर्वांना सावध करणारा उत्तम लेख👌👌👍👍

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू10 February 2024 at 23:10

    आजची वस्तुस्थिती छान कथन केली आहे विकृती सोडली पाहिजे,चांगले ते घेतले पाहिजे , सदविवेक बुध्दीने काम केले तर काहीच अडचण नाही

    ReplyDelete

Post a Comment