गिरनार शिखर...
एक आगळी परीक्षा
पवन है, पवन....उडनखटोला बंद है, आपको जाना है तो डोली किजीए, नही तो दो दिन इंतजार करीए, अभी ये पवन रुकनेवाला नही, हे वाक्य आमच्या दोघांच्या कानावर पडले आणि आम्ही दोघं जिथे होतो, तिथे जणू फ्रिज झाल्यासारखे शांत उभे राहिलो. गुजरातमधील जुनागढ शहरात गिरनार शिखराच्या पायथ्याशी आम्ही उभे होतो. भल्या पहाटे, साडे पाच वाजता या शहरात आम्ही दाखल झालो. तिथे फिरण्याचा सगळा प्लॅन तयार होता. सकाळी आठ वाजता, रोपवेच्या माध्यमातून गिरनार शिखराचा अर्धा टप्पा पार करणार होतो, त्यानंतर अंबाजी मातेचे दर्शन घेऊन पुढच्या पाच हजार पाय-या पार करुन गुरु शिखरावर जाऊन दत्त महाराजांचे दर्शन. इनमिन किती वेळ लागणार, याचेही आमचे गणित आधीच करुन झाले होते. सकाळी आठ वाजता निघायचे, दुपारी दोन वाजता परत यायचे. मग आराम करायचा आणि संध्याकाळी जुनागढ फिरायला बाहेर पडायचे. अगदी संध्याकाळचा नाष्टा कुठे करायचा आणि रात्री कुठे जेवायचे, हा सगळा प्लॅन आम्ही घरी बसून केलेला. पण जेव्हा प्रत्यक्ष जुनागढला दाखल झालो, तेव्हा तिथल्या पवनने, अर्थात वा-यानं आमचा प्लॅन वाहून नेला होता, आम्ही हताशपणे आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा रोपवेच्या कार्यालयाबाहेर बसून होतो. सकाळचे दहा वाजून गेले आणि आमचा संयम संपला. मी नव-याला मोठ्या थाटात सांगितलं, अरे कशाला या रोपवेसाठी थांबायचं, चल चढायला सुरुवात करुया. दहा हजार पाय-या चढायला तीन-चार तास लागतील. नव-यानं चारवेळा विचारलं, नक्की ना. मी हो म्हटलं. गिरनार शिखर चढतांना काठ्या आवश्यक असतात, त्या काठ्या घेतल्या आणि आयुष्यातल्या एका परीक्षेला सुरुवात केली.
बरोबर सकाळी साडेदहा वाजता गुरुशिखराच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला. दिवा लावला आणि गिरनार शिखर चढायला सुरुवात केली. तोपर्यंत सगळं ठिक वाटत होतं. दहा हजार पाय-यांचा टप्पा पार करायचाय, एवढंच जाणवत होतं. पण पहिल्या पन्नास पाय-या पार केल्या आणि जाणीव झाली, हे काहीतरी वेगळं चॅलेंज आहे. आणखी दहा-बारा पाय-या पार केल्यावर एक महिलांचा ग्रुप पाय-या उतरत होता. मी लगेच पुढे झाले. त्यांना विचारलं, झालं दर्शन. कसं वाटलं. पण त्या महिलांच्या उत्तरांनी माझ्या चेह-याचा रंग पार बदलला. कारण त्यासर्वजणी 400 व्या पायरीवरुन परत आलेल्या. खूप उन आहे, पाय लटपटायला लागले, तुम्हीही चारवेळा विचार करा, म्हणून आम्हाला उलटा सल्ला दिला. मी काळजीयुक्त नजरेनं नव-याकडे पाहिलं. त्यानं याआधीही गिरनार शिखर सर केलेलं. अनुभवातून त्यानं सल्ला दिला. लक्षात ठेव, तुला चढायचं आहे, मागे फिरायचं असेल तर केव्हाही फिरु शकशील, अगदी 5000 पाय-या पार केल्यावरही परत फिरलीस तरी चालेल. पण तुझं मत काय हे जाण. तुझी क्षमता आणि इच्छाशक्ती. बस्स. याशिवाय कोणाचाही विचार नको. कोणाचा सल्ला नको. गप्पा नको. शांतपणे चढ. अगदी दहा पाय-या चढल्यावर दम लागला तरी बस. चार तासांऐवजी पाच तास लागतील. एवढाच फरक. मी नव-याचा सल्ला मनात चांगला घोकून घेतला. माझ्या पुढच्या प्रवासात या सल्ल्यानंच वेळोवेळी साथ दिली.
आम्ही शिखर चढायला सुरुवात केली होती, ती वेळ थोडी चुकीची होती. कारण तोपर्यंत सूर्य चांगलाच तापला होता. गिर जंगल असा शब्दप्रयोग होत असला तरी या भागात हिरवळ फक्त नावालाच आहे. साधारण दोन हजार पाय-या चढेपर्यंत वाराही सोबतीला नव्हता. काही अंतरांनी येणारी पाणी, सरबताची दुकाने आणि त्यांनी उभारलेल्या अडोशाला तेवढी सावली असायची. त्यानंतर मात्र उन्हाचा कडक मारा. हजार पाय-या झाल्यावर माझ्या मनात गणित सुरु झाले. दहाहजार वजा एक हजार...म्हणजे अजून नऊ हजार. मी लगेच नव-याला सांगितलं, अजून नऊ हजार आहेत. त्यानं पुन्हा अनुभवाचे बोल सांगितले. मोजू नकोस. शांतपणे चढत रहा. पण मला अचानक थकल्यासारखं वाटू लागलं होतं. अगदी परत जावं ही भावनाही मनात आली. रात्रभर केलेला ट्रेनचा प्रवास, आधी दोन दिवसाची सगळी धावपळ, आणि सकाळी अगदी नावाला केलेला नाष्टा, यामुळे कमालीचा थकवा जाणवायला लागला. आम्ही ज्या दुकानाच्या सावलीत बसलो होतो, तिथे आणखी एक दुकानदार बसला होता. त्याचं दुकान पायरींचा एकहजार तिनशे टप्पा जिथे पूर्ण होतो, तिथे होतं. काही सामान घेऊन ते दुकानात जात होते. माझी
अवस्था ओळखून त्यांनी खूप आधार दिला. माझ्या मनातली भीती दूर केली. मन शांत रखो, महाराज का नाम लो, और चढो. आपको कुछ लगा तो हमारे यहा रहो, कोई बात नही. पर वापस मत जाना. त्याच्या आश्वासक शब्दांनी मला आणखी धीर आला. एव्हाना रात्री गुरुशिखरावर चढलेले गिरनारी परत यायला सुरुवात झाली होती. त्यांनीही शब्दांच्या रुपांनी आधार दिला. आराम करत चढण्याचा सल्ला मुख्य होता. हो ना हो ना करत तीन हजार पाय-यांचा टप्पा पार झाला. तेथील एका दुकानात मात्र मी फतकल मारुन बसले. अजून किती वर आहे रे बाबा, म्हणून नव-याला विचारलं. आमच्यासोबत फक्त एकच पाण्याची बाटली होती, आणि एक शहाळ्याच्या पाण्याची लहान बाटली. पाण्याची बाटली आम्ही तिथून भरुन घेतली. त्या दुकानदारानं त्यासोबत लिंबू सरबत दिले, छान गप्पांमधून मला धीर दिला. मुळात आम्ही जी वेळ निवडली ती अजिबात चुकीची नाही, असे ठामपणे सांगितले. तुमचे दर्शन छान होईल, महाराजांच्या आरतीला तुम्ही तिथे असाल, किती छान आहे बघा, म्हणत त्यानं माझी कळी खुलवली. शिवाय, रात्री बेरात्री कधीही खाली उतरा, येथे कसलीच भीती नाही. अगदी प्राण्यांचीही...हा विश्वास दिला. त्यासोबत परत येतांना काही वाटलं तर माझ्या दुकानात या. थांबा. असा आग्रही त्यांनी केला. यानंतर मात्र माझा गिरनार शिखर चढण्याचा उत्साह हा एक निर्धार झाला, आणि अजून किती बाकी आहे, हे गणित मोडीत काढत मी महाराजांच्या दर्शनाला निघाले. वाटेत जैन मंदिरं लागली. येथे मिळणा-या थंडगार पाण्यानं अधिक उभारी मिळाली. मधूनच थंडगार वारा यायचा. अगदी उभ्या डोंगराच्या कडा बघितल्या की मनात थोडी भीती डोकवायची, नेमकं तेव्हाच एखादा वयोवृद्ध गिरनारी समोर यायचा. जय गिरनारी...म्हणून उत्साह वाढवायचा.
त्यापैकी अनेकजण अनवाणी होते. काळ्या दगडाच्या पाय-या दुपारच्या कडक उन्हात किती तापल्या असतील, याची कल्पना करत मी त्यापैकी एका महिलेला शेवटी विचारलेच, आपको दर्द नही होता है. त्यावर ती हसून म्हणाली, नही, माताजीकी कृपा है....श्रद्धा आणि भाव. मी त्या महिलेला नमस्कार केला. जय गिरीनारी हा नारा आम्ही दोघींनी दिला. एकमेकींना नमस्कार करुन आपापला मार्ग पकडला. अंबाजी मातेचं मंदिर आहे, तिथे दोन-चार दुकानं आहेत. येथे नाष्ट्याची व्यवस्था आहे. मुख्य म्हणजे, तो रोपवेही याच टप्प्यापर्यंत येतो. आम्ही येथे दाखल झालो आणि एक घोषणा झाली, रोपवे चालू झाला. आम्ही दोघंही एकमेकांकडे बघून हसलो, कारण आता त्या सोयीचा आम्हाला काहीही उपयोग नव्हता. शांतपणे देवीचे दर्शन घेतले. त्या दुकानात पुन्हा पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या. येथे भजी, शंकरपाळ्या, जिलेबी असा नाष्टा होता. पण या अख्ख्या मार्गावर नैसर्गिक विधीची कुठेही सोय नाही. त्यामुळे मनासोबत पोटाचीही काळजी महत्त्वाची ठरते. म्हणूनच सोबत असलेल्या लिमनेटच्या गोळ्या, शेंगदाण्याचे लाडू आणि शहाळ्याच्या पाण्यावर सगळी मदार ठेऊन आम्ही दोघंही पुढच्या पाच हजार पाय-यांच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झालो.
महाराजांचे दर्शन न घेताच डोलीच्या सहाय्यानं
परतीचा प्रवास करावा लागणार या भीतीनं अंगाला घाम फुटला. पण पाच मिनिटानंतर पाय पूर्ववत झाला. मी एकदोन पाय-या चढून बघितल्या सर्व ठिक होतं. आता पुन्हा तेच धोरण, आस्ते कदम. येथेच मागून एक काठेवाडी आजोबा आले. शुभ्र पांढ-या रंगाचा फेटा आणि तसाच पोशाख. वय चेह-यावर दिसत होतं, पण माणूस ताठ. माझ्यामागून आले आणि सरसर पाय-या चढत वर गेले. मी शंभर पाय-या पार केल्या असतील तर ते दर्शन घेऊन परतलेही. मी विचारलं दादाजी, एज कितना है, त्यांना काही कळेना. मग विचारलं उमर, उमर कितना है...यावर हसून म्हणाले, अस्सी को दो-चार इधर उधर करलो...बेटा आप आरामसे चढो, कोई जल्दी मत करना, असं मला सांगत पुन्हा सरसर उतरुन गेलेही. मी त्यांना नमस्कार करत शेवटच्या पन्नास पाय-या पार करत होते. एव्हाना चार वाजून गेले. गुरु शिखरावरील मंदिरात साडेचारला आरती होते. त्यासाठी मंदिर अर्धातास बंद ठेवतात. त्यामुळे आम्हाला बघून तिथे असलेले पोलीस ओरडायला लागले, चलो जल्दी...नही तो आधा घंटा रुको...अर्थातच एव्हाना मला समजले होते, माझ्यासाठी हा जल्दी शब्दच नव्हता. छाती फुटेस्तोव दमणे, या शब्दाचा वास्तव अनुभव मी घेत होते. तो अंतिम टप्पा अगदी हळूवार पार केला. दहा बाय बारा चौरस फुटाची जागा, त्यात बांधलेले मंदिर. समोर आमचे आराध्य दैवत, श्री दत्त महाराज. त्यांच्या पादुकांपुढे नतमस्तक झालो. एका उभ्या सुळक्यावर या एवढ्याश्या जागेत मंदिर बांधणा-यालाही मनोमन नमस्कार केला आणि भरलेल्या डोळ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. पुन्हा हा हजार पाय-या असलेला सुळका उतरला. त्याच्याही आणखी खाली तीनशे पाय-या उतरुन अखंड धुनीचे स्थान आहे. तिथे दर्शन झालं, तेव्हा सायंकाळचे पाच वाजले होते. इथे कधीही गेलं, तरी दत्त भक्तांसाठी प्रसाद उपलब्ध असतो. आमचीही ताटे मांडली गेली. भात, कढी, भाजी, शिरा, ढोकळा. जेवढं हवं तेवढं घ्या. आम्ही अगदी घासभर प्रसाद घेतला. हात धुवायला पाणीही जपून वापरण्याच्या सल्ला मिळाला. कारण येथे पाण्याची सोय नाही. सगळा कारभार पावसाच्या साठवलेल्या पाण्यावर. येथेच आमचा एक छोटासा ग्रुप झाला. परतीच्या प्रवासात आम्ही काहीजण सोबत होतो. साधारण साडेपाच्या सुमारास पुन्हा त्या इंग्रजी व्ही मधला चढाईचा टप्पा सुरु झाला. या दिड हजार पाय-या चढतांना अक्षरशः दहा-दहा मिनिटांनी बसकण मारावी लागत होती. अगदी उभ्या असलेल्या या पाय-या पार झाल्या तेव्हा सायंकाळी सहा वाजत आलेले. अस्ताला जाणा-या सूर्यनारायणानं सर्व आभाळ व्यापलं होतं.
त्याच्या लालसर छटा मोहात पाडत होत्या. एरवी, कुठे असतो, तर मोबाईल काढून भराभर फोटो काढले असते. पण ही वेळ वेगळी होती. पाय-या उतरतांना घाई करु नका, सावकाश उतरा, चढण्यापेक्षा पाय-या उतरतांना त्रास होतो, असा सल्ला आमच्या ग्रुपमधील एका अनुभवी व्यक्तीनं दिल्यावर मी अधिकच सावकाश उतरायला लागले.
जैन मंदिरे येईपर्यंत किर्र अंधार झालेला. वाटेत लाईटची व्यवस्था आहे. पण काही वळणावर मात्र काळोख. आजुबाजुला गिरचे जंगल आहे, ही जाणीव झाल्यावर मनात भीतीची चाहूल लागायची. पाय-या उतरत असतांना माझा वेग जरा वाढला. नव-याला एक सोबत मिळाली, ते दोघं गप्पा मारत उतरत असतांना मी कधी पुढे आले हे कळलेच नाही. जवळपास पाचशे पाय-यांचे अंतर पडले. एका वळणावर अंधार दिसला आणि मला, मी एकाकी असल्याची जाणीव झाली. आसपास किर्र अंधार. अचानक भीतीचा एक काटा अंगावरुन फिरला. हताशपणे खाली बसले. पुढची दहा मिनीटं हातातील काठी वाजवत बसले. मनात कोणकोणते विचार आले हे विचारु नका. दहा मिनीटांनी नवरा आणि ते गृहस्थ आले. मी एकटीच बसले होते. माझा घाबरलेला चेहरा बघून दोघंही समजले. दोघंही पाय-यांवर बसले. सोबतचे गृहस्थ अनेकवेळा या गुरुशिखरावर येतात, ते अनुभवानं म्हणाले, मान्य आहे, हे जंगल आहे. पण इथे काहीही भीती नाही. घाबरु नका. काहीही होणार नाही. चला, सावकाश उतरुया. दरम्यान आम्ही चढतांना जिथे थांबलो होतो, त्या तेराशेव्या पायरीवरील दुकान उघडे होते. ते गृहस्थ आणि त्यांची पत्नी पुढे आले. बसण्याचा आग्रह केला. काही हवं का
म्हणून चौकशी केली. आम्ही त्यांचे आभार मानले. पुढच्या हजार पाय-या पार करतांना पाय प्रचंड लटपटत होते. हातातील काठीवर सर्व मदार होती. बरोबर रात्रीचे साडेदहा वाजता गुरु शिखराच्या पहिल्या पायरीवर आम्ही उभे होतो. शरीर थकले होते. पाय उचलत नव्हते. पण मन मात्र उत्साहाच्या वेगळ्या लाटेवर स्वार झाले होते. सकाळी गुरु शिखर चढायला सुरुवात केली त्याच्या अगदी उलट स्थिती. आम्ही खाली उतरलो आणि आमच्या पाठोपाठ खुपसे डोलीवाले आले. गुरुशिखर चढतांना ब-याचवेळा ही मंडळी मध्ये येऊन डोली करणार का म्हणून विचारत होती आणि आम्ही हात जोडून नकार देत होतो. त्यांनी आमचे कौतुक केले, तिथूनच जाणीव झाली, आज आम्ही काय केलं होतं त्याची. सकाळी सोबतीला घेतलेल्या काठ्या जमा करायला दुकानात गेलो, तेव्हा तेथील ताईही आमचे कौतुक करु लागली. रात्री अकरा वाजता आम्ही जिथे उतरलो होतो, त्या आश्रमात गेलो. गरम गरम जेवण करुन आमच्या रुममध्ये आलो, तर तो थकवा, मरगळ कुठल्या कुठे पळून गेलेली. रुमच्या अगदी समोर गुरुशिखर दिसत होतं. त्या शिखराकडे बघत डोळे पाण्यानं भरुन आले. मनातील श्रद्धा ही चिकाटी कशी होते, आणि त्यातून यश कसं मिळतं याचा अनुभव आम्ही घेतला होता. यासाठी त्या लुकलुकणा-या गुरुशिखराला पुन्हा नमस्कार करत शतशः आभार व्यक्त केले.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अरे वा तुझ्या वर्णन वाचून आपणही लवकर गिरनार करू या असं वाटू लागलंय, धन्यवाद सई प्रेरणा दिलीस
ReplyDeleteYou done it Sayee.
ReplyDeleteझकास.
आता गिरनार परिक्रमा करून बघ
khup chhan lekh
ReplyDeleteEnjoy
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखूप सुंदर प्रवास वर्णन केले आहे.प्रत्यक्ष गिरनार सर करीत अहित आहे असे जाणवले, दत्त महाराज तुमच्या पाठीशी आहेत याचाच हा प्रत्यय आहे,त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहो.श्री गुरुदेव दत्त..
ReplyDeleteआपली महत्वाकांशा,इच्छाशक्ती,आत्मविश्वास,देवावरील श्रध्दा,आपण अशक्य असलेलं.शक्य करुन दाखवलं,अभिनंदन!!
ReplyDeleteश्री दत्त महाराज शक्ती व श्रद्धेचा अनुभव
ReplyDeleteखूपच छान माहितीपूर्ण वर्णन
ReplyDelete