*कोरोना परिवार*
लग्नाला एक सोहळा का म्हणतात याचा प्रत्यय मला गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आला. एक एक नातेवाईक,किंबहुना जवळच्या मित्र परिवारातील लग्न होते. हे कुटुंब पुण्याला राहणारे आणि विवाह सोहळा ही पुण्यातच. मुंबईहून येणाऱ्यांची राहण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आम्ही काही अन्य कामामुळे जाऊ शकलो नाही. लग्नाच्या मुहूर्तावर मात्र अगदी वेळेवर हजर झालो होतो. लग्नाला गेल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो, तर आपला नातेवाईकांचा गोतावळा शोधण्याचा प्रयत्न करतो. तशाच आमच्याही नजरा भिरभरू लागल्या. पण जवळपास कोणीही ओळखीचे दिसेना. लग्न लागण्याच्या सुमारास एक काका काकू दिसले. खूप गर्दीमध्ये एखादे परिचित भेटल्यानंतर किती आनंद होतो, तसाच आनंद आम्हाला त्यांना बघून झाला. नमस्कार, गाठीभेटी झाल्यावर आमचा दोघांचा पहिला प्रश्न होता आपलं बाकीचं कोणी कसं दिसत नाही त्यावर ते दोघं हसायला लागले म्हणाले हा शोध आम्ही काल रात्रीपासून घेत आहोत. चार, सहाजण आहेत. यापेक्षा कोणी दिसले नाही. हे काका काकू काल रात्रीच राहायला आले होते. पण तेव्हापासून त्यांना नात्यागोत्यातील कोणीच भेटलं नव्हतं. बाकीचा सर्व मित्र मैत्रिणी आणि शेजारचा गोतावळा या सोहळ्याला जमला होता. काका काकुंनाही सुरुवातीला थोडा संकोच वाटला. पण नंतर सर्व मंडळी अगदी दिलखुलास असल्याची जाणीव झाली. घरचाच सोहळा आहे अशी तयारी चालू होती. सर्व काम शिस्तबद्ध होतं. प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिली होती आणि तशा पद्धतीने ते पारही पाडत होते. रात्री छान पैकी गाण्यांचा कार्यक्रम होता. काही मंडळी मग भेंड्या खेळले आणि बरेचशे गेम ही झाले . या हसत्या खेळत्या वातावरणात काका काकुंनी बाकीचे नातेवाईक कुठे आहेत, असं काही यजमानांना विचारलं नव्हतं. त्यांना वाटलं सगळी मंडळी सकाळी येतील. पण सकाळी तर आम्ही दोघं आणि अन्य दोन जोडपी होती. हा काय मामला आहे हे मात्र आम्हाला समजत नव्हतं. पण अशा प्रसंगी पटकन विचारावं तरी कसं. त्यामुळे मनातील सगळ्या शंका दूर ठेवत आम्ही तो चालू असलेला विवाह सोहळा बघू लागलो.
लग्न सोहळा खरोखर छान होता. एक अख्खा फार्म हाऊस त्या लग्न सोहळ्यासाठी यजमानांनाी बुक केलं होतं. त्यातच लग्नाचा हॉल होता. शिवाय जेवणाची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती. समोरच प्रशस्त लॉन होता. त्यात मुलांना खेळण्याची जागाही भरपूर होती. लग्नाला आलेल्या मंडळींपैकी काहींची मुले तिथे आरामात खेळत होती. आम्हाला लग्न कमी पण पिकनिक जास्त वाटली. सगळे कसे आरामात चालू होते. तिकडे स्टेजवर वधू वर आणि त्यांचे आई-वडील लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त होते. बाकी सर्व आवरेपर्यंत आम्ही जेवायला गेलो. जेवणाचा आनंद घेतल्यानंतर थोडा वेळ त्या फार्म हाऊसला फेरफटका मारला. खूप प्रशस्त आणि मनमोहक असेच फार्म हाऊस होतं. आसपास असलेल्या फुलांच्या वेलीनी वातावरणात एक वेगळाच सुवास पसरलेला होता. लग्न सोहळा असला तरी फार मोठ्या आवाजात संगीत लावलेलं नव्हतं. त्यामुळे एक सुसह्य असं वातावरणच होतं. इकडे लग्न झालं. विधी झाल्या आणि नवरा नवरी जेवणासाठी आले. बऱ्याच वेळा लग्न समारंभामध्ये एकदा लग्न लागलं की नवरा नवरी लगेच रिसेप्शन साठी तयार होण्यासाठी जातात. ते तयार होऊन येईपर्यंत लग्नाला आलेल्या नातेवाईकांची, पाहुण्यांची ही मोठी लाईन लागते. त्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, भेटवस्तू देण्यासाठी ही रांग असते. एकदा त्यांना भेटलं, भेटतानाचा फोटो काढला की मग काम झालं. आपल्या आपल्या घरी चला.
असाच काही तो सोहळा असतो की नाही. पण इथे मात्र सगळं वेगळं. बघितलं तर हे दोघे जेवायला बसले. न राहून काका काकू म्हणाले, आम्ही रात्रीपासून आलोय, आज मात्र संध्याकाळी घरी जायला पाहिजे, तशी कामं आहेत. अर्थात आम्हालाही थोडी घाई होती. पुण्याला लग्न असल्यामुळे एक अख्खा दिवस जाणार हे आम्ही गृहीत धरलं होतं. पण या लग्नामध्ये जसं सर्व आरामात चाललं होतं त्यातून वाटत होतं की, बहुदा घरी पोहोचायला खूप रात्र होणार होती.
शेवटी सर्वांची जेवण झाल्यावर नवरा नवरी कपडे बदलण्यासाठी गेले. बाकीची मंडळी पैकी काही मंडळी ही पुढच्या समारंभासाठी तयार होण्यासाठी गेली. यजमान थोडे मोकळे वाटले. त्यामुळे आम्हा नातेवाईकांचा छोटा ग्रुप साथ त्यांना भेटण्यासाठी गेलो. दोघांनीही आधी आमचं जेवण झालं का, याची चौकशी केली. बाकी सर्व लॉन फिरला का, काय काय आहे ते त्यानी सांगितले. शिवाय जर आम्हाला आराम करायचा असेल तर आमच्यासाठी स्वतंत्र रूम उपलब्ध असल्याची माहिती ही दिली. त्या रूम मध्ये जाऊन थोडावेळ आराम करा आणि मग पुढच्या समारंभासाठी या, असा आग्रह त्यांनी केला. तेव्हा मात्र काका पटकन मिळाले, नाही हो, आता काही थांबता येणार नाही. वर वधू रिसेप्शन साठी कधी येणार ते सांगा. आम्ही त्यांना भेटतो आणि निघतो. आता आराम करत थांबलो तर मात्र घरी जायला मध्य रात्र होईल. त्यावर ते दोघेही यजमान हसले, म्हणाले, आहो काका, कशाला घाई करताय, आरामात थांबा. तुम्हाला हवं असेल तर रात्रभर इथे थांबा, उद्या सकाळी इथून निघाला तरी चालेल. आपण तसं बुकिंग केलं आहे. तुम्ही पत्रिका वाचली असेलच. पत्रिकेवर आम्ही म्हणूनच लिहिलं आहे की, लग्न सोहळा हा दिवसभर आहे. तेव्हा मात्र आम्ही एकमेकांचे चेहरे बघू लागलो. कारण आम्ही फक्त विवाह लागण्याचा मुहूर्त कितीचा आहे हे बघितलं होतं. त्यानंतर मात्र बाकीचं काही वाचायचं नसतं असं समजून पत्रिका न वाचताच आलो होतो.
आमचे चेहरे बघून त्या यजमानांना आमची काय चूक झाली आहे हे लगेच समजले. ते पुन्हा असले म्हणाले, अहो लग्न सोहळा आहे हा. हेच तर निमित्त असतं आपल्या आप्त जणांना भेटण्याचं आणि त्यांच्याबरोबरच मनमुराद गप्पा मारण्याचे. त्यामुळेच आम्ही जेव्हा आमच्या मुलाचे लग्न ठरवले तेव्हा वधू पक्षालाही आमच्या ह्या छोट्याशा अटी सांगितल्या होत्या. त्यात लग्न अगदी आरामात, कुठलाीही घाई न करता करायचं ही पहिली अट होती. लग्न लागण्याचा मुहूर्त पाळायचा, बाकी सगळे सोहळे अगदी आरामात, मुलांना हवे तसे आणि घाई घाई न करता करायचे. म्हणून तर हा प्रशस्त लॉन बुक केला. आता थोडा वेळ दोघही आराम करतील आणि त्यानंतर रिसेप्शन साठी येतील. त्याला अजून दोन तासाचा अवधी आहे बर काका.
यजमानांच्या या स्पष्टीकरणावर आम्हाला काय बोलावं हेच सुचेना. मी न राहून विचारलं अहो पण आपली बाकीची मंडळी कुठे दिसत नाहीत ती. काय संध्याकाळच्या रिसेप्शनला येणार आहेत का. तेव्हा त्या यजमानानी पुन्हा एकमेकांकडे बघितलं आणि मोठ्याने हसले. म्हणाले, ही तुमच्या आसपास जी मंडळी आहेत ती सगळी आपली आहेत. मग काकू म्हणाल्या, पण यातील कोणीच ओळखीचे दिसत नाही. यजमान म्हणाले, अहो हा सगळा आमचाच परिवार आहे. ही सगळी मंडळी रक्ताच्या नातेविकांपेक्षा कमी नाहीत. आमच्यासाठी या सगळ्यांचा मूल्य अनमोल आहे. हा आमचा सगळा कोरोना परिवार आहे.
त्यांचा हा शब्द ऐकला आणि आम्ही चौघही एक तालासुरात ओरडलो. कोरोना परिवार. वास्तविक कोरोना महामारीनंतर करोना हा शब्दच डिक्शनरीतून वगळावा अशा त्याच्या कटू आठवणी आहेत. आमचे यजमान आम्हाला सांगू लागले, म्हणाले कोरोना काळामध्ये काय काय सहन केले हे विचारू नका. आम्हा तिघाही एक साथ कोरोना झाला होता. अशावेळी काय करायचं हे समजेना, घाबरून गेलो होतो. तेव्हा आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या या शेजारच्यानी खूप मदत केली. अगदी सकाळी लागणाऱ्या गरम पाण्यापासून ते रात्री झोपताना हळदीच्या दूधा पर्यंत सगळं आम्हाला घरपोच मिळत होतं. घराच्या उंबरठ्यामध्ये आम्हाला हव्या नको त्या वस्तू ठेवत होते. काही ठराविक अंतरावर उभे राहून ही मंडळी आमच्याशी गप्पाही मारायची. त्या सात दिवसात आम्ही जे भोगलं ते विचारू नका. पण या सर्वांनी आमची हिम्मत तुटू दिली नव्हती. आम्ही त्या आजारातून बाहेर पडलो. ही आमच्या एका घराची कहाणी आहे. पण या दरम्यान आसपासच्या घरांमध्येही अशीच काही परिस्थिती झाली होती. काही घरात तर लहान बाळं होती. त्यांचे आई-वडील कोरोनाग्रस्त झाले होते. अशावेळी त्या लहान मुलांची जबाबदारी आम्ही घेतली. आम्ही प्रत्येकानी एकमेकांना अशी मदत केली की जिथे मदतीच्या सगळ्या व्याख्या संपल्या. ही मदत एका जबाबदारीतून, एका सहानभूतीतून पुढे गेली. या वर्ष, दीड वर्षाच्या काळात एक अनोखा नवा परिवार तयार झाला. त्यात आमचे दूधवाले, फळवाले, आमच्या घरी देवाची फुले पोहोचवणारे, अहो पेपर टाकणारी मुलं सुद्धा आम्हाला अशा पद्धतीने जोडली गेली. त्या कोरोनाच्या काळात कुठलीही भीती न बाळगता आठवणीने फळ आणून देणा-या आमच्या फळ वाल्याला फक्त आभार हा शब्द वापरून कसं टोलवायचं. त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणी सगळ्यांनी पुसून टाकल्या. पण या काळात काही फक्त नकोशा असलेल्याच आठवणी जमा झाल्या असे नाही तर या काळात बऱ्याचशा चांगल्या आठवणी जमा झाल्या आहेत. त्यातून आपले नातेवाईक ही व्याख्या किती संकुचित आहे, याचा प्रत्यय आला. तुम्हाला बोल देत नाही, तुम्ही लांब होतात. पण खरं सांगतो, अगदी जवळपास असलेले, घराजवळ असलेले नातेवाईकही कोरोना च्या नावाखातर आमच्याशी जरा चार हात दूरच झाले. अर्थातच सर्वांना आपापल्या जीवाची काळजी होती. पण आमच्या ह्या आसपासच्या नातेवाईकांनी आम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. आमच्या संकटाच्या काळात ते आमच्या मागे उभे राहिले. तसेच आम्हीही त्यांच्या मागे उभे राहिलो. इथेच आमच्या कोरोना परिवाराचा पाया भक्कम झाला. आता आम्ही एकमेकांना आमचा परिचय करून देताना हे आमचे कोरोना नातेवाईक असाच परिचय करून देतो. कोरोनाने वाईट आठवणी दिल्या. त्यापेक्षा चांगल्या आठवणी जास्त दिल्या असंआम्हाला वाटलं. या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. आता कोरोना संपल्यावर दोन वर्षानंतर तर आभार हा शब्दच पुसून गेला आहे. मग काय त्यांनी आमच्यासाठी जे केलं ते विसरून जायचं का, नक्कीच नाही. म्हणूनच आमच्या मुलाचं जेव्हा लग्न ठरलं, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपल्या परिवाराला बोलवायचं. मदत म्हणजे प्रत्येक वेळेला पैशांचीच मदत असते असं नाही. तर ती आपल्या शब्दांनीही देता येते फक्त आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हटलं तरीही बराच धीर येतो की, हे काका-काकू बघा, काका काकू तुम्ही नाही का आम्हाला आठवड्यातून एकदा फोन करत होतात. तो फोन आम्हाला एका ऊर्जेसारखा वाटत होता. म्हणून आमच्या कोरोना परिवारात तुम्हीही सामील झालात. आणि तुम्ही दोघे ... तुम्ही दोघं काय काय करत होतात. तुमच्या या बायकोने कसले कसले फोटो टाकून नुसतं हैराण केलं होतं. कधी काय केक करायची, कधी काय रुमाल, अगदी बारीक सारीक गोष्टींचे फोटो टाकत होती. त्याबद्दल काही लिहीत होती. या छोट्या कृतीतून सुद्धा आम्हाला आनंद मिळत होता बरं का. म्हणून तुम्हालाही आमच्या या कोरोना परिवारात सहभागी करून घेतले.
आम्ही अशा मोजक्यांनाच लग्नाच्या पत्रिका देण्याचा जेव्हा विचार केला, तेव्हा नंतर येणाऱ्या वादाचाही विचार केला. म्हणूनच सर्व नातेवाईकांना एक दिवस घरी बोलवलं होतं. त्यांना लग्नाची माहिती दिली आणि आम्ही कशाप्रकारे लग्न करू इच्छित आहोत हे सांगितले. कोरोनाचा काळ असा होता की, त्याच्यात हा असा वागला, तो तसा वागला म्हणून राग व्यक्त करता येत नव्हता. शेवटी तो प्रत्येकाच्या जीवाचा प्रश्न होता. त्यामुळे ते त्या काळात कसे वागले, हा विषय आम्ही संपवून टाकला. पण आता आम्हाला आमच्या मुलाच्या लग्नात आम्हाला साथ देणाऱ्यांना मानाचे पान द्यायचे आहे, हे मात्र स्पष्ट केलं. कोणी काहीच बोललं नाही. कारण तो आपापल्या घरातला विषय आहे, असे सगळ्यांचे मत पडले. मग काय, कुठलाही अडसर आला नाही. इथे असलेल्यांपैकी सगळेजण असेच आहेत. तो बघा तो कोपऱ्यावर मुलगा उभा आहे ना, तो त्या लहान मुला बरोबर खेळतोय तो, तो आमचा पेपरवाला. या पेपर वाल्यांनी आम्हाला कोरोना काळात किती मदत केली आहे हे सांगता येणार नाही. घरपोच औषध सुद्धा आणून द्यायचा, हो आणि फळ सुद्धा. आता त्याला सुद्धा आम्ही इथे दोन दिवस राहण्यासाठी बोलवलं. आमच्यावर त्यांनी उपकार केलेत. पण हे उपकार असे आहेत की ते फक्त आभार हा शब्द वापरून त्याची परतफेड होणार नाही. तर प्रत्यक्षात काहीतरी कृती करावी असे आम्हाला वाटले. ज्यातून त्यांना कळेल की ही मंडळी खरोखर आपल्याला आपल्या परिवाराचा भाग मानतात. जेव्हा आम्ही त्याला आमंत्रण दिलं आणि दोन दिवस आमच्या सोबत तुला राहायचे असं सांगितलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मला मिठी मारली. दुसरं काय हवं. आता हा माणूस आमच्या परिवाराशी कायमचा जोडला गेलाय. रक्ताचं नातं म्हणजे फक्त तुमचा डीएनए एक असतो म्हणून जोडला जातं असं अजिबात नाही. परिवार या शब्दाची व्याख्या आपण समजतो त्यापेक्षा व्यापक आहे.
इथे जमलेल्या सर्वांची नावं वेगळी आहेत. आडनाव वेगळी आहेत. जात, धर्म सगळं वेगळं आहे. पण सर्वांच्या मनामध्ये एकच भावना आहे ती म्हणजे आमच्यातल्या एकीची, प्रेमाची आणि आपुलकीची. म्हणून हा छोटासा प्रयोग करून बघितला. पण खरं सांगू का खूप आनंद मिळाला. काल रात्री किती मजा झाली हे या काकांनी बघितलंच आहे. आज रात्रीही असाच गाण्याचा आणि नृत्याचा कार्यक्रम आहे इथे. आपल्या या नातेवाईकांपैकीच काहीजण करणार आहेत हा कार्यक्रम. म्हणूनच तुम्हाला सांगतो की नक्की थांबा. संध्याकाळपर्यंत आणि सर्व कार्यक्रमाची मजा घ्या सोबत, आनंदी आठवणी घ्या आणि मग आपापल्या घरी जा.
हे सर्व होईपर्यंत सायंकाळचे चार वाजले होते माझ्या नवऱ्याच्या मनात चहाची बेल वाजायला लागली. त्या यजमानीन बाईंना आठवण झाली की त्यांनाही पुढच्या सोहळ्यासाठी तयार व्हायचं होतं. त्या पटापट निघून गेल्या. आमच्या पैकी कोणीही बदलण्यासाठी कपडे आणले नव्हते. त्यामुळे चहा कॉफीचे जे टेबल मांडले होते, त्या टेबलावर आम्ही निमुटपणे जाऊन बसलो. आता काही इलाज नव्हता. एक तर आमची एक चूक झाली ती म्हणजे आम्ही पत्रिकाच वाचली नव्हती. लग्नाला जायचे ना मग फक्त त्या हॉलच्या पत्त्याचा फोटो काढायचा आणि मुहूर्ताची वेळ बघायची की काम झाले. आम्हीही तसेच केलं होतं. आता समोर आलेली चहा कॉफी पीत आम्ही केलेल्या या छोट्या चुकीवर हसत बसलो होतो. आमचे हे चहापान होईपर्यंत बाकीची मंडळी पुन्हा छानशी तयार होऊन बाहेर आली. काका आणि काकू इथे रात्रभर राहिले होते. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. काही लहान मुलं ही त्यांच्याशी येऊन खेळू लागली. खरंच सगळी मंडळी दिलखुलास होती. मी पुन्हा एकदा नव्या नजरेने त्यांच्याकडे बघायला लागले.
रक्ताची नाती फक्त नातेवाईक म्हणवून घेऊ शकतात का. माझ्या आसपासची मंडळी फिरत होती ती एकमेकांना काका, मामा, मावशी, आत्या, ताई, दादा अशा नावाने हाक मारत होती. काही वेळानी तयार झालेले नवरा नवरी त्यांच्यात आले. त्यांच्यापैकीच एका आत्याने त्या दोघांना ओवाळलं. कुठल्याशा मामांने दोघांचा हात धरला आणि त्यांना स्टेजवर नेलं. त्या दोघांचे सर्वजण अभिनंदन करत होते आणि ती दोघेही त्या सर्वांना त्यांच्या नात्यांच्या नावाने हाक मारत आभार व्यक्त करत होते. याच आनंदी वातावरणात पुढचा समारंभ सुरू झाला. आम्हीही त्यात सामील झालो. या सर्वांसोबतच रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेत आम्ही त्यांचा निरोप घेतला. निघताना काका काकू ही आमच्या सोबतच आले. हा परतीचा सगळा प्रवास आम्ही शांततेत केला. आम्ही आमच्या मनाला विचारत होतो, आम्ही कुठल्या नात्याच्या बंधनात आहोत.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला फॉलो शेअर आणि कमेंट नक्की करा
कोरोनामुळेच नातेवाईक व मित्र समजले त्यांना धरून व त्यांच्यासोबत चालावे हीच कोरोनाची शिकवण आहे.
ReplyDelete🌷👌👌👍👍🌷
ReplyDeleteअगदी खरं आहे.खूप छान.
ReplyDeleteकरोना काळातले हे खरे नातेवाईक..मला ही असाच चांगला अनुभव आहे.आणि तेच आता आमचे स्वकिय आहेत..छान लिहेले आहेस सोहळ्या बद्दल
ReplyDeleteNice lekh
ReplyDeleteवस्तुस्थिती छान मांडली आहे,लेखाची लांबी थोडी कमी हवी होती.असेच करोना काळात अनेकांना अनुभव आले असतील.
ReplyDeleteखूप छान लेख! कोरोनाचे असेही साईड इफेक्ट्स 👍👍💐
ReplyDelete